Friday, July 22, 2011

अनंताची आरती Arati Anantachi

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।

नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।

अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।

रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।

मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

Labels:

Monday, May 30, 2011

शालेय नेतृत्व

"शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ऊर्जेचा विनियोग समान शैक्षणिक उद्दिष्टांसाठी व्हावा ह्या दृष्टीने सुरू असलेली व्यवस्था म्हणजे शालेय नेतृत्व' अशी विकिपीडियाने शालेय नेतृत्वाची सुंदर व्याख्या केलेली आहे.

"योजकस्तत्र दुर्लभः' ह्या उक्तीप्रमाणे हे सारे घडवून आणणारा समर्थ मुख्याध्यापक लाभणे हे शाळेचे खरे भाग्य असते. हल्ली मुख्याध्यापकाचे पद शिक्षकांना बहुधा निवृत्तीच्या जवळ आल्यावर मिळते आणि काही करून दाखवावे अशी ऊर्मी तोपर्यंत विरून गेलेली असते. त्यातही मुख्याध्यापकाचे पद ग्रहण करणारी व्यक्ती उत्साह टिकवून धरणारी असली तरी शिक्षण खात्याचे निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकारी, शाळेचे सत्तालोलुप विश्वस्तमंडळ आणि चंगळवादाच्या अंमलाखाली असलेले शिक्षक - पालक आणि विद्यार्थी मुख्याध्यापकाची सत्त्वपरीक्षा पाहतात. परिणामी ह्या सर्वांना पुरून मुख्याध्यापकाची सर्जनशीलता शिल्लक उरलीच तर ती "मुख्य अध्यापक' म्हणून खर्च न होता "मुख्य प्रशासक' म्हणून तिचा वेच होण्याची शक्यता जास्त असते.

परंतु विक्रमादित्याच्या सिंहासनाचे जसे स्थानमाहात्म्य असावे तसे मुख्याध्यापकाच्या खुर्चीचे आहे आणि अनेक कर्तृत्ववान शिक्षक त्यांना मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचं सोनं करतात आणि आदर्श मुख्याध्यापकीचा वस्तुपाठ घालून देतात. त्यातही अनेक लोकप्रिय आणि ख्यातकीर्त मुख्याध्यापकांनी आपले विचार लिहून प्रसिद्धही केलेले असल्याने ते "पूढिलांना' स्फूर्तिप्रद ठरत आहेत. इंग़्रजी आणि मराठीतही अशी अनेक पुस्तके आहेत. विविध जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाणे मुख्याध्यापकाने कसे टाळावे आणि आपले काम नेटाने कसे पुधे न्यावे ह्याच्या विविध युक्त्या पॉल ब्लूम ह्यांच्या Surviving and succeeding in senior school management: getting in and getting on ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत.

श्री. ल. ग. घटे ह्यांचे "मुख्याध्यापकी : एक शास्त्र आणि कला' हे हर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तकही असेच स्फूर्तिप्रद आहे. घटेसरांच्या ह्या पुस्तकाला भारतीय शिक्षण मासिकाचे संपादक श्री. मधुकर पेठे सरांची सुंदर प्रस्तावना आहे. "मुख्याध्यापकांसमोरील जटिल प्रश्न', "शाळेला उठाव आहे हे कसे जाणावे?' "शाळेला उठाव कसा आणावा?' "शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी करावयाचे प्रयत्न' "भावनिक स्पर्श आणि ओलावा निर्मिती' "पैसा मिळवणे व वापरणे' ही ह्या पुस्तकातील काही प्रकरणांची शीर्षके पाहिली तरी पुस्तकाचा आवाका आणि उपयुक्तता ध्यानात येईल.
मुख्याध्यापकाने आपल्या शाळेसाठी नेमके काय करावे ह्याचा खात्रीचा फॉर्म्यूला देता येणे शक्य नाही. पण अशा तऱ्हेच्या पुस्तकांमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकेल.

Labels:

Tuesday, May 17, 2011

वर्गपाठ किंवा गृहपाठ कसा द्यावा?

सर्वसामान्य शाळांमधून संमिश्र क्षमतेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग केलेले असतात. ह्या विभिन्न क्षमतेच्या मुलांना एकाच तासिकेत शिकवण्याची कसरत शिक्षकाला करावी लागते. विशेष वर्ग घेतल्याखेरीज विद्यार्थ्यांना क्षमतानिहाय गटांमध्ये शिकवणे शक्य नसते.

परंतु स्वाध्याय देताना शिक्षकांना असे स्वातंत्र्य घेता येणे शक्य आहे. Assignment Tiering च्या तंत्राचा विचार आणि उपयोग शिक्षकांनी अवश्य करावा.
विद्यार्थ्यांना शिक्षकाने जे शिकवले आहे त्याचे दृढीकरण व्हावे हा वर्गपाठ किंवा गृहपाठ देण्यामागील मुख्य उद्देश असतो. विद्यार्थ्याने हा अभ्यास स्वखुशीने आणि प्रामाणिकपणे केल्यास त्याला हा लाभ अधिक चांगल्या रीतीने मिळतो.

Assignment Tiering करणारे शिक्षक एकाच धड्यावर तीन ते चार प्रकारचे वर्गपाठ/गृहपाठ तयार करतात. प्रत्येक आवृत्तीची काठिण्यपातळी वेगवेगळी असते. विद्यार्थ्याला जी आवृत्ती आवडेल ती घेऊन त्यातील स्वाध्याय सोडविण्याची मुभा दिली जाते.

- स्वाध्याय स्वतः निवडल्याने तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्याचा कल असतो.
- विद्यार्थ्याने स्वतःला झेपेल अशी पातळी निवडल्याने जास्त यश त्याच्या पदरी पडते व अशा यशाची त्याला चटक लागते.
- हुशार विद्यार्थी जास्त कठीण पातळीचा स्वाध्याय निवडणे प्रतिष्ठेचे मानतात आणि त्यांच्या क्षमतांना आव्हान मिळाल्याने अभ्यासातील त्यांचे स्वारस्य वाढते.

अर्थातच ह्यासाठी शिक्षकाला थोडी जास्त तयारी करावी लागते.

- ह्या उपक्रमासाठी शालेय पातळीवर सर्वसंमत धोरण असणे फायदेशीर असते. शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत शाळा संचालन समितीची मान्यता घेता येते. विशेषतः मुद्रणासाठी जो थोडाफार जास्तीचा खर्च येतो त्यासाठी पूर्वसंमती घ्यावी.
- उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत पालकांना विश्वासात घेणे इष्ट असते.
- एकाच पाठावर विविध काठिण्यपातळी असलेले उपयुक्त स्वाध्याय कसे तयार करावेत ह्याचे तंत्र शिकून त्याचा सराव शिक्षकांना करावा लागतो. 
- कमीत कमी वेळात स्वाध्यायाच्या जास्तीत जास्त आवृत्त्या आणि प्रती तयार करण्याचे काम हातावेगळे कसे करावे हे सरावाने जमू लागते.
- विविध आवृत्त्यांच्या पुरेशा प्रती तयार ठेवाव्या लागतात आणि कोणता विद्यार्थी कशा प्रकारचे स्वाध्याय निवडतो आहे ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे.
- ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागलेली आहे अशांकडे वैयक्तिक लक्ष पुरवून त्यांना अधिकाधिक आव्हानात्मक स्वाध्याय सोडविण्यास उद्युक्त करावे.

Labels:

Tuesday, December 21, 2010

ये दुख सहा ना जाए ...

तरुण गायकांचं गाणं जोरकस असतं, ताजंतवानं असतं आणि जेव्हा ते सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या स्वरमंचावर गातात तेव्हा अर्थातच तयारीचंही असतं. पण त्यात मध्यमवयीन गायकाच्या गाण्यात आढळणारं "दर्द' जाणवत नाही. की ही केवळ आपली एक समजूत आहे?

भाबडेपणा कमी असलेले आणि लोकप्रिय मतप्रवाहात सहजासहजी वाहून जाण्यास तयार नसलेले अनेक लोक अशा गोष्टी मान्य करीत नाहीत. तासंतास घोटल्याने गाण्यात दर्द उतरेल ही समजूतही अनेक विचारवंतांना मान्य नाही. गुरुची लहर म्हणून शिष्याने अघोरी रियाझ करण्याला अर्थ नाही, त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो असे ते मानतात.

हुकमी कारुण्य किंवा दर्द गाण्यात आणण्याचा काही फॉर्म्युला आहे का? (किंबहुना फॉर्म्युलाच आहे आणि ज्याला तो चांगला जमला तो आपल्याला दर्दी वाटतो, असे आहे का? ). स्वभावोक्ति करणारे गाण्याचे नेमके शब्द, आवाजाचा विशिष्ट लगाव, कातरता दर्शविणारा कंप, आणि एखाद्या संस्कृतीच्या परंपरेत अशा दर्दी भावनांशी जोडले गेलेले विशिष्ट स्वर किंवा तशा मानल्या गेलेल्या विशिष्ट स्वरावली यांचे रसायन जुळून आले की इच्छित परिणाम साधला जातो असे हे मत आहे. पण हे रसायन जमवून आणण्याची हातोटी साध्य करणे ह्यालाच तर तपश्चर्या म्हणत नसावेत ना?  

अलिकडेच  ऍटलांटिक मंथलीमध्ये '3rd minor' ची महती सांगणारा ह्याच विषयावरचा लेख वाचनात आला होता. सायंटिफिक अमेरिकनमधील एका अहवालाचाही त्यात हवाला देण्यात आलेला आहे. लोकसत्तेमध्येही (२८ सप्टेंबर २०१०) अरुण पुराणिक ह्यांनी ‘स्वरसम्राज्ञीच्या श्रेष्ठत्वाचा मागोवा’ ह्या लता मंगेशकर ह्यांच्यावरील गौरवपर लेखात कोमल गांधाराचा उल्लेख केलेला आहे. अर्थातच हे स्वर नेहमीच करुण रसाशी निगडित असतात असे नाही. प्रतिभाशाली संगीतकार त्यांचा वापर इतर इतर रसांच्या परिपोषासाठीही करतात.

काही गाणी, काही बंदिशी त्यातल्या काव्याचा परिपोष सुयोग्य संगीतामुळे झाल्यामुळे असेल, पण पछाडत राहतात. भीमसेनजींनी उस्ताद रशीदखान ह्यांना केलेल्या फर्माईशीवरून त्यांनी सादर केलेली "याद पिया की सताए', पं. राजन साजन मिश्रा ह्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या उस्ताद अल्लारखां ह्यांना अर्पण केलेली रूपक तालातली "ख्वाजा मुइनुद्दिन पीर अजमेरवाले',  ह्या बंदिशी कदाचित त्यांच्या प्रासंगिक संदर्भामुळे असेल पण नेहमी आठवत राहतात. "याद पिया की सताए' तर कित्येकांनी चांगली गायलेली आहे. अलिकडे कौशिकीने गायलेली आहे, वडाली बंधूंनीही गायलेली आहे. पण...

पछाडणाऱ्या गाण्यांविषयी "माझिया मना' ह्या ब्लॉगवर सौ. अपर्णा संखे ह्यांनी एक चांगली मालिका लिहिलेली आहे ती अवश्य वाचावी. चंद्रशेखर महामुनी ह्यांनीही आर्त गाण्यांवर सुंदर लेख लिहिलेला आहे. बेगम अख्तर ह्यांच्याविषयी लिहिताना धनंजय ह्यांनी "दंश'  नावाची बोरकरांची कविता उद्‌धृत केलेली आहे. 'Thy tooth is not so keen..' असे झोंबऱ्या वाऱ्याला शेक्सपिअर सांगतो त्याची आठवण झाली.

कदाचित काही एक वयानंतर गायकाला माणसाच्या कृतघ्नपणाचा अनुभव आला की मगच असा "दंश' तुलनेने सुसह्य होत असावा आणि गाण्यात तो दर्दीला आविष्कार होत असावा. बेगम अख्तर ह्यांनी गायलेली ही गझल माझ्या मित्राने तो मृत्यूशय्येवर असताना मला ऐकवली होती आणि ती विसरणे खरोखरच अशक्य आहे.

 

 

Labels:

Wednesday, September 1, 2010

मुलांनी काढलेली चित्रे - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 16

मुलांनी हुबेहूब चित्रे काढण्यास शिकावे म्हणून हल्ली लहानपणीच त्यांना खास शिकवण्या लावल्या जातात. हे योग्य आहे का? की मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निरर्थक चित्रे काढू द्यावीत?

पालकांनी (आणि शिक्षकांनीही) हे समजून घ्यायला हवे की चित्रकला म्हणजे शारीरिक कसरत किंवा कौशल्य (कारागिरी) नव्हे. आत्मप्रकटीकरणाची ती एक पद्धत असून तिचे स्वतःचे असे तर्कशास्त्र आहे.  संशोधकांनी मुलांच्या चित्रांमधून अर्थ शोधण्याचे प्रयत्न अनेक अंगांनी केलेले आहेत. पण शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांच्या चित्रातून अर्थ शोधणे किंवा त्यांना निरर्थक म्हणणे अन्यायकारक आहे कारण वयाच्या सातव्या ते आठव्या वर्षापर्यंत मुलाने वस्तुनिष्ठ वास्तवाचे चित्रण केलेले असले तरी ते कमालीचे व्यक्तिसापेक्ष असते. कारण मूल वास्तववादी बनू पहात असले तरी त्याची व्यक्तिसापेक्षता (अहंभाव) त्याच्या आड येत असतो. मुलांच्या चित्रातले जग वास्तवातले जग नसून त्यांच्या कल्पनेत त्यांनी वास्तवाची जशी कल्पना केलेली असते तसे ते असते. ही सृष्टिकर्त्याची भूमिका आहे. म्हणून मुलांच्या चित्रांना बौद्धिक पातळीवरील वास्तववादी चित्रे (दृश्य पातळीवरील नव्हे) असे म्हणतात. (उदाहरणार्थ, कप अपारदर्शक असला तरी त्यात भरलेले दूध मुले चित्रात दाखवतात.)  म्हणूनच पिआजे आणि इन्हेल्डर "लहान मुले अत्यंत वास्तववादी असतात' असे प्रतिपादन करतात.

डोळ्यांसमोरचा देखावा बदलत असला तरी मुले एकाच प्रकारचा देखावा (सूर्य, डोंगर वगैरे) काढतात. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे असा आदर्श देखावा (चित्र नव्हे) असावा हा आग्रह त्यातून व्यक्त होतो. आणि दुसरे म्हणजे संभवतः मूल दबावाखाली असल्याने तपशील हरवलेले साचेबंद चित्र ते काढीत रहाते.

वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की लहानपणी चित्रकलेची "शिकवणी' लावणे अनावश्यक तर आहेच शिवाय मुलाची मुस्कटदाबी करण्यासारखे अन्यायकारकही आहे. मुलांना आत्मप्रकटीकरणाचा एक मार्ग म्हणून हवी तशी चित्रे काढू देणे इष्ट होय.

लहान मुलांच्या रेखाटण्यांमागील प्रक्रिया कशी असते? चित्रकाराची कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित होण्यासाठी प्रयत्न करावेत का?

बौद्धिक पातळीवर चित्रकारासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मुलांमध्ये असतातच. उदाहरणार्थ, डोळ्यांच्या, शरीराकृतींच्या अक्षरेषा कलत्या केल्या तरी मुलांच्या ते ध्यानात येते (वय वर्षे 3) असे गुडनाव आणि फ्राईडमन (Learning to Think) ह्यांनी दाखवून दिलेले आहे. मुलांची चित्रकला कशी विकसित होते ह्याचे सोदाहरण विवेचन करणारा एक उत्तम लेख येथे आहे.

मुले दृश्याबाबत फारच संवेदनशील असतात. त्यांची अवास्तव वाटणारी चित्रे सूक्ष्मपणे पाहिल्यास त्यात लपलेली संगती दिसू शकते. काय काढायचे हे त्यांना माहीत असते पण कसे काढायचे हे त्यांना माहीत नसते. ह्या दोहोतील दरी सांधण्याच्या दृष्टीने त्यांचे चित्रकलेचे नियम तयार होतात. म्हणूनच शारीरिक क्षमता/कौशल्ये वयपरत्वे विकसित होईपर्यंत त्यांच्यावर प्रशिक्षणाचे ओझे लादू नये अन्यथा आपल्या बौद्धिक पातळीवरील क्षमतांविषयी मुले साशंक होतील.

पिआजे ह्यांनी मुलांच्या चित्रातील नियमनाचे कारकत्व "मानसिक प्रतिमा' ह्या संकल्पनेला दिलेले आहे. मानसिक प्रतिमा अनुकरणावर आधारलेली असते. अनुकरण कसे करावे हे मुले शिकतात. अनुकरण स्मृतीच्या बॅंकेत रहाते. ह्या स्मृतीचे पुन्हा अनुकरण म्हणजे मानसिक प्रतिमेचे रेखाटन. वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ही स्थिती असते. दुसऱ्या वर्षापर्यंत हे अनुकरण प्रतिनिधित्वाची पातळी गाठते. ह्यामुळे चित्र काढणाऱ्या मुलाकडे मनातील आंतरिक प्रतिमा तयार असते. म्हणूनच बाहेरील प्रतिकृतीचा त्यांच्या चित्रावर खूपच कमी परिणाम असतो. यामुळेच प्रतिकृतीशिवाय चित्र काढणे मुलांना अशक्य वाटत नाही.

मुलांना इतरांनी काढलेली चित्रे रंगविण्यास द्यावीत का?

मुलांना इतरांनी काढलेली चित्रे रंगविण्यास देणे चुकीचे आहे असे अनेक चित्रकारांचे आणि मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. "कलरिंग बुक्स' ही अंतिमतः घातक असून इतरांनी काढलेली चित्रे मुलांना रंगवायला देणे हे प्लॅस्टिकचे बोंडले चोखायला देण्यासारखे आहे असे त्यांना वाटते. मुलांना कुठेेतरी गुंतवून ठेवायचे म्हणून चित्रे रंगविण्यास देऊ नये असा ह्या म्हणण्यामागील आशय आहे.
असे असले तरी चित्र रंगविण्यासाठी मुलांनी केलेली रंगांची निवड भावनिकदृष्ट्या लक्षणीय असते आणि अशी रंगांची निवड हा मनोवैज्ञानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

Labels:

Sunday, July 4, 2010

अमूर्त कल्पना आणि प्रश्न समजून घेण्याची क्षमता - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 15

शालेय वय होण्याआधी लहान मुलांना प्रश्न विचारणे योग्य आहे का?   

अध्ययनप्रक्रियेत आत्मकेंद्री स्वभावावर मात करून सामाजिक सुसंवाद साधणे का आवश्यक आहे हे आपण पाहिले आहे. लहान मुलांच्या आत्मकेंद्री स्वभावामुळे ज्ञानग्रहणात अडथळे येतात हे पिआजे ह्यांचे म्हणणेही आपण ह्या अगोदर पाहिले आहे. ह्या म्हणण्यास वायगोत्स्की ह्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते अमूर्त संकल्पना तयार करण्याची अगर जाणून घेण्याची क्षमता लहान मुलांमध्ये असते. मोठी माणसे परकीय भाषा शिकताना होणाऱ्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती आहे. यामुळे प्रथमतः निरर्थक आणि पोकळ वाटणाऱ्या गोष्टी मुलांकडून करवून घेतल्या तरी शालेय जीवनाच्या संदर्भात त्यांना अर्थ प्राप्त होतो.

वाचन आणि अध्यापन यातून अशा प्रथमतः निरर्थक वाटणाऱ्या संकल्पनांना अर्थ प्राप्त होतो. यातूनच बालोद्यानाच्या शाळेची कल्पना अस्तित्वात आली व विकसित झाली. सारांश; लहान मुलांना संकल्पनातील अमूर्तता अडचणीची वाटत नाही. पुढे पिआजे यांनी ह्या म्हणण्याला मान्यता दिली. वायगोत्स्की यांच्या मतानुसार, शालेय वयाआधी शास्त्रीय ज्ञानाशी संबंधित अमूर्त कल्पना मुलांना समजत नसल्या तरी व्यावहारिक जीवनातील तात्कालिक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रातिभ संकल्पनांचे मुलांना वैचारिक पातळीवर आकलन होते. (किंबहुना अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी मोठ्या वयातही त्याचे संभाव्य व्यावहारिक उपयोजन हा हेतू प्रभावी असल्याखेरीज त्या समजणे कठीण होते व त्यासाठी तयार केलेली मूर्त प्रारूपेही निरुपयोगी ठरतात. डोनाल्डसन यांनीही लहान मुलांच्या बाबतीत ह्या मुद्याचे आग्रही प्रतिपादन केलेले आहे.)

लहान मुलांना प्रश्न विचारताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायला हवे?

मार्गारेट डोनाल्डसन ह्यांनी मानव हा प्राणी असल्याचे विचारात घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. व ह्या प्राण्याच्या दृष्टीने निरर्थक असलेले प्रश्न मुलांना विचारू नयेत असे मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांना आपण जे उपक्रम करण्यास देतो त्यांची निवड करताना ह्याचे भान असायला हवे. कृती करण्यापूर्वी मुलाच्या मनात असलेले विचार आणि कृती करताना असलेले विचार ह्यामध्ये नैसर्गिक एकसंधपणा असायला हवा. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या, प्रश्नाशी संबंध नसलेल्या कृतीवरही मूल लक्ष केंद्रित करते. (उदाहरणार्थ, बाईंनी हात हलवल्यास, डोके खाजवल्यास ह्या कृतींचा संबंध मूल प्रश्नाशी जोडण्याचा प्रयत्न करते). शिक्षकाच्या बोलण्यातील हेतू, भाष्य, सूर, पसंती/नापसंती इत्यादी भाव जाणून घेण्यासाठी मूल भाषाबाह्य संदर्भांचा आधार घेण्याची धडपड करते. म्हणूनच मुलांना विचारण्याचे प्रश्न काळजीपूर्वक तयार करावे लागतात आणि विचारतानाही काळजी घ्यावी लागते.

पिआजे यांनीही ह्या मुद्यावर विचार केलेला आहे. "कुतूहल हा (बाल) मनाच्या गरजांचा दृश्य परिणाम आहे' असे त्यांनी म्हटले आहे. "कोठे' हा प्रश्न मुलांना सर्वात सोपा वाटतो. "काय' हा नंतर समजतो. "का' हा प्रश्न समजण्यास कठीण जातो. "कसे' हा प्रश्न तर फारच कठीण आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. ज्या प्रश्नात एखाद्या साध्याच्या दिशेने काही हालचाल अभिप्रेत आहे असे प्रश्न निवडावेत असे ते म्हणतात. प्रश्न, "प्रेरणा आणि उद्देश' ह्यांनी परिपूर्ण हवा.

सर्व वस्तूंना जीव असून त्यांना हेतू, भावना वगैरे असतात अशी मुलांची धारणा असते. त्यामुळे जैविक दृष्टीने प्रश्नातील घटनेची सत्यता पडताळण्याचा मूल प्रयत्न करते. "योगायोग' ही संकल्पना लहान मुलांना समजू शकत नाही. (खरंतर मोठ्या माणसांपैकीसुद्धा फारच थोड्या लोकांना योगायोग म्हणजे काय हे समजते.)

वस्तूच्या नित्यत्वासारख्या सोप्या वाटणार्या कल्पना आणि युद्धासारख्या सामाजिक संदर्भ असलेल्या अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी योग्य वय होणे आवश्यक असते असे पिआजे ह्यांनी आपल्या बोधन विकासाच्या टप्प्यांचा सिद्धान्त मांडताना म्हटले आहे.

Labels:

Thursday, July 1, 2010

बालमानसशास्त्र आणि अध्ययनप्रक्रिया - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 14

लहान मुले शिकतात म्हणजे काय होते? बालमानसशास्त्रातील आधारभूत संकल्पना आणि लहान मुलांच्या शिकण्याचा काय संबंध आहे?
शिकणे म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता येणे. विचारांची किंवा क्रियांची मालिका कशी असावी हे एखादे मूल (किंवा व्यक्ती) तर्कशुद्ध विचारातून ठरवू शकते. असा विचार करण्याची क्षमता सामाजिक सुसंवादातून साध्य होते. मुले एकमेकांशी किती बोलतात, एकमेकांमध्ये किती मिसळतात किंवा बाई त्यांच्याशी किती बोलतात ह्यावर पूर्वप्राथमिक वर्गात हा सुसंवाद अवलंबून असतो. ज्या मुलांना इतर मुलांशी (किंवा माणसांशी) बोलण्याची, त्यांच्यात मिसळण्याची संधी मिळत नाही त्या मुलांमध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता लवकर विकसित होत नाही.

असे का घडते?
अनुभवातील वास्तवाची सापेक्षता आणि वैयक्तिक दृष्टिकोन ह्यांची तुलना करून त्यातील अन्योन्य संबंध मूल सामाजिक सुसंवादातून ताडून पहात असते व तेच त्याचे शिक्षण असते. सापेक्षतेसाठी त्याला अन्य व्यक्तीच्या त्याच अनुभवावरील प्रतिक्रियेची गरज भासते. स्वतःची प्रतिक्रिया दुसऱ्याच्या प्रतिक्रियेशी ताडून पहाण्यासाठी हा “दुसरा कोणीतरी” हजर असावा लागतो.

शिकण्यासाठी सामाजिक सुसंवाद अनिवार्य आहे का?
कोणत्याही क्षेत्रात जाणून घेण्याची (ज्ञानग्रहणाची) प्रक्रिया ही सुसंवादाची प्रक्रिया असते. ह्या सुसंवादात, शिकणाऱ्याच्या अहंभावाचा लोप होतो. किंबहुना आपल्या अहंभावाचा लोप होऊन त्याला एखाद्या वस्तुनिष्ठ संदर्भाचे तादात्म्य लाभते तेव्हाच आपण काही शिकू शकतो. (एखादे कठीण गणित/उदाहरण आपल्याला समजल्यावर देहभान हारपण्याचा क्षण कसा येत असेे ते आठवून पहा. आपण जेव्हा काही समजून घेत असतो तेव्हा हीच प्रक्रिया कमी-अधिक उत्कटतेने घडत असते. ती अनायासे घडत असल्याने प्रत्येकवेळी ती आपणास जाणवत नाही इतकेच.)  

पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा ह्या संकल्पनेशी कसा संबंध आहे?

आपल्या (किंवा मुलाच्या) मनाने तर्काच्या आधारे विविध संबंधांचे (उदाहरणार्थ, दृश्य-द्रष्टा संबंध) केलेले अनुमान हे ह्या सुसंवादाचे (साध्याचे) एक साधन असते आणि तो त्याचा परिणामही असतो. जन्मल्यापासून ह्या साधनेला सुरुवात होते. बाई वर्गात मुलांशी गप्पा मारत असतात त्यावेळी त्यांना ह्या साधकाच्या (मुलाच्या) सिद्धतेचा अंदाज आणि पडताळा घेता येतो.

वरीलप्रमाणे सुसंवादाची अधिकाधिक संधी देणाऱ्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता अर्थातच जास्त असते. ह्या सुसंवादाला पोषक असे पर्यावरण निसर्ग, व्यक्ती आणि वस्तू ह्यांच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यावर पूर्वप्राथमिक शिक्षणाचा भर असायला हवा. 

वैयक्तिक बाबी आणि सामाजिक बाबी ह्यांच्यामधील फरक न कळल्याने सुसंवाद साधण्यात अडथळे येतात (मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे खरे आहे). हे अडथळे फार वाढले की सामाजिक स्तरावरील ह्याचे प्रकटीकरण भांडणांमधून दिसते तर वैयक्तिक स्तरावर अडथळ्यांचे अस्तित्व उघड जाणवले नाही तरी ज्ञानग्रहणातील असमर्थतेतून ते व्यक्त होतात.

Labels: