Sunday, December 20, 2009

लेखनकलेची आराधना

ईश्वराच्या आराधनेसाठी तंत्रांची निर्मिती ही भारताची सिद्ध परंपराच आहे. लेखनासारख्या एखाद्या कलेसाठीही तंत्रज्ञानाची कास उपयुक्त ठरत आहे. लेखकांना उपयुक्त अशी वायरायटर सारखी अनेक सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत परंतु बहुतांशी ती लिहिलेल्या मजकुराचे वर्गीकरण आणि व्यवस्थापन करण्यासाठी आहेत.

विद्यार्थ्यांना आणि नवोदित लेखकांना ब्लॉग्ज लिहिण्यामुळे आणि सोशल नेटवर्क साईट्‌सवर लेखन केल्यामुळे लेखनाचा चांगला सराव होतो आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढीस लागतो असे निदर्शनास आले आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडमधील तीन हजार विद्यार्थ्यांची पाहणी केली असता जी मुले ब्लॉग्ज लिहितात त्यांच्यापैकी एकसष्ट टक्के आणि जी मुले सोशल नेटवर्किंग साईट्‌सवर लिहितात त्यांच्यापैकी छप्पन्न टक्के मुलांमध्ये असा आत्मविश्वास विकसित झाल्याचे आढळले. ऑनलाइन लेखन करणारी ही मुले कथा, पत्रे, दैनंदिनी आणि गीते लिहिण्यातही तरबेज झाल्याचे आढळले.

संशोधनाचा हा दावा अर्थातच सर्वांना मान्य होण्यासारखा नाही. इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि संगणक अशा यंत्रांमुळे सर्जनशीलतेची हानि होते असे बऱ्याच जणांचे मत आहे. असे असले तरी आता "लेखन' ही क्रियाच संगणकाशी निगडित झाल्याने ह्या तंत्रज्ञानाच्या आधारे लेखनाचा सराव विद्यार्थ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.

Wednesday, December 16, 2009

शिस्त लावण्याचे उपाय - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 12

विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?
विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत. 'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची संकल्पना शिक्षणक्षेत्रात आली. "अथ आत्मानुशासनम्‌' अशा आदर्शवादापासून समाज दूर झाला की शिक्षकाचा नैतिक अधिकार स्वयंसिद्ध रहात नाही त्याला उसन्या पेडस्टलची किंवा दंडाधिकाराची गरज भासते.
मानसशास्त्रातील विविध मतप्रवाहांचे विविध काळी प्राबल्य होते असे आढळते. मानवी वर्तणुकीवर ताबा मिळवण्याच्या तंत्रांचे त्या मतांनुसार प्रतिपादन होत राहिले. सध्या अशा तंत्रांमध्ये न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा "एनएलपी' चा बराच बोलबाला आहे.
रिचर्ड बॅंडलर आणि जॉन ग्राइंडर हे ह्या संकल्पनेचे जनक होत. Frogs into Princes ह्या त्यांच्या लोकप्रिय पुस्तकातून ह्या संकल्पनेचा प्रसार झाला. मज्जासंस्था आणि भाषा ह्यांच्यातील सहयोगातून वागणुकीवर प्रभाव पडतो किंवा पाडता येतो अशा स्वरूपाचे हे गृहीतक आहे आणि त्याच्या आधारे तयार केलेली उपचारपद्धती अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांवर उपाय असल्याचा दावा करण्यात येतो. image
हे तंत्र अपेक्षेनुसार वादविवादांच्या भोवऱ्यात आहेच. आदर्शवादी विद्वान आणि परंपरावादी विचारांचे समर्थन करणारे असे दोन टोकांचे लोक आपल्या अनुशासनपद्धतीसाठी ह्या तंत्राची कास धरावी असे म्हणतात हे विशेष. एनएलपी विषयी सोप्या शब्दात माहिती देणारे हे संकेतस्थळ अवश्य पहावे.
साचेबंद वागणूक नाकारणारे (= बेशिस्त) विद्यार्थी तसे का वागतात ह्याची अनेक प्रकारची कारणे असल्याने सर्वांना "रुळावर आणण्यासाठी' एकाच प्रकारचे (उदाहरणार्थ भाषिक क्लृप्तीचे) तंत्र वापरता येईल हे शक्य वाटत नाही. अनेक अनाक्रमक तंत्रांपैकी ते एक असू शकते. विद्यार्थ्यांने झापडबंद विचाराचे न होता त्याची विवेकबुद्धि शाबूत रहावी आणि त्याच्या आधारे त्याला स्वैराचारावर मात करता यावी असा आदर्शवादी विचार आहे.
विद्यार्थ्याला, मग तो बेशिस्त असो वा नसो, विचार करायची सवय लागायची असेल तर मुळात शिक्षकाला विचार करण्याचे वावडे असता कामा नये. झापडबंद किंवा टोपल्या टाकणाऱ्या शिक्षकांना विचार करण्याचा आळस असतो किंवा सवय नसते. ती सवय जर त्याने अंगी बाणवली तर त्याच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे एक उदाहरण राहील आणि त्यातून विचारांची सवय त्यांना लागू शकेल व यथावकाश त्यांचा प्रवास आत्मानुशासनाकडे होऊ शकेल.
अशी ही चिकाटीने साध्य करायची दीर्घ प्रक्रिया आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ एकाच वर्गाला शिकवणारे शिक्षक त्या वर्गाचे चांगले नियंत्रण का करू शकतात ह्यामागच्या कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकाची पुरेशी ओळख पटण्यास आणि चांगुलपणाची प्रेरणा घेण्यास आवश्यक वेळ मिळतो. बडगा उगारून किंवा एखाद्या उसन्या "तंत्राने' अल्पकालीन यश मिळेलही व त्या दृष्टीने तंत्रांचा डोळस वापर अवश्य करावा पण शाश्वत परिणामासाठी "उप-देशा'ला (शब्दशः, गुरुच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ राहण्याला) पर्याय नाही.

Popular Posts