Tuesday, March 14, 2017

शिक्षकांसाठी Checklist, अर्थात पडताळा यादी म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 26



आपल्याला अनेक गोष्टी माहीत असतात पण त्या माहीत आहेत हे लक्षात नसते. मानवी मेंदूची स्मरणक्षमता सरावाने आणि वापराने वाढते हे जरी खरे असले तरी महत्त्वाच्या कामांसाठी आपल्या स्मरणशक्तिवर विसंबू नये अशी शिस्त आज व्यावसायिक जगाने लावून घेतलेली आहे. आजच्या जीवनशैलीत विविध प्रकारच्या माहितीकडे ग्राहकाचे लक्ष वेधून घेण्याची स्पर्धा सुरू असल्याने आणि सामान्य माणूस ह्या सर्व आकर्षणांपासून अलिप्त राहू शकत नसल्याने त्याने चेकलिस्ट्ससारख्या साधनाचा वापर करणे इष्ट आहे.
द न्यू यॊर्कर साप्ताहिकात डॉ. अतुल गवांदे ह्यांनी, शस्त्रक्रिया करताना पडताळा यादी वापरणे किती लाभदायक ठरते व त्यामुळे यशाची शक्यता कित्येक पटींनी कशी वाढते हे विशद करणारा एक लेख लिहिला. त्याचे सर्वत्र स्वागत झाले आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर ती चळवळच सुरू झाली. नंतरडॉ. गवांदे ह्यांनी ह्याच विषयावर पुस्तकही लिहिले. हे पुस्तक सर्वांनी, विशेषतः शिक्षकांनी वाचावे असे आहे. विमानांचे पायलट्स, गगनचुंबी इमारती बांधणारे वास्तुशिल्पी अशा अनेकांसाठी विविध प्रकारच्या पडताळा याद्या अनिवार्य असतात.


अध्यापनासाठी शिक्षकाला आज वेळाचा तुटवडा जाणवतो आहे. म्हणून पाठाकडे एक `प्रकल्प' म्हणून पाहणे आणि त्यासाठी प्रकल्प-व्यवस्थापनाची तंत्रे वापरणे आज आवश्यक झाले आहे. चेकलिस्ट्स किंवा पडताळा याद्या तयार करणे हे त्यातील एक प्राथमिक आणि सोपे तंत्र आहे.
पडताळा यादी वापरण्याचे हेतू अनेक असू शकतात. मात्र हेतू कोणताही असला तरी प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे हाच समान उद्देश पडताळा यादीमागे असतो. शिक्षक आपल्या कामांचा क्रम ठरविण्यासाठी, विद्यार्थ्याचे विषयज्ञान तपासण्यासाठी, क्षमतानिर्धारण करण्यासाठी, प्रगतीचा आलेख नोंदविण्यासाठी अशा अनेक हेतूंसाठी पडताळा यादी तंत्राचा वापर करू शकतो. अशा पडताळा याद्या तयार करणे, त्यांचा वापर करणे, त्यांच्यामध्ये सुधारणा करणे हा शाळांमधील नित्यक्रमाचा एक भाग असायला हवा. ह्या आधीच्या एका नोंदीमध्ये वर्ग पारिस्थितिकीय तपासणी यादीचा उल्लेख आलेला आहे.

पडताळा याद्यांची वेगवेगळी तयार प्रारूपे उपलब्ध आहेत. स्थानिक परिस्थितीनुसार त्यांमध्ये बदल करून सुधारित प्रारूपे तयार करून वापरता येतील.





Popular Posts