Saturday, January 5, 2008

आशेची वात

डिसेंबर ते एप्रिल ह्या पाच महिन्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील शाळा ओस पडतात. ह्या शाळांमधील सुमारे 25,000 मुले वीटभट्ट्यांवर काम करण्यासाठी जातात. पहाटे दोन वाजता त्यांचा दिवस उजाडतो. कारण दिवसाच्या उन्हात सुकण्यासाठी जास्तीत जास्त विटा तयार करायच्या असतात. वर्षाचे पूर्ण दिवस भरत नाहीत म्हणून चांगल्या शाळा अशा मुलांना प्रवेशच देत नाहीत. ह्या मुलांसाठी "भोंगे' म्हणजे झोपड्या बांधून त्यांच्यासाठी शाळा चालवणाऱ्या "विधायक संसद' ह्या चळवळीची माहिती रमेश पानसे ह्यांच्या "शिक्षण : आनंदक्षण' ह्या पुस्तकात वाचल्यावर "बीएचके' संस्कृतीमधील कोणीही अंतर्मुख झाल्याशिवाय राहणार नाही.

ह्याच पुस्तकात शिक्षणक्षेत्रात वेगळी वाट चोखाळणाऱ्या इतर 11 शाळांची / चळवळींची माहिती आहे. कोल्हापूर येथील लीलाताई पाटील ह्यांचे "शिक्षणाला मुलाकडे ओढून आणणारे' सृजन आनंद विद्यालय, ताणरहित अनौपचारिक शिक्षण देणारे पुण्यातील नारळकर फाऊंडेशनपासून प्रेरणा घेतलेले अक्षरनंदन, मॅक्सिन बर्नसन ह्या बहुभाषाकोविद विदुषीचे प्रकल्पतंत्राने सर्वांगीण स्वयंअध्ययन घडवणारे फलटणमधील कमला निंबकर बालभवन, "वावरण्याचे" स्वातंत्र्य देणारे गोदरेजचे विक्रोळी येथील उदयाचल विद्यालय, स्वतःचे वृत्तपत्र काढणारे कफ परेडच्या "दलित आंबेडनगरमधील' प्रा. रजनी परांजपे आणि बीना लष्करी ह्यांचे डोअरस्टेप स्कूल, कोल्हापूरमध्ये वंचितांना शिक्षण देणारे डॉ. श्रीधर आणि सौ. सुलोचना ह्यांचे तेजस विद्यालय, ताराबाई मोडक, अनुताई वाघ ह्यांच्या कार्यातून साकारलेल्या मुक्त शाळा पद्धतीचे डहाणूतील "ग्राममंगल', शिक्षणातून ग्रामविकास साधणारे राजा आणि रेणू दांडेकरांचे दापोलीचे लोकमान्य टिळक विद्यालय, कोळशाच्या भट्ट्यांवर काम करणाऱ्या धनगर-कातकऱ्यांच्या मुलांसाठी राना-डोंगरांमधील "श्रमिक सहयोग' च्या "आत्मविश्वास देणारी शिक्षणपद्धत राबवणाऱ्या' शाळा, अदिवासींच्या "पावरी' भाषेतील साहित्यनिर्मितीला उत्तेजन देणाऱ्या नर्मदा विस्थापितांच्या मुलांना शिक्षण देणाऱ्या "जीवनशाळा', मांजरी-थेऊर परिसरातील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना शिकवणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीच्या "प्रचिती" ने चालविलेल्या 100 दिवसांच्या "साखरशाळा', अशा झगडणाऱ्या आणि आगळ्यावेगळ्या शाळांची माहिती श्री. पानसे ह्यांनी या पुस्तकात दिलेली आहे.

ह्या केवळ वंचितांसाठी काम करणाऱ्या शाळा नसून विविध शैक्षणिक तंत्रे नावीन्यपूर्ण प्रयोगांमधून राबवीत आहेत. प्रस्तावनेमध्ये लेखकाने ह्या शाळांच्या कार्याचे मूल्यमापन "बालकेंद्री शिक्षणाच्या' दृष्टीने केलेले आहे. शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून वाचावे (किमान नजरेखालून घालावे) असे हे पुस्तक आहे.

ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती "युनिसेफ" ने प्रकाशित केलेली होती तर दुसरी आवृत्ती "ग्रंथाली"ने प्रकाशित केलेली आहे.

3 comments:

  1. At the outset let me thank you for this blog. It was long needed from you.

    I am sure readers would get treat through your blog in the days to come.

    Thanks to helping us in developing an insight through your articles/collections.

    ReplyDelete
  2. At the outset let me thank you for this blog. It was long needed from you.

    I am sure readers would get treat through your blog in the days to come.

    Thanks to helping us in developing an insight through your articles/collections.

    ReplyDelete
  3. याच धर्तीवरील श्री अनिल अवचट यांचे कार्यरत हे पुस्तक वाचण्याजोगे आहे. विभिन्न सामाजिक चळवळींत सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी केलेल्या असामान्य कार्याचे अप्रतिम वर्णन या पुस्तकात दिलेले आहे....

    ReplyDelete

Popular Posts