Sunday, April 13, 2014

रंग आणि त्यांच्या छटा सांगणारे मराठी शब्द

 

चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ब्लू अशा रंगछटा भेटीला येत तेव्हा मराठीतून अशा प्रमाणित रंगछटा का वर्णिल्या जाऊ नयेत असे मला वाटत असे. मराठीत असे नेमकेपणाने लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती (मुळातून मराठीमध्येच लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती) कमी होत असताना हा प्रश्न अधिकच सतावू लागला आहे. आपल्या भाषेच्या ह्या सुंदर अंगाकडे आपण दुर्लक्ष करून सुखद शब्दांचा खजिना गमावतो आहोत असे वाटते. मित्रांकडे आणि ओळखीच्या चित्रकारांकडे मी नेहमी हा प्रश्न काढतो.

जाहिरातीची एक क्लृप्ती म्हणून अलिकडे गाड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगांसाठी नवे अनवट शब्द "कॉइन' झालेले कानावर पडतात. स्त्रियांच्या साड्यांच्या वेडामुळे रंगछटांचे काही शब्द मात्र आवर्जून मराठीत वापरले जाताना दिसतात. सामान्यतः फुलांच्या, पदार्थांच्या, पशुपक्ष्यांच्या नावांचा वापर नेमक्या रंगछटांचे वर्णन करण्यासाठी केलेला आहे. 

श्री. मारुती चितमपल्ली ह्यांनी त्यांच्या आईच्या वापरातील शब्दसंपत्तीसंबंधी आपल्या "चकवा-चांदणं' ह्या आत्मचरित्रात लिहिले आहे ते माझ्या आईने नुकतेच माझ्या निदर्शनाला आणले; ""डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, शरबती या तांबड्या रंगाच्या छटा; जिलेबी, लिंबू,सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या पिवळ्या रंगाच्या छटा. लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा. अस्मानी आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. निळ्या रंगाला "आनंदी' हा किती अपरूप शब्द. अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा. काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा. दुधिया, मोतिया आणि चांदी ह्या पांढऱ्या रंगाच्या छटा. गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली ही रंगांची मिश्रणं...''

त्यानंतर आमच्या घरात काही काळ सगळ्यांना असे शब्द शोधण्याचं वेडच लागलं. माझे मुलगे माझी पत्नी आणि सून सगळेजण कामाला लागले. आम्हाला फारशी मजल गाठता आली नसली तरी जे काही शब्द जमा झाले त्यांची यादी ही अशी आहे :

राखाडी, विटकरी, तपकिरी, हळदी, मोरपिशी, लिंबू, पारवा, आकाशी, अंजिरी, कुसुंबी, वांगी, लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी, रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, डाळिंबी, पोपटी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी, गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, पिस्ता, अबिरी, गव्हाळी, पांढरा, पिरोजी...

आणखी एक महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे ह्या रंगांच्या प्रत्यक्ष छटा आणि शब्द ह्यांच्या जोड्या जुळवण्याचे. तो खरा दस्तऐवज होईल. ह्या आणि  ह्या संकेतस्थळावर इंग्लिशसाठी असे काम केलेले दिसेल. मराठीसाठी असा प्रयत्न ह्या संकेतस्थळावर केलेला आढळतो पण त्यासाठी जाणकार मराठी भाषकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे . अर्थात संगणकीय प्रणालींच्या मर्यादा विचारात घेता ह्या छटा किती नेमकेपणाने दिसतात हा प्रश्न आहेच. रंगछटांचे वर्णन करणारे शब्द कसे तयार होतात आणि त्यांचे अर्थ कसे होतात ह्याचे विवेचन जिज्ञासूंना ह्या संकेतस्थळावर पाहता येईल.

Sunday, February 2, 2014

अध्ययनसिद्धान्तांचा सारांश - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -21

अध्ययनसिद्धान्तांचा सारांश काय सांगता येईल? सध्या कोणता सिद्धान्त वापरणे इष्ट आहे?

आपण कसे शिकतो ह्याबाबत अध्ययनविषयक प्रत्येक सिद्धान्त काही महत्त्वाचे ज्ञान देतो. ह्याचाच परिणाम आपण कसे शिकवतो यावर होत असतो. वरील तिन्ही प्रकारच्या सिद्धान्तांच्या समन्वयाने आपण विद्यार्थ्यांना शिकण्याचा चांगला अनुभव कसा देऊ शकू ह्याचे धोरण आखता येईल.
वर्तनवादाला हल्ली फार चांगले समजले जात नाही कारण तो शिक्षककेंद्री आहे आणि अध्ययन त्यात सक्रियतेने होते असे मानलेले नाही. परंतु शिक्षणाची उद्दिष्टे कशी गाठावी, अभ्यासक्रमाची रचना कशी करावी आणि उच्च पातळीवर विचारक्षमता विकसित करण्याचे तंत्र कसे राबवावे हे त्याने शिकवले आहे. क्षमताधिष्ठित शिक्षणाचा पाया त्यातून घातला गेला आहे आणि अध्ययन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ब्लूम्स टॅक्सॉनॉमीसारखे क्षमतांचे वर्गीकरण सिद्ध झाले आहे.  ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यांकन अशा बौद्धिक वर्तनाच्या पातळ्यांचे हे वर्गीकरण आहे. त्यातून वर्तनाची उद्दिष्टे तयार झाली आणि ह्यापैकी प्रत्येक पातळीसाठी कोणती क्रियापदे वापरून अध्ययन लक्ष्ये साध्य करावी ह्याचे आडाखे शिक्षकांना बांधता येऊ लागले. 


विद्यार्थी इच्छित गोष्टी शिकले आहेत की नाही ह्यावर आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात भर दिला जात असल्याने आपण अध्ययन उपक्रमांची रचना कशी करावी ह्यात वर्तनवादाचे योगदान महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.

मनाचे कार्य कसे चालते हे समजून घेण्यात ज्ञानात्मकतावादाचा प्रभाव आहेच. स्मृतीची संरचना समजून घेण्यास आणि माहितीवर प्रक्रिया होऊन ती कशी साठवली जाते हे आपल्याला ज्ञानात्मकतावादाच्या आधारे समजले. अभ्यासाचा आशय कसा तयार केला जातो आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत अध्ययनाला मदत होण्यासाठी कसा पोहोचवला जातो ह्यावर ज्ञानात्मकतावादाचा प्रभाव आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये शीर्षके, उपशीर्षके, कल्पनाविस्तार अशी तर्कसंगत भागांमध्ये आशयाची विभागणी केलेली दिसते. साध्या पातळीपासून क्लिष्ट पातळीपर्यंत क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती होण्यासाठी अध्ययन सामग्रीची मांडणी केलेली असते. 


अखेरीस रचनावादाने शिकणाऱ्याला अध्ययन प्रक्रियेतील सक्रिय सहभागी मानून एक साकल्यवादी दृष्टिकोन दिलेला आहे. वाचणे, व्याख्यान देणे आणि चाचण्या घेणे ह्याऐवजी अध्यापन आता अधिक संवादात्मक झाले आहे. आपल्याला जे माहीत आहे ते मांडणे. त्यावर सहाध्यायींची आव्हाने आणि आक्षेप स्वीकारून त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करणे ह्यातून विचारातला उणेपणा शिकणाऱ्याला उमगत जातो. त्याचा दृष्टिकोन बहुआयामी होतो. (शिकणाऱ्याने स्वतःच अध्ययन उद्दिष्ट ठरविणे अध्ययन कितपत शक्य आहे आणि योग्य आहे असा प्रश्न अर्थातच उरतो.)

सारांशाने हे तिन्ही सिद्धान्त पाहू :

वर्तनवाद (एकोणीसशे पन्नास आणि साठची दशके)
अभ्यास - निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनाचा.
ज्ञान - व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात असते - वर्तनात बदल करून मिळवले जाते,
अध्ययन - छडी आणि गाजर अशा सकारात्मक आणि नकारात्मक प्रबलनातून अभिसंधित होणारे वर्तनातील बदल,
संशोधन -
पावलॉवचे शास्त्रीय अभिसंधान - स्किनरचे व्यापारक अभिसंधान,
अध्ययनाचे प्रकार - तथ्ये आठवणे, संकल्पनांची व्याख्या करणे, स्पष्टीकरण देणे, कार्यपद्धती,
विद्यार्थी - अक्रिय,
अध्यापनाचा भर - शिक्षककेंद्री, वर्तनात बदल करण्याची क्षमता, वर्तनाच्या उद्दिष्टांचा वापर, फलितावर आधारित.
अध्यापन धोरणे - वर्तनात्मक उद्दिष्टे,
ब्लूम्स टॅक्सोनॉमी, सराव आणि घोकंपट्टी

ज्ञानात्मकतावाद (एकोणीसशे साठ आणि सत्तरची दशके)
अभ्यास - मनाचा
ज्ञान - व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात असते - माहितीवर प्रक्रिया करून मिळवले जाते,
अध्ययन - नियोजन, संनियंत्रण आणि मूल्यांकन ह्याद्वारे स्मृतीसंरचनेत बदल. श्रद्धा, दृष्टिकोन आणि मूल्ये अध्ययनावर परिणाम करतात ह्यास मान्यता.
संशोधन - डेव्हिड ऑसुबेलचे अग्रिम संघटन -
गॅग्नेच्या नऊ अध्यापन पायऱ्या
अध्ययनाचे प्रकार - समस्या सोडवणे, क्लिष्ट समस्यांचे लहान घटकांमध्ये विघटन करणे
विद्यार्थी - सक्रिय,
अध्यापनाचा भर - शिक्षककेंद्री, आशयाचे संघटन, अध्ययनाच्या पायऱ्या रचणे
अध्यापन धोरणे - अग्रिम संघटने, अध्यापनाच्या नऊ पायऱ्या

रचनावाद (एकोणीसशे ऐंशीचे दशक)
ज्ञान - व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात नसते तर ती व्यक्ती पर्यावरणाशी कशा आंतरक्रिया करते आणि जगाचा अनुभव घेते ह्याच्या आधारे त्याची रचना केली जाते. 
अध्ययन - शिकता शिकता पूर्वज्ञानाचे, श्रद्धांचे आणि अनुभवांचे एकात्मीकरण करताना विद्यार्थी ज्ञानाची आणि अर्थाची रचना करतात
संशोधन - पिआजे ह्यांचा
बोधनात्मक रचनावाद. वायगोत्स्कींचा सामाजिक रचनावाद
अध्ययनाचे प्रकार -
घटकांऐवजी साकल्यावर भर
विद्यार्थी - सक्रिय, समाजाभिमुख
अध्यापनाचा भर -
शिक्षक सुविधाकाराच्या भूमिकेत, वास्तव जीवनामध्ये कौशल्य आणि ज्ञान ह्यांच्या एकात्मीकरणावर भर, अध्ययन अनुभवाच्या पायऱ्या रचणे, ज्ञानाची समाजाभिमुख रचना
अध्यापन धोरणे -
सक्रिय अध्ययन धोरणे, चिकित्सक विचारासाठी धोरणे, चिंतनासाठी धोरणे

Saturday, February 1, 2014

ज्ञानसंरचनावाद किंवा रचनावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -20





रचनावाद (कन्स्ट्रक्टिविझम) ऐंशीच्या दशकात लोकप्रिय झाला. ह्या सिद्धान्तानुसार अध्ययन ह्या प्रक्रियेत ज्ञानाची आणि अर्थाची रचना विद्यार्थी/शिकणारा करतो. त्यासाठी तो पूर्वज्ञान, श्रद्धा आणि अनुभव ह्यांचे एकात्मीकरण करतो. ह्या सिद्धान्ताचे आधीच्या सिद्धान्तांपेक्षा मुख्य वेगळेपण असे की ह्यात ज्ञान व्यक्तीच्या बाहेर नसते असे मानले जाते. जगाच्या अनुभवातून आणि वातावरणाशी होणाऱ्या व्यवहारातून ज्ञान व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये रचते असा विचार यात मांडलेला आहे. रचनावादाचा भर वातावरणावर नियंत्रण ठेवण्यावर नाही. त्याऐवजी ज्ञान आणि कौशल्ये ह्यांचे संश्लेषण/ एकात्मीकरण व्यक्तीच्या अनुभवात होण्यावर येथे भर आहे. येथे इतर सिद्धांतांप्रमाणे स्वतंत्र घटकांवर भर नसून अखंड एकात्मतेवर भर आहे.   
रचनावादाचे दोन प्रकार आहेत : बोधनात्मक रचनावाद आणि सामाजिक रचनावाद. बोधनात्मक रचनावादाचा भर शिकणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणांवर आणि शिकण्यावर त्यांचा जो परिणाम होतो त्यावर आहे. सामाजिक रचनावादाचा भर सामाजिक देवघेवीतून / आंतरक्रियांमधून अर्थ आणि समज ह्यांची निर्मिती कशी होते यावर आहे. दोन्हींचा दृष्टिकोन आत येणारी माहिती व्यक्तीच्या खास त्याच्या अशा भिंगातून कशी पाहिली जाते आणि तिचा अर्थ लावून ज्ञानसंपादन कसे होते हे पाहण्याचा आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, श्रद्धा, संस्कृती आणि अनुभव ह्यातून ह्या भिंगाची घडण होते. हा जो अर्थ लावला जातो त्यानुसार शिकणाऱ्या व्यक्ती स्कीमाटांची रचना करतात आणि त्यांच्याद्वारे त्यांना काय माहीत आहे हे व्यक्त करतात.
ज्यां पिआजे
ह्यांनी बोधनात्मक रचनावादाचा सिद्धान्त मांडला. ज्ञान केवळ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रामित करता येणे शक्य नाही असे ते म्हणतात. ज्ञान अनुभवातूनच शिकावे लागते. अनुभवातून व्यक्ती मानसिक प्रारूपे किंवा स्कीमाटांची रचना करतात आणि ज्ञानाची रचना अशा एकत्र केलेल्या आणि सामावून घेतलेल्या स्कीमाटांमधील बदलांवर आधारित असते. जर आत येणारी माहिती आधीच आत असलेल्या माहितीशी संबंधित असेल तर आधीच अस्तित्वात असलेल्या स्कीमांमध्ये ती एकत्र केली जाते. जर येणारी माहिती आधीच अस्तित्वात असलेल्या माहितीच्या विरोधात असेल तर विसंवाद निर्माण होतो आणि व्यक्तीला एकाच वेळी परस्परविरोधी कल्पनांचा विचार करावा लागतो.  ह्याव्यतिरिक्त आपण आणि आपल्या पर्यावरणामध्ये क्रियांची जी देवाणघेवाण होते त्यावर शिक्षण किंवा अध्ययन आधारित असते असे पिआजे ह्यांचे मत आहे. म्हणूनच वास्तव जगातील अनुभव शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
सामाजिक रचनावादामध्ये अध्ययनाच्या सामाजिक स्वरूपावर भर आहे. लेव वायगोत्स्की ह्यांच्या प्रतिपादनानुसार अध्ययन ज्या सामाजिक संदर्भामध्ये होते त्यापासून ते वेगळे काढता येत नाही. ज्ञान गोळा होण्याची प्रक्रियाही शिकणारा सामाजिक परिस्थितीशी एकात्म झाल्याखेरीज घडू शकत नाही. अध्ययन ही समन्वयात्मक प्रक्रिया आहे असे सांगून ती समजावून देण्यासाठी त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली.

ह्या सिद्धान्तानुसार विकासाच्या दोन पातळ्या आहेत. एक पातळी शिकणारा स्वतंत्रपणे गाठू शकतो तर दुसरी संभाव्य पातळी गाठण्यासाठी त्याला शिक्षकाची किंवा सहाध्यायींची मदत लागते. शिकणाऱ्याला एक पायरी वर जाता यावे म्हणून त्याला शिक्षकाचा आधार देण्याची कल्पना ह्यात आहे. ह्या आधाराने शिकणारा स्वतः पायरीपायरीने रचना करीत शिकू लागतो. त्याला शिकता येईनासे झाले की शिक्षकाने पुन्हा त्याला आधार द्यावा आणि आणखी वरच्या पायरीसाठी मार्गदर्शन करावे.
रचनावादानुसार स्मृती सातत्याने रचली जात असते. आत येणाऱ्या माहितीशी व्यक्तीची जसजशी आंतरक्रिया विशिष्ट संदर्भात होत जाते तसतसे त्या व्यक्तीला आपल्या आधीच्या ज्ञानाचा धांडोळा घ्यावा लागतो. नवी माहिती जोडली जाते किंवा सामावली जाते आणि समज आणखी सखोल आणि सार्थ होत जाते. शिकलेल्या गोष्टी वेगळ्या आणि नवनवीन संदर्भाकडे स्थलांतरित करून वापरण्याचे कौशल्य व्यक्तीला साधू लागते. वास्तव जगातील समस्या सोडविण्याची संधी ही अशा स्थलांतरणासाठी उत्तम संधी असते.

रचनावादाचे सिद्धान्त शिकण्याचे वेगवेगळे प्रकार न मानता सर्व अध्ययन किंवा शिक्षण संदर्भसापेक्ष आहे असे मानतात. रचनावादी शिक्षण सिद्धान्ताची एक दुबळी बाजू अशी की शिकणारे सगळे जण शिकण्यासाठी येताना आधीचे ज्ञान घेऊन येतात असे मानले जाते. शिकण्याचे उद्दिष्ट हे आधीचे ज्ञान क्रियान्वित करण्याचे आहे असे मानले जाते. पण एखाद्या नव्या क्षेत्राचा अभ्यास करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांकडे आधीचे ज्ञान असेलच असे नाही. मग त्याच्या आधारावर संरचना कशी उभारणार? चुकीची रचना केली जाण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पूर्वज्ञान नाही त्यांच्यासाठी ज्ञानात्मकतावादावर आधारित धोरण राबवून संकल्पनांच्या पायऱ्या तयार करून घेणे आणि पूर्वज्ञानाची उणीव भरून काढणे आवश्यक ठरते.

रचनावादाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी केवळ निष्क्रियपणे ज्ञान मिळवीत नसून ते शिकण्याच्या आणि ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी असतात. शिकणे का महत्त्वाचे आहे हे शिकणाऱ्याला उमगावे असे काम शिक्षकाने त्याच्याकडून करवून घ्यावे. म्हणून रचनावादानुसार आपले अध्यापन करणारे शिक्षक केवळ लेक्चरबाजी करीत नाहीत तर विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तो ज्या पायरीवर आहे त्याच्या वरची पायरी गाठायला तो स्वतःला मदत कशी करू शकेल हे पाहतात. त्यांची भूमिका केवळ व्याख्यात्याची न राहता ती सुविधाकारकाची होते. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययन शैलींचे भान असणे आवश्यक आहे तरच विद्यार्थी शिकत असताना शिक्षक त्याला विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल.
पहा : ज्ञानात्मकतावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -19
आणि   वर्तनवाद म्हणजे काय?- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18
तसेच अध्ययनसिद्धान्तांचा सारांश - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -21

Saturday, January 25, 2014

ज्ञानात्मकतावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -19


एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मानसशास्त्र वर्तनाच्या अभ्यासाकडून मनाच्या अभ्यासाकडे सरकले आणि बोधनवाद किंवा ज्ञानात्मकतावाद (कॉग्निटिविझम) हा नवीन अध्ययनसिद्धान्त उदयाला आला. ज्ञानात्मकता वादानुसारही ज्ञान हे शिकणाऱ्याच्या बाहेर अस्तित्वात असते असे मानले आहे. परंतु त्याचा भर मानवी स्मृती ज्ञानग्रहण कसे करते आणि अध्ययनाला कशी चालना देते यावर आहे. शिवाय ह्या विश्लेषणात अध्ययनाच्या स्थिती विचारात घेतल्या जातात, व्यक्तीव्यक्तीमध्ये फरक असून अध्यापन करताना प्रत्येकाला अनुरूप अशी धोरणे अवलंबिणे आवश्यक आहे असाही विचार आहे. वर्तनवादाचा भर वर्तनबदलाच्या उद्दिष्टांवर आहे तर ज्ञानात्मकतावादाचा भर कामगिरीच्या विविध टप्प्यांचे विश्लेषण करण्यावर आहे. नवशिका ते तज्ज्ञ असा प्रवास घडताना येणारे हे टप्पे आहेत.

वातावरणाचा अध्ययनावर सर्वाधिक परिणाम होतो हे गृहीत धरले आहेच पण शिकणारा आपल्या अध्ययनासाठी नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन अशी विशिष्ट प्रकारची धोरणात्मक हत्यारे कशी वापरतो आणि पूर्वज्ञान, श्रद्धा, दृष्टिकोन व मूल्ये ह्यांचा अध्ययनावर कसा परिणाम होतो ह्यावर भर दिलेला आहे. माहितीवर प्रक्रिया कशी होते आणि कशी साठवली जाते तसेच पूर्वज्ञान स्कीमा (अनेकवचन - स्कीमाटा) नावाच्या स्मृती संरचनेत कसे साठवले जाते आणि आवश्यकतेनुसार योग्य संदर्भात आठवून कसे वापरले जाते ह्याचा विचार ज्ञानात्मकतावादात विकसित झाला आहे.

समस्या किंवा गणिते सोडविणे ह्यासारख्या उच्च पातळ्यांवरील अध्ययन पातळ्यांवर अवलंबून असलेल्या गोष्टी ज्ञानात्मकतावादाच्या आधारे स्पष्ट करणे अधिक सोपे आहे कारण गुंतागुंतीच्या समस्यांचे विघटन घटकांमध्ये करून, त्यांची पूर्वज्ञानाशी सांगड घालून नव्या अध्ययनाचे विणकाम कसे होते हे त्याद्वारे दाखवता येते. ज्ञानात्मकतावादावर आधारलेल्या अध्यापन धोरणांमध्ये अध्ययन आशयाची व्यवस्था लावण्यावर भर असतो. माहितीवर प्रक्रिया कशी करावी, माहिती कशी आठवावी, कशी वापरावी ह्याचा त्यात समावेश असतो.   

डेव्हिड ऑसुबेल ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अग्रिम संघटनाची संकल्पना मांडली. शिकण्याच्या प्रक्रियेपूर्वी जी माहिती सादर होते त्याकडे त्याने लक्ष पुरविले. ह्या माहितीची पायऱ्या-पायऱ्यांची रचना केल्यास एका पायरीच्या आधारे वरची पायरी व त्याआधारे आणखी वरची पायरी गाठणे आणि पूर्वज्ञानाशी नव्या माहितीशी सांगड घालणे सुलभ होते असा विचार त्याने मांडला. म्हणजे एखादा पाठ वाचण्यापूर्वी त्यातील महत्त्वाच्या कल्पनांचा सारांश, आशयाचे स्पष्टीकरण, अमूर्ततेच्या किंवा सर्वसामान्यीकरणाच्या आणि समावेशकतेच्या आणखी वरच्या पातळीवर आधीच सादर केल्यास वाचन सोपे होते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचताना आधी ओवीवरील स्पष्टीकरण, अन्वय आणि ओवीचा अर्थ वाचून घेतल्यास ओवी जास्त समजते आणि आवडते. 

रॉबर्ट गॅग्ने ह्या मानसशास्त्रज्ञाने विशिष्ट ज्ञानात्मक किंवा बोधनात्मक प्रक्रियांशी निगडित अशा अध्ययनाच्या नऊ टप्प्यांची कल्पना मांडली. ह्या नऊ टप्प्यांवर अध्ययनस्थिती कशी असते आणि कोणती बौद्धिक कौशल्ये शिकावी लागतात हे सांगितले आहे शिवाय अध्यापन कशा क्रमाने करावे हेही सांगितले आहे. अगोदर अस्तित्वात असलेल्या ज्ञानसंरचनांशी, नव्या ज्ञानाची सांगड शिकणाऱ्याला घालता यावी म्हणून धड्यांचे संघटन ह्या टप्प्यांनुसार करावे असे त्याचे मत होते. अध्ययनासाठी ह्या नऊ पायऱ्या योग्य पातळीत आधार देऊ शकतात असेही त्याला वाटत होते. ह्या नऊ पायऱ्या अशा आहेत :
शिकणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणे
त्यांना शिकण्याच्या उद्दिष्टांची/फलितांची माहिती देणे
पूर्वीचे ज्ञान आठविण्यासाठी चालना देणे
जो आशय शिकायचा आहे तो प्रेरक स्वरूपात सादर करणे
मार्गदर्शन पुरविणे
अध्यापनातून सूचना देणे आणि आवश्यक कामगिरी करवून घेणे
त्यांच्या कामासंबंधी प्रतिसाद पुरविणे
कामगिरीचे मूल्यनिर्धारण करणे
आशय रुजवण्यासाठी प्रयत्न करणे

ज्ञानात्मकतावादानुसार, अध्ययनात शिकणाऱ्यांची भूमिका अधिक सक्रिय असते आणि अध्ययन प्रक्रियांचे संघटन करीत तो शिकत जातो. ज्ञानात्मकतावादाचा भर माहिती संघटित करण्यासाठी, ती दीर्घस्मृतीत नंतर आठवता येईल अशा रीतीने साठविण्यासाठी शिकणाऱ्यांना मदत करण्यावर आहे. अध्ययनाचे उद्देश/फलित अध्यापक ठरवितो पण विचारप्रक्रिया, अंतर्गत अध्ययन, माहितीचे संघटन, स्वतःवर देखरेख करण्याचे कौशल्य विकसित करणे, सकारात्मक दृष्टिकोन वाढविणे ह्या गोष्टी शिकणाऱ्याने करणे व त्यासाठी अध्यापकाने त्याला मदत करणे अपेक्षित आहे. शिक्षण सुलभ व्हावे म्हणून अध्ययन उद्दिष्टांशी सुसंगत असे पूर्वज्ञान आठवता येईल अशा तऱ्हेचे वातावरण निर्माण करायला हवे असे ज्ञानात्मकतावादाचे गृहीतक आहे. ज्यांना फारसे पूर्वज्ञान नाही अशांना नव्या स्कीमाटा तयार करता याव्यात म्हणून त्यांच्या माहितीतील उदाहरणे देण्याचे कसब शिक्षकाकडे अपेक्षित आहे.

वर्तनवाद म्हणजे काय?- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18


अध्ययन कसे घडते ह्याची मांडणी विसाव्या शतकातील 5 व्या आणि 6 व्या दशकामध्ये वर्तनवादाच्या (बिहेवियरिझम) आधारे केली गेली. "फक्त पाहता येतील (दृश्य) आणि मोजता येतील (मापनीय) अशाच घटकांच्या आधारे शास्त्रीय मांडणी करता येऊ शकते.' हा विचार आधारभूत समजून वर्तनवादाची उभारणी झालेली आहे.


वर्तनवाद समजून घेण्यासाठी मनाचे "अभिसंधान' (कंडिशनिंग) ही पारिभाषिक संज्ञा समजून घ्यायला हवी. आपल्याला आलेल्या अनुभवांचा साठा मनात होत असतो. नंतर येणारा अनुभव, आपण आधी आलेल्या ह्या अनुभवांच्या माध्यमातून घेत असतो. आधीच्या अनुभवांशी नव्या अनुभवाची तुलना करून त्याद्वारे आपण नव्या अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या परीने हा अर्थ लावलेला नवा अनुभव आणखी एक अनुभव म्हणून मनात साठवला जातो. अशा तऱ्हेने मनाच्या पूर्वीच्या संस्कारित स्थितीमध्ये (पूर्वीचे अभिसंधान) बदल होत जातो आणि त्याला नंतरची संस्कारित स्थिती (नंतरचे अभिसंधान) प्राप्त होते. थोडक्यात असे म्हणता येईल की विशिष्ट वेळी असलेल्या मनाच्या संस्कारित स्थितीला मनाचे त्यावेळचे अभिसंधान असे म्हणता येईल. अर्थातच एखाद्या वेळी असलेल्या मनाच्या मर्यादा आणि क्षमता मनाच्या त्यावेळच्या अभिसंधानानुसार असतात. 


माणसाला बक्षीस देऊन (गाजर दाखवून) किंवा त्याला शिक्षा करून (छडी उगारून) त्याच्या वर्तनात बदल घडवता येतो. वर्तनात हा बदल म्हणजे "अध्ययन' किंवा "शिकणे' होय आणि "गाजर आणि छडी' ह्यांच्या साहाय्याने मनाच्या अभिसंधानात हा अपेक्षित बदल घडवला जातो. हा बदल अभिसंधित होण्यासाठी, शिकलेले दृढ होण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा सकारात्मक ("गाजर') किंवा नकारात्मक ("छडी') बळ दिले जाते. ह्याला अभिसंधानाचे प्रबलन (रीइन्फोर्समेंट) अशी संज्ञा आहे. 
वर्तनवादाशी दोन प्रकारचे अभिसंधान संबंधित असल्याचे मानले जाते. 1) शास्त्रीय अभिसंधान 2) व्यापारक (कार्यप्रेरक) अभिसंधान


1) शास्त्रीय अभिसंधान किंवा क्लासिकल कंडिशनिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण
इवॉन पॉवलॉव ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या रशियन शास्त्रज्ञाने केलेल्या एका प्रयोगाची माहिती घेऊ. कुत्र्याला अन्न दाखविले की त्याची लाळ गळू लागते. त्याचवेळी एक बझर वाजविणे सुरू केले. पुढेपुढे नुसता बझर वाजवला की कुत्र्याची लाळ गळू लागते. दोन नैसर्गिक प्रतिसादांची सांगड घालणारे हे अभिसंधान आहे.


2) व्यापारक (किंवा कार्यप्रेरक) अभिसंधान किंवा ऑपेरंट कंडिशनिंग आपण "स्किनर्स बॉक्स' ह्या प्रसिद्ध प्रयोगाद्वारे समजून घेऊ शकतो. 
बी. एफ. स्किनर ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ऑपेरंट कंडिशनिंग चेंबर ह्या नावाचे एक उपकरण तयार केले. ह्या चेंबरमध्ये उंदिर किंवा कबुतरे एक कळ दाबून आपले अन्न मिळवण्यास शिकत असत. जर एखाद्या क्रियेच्या प्रतिसादातून बक्षीस मिळत असेल तर ती क्रिया पुन्हापुन्हा केली जाते आणि जर मिळत नसेल तर ती पुन्हा केली जाण्याची शक्यता कमी असते. "सजीव प्राणी, ते करीत असलेल्या क्रियांमध्ये, त्या क्रियांमुळे त्यांना अनुभवास येणाऱ्या परिणामांमुळे, हळूहळू बदल घडवितात' ह्या सिद्धान्तावर हा प्रयोग आधारित आहे. अशा रीतीने, व्यापारक अभिसंधान हे वर्तन आणि त्याचा परिणाम ह्यांची सांगड घालणारे अभिसंधान आहे.


पहिल्या प्रकारचे अभिसंधान हे प्रतिसादात्मक आहे तर दुसऱ्या प्रकारचे अभिसंधान क्रियात्मक आहे.


प्राण्यांवर केलेल्या अशा प्रकारच्या प्रयोगांमधून वर्तनवादी शास्त्रज्ञांनी असे म्हटले की अध्ययन, नेहमी वर्तन आणि त्याचे परिणाम ह्यातील संबंधाने प्रभावित होते. शिक्षक, बक्षिस आणि शिक्षा ह्यांचा वापर करून इच्छित अध्ययन साध्य करण्यासाठी शिकणाऱ्याचे वर्तन अभिसंधित करतो. वर्तनवादी असेही मानतात की अध्ययनासाठी विविध प्रकारचे प्रबलनही आवश्यक आहे. उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी चांगले गुण मिळाल्याने प्रेरित होत असेल तर गुणांचा वापर अशा सकारात्मक प्रबलनासाठी करता येतो. कमी गुण देणे हे नकारात्मक प्रबलन असू शकते, त्याचा वापर केल्यास विद्यार्थी चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे असा हा विचार आहे.

Friday, January 24, 2014

अध्ययन सिद्धान्त - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 17

आजच्या शिक्षकाचे अध्ययन तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान गुणवत्तेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे का?
होय. तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान म्हणजे पारिभाषिक अज्ञान नव्हे. परिभाषा माहीत नसली तरी पारंपारिक वारशाने व अनुकरणाने शैक्षणिक तत्त्वज्ञान अंगिकारणे आणि औपचारिक शिक्षणातून परिभाषा व नवीन संकल्पना शिकून घेऊन ते अंगिकारणे असे दोन मार्ग असू शकतात. प्रत्यक्षात दोन्हींची सांगड घातली गेल्यास ते अतिशय योग्य ठरते.
प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश करणाऱ्या असंख्य मुलांना नीट लिहिता वाचता येत नाही असे मध्यंतरी "प्रथम" च्या ""असर' अहवालाने अधोरेखित केले. गेल्या दोन वर्षांमध्ये मुलांच्या लेखन-वाचन करण्याच्या आणि गणिते सोडविण्याच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे हा अहवाल म्हणतो.
शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरांवर आणि माध्यमांमधून ह्यावर चर्चा सुरू झाली. शिक्षकांनी वर्तनवादावर आधारित अध्यापनपद्धती सोडून देऊन ज्ञानसंरचनावादी अध्यापनकौशल्यांचा अंगीकार करावा असे म्हणणे सातत्याने पुढे येऊ लागले. परंतु ह्या विविध अध्ययनपद्धती कोणत्या, वर्तनवाद (Behaviourism), ज्ञानात्मकतावाद (Cognitivism) किंवा ज्ञानसंरचनावाद (Constructivism) हे वाद किंवा "-isms' कोणते ह्याबाबत शिक्षकांना संभ्रम पडतो आहे. बीएडच्या/डीएडच्या अभ्यासाच्या वेळी केलेली घोकंपट्टी आता विस्मरणात गेल्याने गोंधळात आणखीनच भर पडलेली आहे. बालमानसशास्त्र आणि त्यावर आधारित ह्या सिद्धांतांचा पसारा खूप मोठा आहे. विविध पारिभाषिक शब्दांचे अर्थ नीट माहीत नसल्यास ह्या अध्ययनपद्धतींविषयी प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचे आपल्याला नीट आकलन होत नाही. ह्या सिद्धांतांविषयी तज्ज्ञांकडून किंवा मार्गदर्शकांकडून जाणून घेतल्यास, टिपणे काढल्यास त्याचा नक्कीच लाभ होईल.
सुरुवातीला हा अभ्यास बोजड आणि कंटाळवाणा वाटू शकेल पण तो नेटाने सुरू ठेवल्यास त्याच्या परिभाषेची सवय होईल. ह्या विषयावर ग्रंथालयांमधून आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेले साहित्य वाचण्याची सवय लावून घेतल्यास आपले अध्यापन अद्ययावत राहण्यासाठी मदत होईल.



Popular Posts