Saturday, January 25, 2014

ज्ञानात्मकतावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -19


एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मानसशास्त्र वर्तनाच्या अभ्यासाकडून मनाच्या अभ्यासाकडे सरकले आणि बोधनवाद किंवा ज्ञानात्मकतावाद (कॉग्निटिविझम) हा नवीन अध्ययनसिद्धान्त उदयाला आला. ज्ञानात्मकता वादानुसारही ज्ञान हे शिकणाऱ्याच्या बाहेर अस्तित्वात असते असे मानले आहे. परंतु त्याचा भर मानवी स्मृती ज्ञानग्रहण कसे करते आणि अध्ययनाला कशी चालना देते यावर आहे. शिवाय ह्या विश्लेषणात अध्ययनाच्या स्थिती विचारात घेतल्या जातात, व्यक्तीव्यक्तीमध्ये फरक असून अध्यापन करताना प्रत्येकाला अनुरूप अशी धोरणे अवलंबिणे आवश्यक आहे असाही विचार आहे. वर्तनवादाचा भर वर्तनबदलाच्या उद्दिष्टांवर आहे तर ज्ञानात्मकतावादाचा भर कामगिरीच्या विविध टप्प्यांचे विश्लेषण करण्यावर आहे. नवशिका ते तज्ज्ञ असा प्रवास घडताना येणारे हे टप्पे आहेत.

वातावरणाचा अध्ययनावर सर्वाधिक परिणाम होतो हे गृहीत धरले आहेच पण शिकणारा आपल्या अध्ययनासाठी नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन अशी विशिष्ट प्रकारची धोरणात्मक हत्यारे कशी वापरतो आणि पूर्वज्ञान, श्रद्धा, दृष्टिकोन व मूल्ये ह्यांचा अध्ययनावर कसा परिणाम होतो ह्यावर भर दिलेला आहे. माहितीवर प्रक्रिया कशी होते आणि कशी साठवली जाते तसेच पूर्वज्ञान स्कीमा (अनेकवचन - स्कीमाटा) नावाच्या स्मृती संरचनेत कसे साठवले जाते आणि आवश्यकतेनुसार योग्य संदर्भात आठवून कसे वापरले जाते ह्याचा विचार ज्ञानात्मकतावादात विकसित झाला आहे.

समस्या किंवा गणिते सोडविणे ह्यासारख्या उच्च पातळ्यांवरील अध्ययन पातळ्यांवर अवलंबून असलेल्या गोष्टी ज्ञानात्मकतावादाच्या आधारे स्पष्ट करणे अधिक सोपे आहे कारण गुंतागुंतीच्या समस्यांचे विघटन घटकांमध्ये करून, त्यांची पूर्वज्ञानाशी सांगड घालून नव्या अध्ययनाचे विणकाम कसे होते हे त्याद्वारे दाखवता येते. ज्ञानात्मकतावादावर आधारलेल्या अध्यापन धोरणांमध्ये अध्ययन आशयाची व्यवस्था लावण्यावर भर असतो. माहितीवर प्रक्रिया कशी करावी, माहिती कशी आठवावी, कशी वापरावी ह्याचा त्यात समावेश असतो.   

डेव्हिड ऑसुबेल ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अग्रिम संघटनाची संकल्पना मांडली. शिकण्याच्या प्रक्रियेपूर्वी जी माहिती सादर होते त्याकडे त्याने लक्ष पुरविले. ह्या माहितीची पायऱ्या-पायऱ्यांची रचना केल्यास एका पायरीच्या आधारे वरची पायरी व त्याआधारे आणखी वरची पायरी गाठणे आणि पूर्वज्ञानाशी नव्या माहितीशी सांगड घालणे सुलभ होते असा विचार त्याने मांडला. म्हणजे एखादा पाठ वाचण्यापूर्वी त्यातील महत्त्वाच्या कल्पनांचा सारांश, आशयाचे स्पष्टीकरण, अमूर्ततेच्या किंवा सर्वसामान्यीकरणाच्या आणि समावेशकतेच्या आणखी वरच्या पातळीवर आधीच सादर केल्यास वाचन सोपे होते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचताना आधी ओवीवरील स्पष्टीकरण, अन्वय आणि ओवीचा अर्थ वाचून घेतल्यास ओवी जास्त समजते आणि आवडते. 

रॉबर्ट गॅग्ने ह्या मानसशास्त्रज्ञाने विशिष्ट ज्ञानात्मक किंवा बोधनात्मक प्रक्रियांशी निगडित अशा अध्ययनाच्या नऊ टप्प्यांची कल्पना मांडली. ह्या नऊ टप्प्यांवर अध्ययनस्थिती कशी असते आणि कोणती बौद्धिक कौशल्ये शिकावी लागतात हे सांगितले आहे शिवाय अध्यापन कशा क्रमाने करावे हेही सांगितले आहे. अगोदर अस्तित्वात असलेल्या ज्ञानसंरचनांशी, नव्या ज्ञानाची सांगड शिकणाऱ्याला घालता यावी म्हणून धड्यांचे संघटन ह्या टप्प्यांनुसार करावे असे त्याचे मत होते. अध्ययनासाठी ह्या नऊ पायऱ्या योग्य पातळीत आधार देऊ शकतात असेही त्याला वाटत होते. ह्या नऊ पायऱ्या अशा आहेत :
शिकणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणे
त्यांना शिकण्याच्या उद्दिष्टांची/फलितांची माहिती देणे
पूर्वीचे ज्ञान आठविण्यासाठी चालना देणे
जो आशय शिकायचा आहे तो प्रेरक स्वरूपात सादर करणे
मार्गदर्शन पुरविणे
अध्यापनातून सूचना देणे आणि आवश्यक कामगिरी करवून घेणे
त्यांच्या कामासंबंधी प्रतिसाद पुरविणे
कामगिरीचे मूल्यनिर्धारण करणे
आशय रुजवण्यासाठी प्रयत्न करणे

ज्ञानात्मकतावादानुसार, अध्ययनात शिकणाऱ्यांची भूमिका अधिक सक्रिय असते आणि अध्ययन प्रक्रियांचे संघटन करीत तो शिकत जातो. ज्ञानात्मकतावादाचा भर माहिती संघटित करण्यासाठी, ती दीर्घस्मृतीत नंतर आठवता येईल अशा रीतीने साठविण्यासाठी शिकणाऱ्यांना मदत करण्यावर आहे. अध्ययनाचे उद्देश/फलित अध्यापक ठरवितो पण विचारप्रक्रिया, अंतर्गत अध्ययन, माहितीचे संघटन, स्वतःवर देखरेख करण्याचे कौशल्य विकसित करणे, सकारात्मक दृष्टिकोन वाढविणे ह्या गोष्टी शिकणाऱ्याने करणे व त्यासाठी अध्यापकाने त्याला मदत करणे अपेक्षित आहे. शिक्षण सुलभ व्हावे म्हणून अध्ययन उद्दिष्टांशी सुसंगत असे पूर्वज्ञान आठवता येईल अशा तऱ्हेचे वातावरण निर्माण करायला हवे असे ज्ञानात्मकतावादाचे गृहीतक आहे. ज्यांना फारसे पूर्वज्ञान नाही अशांना नव्या स्कीमाटा तयार करता याव्यात म्हणून त्यांच्या माहितीतील उदाहरणे देण्याचे कसब शिक्षकाकडे अपेक्षित आहे.

वर्तनवाद म्हणजे काय?- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18


अध्ययन कसे घडते ह्याची मांडणी विसाव्या शतकातील 5 व्या आणि 6 व्या दशकामध्ये वर्तनवादाच्या (बिहेवियरिझम) आधारे केली गेली. "फक्त पाहता येतील (दृश्य) आणि मोजता येतील (मापनीय) अशाच घटकांच्या आधारे शास्त्रीय मांडणी करता येऊ शकते.' हा विचार आधारभूत समजून वर्तनवादाची उभारणी झालेली आहे.


वर्तनवाद समजून घेण्यासाठी मनाचे "अभिसंधान' (कंडिशनिंग) ही पारिभाषिक संज्ञा समजून घ्यायला हवी. आपल्याला आलेल्या अनुभवांचा साठा मनात होत असतो. नंतर येणारा अनुभव, आपण आधी आलेल्या ह्या अनुभवांच्या माध्यमातून घेत असतो. आधीच्या अनुभवांशी नव्या अनुभवाची तुलना करून त्याद्वारे आपण नव्या अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या परीने हा अर्थ लावलेला नवा अनुभव आणखी एक अनुभव म्हणून मनात साठवला जातो. अशा तऱ्हेने मनाच्या पूर्वीच्या संस्कारित स्थितीमध्ये (पूर्वीचे अभिसंधान) बदल होत जातो आणि त्याला नंतरची संस्कारित स्थिती (नंतरचे अभिसंधान) प्राप्त होते. थोडक्यात असे म्हणता येईल की विशिष्ट वेळी असलेल्या मनाच्या संस्कारित स्थितीला मनाचे त्यावेळचे अभिसंधान असे म्हणता येईल. अर्थातच एखाद्या वेळी असलेल्या मनाच्या मर्यादा आणि क्षमता मनाच्या त्यावेळच्या अभिसंधानानुसार असतात. 


माणसाला बक्षीस देऊन (गाजर दाखवून) किंवा त्याला शिक्षा करून (छडी उगारून) त्याच्या वर्तनात बदल घडवता येतो. वर्तनात हा बदल म्हणजे "अध्ययन' किंवा "शिकणे' होय आणि "गाजर आणि छडी' ह्यांच्या साहाय्याने मनाच्या अभिसंधानात हा अपेक्षित बदल घडवला जातो. हा बदल अभिसंधित होण्यासाठी, शिकलेले दृढ होण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा सकारात्मक ("गाजर') किंवा नकारात्मक ("छडी') बळ दिले जाते. ह्याला अभिसंधानाचे प्रबलन (रीइन्फोर्समेंट) अशी संज्ञा आहे. 
वर्तनवादाशी दोन प्रकारचे अभिसंधान संबंधित असल्याचे मानले जाते. 1) शास्त्रीय अभिसंधान 2) व्यापारक (कार्यप्रेरक) अभिसंधान


1) शास्त्रीय अभिसंधान किंवा क्लासिकल कंडिशनिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण
इवॉन पॉवलॉव ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या रशियन शास्त्रज्ञाने केलेल्या एका प्रयोगाची माहिती घेऊ. कुत्र्याला अन्न दाखविले की त्याची लाळ गळू लागते. त्याचवेळी एक बझर वाजविणे सुरू केले. पुढेपुढे नुसता बझर वाजवला की कुत्र्याची लाळ गळू लागते. दोन नैसर्गिक प्रतिसादांची सांगड घालणारे हे अभिसंधान आहे.


2) व्यापारक (किंवा कार्यप्रेरक) अभिसंधान किंवा ऑपेरंट कंडिशनिंग आपण "स्किनर्स बॉक्स' ह्या प्रसिद्ध प्रयोगाद्वारे समजून घेऊ शकतो. 
बी. एफ. स्किनर ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ऑपेरंट कंडिशनिंग चेंबर ह्या नावाचे एक उपकरण तयार केले. ह्या चेंबरमध्ये उंदिर किंवा कबुतरे एक कळ दाबून आपले अन्न मिळवण्यास शिकत असत. जर एखाद्या क्रियेच्या प्रतिसादातून बक्षीस मिळत असेल तर ती क्रिया पुन्हापुन्हा केली जाते आणि जर मिळत नसेल तर ती पुन्हा केली जाण्याची शक्यता कमी असते. "सजीव प्राणी, ते करीत असलेल्या क्रियांमध्ये, त्या क्रियांमुळे त्यांना अनुभवास येणाऱ्या परिणामांमुळे, हळूहळू बदल घडवितात' ह्या सिद्धान्तावर हा प्रयोग आधारित आहे. अशा रीतीने, व्यापारक अभिसंधान हे वर्तन आणि त्याचा परिणाम ह्यांची सांगड घालणारे अभिसंधान आहे.


पहिल्या प्रकारचे अभिसंधान हे प्रतिसादात्मक आहे तर दुसऱ्या प्रकारचे अभिसंधान क्रियात्मक आहे.


प्राण्यांवर केलेल्या अशा प्रकारच्या प्रयोगांमधून वर्तनवादी शास्त्रज्ञांनी असे म्हटले की अध्ययन, नेहमी वर्तन आणि त्याचे परिणाम ह्यातील संबंधाने प्रभावित होते. शिक्षक, बक्षिस आणि शिक्षा ह्यांचा वापर करून इच्छित अध्ययन साध्य करण्यासाठी शिकणाऱ्याचे वर्तन अभिसंधित करतो. वर्तनवादी असेही मानतात की अध्ययनासाठी विविध प्रकारचे प्रबलनही आवश्यक आहे. उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी चांगले गुण मिळाल्याने प्रेरित होत असेल तर गुणांचा वापर अशा सकारात्मक प्रबलनासाठी करता येतो. कमी गुण देणे हे नकारात्मक प्रबलन असू शकते, त्याचा वापर केल्यास विद्यार्थी चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे असा हा विचार आहे.

Friday, January 24, 2014

अध्ययन सिद्धान्त - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 17

आजच्या शिक्षकाचे अध्ययन तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान गुणवत्तेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे का?
होय. तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान म्हणजे पारिभाषिक अज्ञान नव्हे. परिभाषा माहीत नसली तरी पारंपारिक वारशाने व अनुकरणाने शैक्षणिक तत्त्वज्ञान अंगिकारणे आणि औपचारिक शिक्षणातून परिभाषा व नवीन संकल्पना शिकून घेऊन ते अंगिकारणे असे दोन मार्ग असू शकतात. प्रत्यक्षात दोन्हींची सांगड घातली गेल्यास ते अतिशय योग्य ठरते.
प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश करणाऱ्या असंख्य मुलांना नीट लिहिता वाचता येत नाही असे मध्यंतरी "प्रथम" च्या ""असर' अहवालाने अधोरेखित केले. गेल्या दोन वर्षांमध्ये मुलांच्या लेखन-वाचन करण्याच्या आणि गणिते सोडविण्याच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे हा अहवाल म्हणतो.
शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरांवर आणि माध्यमांमधून ह्यावर चर्चा सुरू झाली. शिक्षकांनी वर्तनवादावर आधारित अध्यापनपद्धती सोडून देऊन ज्ञानसंरचनावादी अध्यापनकौशल्यांचा अंगीकार करावा असे म्हणणे सातत्याने पुढे येऊ लागले. परंतु ह्या विविध अध्ययनपद्धती कोणत्या, वर्तनवाद (Behaviourism), ज्ञानात्मकतावाद (Cognitivism) किंवा ज्ञानसंरचनावाद (Constructivism) हे वाद किंवा "-isms' कोणते ह्याबाबत शिक्षकांना संभ्रम पडतो आहे. बीएडच्या/डीएडच्या अभ्यासाच्या वेळी केलेली घोकंपट्टी आता विस्मरणात गेल्याने गोंधळात आणखीनच भर पडलेली आहे. बालमानसशास्त्र आणि त्यावर आधारित ह्या सिद्धांतांचा पसारा खूप मोठा आहे. विविध पारिभाषिक शब्दांचे अर्थ नीट माहीत नसल्यास ह्या अध्ययनपद्धतींविषयी प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचे आपल्याला नीट आकलन होत नाही. ह्या सिद्धांतांविषयी तज्ज्ञांकडून किंवा मार्गदर्शकांकडून जाणून घेतल्यास, टिपणे काढल्यास त्याचा नक्कीच लाभ होईल.
सुरुवातीला हा अभ्यास बोजड आणि कंटाळवाणा वाटू शकेल पण तो नेटाने सुरू ठेवल्यास त्याच्या परिभाषेची सवय होईल. ह्या विषयावर ग्रंथालयांमधून आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेले साहित्य वाचण्याची सवय लावून घेतल्यास आपले अध्यापन अद्ययावत राहण्यासाठी मदत होईल.



Popular Posts