Sunday, October 18, 2020

शिक्षकांनी मुलांसमवेत कसे वागावे?

Online शिक्षणाच्या ह्या जमान्यामध्ये शिक्षक मुलांच्या समवेत असतात असे म्हणणेच धाडसाचे ठरेल. कोविडची साथ उतरली की शाळा सुरू होतील आणि शिक्षक-विद्यार्थी एकमेकांच्या प्रत्यक्ष संपर्कात येतील. तो दिवस लवकर उगवेल अशी आशा करूया.

असे असले तरी Online शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक-विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आहेतच. शिक्षकांनी मुलांसमवेत कसे वागावे? ह्याबाबत सल्ला देणे खूप अवघड आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत 3 जसा तात्त्विक विचार झालेला आहे तितक्या प्रमाणात शिक्षकाच्या वर्तनाबाबत झालेला नाही. प्रत्येक विद्यार्थी आणि शिक्षक ही स्वतंत्र व्यक्तिमत्त्वे आहेत. ते एकमेकांशी कसे वागतील ही वैयक्तिक बाब आहे. त्यामुळे त्याबाबत काहीही नियम करणे कठीण आहे. काही तंत्रे सांगता येतील 1  पण एक तंत्र एका ठिकाणी यशस्वी झाले तरी दुसरीकडे यशस्वी होईलच असे नाही.

म्हणून ह्यासाठी शिक्षकाने स्वतःचा आत्मविश्वास विकसित करत असतानाच आपली स्वतःच्या सोयीची वैयक्तिक शैली विकसित करणे अपेक्षित आहे.

शिक्षकाकडे एक प्रकारचा 'नैसर्गिक अधिकार' असतो असे अनेकजण मानतात. हा अधिकार संस्कृतीने, परंपरेने दिलेला असतो तर काही प्रभावी व्यक्तींकडे तो जन्मजात असल्यासारखा आणि विशेष जाणवणारा असू शकतो. वस्तुतः प्रत्येक शिक्षकाचे बरे वाईट दिवस असतात. सर्व काळ प्रत्येकजण चांगल्या अनुभवाचीच अपेक्षा करू शकणार नाही. वाईट अनुभवांचा आपल्यावर फार परिणाम होऊ न देण्याचा विवेक हे अनुभवी शिक्षकांचे मोठे हत्यार असते.

वाईट अनुभव टाळण्याची एक युक्ती म्हणजे विद्यार्थ्यांचा अपमान करणे टाळणे. शिक्षा करणे वेगळे आणि अपमान करणे वेगळे. मुख्याध्यापकांनी शिक्षकाचा अपमान केल्यावर शिक्षकाला जसे वाटते तसेच शिक्षकाने विद्यार्थ्याचा अपमान केला तर विद्यार्थ्याला वाटते. शिक्षकाने आपल्या सकारात्मक अपेक्षा विद्यार्थ्यापर्यंत त्याचा अपमान न होऊ देता पोहोचवणे हे त्याचे खरे कौशल्य असते.

हे कौशल्य विकसित करण्यासाठी एक उपयुक्त तंत्र असे आहे : विद्यार्थ्याला कोणताही प्रश्न विचारल्यानंतर (शिस्तीच्या/ अभ्यासाच्या, कोणत्याही बाबतीत) विद्यार्थ्याला त्याने प्रतिसाद सुरू करण्यापूर्वी उपलब्ध असलेला कालावधी (लेटन्सी पिरियड) वाढवणे 2 (संयम, संयम!).

Online अध्यापनाच्या वेळी तर संपर्कसाधनांच्या मर्यादा लक्षात घेऊन लेटन्सी पिरियड किती असावा ह्यावर विशेष विचार करावा. अनुभवातून हे उमजेलच पण शक्यतो ह्या मुद्याकडे दुलर्क्ष होणार नाही हे पहा.

संदर्भ :

1. https://www.scholastic.com/teachers/articles/teaching-content/25-sure-fire-strategies-handling-difficult-students/

2. http://aarf.asia/download.php?filename=../current/2019/Mar/diygSTb4ZAJm90z.pdf&new=IRJHSS2March19-9192.pdf

3. https://paramchandra.blogspot.com/2014/01/18.html

Popular Posts