Sunday, September 11, 2016

मराठीने नुक्ता स्वीकारावा

आजच्या (11.09.2016) लोकसत्ता दैनिकामध्ये आलेला मराठीने नुक्ता स्वीकारावा हा प्रा. लछमन परसाराम हर्दवाणी ह्यांचा लेख वाचला. एक सुंदर लेख वाचायला मिळाला. ह्या लेखाला २१ ऒगस्ट रोजी ह्याच दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वसुंधरा काशीकर-भागवत ह्यांच्या लेखाची पार्श्वभूमी आहे.  अशा अभ्यासू व्यक्ती समाजात आहेत ही गोष्टही दिलासा देणारी आहे. अशा लेखनाला वर्तमानपत्रे अजूनही प्रसिद्धी देतात हेही सुखद आश्चर्यच. मायबोली आणि मनोगत ह्या संकेतस्थळांवरील या विषयावरील चर्चा वाचनीय आहेत.

विनोबांनी गीताईच्या आवृत्त्यांमध्ये नुक्त्याचा वापर केला आहे त्याची आठवण झाली. गीता प्रवचनांच्या अनेक देशी भाषांमधील आवृत्त्या त्यांनी देवनागरीत मुद्रित केल्याचीही आठवण झाली. देवनागरीमध्ये असल्याने बंगाली, गढवाली (मला येथे नुक्ता टाईप करता येत नाही, क्षमस्व!) आवृत्ती मी वाचू शकलो. पूर्वी गिरगिट ह्या ट्रान्स्लिटरेशन टूलमध्ये इतर भारतीय भाषांमधील वेबपेजिस् देवनागरीमध्ये वाचता येत असत. सध्या दुसरे एखादे असे टूल आहे का हे माहीत नाही.

डमरूतील ड आणि झाडातील ड वेगळे आहेत ही गोष्ट मला नवीन आहे. उच्चारस्थाने वेगळी आहेत का? डमरूतील ड अधिक दन्त्य आहे का? की भेद फक्त स्वरामध्ये/ स्वराघातामध्ये आहे? हिन्दीतील् ड प्रमाणे नुक्ता असलेला ड फ्रिकेटिव आहे का? ही माहिती विस्ताराने मिळण्यासाठी संदर्भ शोधायला हवेत. मराठी शब्दांचे उच्चार देणारा सोवनींचा पाच खंडांचा अभिनव मराठी शब्दकोश पाहण्यात आला होता. तोही पुन्हा पाहून घेतो.

कैलाशचंद्र भाटिया ह्यांचे हिंदी की मानक वर्तनी हे पुस्तक वाचल्याचे आठवते. वरील लेखाने कुतूहल चाळवल्याने ते पुन्हा वाचावे असे वाटू लागले आहे. हिंदी वर्तनीसाठीही एखादा आदर्श संदर्भ शोधायला हवा.

Popular Posts