Saturday, November 14, 2009

बेशिस्तीची कारणे - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 11

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे कोणती ?

ह्या प्रश्नाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे लहान लहान भाग करून त्याचा विचार करू. बेशिस्त नेमके कशाला म्हणावे यापासून सुरुवात आहे. सध्या त्या विषयात न शिरता त्यावर सर्वसाधारण एकमत आहे असे समजूया. कारणे अनेक प्रकारची आहेत. बेशिस्तीला कारण कोण आहे यावर कारणे कोणत्या प्रकारची आहेत हे ठरते.

विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीला स्वतः विद्यार्थी, त्यांचे पालक/सामाजिक परिस्थिती, शिक्षक आणि शाळा हे चार प्रमुख घटक कारणीभूत असतात. ह्या प्रत्येक घटकातील दोष किंवा उणीवा अंतिमतः विद्यार्थ्यांमधील "बेशिस्ती'च्या स्वरूपात व्यक्त होतात. विद्यार्थ्याची एखादी वागणूक आपल्याला आवडत नसेल तर त्यामागे वरील चारांपैकी नेमक्या कोणत्या घटकाचा दोष जास्त आहे ह्याचा वस्तुनिष्ठपणे शोध घेण्याची सवय शिक्षकाने लावून घ्यायला हवी.

विद्यार्थ्यांशी संबंधित कोणते घटक शिक्षकाने त्यांच्या वर्तणुकीचे मूल्यमापन करताना विचारात घ्यावे?
सरसकट सर्व विद्यार्थ्यांसाठी अमूकच घटक अमूक कार्य करतात असे मानणे योग्य नसते. तरीही काही ठोकताळे आणि निरीक्षणे खाली दिलेली आहेत :

विद्यार्थ्याच्या वयाशी निगडित घटक
वाढत्या वयासोबत -

  • विद्यार्थ्याच्या शिक्षकाकडे असलेल्या मागण्या आणि शिक्षकांकडून असलेल्या अपेक्षा बदलतात.
  • विद्यार्थ्यांचे एकमेकांशी जे नाते असते त्यात बदल होतो.
  • वर्गाच्या दृष्टीने आपली प्रतिष्ठा काय असावी याबाबत विद्यार्थ्याच्या अपेक्षा उंचावतात.
  • विद्यार्थी अधिक सशक्त आणि थोराड होतात.
  • प्रौढांच्या वागणुकीबाबत ते अधिक टीका करू लागतात.
  • स्वतःच्या अपयशाबद्दल प्रौढांना जबाबदार धरण्याची त्यांची प्रवृत्ती वाढते.
  • विद्यार्थ्यांची संवेदनक्षमता वाढते.
  • सामाजिक अस्थैर्याने ते जास्त अस्वस्थ होतात.
  • विद्यार्थ्याच्या क्षमतेशी निगडित घटक

    • अधिक क्षमतेच्या विद्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा असे वाटत असते.
    • भिन्न क्षमतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून भिन्न वागणूक अपेक्षित असते. (जसे; काहींना संयम आणि सहानुभूती हवी असते)
    • आपल्या क्षमतेच्या पातळीनुसार विद्यार्थ्याचे स्वतःच्या यशाचे आणि अपयशाचे निकष बदलतात.
    • विद्यार्थ्यांना आपल्या विभिन्न क्षमतांशी सुसंगत अशा विभिन्न सुविधांची आणि उपकरणांची गरज असते.

    विद्यार्थ्याच्या लिंगाशी निगडित घटक
    विद्यार्थी मुलगा आहे की मुलगी आणि समाजात स्त्री-पुरुषांच्या आदर्श भूमिका कोणत्या मानल्या जातात याच्याशी निगडित घटक.
    उदाहरणार्थ;

    • प्राथमिक शाळेत मुली शिक्षकांशी जास्त सहकार्य करतात.
    • मुली लवकर वयात येतात.
    • शिक्षकांच्या मुलांकडून आणि मुलींकडून वेगवेगळ्या अपेक्षा असतात (परंतु चांगले अनुभवी शिक्षक तसे जाणवून देत नाहीत.)
    • वाढत्या वयानुसार मुलांना आणि मुलींना वेगवेगळ्या विषयात रस वाटू लागतो.
    • मुली भावनांच्या प्रकटनावर भर देतात तर मुले भावना शारीरिक हालचालींमधून (मस्ती करणे) व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात.

    विद्यार्थ्याच्या सामाजिक - आर्थिक परिस्थितीशी निगडित घटक
    (विश्लेषण करताना सामाजिक-आर्थिक घटकांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याची शक्यता असते ह्याचे भान नेहमी असायला हवे.)

    • साधारणतः गरीबांची मुलांना दबून वागण्याची तर श्रीमंतांच्या मुलांना उन्मत्तपणे वागण्याची सवय लागते. (जितक्या लहान वयापासून मुले एकत्र असतात, उदाहरणार्थ शिशुवर्गापासून,  तितका हा दोष कमी होतो)
    • शाळेमध्ये शिकवण्यात येणारी मूल्ये सधन वर्गाच्या चालीरीतींशी सुसंगत असण्याची शक्यता जास्त असते.
    • सधन मुले जास्त क्षमतेच्या गटात तर निर्धन मुले कमी क्षमतेच्या गटात आहेत असे मानण्याकडे शिक्षकांचा कल असतो.
    • चांगल्या वागणुकीचे चांगले फळ मिळण्यासाठी वाट पाहण्यास सधन मुले तयार असतात. निर्धन मुलांना हा विश्वास वाटणे अवघड असते.

    समाजगटविशिष्ट सांस्कृतिक घटक
    (विश्लेषण करताना काही घटकांना, उदाहरणार्थ, सामाजिक-आर्थिक घटकांना जरुरीपेक्षा जास्त महत्त्व दिले जाण्याची शक्यता असते. सांस्कृतिक घटकांबाबत तर ह्याचे भान नेहमी असायला हवे.)

    • काही समाजगटांमध्ये धार्मिक आणि नैतिक संकेत जास्त काटेकोरपणे पाळले जातात. (उदाहरणार्थ, शाकाहार-मांसाहार/एकत्र खाण्यापिण्यास मज्जाव)
    • धार्मिक कृत्ये आणि कर्मकांडे ह्यांचा काही विद्यार्थ्यांच्या शाळेतील वागणुकीवर परिणाम होऊ शकतो. (उदाहरणार्थ उपवास करणे)
    • दोन समाजगटांमध्ये पारंपारिक वैर असणे
    • एका गटाच्या भाषेची/बोली भाषेची दुसऱ्या गटाकडून टिंगल होणे
    • सामाजिक आणि भावनिक संयम किती प्रमाणात असावा ह्याबाबत भिन्न संस्कृतींचे भिन्न निकष असणे.

  • Popular Posts