शैक्षणिक गुणवत्तेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची उद्दिष्टे काय असावीत ?
शैक्षणिक गुणवत्तेसाठी जाणीवपूर्वक राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची उद्दिष्टे उपक्रमांच्या स्तरानुसार आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बदलतात. पुढे दिलेली उद्दिष्टे दक्षिण आशियातील दर्जेदार शिक्षणाबाबत नवी दिल्ली येथे जागतिक बॅंकेच्या पुढाकाराने भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेची आहेत :
शैक्षणिक गुणवत्तेचे मापन आणि वर्धन
गुणवत्ता सुधारणाऱ्या घटकांचा शोध आणि ते प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न - उदाहरणार्थ :
- शिक्षकांमधील व्यावसायिकतेचा विकास
- शिक्षकांसाठी प्रोत्साहक लाभ (ह्या विषयावरील एक उत्तम भाषण येथे आहे)
- शिक्षकांचे उत्तरदायित्व
- अधिकारांचे विकेंद्रीकरण
- गुणवत्तेची हमी
- शालेय स्तरावरील व्यवस्थापन
- अध्यापन-अध्ययन प्रक्रिया आणि अध्यापनशास्त्र
दर्जेदार शिक्षण उपलब्ध होण्यासाठी अभिनव उपायांचा शोध
- दर्जेदार शिक्षणासाठी समान संधी होण्याबाबत प्रादेशिक स्तरावरील अभ्यास
- दर्जेदार शिक्षणासाठी संधी उपलब्ध होण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाचा प्रादेशिक स्तरावर अभ्यास
उद्दिष्टांचा हा एक व्यापक स्तर झाला. एखाद्या बालोद्यानात दर्जेदार शिक्षणासाठी राबविण्यात येणारी उद्दिष्टे हे दुसरे टोक होईल. बालोद्यानासाठी गुणवत्तावर्धक उपक्रमांची उद्दिष्टे ठरवतानाही सहजासहजी न सोडवता येणारे धोरणात्मक प्रश्न उपस्थित होतात (विकीपीडियावरील हा लेख अवश्य नजरेखालून घालावा) -
- बालोद्यानात उपस्थिती सक्तीची असावी की नसावी ? (विकसनशील देशांमधील पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या फायद्यांविषयी एक चांगला संशोधन लेख येथे मिळेल)
- बालोद्यानातील प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय हा निकष ठेवण्याचे फायदे-तोटे कोणते ?
- अभ्यासक्रमाचे विविध पर्याय एकत्रितपणे विचारात घ्यावे की एकच ठराविक अभ्यासक्रम असावा?
- बालोद्यानाचा दैनंदिन कालावधी वाढवल्याने होणारे लाभ अल्पकालीन असतात असे संशोधनातून सिद्ध होत असतानाही शिक्षकांचा / पालकांचा हट्ट पुरवावा का?
- बालोद्यानाचा अधिकाधिक लिखापढीच्या दिशेने होत असलेला प्रवास योग्य आहे का?
वरील दोन स्तरांचा विचार करताना असे ध्यानात येईल की वैश्विक विचाराध्येही स्थानिक परिमाणे महत्त्वाची आहेत आणि अनेक स्थानिक वाटणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप वैश्विक आहे.
No comments:
Post a Comment