शालान्त परीक्षा मंडळाने "सोप्या गणिताचा' पर्यायी विषय आणल्याचे आजच पेपरात वाचले. पण सध्या असलेल्या कठीण गणितानेही समाधान न होणारी काही मुले (आणि अर्थातच त्यांचे पालक व शिक्षक ) असतात. अशी मुले गणित अध्यापक मंडळाने घेतलेल्या गणिताच्या बहिःशाल परीक्षांना किंवा देशातील किंवा देशाबाहेरील गणित ऑलिंपियाडला वगैरे बसतात.
ह्या बालगणितींच्या प्रज्ञेला अनेक आव्हानात्मक प्रश्न खुणावत असतात.
"दोन संख्यांच्या चवथ्या घातांची बेरीज 3026 असेल तर खालील प्रश्नांची कारणांसह उत्तरे द्या:
-त्या संख्या किती अंकी आहेत?
-त्या संख्या दोन्ही सम की दोन्ही विषम किंवा एक सम आणि एक विषम अशा आहेत?
- त्या संख्या कोणत्या?''
अशा प्रश्नांची तर्काधिष्ठित उत्तरे कशी द्यावी ह्याचे मार्गदर्शन करणारी "गणितातील चाकोरीबाहेरील वाटा' ही श्री. वा. के. वाड ह्यांची उत्तम मराठी पुस्तिका (ISBN-81-7424-043-8) आहे.
गणितासाठी चांगलं काय? इंग्लिश की सेमी-इंग्लिश? वैदिक गणित की जपानी पद्धत की चिनी पद्धत असले प्रश्न ह्या पातळीवर आपोआपच निरर्थक ठरतात. कोणत्या आणि किती विद्यार्थ्यांनी ह्या फंदात पडावे हा चर्चेचा विषय असू शकतो. पण गणिताचे शिक्षक म्हणविणाऱ्या सर्वजणांनी मात्र अशा पातळीवरील गणितीय प्रश्नांशी अवश्य झट्या घ्याव्यात.
No comments:
Post a Comment