जगामध्ये अस्तित्वासाठी आणि आपल्या जनुकांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून विविध प्रजातींमध्ये सतत स्पर्धा सुरू असते असे आपण जीवशास्त्रामध्ये वाचतो. परंतु एकाच प्रजातीचे नर आणि माद्या ह्यांची एकमेकांशी स्पर्धा होण्याचा प्रकार फक्त मानवामध्येच आढळत असावा. शतकानुशतके स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याने "पुरुषी' आणि 'बायकी' अशी गुणांची विभागणी झाली. स्त्रियांना मजुरी कमी मिळण्याचा प्रकार अद्यापही सुरू आहे. टेल्कोच्या शॉप फ्लोअरवरील कामासाठी अर्ज करण्यास स्त्री इंजिनिअर्सना मज्जाव करणाऱ्या जाहिरातीबद्दल थेट जेआरडींकडे दाद मागणारी एखादी सुधा (कुलकर्णी) मूर्ती अजूनही अपवादात्मकच आहे. संशोधनातून असेच आढळते की अजूनही बऱ्याच स्त्रियांना पुरेसा आत्मविश्वास आलेला नाही.
मात्र अलिकडे स्त्रिया पुरुषांशी वाढती स्पर्धा करू लागल्यावर "पुरुषी' किंवा "बायकी' असे काही गुण नसून फक्त "यशस्वी' ठरणारे गुण असतात असा साक्षात्कार पुरुषांना झालेला दिसतो. ह्याचाच परिणाम म्हणून आजचा शहरी पुरुष आपल्या रूपाकडे, नीटनेटकेपणाकडे आणि संवादकौशल्याकडे लक्ष पुरवू लागलेला आहे. स्त्रियांच्या ज्या गुणांमुळे त्यांना यश मिळते आहे ते गुण तो अंगी बाणवू लागलेला आहे. पुरुषांच्या ह्या नव्याने उदयाला आलेल्या वर्गाला मार्क सिम्पसन ह्यांनी "मेट्रोसेक्शुअल' (हेटरोसेक्शुअलच्या चालीवर) अशी संज्ञा बहाल केली आहे आणि ती लोकप्रिय झालेली आहे.
मेट्रोसेक्शुअल्सना एक आणखी फायदा होण्याची शक्यता आहे तो म्हणजे दीर्घायुष्य लाभण्याचा. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त दीर्घायुषी असतात, पण आता त्यांचे गुण अंगिकारणाऱ्या पुरुषांचे सरासरी आयुष्यमान खरोखरच वाढेल का हे कळण्यास अजून काही वर्षे जावी लागतील. पण तशी शक्यता तर्कसुसंगत नक्कीच आहे.
विभिन्न समाजांमध्ये आणि संस्कृतींमध्ये तसेच विविध कालखंडांमध्ये स्त्री-पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकींच्या भूमिका कशा होत्या ह्याचे वर्णन करणारी विकिपीडियामधील ही नोंद जिज्ञासूंनी अवश्य वाचावी.
No comments:
Post a Comment