घोडा का अडला?
भाकरी का करपली?
(आणि पोरगी हातून का निसटली?)
ह्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे म्हणतात. न फिरवल्यामुळे !
ह्या फिरवाफिरवीच्या फंदात पडायचं कारण म्हणजे केविन केलीच्या टेकिनमवर वाचलेला त्याचा इशारा ! ह्या नोंदीमध्ये त्याने डेव्हिड पोगच्या निरीक्षणाचाही हवाला दिलेला आहे.
डिजिटल स्वरूपात आपला सगळा "ऍनॅलॉग' डेटा रूपांतरित करायचा आपण सगळ्यांनीच सपाटा लावलेला आहे. पण ही डिजिटल माध्यमे आपली माहिती जास्त काळ टिकवू शकतात हाच मुळात एक मोठा भ्रम आहे. त्यापेक्षा कागदावरची, टेप्सवरची किंवा फिल्म्सवरची माहिती बरीच जास्त टिकून आहे.
महत्त्वाचं म्हणजे घरातल्या कंप्यूटरवर बर्न केलेल्या डीव्हीडीज् फक्त 2 वर्षे टिकतात म्हणे! आणि इथे पहावं तर जो तो डीव्हीडीवर बॅक अप घेतोय. सोन्याच्या डीव्हीडीज् वापरल्या तर डेटा शंभर वर्षे टिकतो हा दावाही फोल आहे म्हणतात.
ह्यावर केलीनं सुचवलेला उपाय आहे स्टोअरेज ऐवजी मूव्हेजचा. माहिती साठवण्याऐवजी एका माध्यमातून दुसऱ्या नव्या माध्यमात फिरवण्याचा - रूपांतरित करीत राहण्याचा.
आपण विषाची परीक्षा घेऊ नये हे तर खरंच पण आपण स्वतः ह्याची चाचणी घेतल्याशिवाय डीव्हीडीज् फेकूनही देऊ नयेत. जास्त माहिती हवी असेल तर ही साईट अवश्य पहावी.
No comments:
Post a Comment