छांदिष्ट माणसे अनेक आहेत आणि तसेच त्यांचे नानाविध छंदही. काही छंद संग्रह करण्याचे असतात. काडेपेट्यांपासून पोस्टाची तिकिटे जमवण्यापर्यंत अनेक.
पुस्तकप्रेमींना पुस्तकं जमवण्याचा छंद असणं स्वाभाविकच आहे. हे वेड जसजसं पराकोटीला जायला लागेल तसतशी जुनी पुस्तकं, ठराविक लेखकाची पुस्तकं, ठराविक आवृत्ती आपल्याकडे असल्याचा अभिमान वाटायला लागतो.
संतांनी असंग्रह वृत्ती जोपासण्याची गरज आहे असं कितीही कळकळीनं सांगितलं तरी त्यातून पळवाटा असतातच. ग्रंथसंग्रह करणे हे दासबोधात सत्त्वगुणाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे ह्याचा मीही अधूनमधून आधार घेत असतो.
संग्रह करूनही केला नाही असं म्हणण्याची सोय आता या महाजालामुळे झालेली आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठांचा संग्रह करणारी ही साईट पाहिली तेव्हा भरून पावलो असं मला वाटलं. मराठी पुस्तकांच्या वाटेला हे भाग्य कधी येणार याची आता वाट पाहूया. लवकरच एखादी छांदिष्ट व्यक्ती- हवंतर वल्ली म्हणा- मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा खजिना महाजालावर हजर करील आणि नुसते तिळा उघड असे म्हटले की खजिन्याची गुहा उघडेल यात मला तिळमात्र शंका नाही.
पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं माधव आचवलांच्या जास्वंद ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ नमुना म्हणून सोबत दिलेलं आहे. मराठीत दलालांपासून अवचटांपर्यंत आणि र. कृ. जोशींपासून अच्युत पालवांपर्यंत उत्तमोत्तम चित्रकारांनी नटवलेली मुखपृष्ठांची समृद्ध दुनिया आहे. पुस्तकाच्या आशयाचा, अंतरंगाचा वेध घेणारी त्यावर समर्थपणे स्वतंत्र भाष्य करणारी अन्वर्थक आणि समर्पक मुखपृष्ठे मराठीत खरोखरच अनंत आहेत.
नेव्हिल श्यूट च्या पॅन बुक्सच्या एका आवृत्तीत सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे सुंदर ऑइल पेंटिंग्जची होती. त्यातली बरीचशी मला मिळाली.
जेन ऑस्टिनच्या पुस्तकांच्या पेंग्विन प्रकाशनाने काढलेल्या गिफ्टबॉक्स आवृत्तीत मुखपृष्ठांवर व्हिक्टोरियन स्त्रियांची व्यक्तिचित्रणे आहेत. सुदैवाने ह्या आवृत्तीतील सर्व पुस्तके मी मिळवू शकलो. त्यातले प्राईड अँड प्रेज्युडिस एका मैत्रिणीने निष्काळजीपणे हरवले तेव्हा मी खूप हळहळलो. पूर्वी कुठे नाही तर काळबादेवीच्या न्यू अँड सेकंडहॅंड बुक स्टॉलमध्ये असे काही मिळण्याची आशा होती. आता तीही उरली नाही.
पेंग्विन (आणि पेलिकन) पुस्तकांची मुखपृष्ठे हा खरंतर स्वतंत्र संशोधनाचा विषय होण्यासही हरकत नाही. अशा निवडक मुखपृष्ठांसाठी हे संकलन अवश्य पहावे.