विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?
विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या
आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत.
'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची संकल्पना शिक्षणक्षेत्रात आली. "अथ आत्मानुशासनम्' अशा आदर्शवादापासून समाज दूर झाला की शिक्षकाचा नैतिक अधिकार स्वयंसिद्ध रहात नाही त्याला उसन्या पेडस्टलची किंवा दंडाधिकाराची गरज भासते.
मानसशास्त्रातील विविध मतप्रवाहांचे विविध काळी प्राबल्य होते असे आढळते. मानवी वर्तणुकीवर ताबा मिळवण्याच्या तंत्रांचे त्या मतांनुसार प्रतिपादन होत राहिले. सध्या अशा तंत्रांमध्ये
न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा "एनएलपी' चा बराच बोलबाला आहे.
रिचर्ड बॅंडलर आणि
जॉन ग्राइंडर हे ह्या संकल्पनेचे जनक होत.
Frogs into Princes ह्या त्यांच्या लोकप्रिय पुस्तकातून ह्या संकल्पनेचा प्रसार झाला. मज्जासंस्था आणि भाषा ह्यांच्यातील सहयोगातून वागणुकीवर प्रभाव पडतो किंवा पाडता येतो अशा स्वरूपाचे हे गृहीतक आहे आणि त्याच्या आधारे तयार केलेली उपचारपद्धती अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांवर उपाय असल्याचा दावा करण्यात येतो.
हे तंत्र अपेक्षेनुसार वादविवादांच्या भोवऱ्यात आहेच. आदर्शवादी विद्वान आणि
परंपरावादी विचारांचे समर्थन करणारे असे दोन टोकांचे लोक आपल्या अनुशासनपद्धतीसाठी ह्या तंत्राची कास धरावी असे म्हणतात हे विशेष.
एनएलपी विषयी सोप्या शब्दात माहिती देणारे
हे संकेतस्थळ अवश्य पहावे.
साचेबंद वागणूक नाकारणारे (= बेशिस्त) विद्यार्थी तसे का वागतात ह्याची अनेक प्रकारची कारणे असल्याने सर्वांना "रुळावर आणण्यासाठी' एकाच प्रकारचे (उदाहरणार्थ भाषिक क्लृप्तीचे) तंत्र वापरता येईल हे शक्य वाटत नाही. अनेक अनाक्रमक तंत्रांपैकी ते एक असू शकते. विद्यार्थ्यांने झापडबंद विचाराचे न होता त्याची विवेकबुद्धि शाबूत रहावी आणि त्याच्या आधारे त्याला स्वैराचारावर मात करता यावी असा आदर्शवादी विचार आहे.
विद्यार्थ्याला, मग तो बेशिस्त असो वा नसो, विचार करायची सवय लागायची असेल तर मुळात शिक्षकाला विचार करण्याचे वावडे असता कामा नये. झापडबंद किंवा टोपल्या टाकणाऱ्या शिक्षकांना विचार करण्याचा आळस असतो किंवा सवय नसते. ती सवय जर त्याने अंगी बाणवली तर त्याच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे एक उदाहरण राहील आणि त्यातून विचारांची सवय त्यांना लागू शकेल व यथावकाश त्यांचा प्रवास
आत्मानुशासनाकडे होऊ शकेल.
अशी ही चिकाटीने साध्य करायची दीर्घ प्रक्रिया आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ एकाच वर्गाला शिकवणारे शिक्षक त्या वर्गाचे चांगले नियंत्रण का करू शकतात ह्यामागच्या कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकाची पुरेशी ओळख पटण्यास आणि चांगुलपणाची प्रेरणा घेण्यास आवश्यक वेळ मिळतो. बडगा उगारून किंवा एखाद्या उसन्या "तंत्राने' अल्पकालीन यश मिळेलही व त्या दृष्टीने तंत्रांचा डोळस वापर अवश्य करावा पण शाश्वत परिणामासाठी "उप-देशा'ला (शब्दशः, गुरुच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ राहण्याला) पर्याय नाही.