Tuesday, December 21, 2010

ये दुख सहा ना जाए ...

तरुण गायकांचं गाणं जोरकस असतं, ताजंतवानं असतं आणि जेव्हा ते सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या स्वरमंचावर गातात तेव्हा अर्थातच तयारीचंही असतं. पण त्यात मध्यमवयीन गायकाच्या गाण्यात आढळणारं "दर्द' जाणवत नाही. की ही केवळ आपली एक समजूत आहे?
भाबडेपणा कमी असलेले आणि लोकप्रिय मतप्रवाहात सहजासहजी वाहून जाण्यास तयार नसलेले अनेक लोक अशा गोष्टी मान्य करीत नाहीत. तासंतास घोटल्याने गाण्यात दर्द उतरेल ही समजूतही अनेक विचारवंतांना मान्य नाही. गुरुची लहर म्हणून शिष्याने अघोरी रियाझ करण्याला अर्थ नाही, त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो असे ते मानतात.
हुकमी कारुण्य किंवा दर्द गाण्यात आणण्याचा काही फॉर्म्युला आहे का? (किंबहुना फॉर्म्युलाच आहे आणि ज्याला तो चांगला जमला तो आपल्याला दर्दी वाटतो, असे आहे का? ). स्वभावोक्ति करणारे गाण्याचे नेमके शब्द, आवाजाचा विशिष्ट लगाव, कातरता दर्शविणारा कंप, आणि एखाद्या संस्कृतीच्या परंपरेत अशा दर्दी भावनांशी जोडले गेलेले विशिष्ट स्वर किंवा तशा मानल्या गेलेल्या विशिष्ट स्वरावली यांचे रसायन जुळून आले की इच्छित परिणाम साधला जातो असे हे मत आहे. पण हे रसायन जमवून आणण्याची हातोटी साध्य करणे ह्यालाच तर तपश्चर्या म्हणत नसावेत ना?  
अलिकडेच  ऍटलांटिक मंथलीमध्ये '3rd minor' ची महती सांगणारा ह्याच विषयावरचा लेख वाचनात आला होता. सायंटिफिक अमेरिकनमधील एका अहवालाचाही त्यात हवाला देण्यात आलेला आहे. लोकसत्तेमध्येही (२८ सप्टेंबर २०१०) अरुण पुराणिक ह्यांनी ‘स्वरसम्राज्ञीच्या श्रेष्ठत्वाचा मागोवा’ ह्या लता मंगेशकर ह्यांच्यावरील गौरवपर लेखात कोमल गांधाराचा उल्लेख केलेला आहे. अर्थातच हे स्वर नेहमीच करुण रसाशी निगडित असतात असे नाही. प्रतिभाशाली संगीतकार त्यांचा वापर इतर इतर रसांच्या परिपोषासाठीही करतात.
काही गाणी, काही बंदिशी त्यातल्या काव्याचा परिपोष सुयोग्य संगीतामुळे झाल्यामुळे असेल, पण पछाडत राहतात. भीमसेनजींनी उस्ताद रशीदखान ह्यांना केलेल्या फर्माईशीवरून त्यांनी सादर केलेली "याद पिया की सताए', पं. राजन साजन मिश्रा ह्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या उस्ताद अल्लारखां ह्यांना अर्पण केलेली रूपक तालातली "ख्वाजा मुइनुद्दिन पीर अजमेरवाले',  ह्या बंदिशी कदाचित त्यांच्या प्रासंगिक संदर्भामुळे असेल पण नेहमी आठवत राहतात. "याद पिया की सताए' तर कित्येकांनी चांगली गायलेली आहे. अलिकडे कौशिकीने गायलेली आहे, वडाली बंधूंनीही गायलेली आहे. पण...
पछाडणाऱ्या गाण्यांविषयी "माझिया मना' ह्या ब्लॉगवर सौ. अपर्णा संखे ह्यांनी एक चांगली मालिका लिहिलेली आहे ती अवश्य वाचावी. चंद्रशेखर महामुनी ह्यांनीही आर्त गाण्यांवर सुंदर लेख लिहिलेला आहे. बेगम अख्तर ह्यांच्याविषयी लिहिताना धनंजय ह्यांनी "दंश'  नावाची बोरकरांची कविता उद्‌धृत केलेली आहे. 'Thy tooth is not so keen..' असे झोंबऱ्या वाऱ्याला शेक्सपिअर सांगतो त्याची आठवण झाली.
कदाचित काही एक वयानंतर गायकाला माणसाच्या कृतघ्नपणाचा अनुभव आला की मगच असा "दंश' तुलनेने सुसह्य होत असावा आणि गाण्यात तो दर्दीला आविष्कार होत असावा. बेगम अख्तर ह्यांनी गायलेली ही गझल माझ्या मित्राने तो मृत्यूशय्येवर असताना मला ऐकवली होती आणि ती विसरणे खरोखरच अशक्य आहे.




Popular Posts