"शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ऊर्जेचा विनियोग समान शैक्षणिक उद्दिष्टांसाठी व्हावा ह्या दृष्टीने सुरू असलेली व्यवस्था म्हणजे शालेय नेतृत्व' अशी विकिपीडियाने शालेय नेतृत्वाची सुंदर व्याख्या केलेली आहे.
"योजकस्तत्र दुर्लभः' ह्या उक्तीप्रमाणे हे सारे घडवून आणणारा समर्थ मुख्याध्यापक लाभणे हे शाळेचे खरे भाग्य असते. हल्ली मुख्याध्यापकाचे पद शिक्षकांना बहुधा निवृत्तीच्या जवळ आल्यावर मिळते आणि काही करून दाखवावे अशी ऊर्मी तोपर्यंत विरून गेलेली असते. त्यातही मुख्याध्यापकाचे पद ग्रहण करणारी व्यक्ती उत्साह टिकवून धरणारी असली तरी शिक्षण खात्याचे निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकारी, शाळेचे सत्तालोलुप विश्वस्तमंडळ आणि चंगळवादाच्या अंमलाखाली असलेले शिक्षक - पालक आणि विद्यार्थी मुख्याध्यापकाची सत्त्वपरीक्षा पाहतात. परिणामी ह्या सर्वांना पुरून मुख्याध्यापकाची सर्जनशीलता शिल्लक उरलीच तर ती "मुख्य अध्यापक' म्हणून खर्च न होता "मुख्य प्रशासक' म्हणून तिचा वेच होण्याची शक्यता जास्त असते.
परंतु विक्रमादित्याच्या सिंहासनाचे जसे स्थानमाहात्म्य असावे तसे मुख्याध्यापकाच्या खुर्चीचे आहे आणि अनेक कर्तृत्ववान शिक्षक त्यांना मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचं सोनं करतात आणि आदर्श मुख्याध्यापकीचा वस्तुपाठ घालून देतात. त्यातही अनेक लोकप्रिय आणि ख्यातकीर्त मुख्याध्यापकांनी आपले विचार लिहून प्रसिद्धही केलेले असल्याने ते "पूढिलांना' स्फूर्तिप्रद ठरत आहेत. इंग़्रजी आणि मराठीतही अशी अनेक पुस्तके आहेत. विविध जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाणे मुख्याध्यापकाने कसे टाळावे आणि आपले काम नेटाने कसे पुधे न्यावे ह्याच्या विविध युक्त्या पॉल ब्लूम ह्यांच्या Surviving and succeeding in senior school management: getting in and getting on ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत.
श्री. ल. ग. घटे ह्यांचे "मुख्याध्यापकी : एक शास्त्र आणि कला' हे हर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तकही असेच स्फूर्तिप्रद आहे. घटेसरांच्या ह्या पुस्तकाला भारतीय शिक्षण मासिकाचे संपादक श्री. मधुकर पेठे सरांची सुंदर प्रस्तावना आहे. "मुख्याध्यापकांसमोरील जटिल प्रश्न', "शाळेला उठाव आहे हे कसे जाणावे?' "शाळेला उठाव कसा आणावा?' "शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी करावयाचे प्रयत्न' "भावनिक स्पर्श आणि ओलावा निर्मिती' "पैसा मिळवणे व वापरणे' ही ह्या पुस्तकातील काही प्रकरणांची शीर्षके पाहिली तरी पुस्तकाचा आवाका आणि उपयुक्तता ध्यानात येईल.
मुख्याध्यापकाने आपल्या शाळेसाठी नेमके काय करावे ह्याचा खात्रीचा फॉर्म्यूला देता येणे शक्य नाही. पण अशा तऱ्हेच्या पुस्तकांमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकेल.