बॅरी कॉमनर हे अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी असून Centre for the Bilogy of Natural Systems ही संस्था त्यांनी स्थापन केली. अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी लढविलेली होती. अणुचाचण्यांना त्यांचा प्रखर विरोध आहे. रीगन आणि बुश यांनी प्रदूषण टाळण्यात कुचराई केल्याबद्दल त्यांच्यावर कॉमनर यांनी टीका केलेली आहे.
पर्यावरणाच्या ऱ्हासाचा अभ्यास करणे फॅशनेबल नव्हते तेव्हापासून बॅरी कॉमनर ह्या क्षेत्रात कार्यरत आहेत. विकसनशील आणि विकसित अशा दोन्ही प्रकारच्या देशांमधील पुरोगामी विचाराच्या लोकांना भावलेले असे त्यांचे हे पुस्तक आहे. Making Peace With The planet हे बॅरी कॉमनर ह्यांचे पुस्तक गेल्या दशकात बरेच गाजले. पुस्तकाची अनेक परीक्षणे झाली.
त्यापैकी मायकेल टॅन्झर ह्यांनी मंथली रिव्ह्यूच्या जून 1991 च्या अंकामध्ये केलेल्या परीक्षणावर हे टिपण आधारित आहे.
1971 साली कॉमनर यांनी प्रतिपादित केलेले पर्यावरणाचे चार नियम महत्त्वाचे मानले जातात. हे नियम असे आहेत :
1. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या कशाशीतरी जोडलेली आहे. प्रत्येकावर आणि सर्वांवर परिणाम करणारे सर्व सजिवांसाठी एकच पर्यावरण आहे.
सजीवांमध्ये, समाजांमध्ये, स्पीशींमध्ये आणि वैयक्तिक सजीव व त्याचा भौतिक-रासायनिक परिसर ह्यामध्ये एकमेकांशी संलग्न दुवे आहेत. एकमेकांशी जोडलेल्या व एकमेकांवर कार्य करणाऱ्या अनेकविध भागांची ही पर्यावरणप्रणाली बनलेली आहे ह्याचे काही विलक्षण परिणाम आहेत...
2. प्रत्येक गोष्ट कुठेतरी जाणे क्रमप्राप्त आहे. निसर्गात "कचरा' नसतो आणि तो जिथे फेकून देता येईल अशी कोणतीही जागा नाही.
पदार्थाच्या अविनाशित्वाच्या भौतिकशास्त्रातील मूळ नियमाचेच हे एक अनौपचारिक रूप आहे. प्राणी कार्बन डायॉक्साइड सोडतात ते वनस्पतींचे अन्न आहे. वनस्पती प्राणवायू बाहेर टाकतात आणि प्राणी तो वापरतात. प्राण्यांमधील सेंद्रिय त्याज्य पदार्थांवर कुजवणाऱ्या सूक्ष्म जीवाणूंची वाढ होते. त्यांच्या त्याज्य पदार्थांवर म्हणजे नायट्रेट्स, फॉस्फेट्स आणि कार्बन डायॉक्साइडवर शेवाळ्याचे पोषण होते.
"हे नेमकं कुठे जातं' असा चिकाटीनं शोध घ्यायचा असे ठरविल्यास पर्यावरण प्रणालीबाबत मौल्यवान माहिती मिळू शकते. उदाहरणार्थ पारा असलेली बॅटरी (सेल) खरेदी केली, वापरली आणि संपल्यावर फेकून दिली. पण नेमकी ती जाते कुठे? आधी ती कचऱ्याच्या डब्यात जाते. तेथून कचरा जाळण्याच्या इन्सिनरेटरमध्ये जाते. तेथे पाऱ्याला उष्णता लागून त्याची वाफ तयार होते व इन्सिनरेटरमधून ती बाहेर पडून हवेत मिसळते. पाऱ्याची वाफ विषारी असते. वाऱ्याबरोबर ती पसरते आणि यथावकाश पावसाबरोबर किंवा बर्फाबरोबर ती पुन्हा पृथ्वीतलावर येते. समजा डोंगरावरील तळ्यात पारा थंड होऊन जड असल्याने तळाशी जातो. इथे सूक्ष्म जीवाणूंची त्यावर क्रिया होऊन त्याचे रूपांतर मिथाइल मर्क्युरीमध्ये होते. हा विद्राव्य पदार्थ असल्याने मासा तो घेतो. त्याचा चयापचय होऊ शकत नसल्याने तो माशाच्या शरीरात साठून राहतो. हा मासा पकडून माणूस त्याला खातो आणि पारा त्याच्या इंद्रियांमध्ये साचून राहतो आणि अपायकारक ठरू शकतो वगैरे वगैरे...
3. निसर्गाकडे सर्वोत्तम ज्ञान आहे. मानवाने निसर्गात सुधारणा करण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केलेले आहे पण नैसर्गिक प्रणालीत बदल करणे ""त्या प्रणालीसाठी हानिकारक असण्याची शक्यता आहे.''
कॉमनर ह्यांच्या मते ह्या तत्त्वाला बराच विरोध होण्याची शक्यता आहे. कारण मनुष्य सर्वश्रेष्ठ आहे या समजाला त्यात आव्हान दिलेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे सार्वत्रिक वैशिष्ट्य असे की ते ""निसर्गात सुधारणा घडवण्यासाठी असते...'' अन्नपुरवठा करण्यासाठी, वस्त्र निवारा, संपर्कसाधने निर्माण करण्यासाठी, निसर्गात मानवाला उपलब्ध असलेल्या गोष्टींपेक्षा चांगल्या दर्जाच्या निर्मितीसाठी ते असते असा गाजावाजा केला जातो.
पण स्पष्टपणे सांगायचे तर नैसर्गिक प्रणालीत मानवाने केलेले बदल हे त्या प्रणालीसाठी हानिकारक असतात.
4. किंमत मोजल्याशिवाय काहीही मिळत नाही. प्रत्येक गोष्ट दुसऱ्या कोणत्यातरी गोष्टीपासून मिळते. स्वयंभू अस्तित्व असे काहीही नसते.
ही संकल्पना मूळची अर्थशास्त्रातील आहे पण पर्यावरणाला ती उत्तमप्रकारे लागू आहे. 'There is no such thing as a free lunch' असा हा अर्थशास्त्रातील नियम आहे आणि पर्यावरणालाही तोच लागू आहे.
पर्यावरणातही हा नियम बजावतो की प्रत्येक लाभ हा काही किंमत चुकवल्यावरच मिळतो. असाही विचार करता येईल की पर्यावरणाचे आधीचे तीनही नियम ह्या नियमात अंतर्भूत आहेत. मानवी प्रयत्नांनी निसर्गातून काही काढून घेतले तरी त्याची परतफेड करायला हवी. ही किंमत टाळता येणार नाही. ती विलंबाने दिली तरी चालेल पण ती चुकवावी लागेल. सध्याचे पर्यावरणीय संकट ह्याचे द्योतक आहे की ही किंमत चुकवायला आपण नको इतका उशीर केलेला आहे.
पर्यावरणाच्या समस्या आणि त्यावरील उपाय याकडे पाहण्याचे दोन दृष्टिकोन आहेत. एक पारंपारिक आणि दुसरा मौलिक. कॉमनर ह्यांनी केलेले मतप्रदर्शन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून पाहता येईल.
पारंपारिक किंवा उदारमतवादी दृष्टिकोनाप्रमाणे सध्याच्या पर्यावरणविषयक समस्या, लोकसंख्येतील वाढ आणि आर्थिक भरभराट ह्यांच्या संमिश्र परिणामातून उद्भवलेल्या आहेत.
पृथ्वीवरील मानवी लोकसंख्या अमर्याद वाढू शकेल का? फ्रेमलिन ह्यांच्या मते हे शक्य नाही. मानवी लोकसंख्येमुळे आणि त्यांच्या विविध उपक्रमांमु़ळे इतर प्रकारची ऊर्जा उष्णतेत रूपांतरित होत राहते व ती वरच्या दिशेने उत्सर्जित होते. जर लोकसंख्या एक अब्ज अब्ज लोकांची झाली तर उत्सर्जित होणारी उष्णता लोखंडाच्या विलयबिंदूइतके तापमान निर्माण करील.
पॉल एलरिच ह्यांच्या द पॉप्युलेशन बॉंब ह्या पुस्तकामध्ये ते म्हणतात, ""अति मोटारी, अति कारखाने, अति प्रमाणात कीटकनाशके, मलप्रक्रिया केंद्रांची अतीव कमतरता, पाण्याची अतीव कमतरता, अति कार्बन डायॉक्साईड आणि ह्या साऱ्याचे कारण असलेली अति लोकसंख्या - अशी पर्यावरणाच्या ऱ्हासाची कारणमीमांसा करता येईल.'' थोडक्यात म्हणजे माल्थसच्या सिद्धांताचे हे आधुनिक रूप आहे. लोकसंख्या वाढीचे प्रमाण नैसर्गिक संपत्तीच्या उपलब्धतेपेक्षा अधिक आहे. दूरगामी उपाययोजनेमध्ये लोकसंख्या वाढीला आळा घालणे हा या समस्येवरील उपाय आहे. तोपर्यंत प्रदोषकांच्या प्रसारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वॉल्टर एस. हॉवर्ड हे जीवशास्त्रज्ञ म्हणतात, अफाट समृद्ध समाज हा अफाट उत्सर्जन करणारा समाज झाला आहे. (The affluent society has become an effluent society). युनायटेड स्टेट्समधील जगाच्या 6 टक्के लोक जगातील 70 टक्क्यांहून जास्त घनकचरा तयार करतात.
बाजारपेठांचे हित लक्षात ठेवून जर ह्यावर नियंत्रण ठेवायचे असेल तर ज्यांचे उत्पादन झालेले आहे अशा म्हणजे उत्पादित प्रदोषकांवर नियंत्रण ठेवणे भाग आहे. हे शक्य व्हावे म्हणून पर्यावरण संरक्षणाचे विविध कायदे अस्तित्वात आलेले आहेत. उत्पादन प्रक्रियेत निर्माण झालेल्या विषारी पदार्थांपासून हवा आणि पाणी ह्यांचे संरक्षण व्हावे म्हणून जगात कोट्यवधी डॉलर्स खर्च होत असले तरी काही ठराविक क्षेत्रे वगळता सर्वत्र पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतो.
मौलिक (radical) दृष्टिकोनानुसार पर्यावरण (atmosphere) (नैसर्गिक) आणि तंत्रावरण (technosphere) (मानवनिर्मित उत्पादन आणि वितरणव्यवस्था) या दोहोंमधील विसंवाद हे पर्यावरणाच्या ऱ्हासाचे मुख्य कारण आहे.
पर्यावरणाची समस्या म्हणजे स्थानिक पातळीवरची विषारी कचऱ्याची समस्या ते जागतिक पातळीवरील वातावरणाच्या असुंतलनाची समस्या अशा गुंतागुंतीच्या समस्यांची मालिकाच आहे. दोन प्रकारच्या निर्मितीप्रक्रियांमधील विसंवाद या समस्यांच्या मुळाशी आहे. एक आहे पर्यावरणाची चक्री, अविनाशी आणि स्वसंवादी अशी नैसर्गिक प्रक्रिया आणि दुसरी आहे तंत्रावरणाची रेषीय, शोधक परंतु पर्यावरणाशी विसंवाद असलेली प्रक्रिया.
""प्रत्येक वस्तूचा दुसऱ्या वस्तूशी संबंध'' ""प्रत्येक वस्तूचा विनियोग'' अशा निसर्गनियमांमुळे पर्यावरणाचे संतुलन आपोआप राहू शकते. पण या तुलनेने अलिकडील उत्पादनतंत्राच्या संरचनेतच पर्यावरणाच्या ऱ्हासाची बीजे आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर उत्पादनतंत्रात वेगाने बदल झाले. साबणाऐवजी डिटर्जंट्स, सुती व लोकरी धाग्यांऐवजी कृत्रिम धागे, लाकूड, कागद व चामड्याऐवजी प्लॅस्टिक, सेंद्रिय खतांऐवजी रासायनिक खते, कीटकनाशके, छोट्या गाड्यांऐवजी मोठ्या गाड्या, रेल्वे मालवाहतुकीऐवजी ट्रकने मालवाहतूक. पुन्हा पुन्हा वापरता येणाऱ्या वस्तूंऐवजी एकदा फेकून देण्याच्या वस्तू या बदलांमध्ये प्रदूषणाची बीजे आढळतात. उत्पादनतंत्रातील हे बदल ग्राहकाच्या फायद्यासाठी झालेले नसून उत्पादकाच्या फायद्यासाठी झालेले आहेत विशेष. "ग्राहकं एव राजा' ह्या तत्त्वाचा या बदलाशी काहीही संबंध नाही. उत्पादनतंत्रातील बदलावर उत्पादकाचे नियंत्रण असते. बाजारपेठ व इतर सामाजिक घटकांचा परिणाम त्यावर होत असला तरी कमाल नफा आणि कमाल बाजारपेठ ही उद्दिष्टे उत्पादनतंत्राच्या निर्णयास कारणीभूत ठरतात.
अर्थातच पर्यावरणप्रदूषणाचे प्रश्न भांडवलवादी देशांपुरतेच मर्यादित नाहीत. मिश्र अर्थव्यवस्था अथवा समाजवादी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्येही उत्पादनतंत्र मात्र भांडवलवादी देशांमधील उत्पादनतंत्रावरच बेतलेले असते. या तंत्रानुसार केलेले कृषि/ औद्योगिक उत्पादन पर्यावरणाच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. झेकोस्लोव्हाकिया आणि पोलंड ह्या युरोपियन देशांमध्ये सर्वाधिक औद्योगिक प्रदोषके आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलवादी देशांमध्ये विकसित झालेले उत्पादनतंत्र सर्व जगभर पसरल्याने आणि जागतिकीकरणाचे वारे वाहिल्यानंतर राजकीय तत्त्वप्रणाली आणि प्रदूषण ह्यांचा संबंध उरला नाही. जगाच्या तापमानात वाढ कमी प्रमाणात व्हावी म्हणून चाललेल्या प्रयत्नांना चीनसारखी तथाकथित साम्यवादी राष्ट्रेही धूप घालीत नाहीत.
कोणत्याही वस्तूच्या उत्पादनामुळे निर्माण झालेल्या प्रदूषणाचे कॉमनर यांनी तीन भाग केलेले आहेत. उत्पादनाच्या प्रत्येक एककाने म्हणजे युनिटने निर्माण केलेले प्रदूषण (तांत्रिक गुणक) गुणिले दरडोई निर्माण झालेले उत्पादन (समृद्धि गुणक) गुणिले लोकसंख्या (लोकसंख्या गुणक ) असे हे तीन घटक आहेत. महायुद्धापासून तांत्रिक गुणकात प्रचंड वाढ झालेली आहे.
राष्ट्राराष्ट्रातील संपत्तीचे असमान वाटप व त्यामुळे निर्माण होणारी गरीबी हे लोकसंख्यावाढीचे प्रमुख कारण असल्याचे श्री. कॉमनर मानतात. लोकसंख्येमुळे गरीबी वाढते यापेक्षाही गरीबीमुळे लोकसंख्या वाढते असे मानणाऱ्यांच्या पक्षामध्ये श्री. कॉमनर आहेत.
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या मर्यादा हा वादग्रस्त विषय आहे. ऊर्जा आणि खनिजे अशा दोन्ही अंगांनी हा विचार करता येतो. सूर्यशक्ति प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे पृथ्वीवरील कोणताही पदार्थ अंतिमतः पृथ्वीवरच राहतो ह्या दोन गोष्टी आशादायक आहेत. पर्यावरण ही एखादी बंद पेटी नसून ते एक अक्षय पात्र आहे असा विचार श्री. कॉमनर यांनी मांडलेला आहे.
सूर्यशक्तिचा वाढता उपयोग, सेंद्रिय खतांवरील शेती, सर्वसमावेशक कीटकनाशन पद्धती, कचऱ्यातून पुनर्निर्मिती वगैरे उपायांनी म्हणजेच उत्पादनतंत्रात बदल करून प्रदूषण रोखणे शक्य आहे. मात्र अल्पावधीत अधिकाधिक नफा कमावण्याच्या व्यापारी प्रवृत्तीच्या विरोधात ही प्रक्रिया असल्याने मोठ्या प्रमाणावर प्रबोधन झाल्याखेरीज हा बदल आणि दूरगामी विचाराने पर्यावरणविषयक धोरणे आखली जाणे शक्य नाही.
सध्याच्या विकृत भांडवलवादी विचारसरणीची आणि चंगळवादी राहणीची सरशी जगभर होत असून नफेखोरीला ऊत आलेला आहे. प्रदूषणविरोधी कार्य करणाऱ्या मंडळींची सत्त्वपरीक्षा पाहणारा हा काळ आहे.
Disclaimer: The reader should understand that the information provided in this blog does not constitute legal, medical or professional advice of any kind. All warranties, liabilities, express or implied, are hereby disclaimed
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू । भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।। भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने । दुकूलद...
-
चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ...
-
विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे कोणती ? ह्या प्रश्नाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे लहान लहान भाग करून त्याचा विचार करू. बेशिस्त नेमके ...
आपण माझा अणु लिज्ञान हा ब्लॉग पाहून पाठलाग करण्याचे ठरवले धन्यवाद परंतू आपला ईमेल पत्ता आपल्या ब्लॉगवर कुठेही आढळला नाही. कृपया मेल करावा. आपला ब्लॉग फारच अभ्यासपूर्ण आणि संवेदनशील. चांदोबाची फॅन मी पण आहे. कृपया पहावे.
ReplyDeletehttp://suvarnapanchhi.blogspot.com/2007/08/blog-post_7203.html
आणि शिक्षणक्षेत्रांत आहात म्हणून हा व्हिडियो
http://ye-ye-pawsa.blogspot.com/2009/01/table-of-nine.html