Thursday, October 8, 2009

प्रश्नपेढी

प्रश्नपेढी तयार करणे हा धडपड्या शिक्षकांचा एक लाडका उपक्रम आहे. मीही माझ्या दुसऱ्या अनुदिनीवर प्रश्नांच्या विविध प्रकारांची थोडक्यात ओळख करून देण्याचा केलेला प्रयत्न येथे आणि येथे पाहता येईल. बहुपर्यायी प्रश्न म्हणजे काय हे आजच्या तरुण शिक्षकांना कदाचित सांगता येणार नाही. पण केबीसी टाईप प्रश्न (= कौन बनेगा करोडपती) (क्षमस्व; पण आमच्यासारख्या अडाणी लोकांसाठी कंसात असे समजावून द्यावे लागते) असे म्हटले की लगेच समजते. एक अध्यापन साधन म्हणून प्रश्नांचा कसा वापर करता येतो यावर अजय भागवत यांनी लिहिलेला एक सुंदर लेख येथे पाहता येईल.
योग्य प्रश्न विचारणे हे खरोखरच अतिशय महत्त्वाचे आहे. विचारवंतांना पडलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातूनच मानवाची उत्तरोत्तर प्रगती होत गेली. ह्या तत्त्वज्ञांना आणि शास्त्रज्ञांना पडणारे प्रश्न त्यांनी स्वतःपाशी न ठेवता एकमेकांना विचारावेत आणि त्यासाठी किमान शंभरेक विद्वानांना एका खोलीत कोंडून ठेवावे असे जेम्स ली बायर्स ह्या विख्यात चित्रकाराच्या मनात आले आणि लगेच तो त्या कामाला लागला. त्यातूनच एज फाऊंडेशनच्या जागतिक प्रश्न केंद्राची निर्मिती झाली. 1998 पासून ह्या उपक्रमाला सुरुवात झालेली आहे. दरवर्षी एक प्रश्न विचारण्यात येतो. त्याची उत्तरे देणारे तज्ञांचे आणि शास्त्रज्ञांचे लेख आपल्याला ह्या संकेतस्थळावर वाचावयास मिळतात. संपादनाची आणि प्रकाशनाची जबाबदारी एज फाऊंडेशनचे संस्थापक जॉन ब्रॉकमन सांभाळतात.
यावर्षीचा प्रश्न आहे, WHAT WILL CHANGE EVERYTHING?  त्याला केविन केली यांनी "आर्टिफिशिअल इंटेलिजन्स' हे उत्तर दिले आहे तर हॉवर्ड गार्डनर यांनी "जनुकशास्त्र आणि मानसशास्त्र ह्यांच्या सहयोगातून हुशारीचा शोध' असे उत्तर दिले आहे. स्टीव्हन पिंकर ह्यांनी "पर्सनल जेनॉमिक्स' असे उत्तर दिले आहे. तुमच्या जीनोमचे स्विक्वेन्सिंग तुम्हाला आता  (3.5 लाख डॉलर्सना) मिळू शकते. स्टीव्हन श्नायडर ह्यांनी ध्रुव प्रदेशातील बर्फ वितळण्याचा धोका जवळ येऊन ठेपल्याचे सांगितले आहे. या वर्षीचे असे 151 लेख आहेत. 1998 सालापासूनचे असे अनेक लेख तुम्ही ह्या संकेतस्थळावर वाचू शकता. हा खजिना म्हणजे खरी प्रश्नपेढी (आणि उत्तरपेढीसुद्धा) आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts