Wednesday, June 30, 2010

बालमानसशास्त्रातील काही आधारभूत संकल्पना - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 13

पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल?

हा खूप व्यापक प्रश्न आहे. केवळ कायदे करून हे घडणार नाही. कायद्याच्या निमित्ताने प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते हे खरे आहे पण तितके पुरेसे नाही. प्रत्यक्ष काम शैक्षणिक संस्थांनाच करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी बालक, पालक आणि शिक्षक अशा तिन्ही घटकांचा विचार अभिप्रेत आहे. यापैकी बालक केंद्रस्थानी असून इतर दोन घटकांमध्ये बालकाचा विकास घडविण्यासाठी समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी विशेषतः प्राथमिक व पूर्वप्राथमिक वयोगटांच्या विकासात बालमानसशास्त्र महत्त्वाचे ठरते.

पूर्वप्राथमिक शिक्षकाकडे बालमानसशास्त्राचे ज्ञान असणे अनिवार्य आहे का?

होय. सामान्यतः पूर्वप्राथमिक वर्ग संचालित करणाऱ्या शिक्षिकेला असे ज्ञान असतेच. फक्त ते औपचारिक स्वरूपात असेलच असे नाही. आई ही आपली पहिली गुरु आहे. तिला आपल्या बाळाचे मन अंतःप्रेरणेने समजते. म्हणूनच अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये बहुतेक शिक्षिकाच आहेत, पुरुष शिक्षक अभावानेच आढळेल. स्त्रीला निसर्गतःच बालमनाची अधिक जाणीव असलेली दिसते. असे असले तरी सैद्धान्तिक स्वरूपाचे औपचारिक ज्ञान बालोद्यान किंवा पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षिकांना असले तर त्याचा फायदाच होईल. विशेषतः मुले नेमके काय करण्यास सक्षम असतात किंवा नसतात ह्याच्या सर्वसामान्य मर्यादा त्यांना माहीत असल्यास फायदा होतो.

अनेक बालमानसशास्त्रज्ञांनी मुलांच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे सांगितले आहेत. ह्या साऱ्यामागे बालमानसशास्त्राची काही आधारभूत तत्त्वे आहेत. मुलांचा स्वभाव आत्मकेंद्री असतो हे असेच एक तत्त्व आहे.

बालमनाच्या आत्मकेंद्री स्वभावाची संकल्पना काय आहे ?

बालमानसशास्त्राची पायाभरणी करणाऱ्या ज्यां पिआजे ह्या स्विस शास्त्रज्ञाने असे दाखवून दिलेले आहे की लहान मुलांना सांकल्पनिक विकेंद्रीकरण करता येत नाही. उदाहरणार्थ, दृश्य आणि ते पाहणारा द्रष्टा ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे त्यांना समजू शकत नाही. आधुनिक मानसशास्त्राला पिआजे ह्यांचे मत संपूर्णपणे अमान्य नसले तरी मुलांची क्षमता इतकी कमी नसते असे त्यांना वाटते. मुलांची समज चांगली असते पण आपल्या ज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले नसते. आपल्याला एखादी गोष्ट समजलेली आहे असे लहान मूल दाखवून देऊ शकत नाही. परंतु पिआजे ह्यांच्या मतानुसार लहान मुलाला त्याच्या दृष्टिकोनाव्यतिरिक्त दुसरा एखादा दृष्टिकोन (उदाहरणार्थ, मोठ्या माणसाचा) असू शकतो याची कल्पनाच करता येत नाही. लहान मुलाच्या ह्या असमर्थतेबाबत दुमत नाही.

पिआजे ह्यांची संशोधन पद्धती काय होती?

पिआजे ह्यांची संशोधन पद्धती काहीशा अलिप्तपणे घेतलेल्या मुलाखतीची होती. एखादा शाब्दिक अगर व्यावहारिक विषय ह्या निर्हेतुक आविर्भावात घेतलेल्या मुलाखतीच्या केंद्रस्थानी असे. पिआजे ह्यांच्या सिद्धान्तानुसार "दृश्य-द्रष्टा ह्यांच्यामध्ये समतोल साधणे' हे बालमनाचे ध्येय असते. बालमनाची जडणघडण निरंतर मनोव्यापारातून होत असते. भौतिक आणि सामाजिक पर्यावरणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आपले स्वत्व जपण्याची धडपड असे ह्या मनोव्यापारांचे स्वरूप असते. पर्यावरणाची मनावर होणारी क्रिया आणि मनाची प्रतिक्रिया यातील समतोलत्वाचा हा सिद्धांत आहे.

Wednesday, June 23, 2010

शिस्त लावण्याचे उपाय - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 12

विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?

विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत. 'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची संकल्पना शिक्षणक्षेत्रात आली. "अथ आत्मानुशासनम्‌' अशा आदर्शवादापासून समाज दूर झाला की शिक्षकाचा नैतिक अधिकार स्वयंसिद्ध रहात नाही त्याला उसन्या पेडस्टलची किंवा दंडाधिकाराची गरज भासते.

मानसशास्त्रातील विविध मतप्रवाहांचे विविध काळी प्राबल्य होते असे आढळते. मानवी वर्तणुकीवर ताबा मिळवण्याच्या तंत्रांचे त्या मतांनुसार प्रतिपादन होत राहिले. सध्या अशा तंत्रांमध्ये न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा "एनएलपी' चा बराच बोलबाला आहे.

रिचर्ड बॅंडलर आणि जॉन ग्राइंडर हे ह्या संकल्पनेचे जनक होत. Frogs into Princes ह्या त्यांच्या लोकप्रिय पुस्तकातून ह्या संकल्पनेचा प्रसार झाला. मज्जासंस्था आणि भाषा ह्यांच्यातील सहयोगातून वागणुकीवर प्रभाव पडतो किंवा पाडता येतो अशा स्वरूपाचे हे गृहीतक आहे आणि त्याच्या आधारे तयार केलेली उपचारपद्धती अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांवर उपाय असल्याचा दावा करण्यात येतो. image51

हे तंत्र अपेक्षेनुसार वादविवादांच्या भोवऱ्यात आहेच. आदर्शवादी विद्वान आणि परंपरावादी विचारांचे समर्थन करणारे असे दोन टोकांचे लोक आपल्या अनुशासनपद्धतीसाठी ह्या तंत्राची कास धरावी असे म्हणतात हे विशेष. एनएलपी विषयी सोप्या शब्दात माहिती देणारे हे संकेतस्थळ अवश्य पहावे.

साचेबंद वागणूक नाकारणारे (= बेशिस्त) विद्यार्थी तसे का वागतात ह्याची अनेक प्रकारची कारणे असल्याने सर्वांना "रुळावर आणण्यासाठी' एकाच प्रकारचे (उदाहरणार्थ भाषिक क्लृप्तीचे) तंत्र वापरता येईल हे शक्य वाटत नाही. अनेक अनाक्रमक तंत्रांपैकी ते एक असू शकते. विद्यार्थ्यांने झापडबंद विचाराचे न होता त्याची विवेकबुद्धि शाबूत रहावी आणि त्याच्या आधारे त्याला स्वैराचारावर मात करता यावी असा आदर्शवादी विचार आहे.

विद्यार्थ्याला, मग तो बेशिस्त असो वा नसो, विचार करायची सवय लागायची असेल तर मुळात शिक्षकाला विचार करण्याचे वावडे असता कामा नये. झापडबंद किंवा टोपल्या टाकणाऱ्या शिक्षकांना विचार करण्याचा आळस असतो किंवा सवय नसते. ती सवय जर त्याने अंगी बाणवली तर त्याच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे एक उदाहरण राहील आणि त्यातून विचारांची सवय त्यांना लागू शकेल व यथावकाश त्यांचा प्रवास आत्मानुशासनाकडे होऊ शकेल.

अशी ही चिकाटीने साध्य करायची दीर्घ प्रक्रिया आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ एकाच वर्गाला शिकवणारे शिक्षक त्या वर्गाचे चांगले नियंत्रण का करू शकतात ह्यामागच्या कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकाची पुरेशी ओळख पटण्यास आणि चांगुलपणाची प्रेरणा घेण्यास आवश्यक वेळ मिळतो. बडगा उगारून किंवा एखाद्या उसन्या "तंत्राने' अल्पकालीन यश मिळेलही व त्या दृष्टीने तंत्रांचा डोळस वापर अवश्य करावा पण शाश्वत परिणामासाठी "उप-देशा'ला (शब्दशः, गुरुच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ राहण्याला) पर्याय नाही.

Tuesday, June 15, 2010

विश्रब्ध शारदा

नुकताच दोन शास्त्रज्ञांमधील पत्रव्यवहार वाचण्याच्या निमित्ताने Letters of note हे संकेतस्थळ पाहण्यात आले आणि मराठीतील “विश्रब्ध शारदा’’ ह्या ह. वि. मोटे ह्यांनी संकलित केलेल्या अप्रतिम पत्रसंग्रहाची आठवण झाली. मग मोट्यांची "सर्वमंगल क्षिप्रा' आठवली, बेडेकरांचे "एक झाड दोन पक्षी' आठवले आणि मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचलेला कृष्णाताई मोट्यांवरील हा आणि हा लेखही आठवला.
पंडित नेहरूंची पत्रे, आइन्स्टाईनची पत्रे इतकंच काय पण समर्थ रामदास स्वामींच्या पत्रांपासून साहित्यविश्वाचे अविभाज्य अंग असलेली असंख्य प्रकारची पत्रे आहेत आणि अशी पत्रे पोहोचवणारा - आणणारा तो दूत, त्याची आतुरतेने वाट पाहणारे विरही जन ह्यांच्या भावकल्लोळाचा आविष्कार करणारे पत्रवाङ्मय अतिशय समृद्ध आहे.  डाकिये ने द्वार खटखटाया । अनबांटा पत्र लौट आया ।। ह्या माया गोविंद ह्यांच्या पद्यपंक्तिंसारखे पत्रांचे अनेक भावपूर्ण उल्लेख ललित आणि इतर साहित्यात जागोजागी आहेत.
अलिकडे संपर्काच्या क्रांतीमुळे पत्र लिहिणे हा प्रकार कमी झालेला आहे आणि एक साहित्यप्रकार अस्तंगत होतोय की काय अशी भीतीही अनेकांना वाटते आहे. (जॅन्युअरीमॅगेझिन ह्या साईटवरील हा लेख नजरेखालून घाला). बेन ग्रीनमन ह्या अति प्रयोगशील आधुनिक लेखकाच्या या मुलाखतीतही ही खंत दिसते आहे. 
रोजनिशी म्हणजे एकप्रकारे स्वतःलाच लिहिलेली पत्रे आहेत. (प्रस्तुत ब्लॉग्जसारख्या लिहिण्याच्या हौसेखातर सुरू असलेल्या अनेक ब्लॉग्जच्या बाबतीत तर हे प्रकर्षानं खरं आहे). पत्रवाङ्मयाचा आढावा घेणारी विश्वकोशातील ही नोंद पहावी.

Popular Posts