Tuesday, April 30, 2019

वामनपंडित – यथार्थदीपिका ह्या ग्रंथाचे कर्ते

`नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी ।
रसभावना तत्कवना मानी या तेवि वाम न स्वामी’
- मोरोपंत
शाळेत वामनपंडितांच्या आणि रघुनाथपंडितांच्या1 कविता होत्या त्यामुळे ही नावे कानावरून गेलेली, ओळखीची होती.
पुढे वामनपंडितांनी (मूळ नाव – वामन नरहरी शेष) गीतार्थबोधिनी ह्या ग्रंथात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे मराठी समश्लोकी, आर्या, हिंदी दोहा, मराठी ओवी आणि अभंग अशा पाच प्रकारच्या रचनांमध्ये केलेले रूपांतर वाचनात आले. केतकरांच्या ज्ञानकोशातील वामनपंडितांवरील नोंदीचा काही भाग असा आहे -

“यमकें लांब लांब साधण्यांत याचें कौशल्य दिसून येतें. म्हणून यास यमक्या वामन असेंहि म्हणतात. याचें कांहीं भाषांतररुप काव्य आहे व कांहीं स्वतंत्र आहे. भर्तृहरीचीं श्रृंगार, नीति वैराग्य शतकें, गंगालहरी, समश्लोकी गीता हीं भाषांतरित होय. निगमसागर नांवाचा वेदांतपर ग्रंथ त्यानें लिहिला आहे. त्यानंतर, 'यथार्थदीपिका' या नांवाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या सूचनेवरुन त्यानें लिहिली. व तींत आंधळी भक्ति ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग म्हणून प्रतिपादिलें आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे.’’
जिज्ञासूंनी मूळ नोंद2 येथे पहावी.
आधुनिक काळात अशा काव्याला कृत्रिम म्हणून हिणवण्यात आले असले तरी पाच प्रकारच्या काव्यरचनांच्या स्वभाव लक्षात घेऊन केलेली ही रूपांतरे पाहिली की आपण थक्क होतो. उदाहरणार्थ आपण पुढील श्लोक पाहू :
मूळ श्लोक
सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥
वामनपंडितांची गीतार्थबोधिनी
समश्लोकी
कृपाविष्ट तसा पार्थ आशीं नेत्रांत दाटली
बोले विषादयुक्तातें त्यातें हें मधुसूदन ॥
आर्या
संजय म्हणे किरीटी साश्रुसखेदहि बहूकृपावंत । होतां मधुसूदन तो बोले वचनें तयासि भगवंत ॥
दोहा
लेऊ सास असुवाभरें अर्जुन करुणाभाय । बहुबिखादसों जुगत लखी बोले श्री जदुराय ॥
ओवी
संजय म्हणे धृतराष्ट्रातें । अर्जुन वेष्टिला मोहें बहुतें । अश्रुपात आलें नेत्रांतें । देखोनि बोलिला श्रीकृष्ण ॥
अभंग
श्री गुरुव्यासाचा । शिष्य सद्विद्येचा । धृतराष्ट्रदेवाचा । –तोषदानी ॥1॥ बोले राया देव । उघड अपूर्व । तरी हें वैभव । भोक्ता होसी ॥2॥ कृपेनें व्यापीला । सांडित अश्रूला । येथें पार्थ भ्याला । विषादानें ॥3॥ मग मधुरिपू । शांतवी अमूपू । शांतवावें वपू । तुका म्हणे ॥4॥

ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ह्या टीकेप्रमाणे वामनपंडितांनी लिहिलेली गीतेवरील ओवीबद्ध टीका यथार्थदीपिका ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीइतका हा ग्रंथ पुरातन आणि समृद्ध नसला तरी त्याची शैली मर्मग्राही असून विविध प्रमेयांचा विभिन्न दृष्टिकोनांमधून केलेला अभ्यास आणि ज्ञानयुक्त सगुणभक्तिचे प्रतिपादन हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
उदाहरणार्थ,

यांस मी मारूं कैसा? । इतकाच श्लोकाचा वळसा ।
हे मरती कीं शोक ऐसा । न करी अर्जुन ॥
ऐसा वाखाणितां अर्थ । हा दोष ठेविती समर्थ ।
याचा अर्थ यथार्थ । वाखाणिला ऐसा ॥
कीं यांस मारणें अधर्म । तेव्हां शोक करणें अधर्म ।
तरी श्लोकाचें मूळ भ्रम । कीं हे मरती म्हणोनि ॥   


वामनपंडितांचे आजोबा वामन अनंत शेष हे विजापूर दरबारी ग्रंथपाल होते. संस्कृत आणि फार्सी ह्या भाषा त्यांना अवगत होत्या अशी मराठी विश्वकोशातील नोंद आहे. 1666 साली वामनपंडित घरसंसार सोडून बाहेर पडले आणि त्यांनी संन्यास घेतला. 

निगमसार, कर्मतत्त्व, ब्रह्मस्तुती, अनुभूतिलेश हे त्यांचे वेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ आहेत. रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रा संवाद ह्या त्यांच्या रचना रामायणावर आधारित आहेत.  

गजेंद्रमोक्ष, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, मृत्तिकाभक्षण, हरिविलास, रासक्रीडा अशी आख्यानेही त्यांनी रचलेली आहेत. द्वारकाविजय हा त्यांचा ग्रंथ भागवताच्या दशम्‌ स्कंधावर आधारित आहे.
वामनपंडितकृत सर्व संग्रहाचे प्रकाशक  माधव चंद्रोबा असून ग्रंथाची छपाई  शिळा छापखान्यात, दगडावर अक्षरे कोरून केलेली आहे. प्रकाशन काल - शके १७९० (सन १८६८) आहे. मुंबईतील बाळाजी आणि कंपनी ह्या प्रकाशनसंस्थेने वामनी ग्रंथ हे मासिक 1889 च्या नोव्हेंबरपासून सुरू केले. वामनपंडितांच्या ग्रंथांची जुनी हस्तलिखिते मिळवून, ती शुद्ध करून छापणे हे त्याचे उद्दिष्ट होते.
वामनपंडितांविषयी अधिक माहिती जया दडकर आणि इतरांनी संपादित केलेल्या `संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशामध्ये (आरंभापासून 1920 पर्यंतचा कालखंड) मिळू शकेल.
 
वामनपंडितांच्या3 67 हून अधिक ग्रंथांची यादी4 मराठी विकिपीडियाने दिलेली आहे. त्यांचे 20 ग्रंथ येथे5 ऑनलाईन उपलब्ध आहेत. यथार्थदीपिका हा ग्रंथ राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  आपल्या भाषेतील ह्या ठेव्याकडे अडगळ म्हणून न पाहता पूर्वग्रह बाजूला ठेवून ह्या समृद्ध साहित्याचा आस्वाद घ्यायला हवा.

संदर्भ :
1. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4
2. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
3. http://www.chanefutane.com/articles.php?articlesid=40
4. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4#.E0.A4.89.E0.A4.A4.E0.A5.8D.E0.A4.A4.E0.A4.B0_.28.E0.A4.B5.E0.A4.B0.E0.A5.8D.E0.A4.A4.E0.A4.AE.E0.A4.BE.E0.A4.A8.29.E0.A4.95.E0.A4.BE.E0.A4.B2.E0.A5.80.E0.A4.A8_.E0.A4.9F.E0.A5.80.E0.A4.95.E0.A4.BE
5. http://www.transliteral.org/pages/i141129060408/view

No comments:

Post a Comment

Popular Posts