Friday, May 16, 2008

ऐसी हस्ताक्षरे रसिके...

कळफळकाच्या वाढत्या वापरामुळे "लेखन' करण्याचे महत्त्व कमी होत जाईल का? कॅल्क्युलेटर्स असल्यावर पाढे घोकायची आवश्यकता आहे का?

अशा तऱ्हेचे प्रश्न भारतीय परंपरेनुसार अप्रस्तुत आहेत. ज्या पद्धतीत स्वतःव्यतिरिक्त दुसऱ्या साधनावर अवलंबित्व येईल त्या पद्धतीला ह्या परंपरेने दुय्यम ठरविले आहे. (सर्वं आत्मवशं सुखम्‌ । सर्वं परवशं दुःखम्‌ ।। )इतकेच काय पण लेखन ही सुद्धा ह्या मौखिक परंपरेसाठी एक तडजोडच आहे. ज्ञान जर "न चोरहार्यं, न राजहार्यं' असे व्हायचे असेल तर ते कंठस्थ करणे हाच उपाय ह्या परंपरेने सर्वोत्तम मानलेला आहे.

लेखनाला ह्या परंपरेने दिलेली सवलत "आगम' विचारातून म्हणजे तांत्रिक परंपरेतून दिलेली आहे. अक्षराची आकृती हे एक "यंत्र' मानलेले असून त्यामध्ये प्रतीकातून ऊर्जा अभिव्यक्त करण्याची शक्ति गृहीत धरलेली आहे. बौद्ध परंपरेने हा विचार स्वीकारला आणि रुजवला. चीन व जपानमध्ये ह्या तंत्राचा आणखी विकास झालेला आढळतो. तेथील सिद्ध पुरुषांकडे भाविक कागद घेऊन जातात आणि त्यावर जणू "अक्षरं अर्थोऽनुधावति' अशा श्रद्धेने सिद्धपुरुषांकडून मजकूर लिहून आणतात आणि ते कागद घरात देवांच्या तसबिरींसारखे लावून ठेवतात.

श्री ज्ञानेश्वरांनीही "हे असो बहु पंडितु । धरोनि बाळकाचा हातु । ओळी लिही व्यक्तु । आपणचि' ह्या ओवीमधून लेखनातून ईश्वरी शक्तिचा आविष्कार होत असल्याचे ध्वनित केले आहे. हस्ताक्षर चांगले असावे हा समर्थांचा प्रसिद्ध आग्रहसुद्धा केवळ व्यावाहारिक आहे असे नाही. सॉमरसेट मॉमसारख्या लेखकांनी लेखनक्रियेचा लिहिणाऱ्याच्या मनावर होणाऱ्या परिणामाविषयी चिंतन केलेले आहे. रूढ प्रतीकांच्या प्रकटीकरणासाठी मेंदूने डोळे आणि हात ह्या अनुक्रमे ज्ञानेंद्रियाचा आणि कर्मेंद्रियाचा यशस्वी समन्वय करायची ही प्रक्रिया खरोखरच खडतर असल्याचे वैज्ञानिकही मानतात.

ह्या काहीशा गूढ वाटणाऱ्या चर्चेतून जमिनीवर उतरायचे तर "तारे जमींपर' ह्या चित्रपटाची आठवण होणे अपरिहार्य आहे. अवघड लेखनकलेविषयी भारतामध्ये इतकी लोकजागृती इतर माध्यमाद्वारे होणे शक्य नव्हते. अनेक अवघड कामे सोपी करण्याची किमया हिंदी सिनेमासृष्टीने केली आहे, पण त्याविषयी परत कधीतरी...

हाताने लिहिणे अजूनही कालबाह्य आणि संदर्भहीन झालेले नाही असे मत स्वीकारले तर हस्ताक्षर घोटवणे ओघानेच आले. हाताचे स्नायू फार कोवळे असताना अक्षरे गिरवू नयेत हा सल्ला हल्ली पालकांना पटत नाही. प्राथमिक शिक्षणाचा हा विषय पूर्वप्राथमिक शिक्षणाने खेचून घेतलेला आहे. तो आता पाळणाघरात कधी पोहोचतो त्याची वाट पाहूया. ("आमच्या क्रेशमध्ये कर्सिव शिकवतात !').

माझ्या लहानपणी पाटीवर अक्षरे गिरवण्यापेक्षा कित्ता गिरवावा लागला तर मला मोठे संकट वाटत असे. (मस्ट बी माईल्डली डिस्लेक्सिक, यू नो.) आता बालोद्यानात, आय मीन केजी मध्ये, कॉपी बुक ट्रेस करणे मुलांना आवडत नसेल. त्याचे एक कारण म्हणजे जे आपण गिरवतो ते संदर्भहीन आहे असे मुलांना जाणवत असावे. कॅट, हॅट, मॅट सारखे शब्द मुलाला किती रिझवणार? पण बाजारात तयार मिळणाऱ्या कॉपी बुकांमधून असलाच नीरस मजकूर असतो.

मुलांना आपला वाटेल असा मजकूर असलेली वाक्ये / शब्द ट्रेसिंगसाठी तयार करणे आता शिक्षकांना / पालकांना सहज शक्य आहे. तुम्हाला हवा असलेला मजकूर टाईप करा, त्याचे कॉपी बुक शैलीत हॉलो लेटर्समध्ये रूपांतर करून देणारी ही साईट अवश्य पहा. प्रिंट घ्या आणि लावा मुलांना गिरवायला (बिच्चारी !).

देवनागरीसाठी अशी साईट कुठली मिळायला? मराठी मुलांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी काय करायचं? असा विचार मनात घोळत होता. शेवटी सर्वं आत्मवशं सुखं हा मंत्र आठवला.

थोड्याशा प्रयत्नांनी वर्ड आर्टमध्ये हे करणं सहज शक्य आहे हे ध्यानात आलं.

clip_image001[4]

मराठी माध्यमातल्या मुलांनाही सोडू नका ! लावा गिरवायला ! पण एक विनंती ऐका. त्यांना बालोद्यानात अक्षरओळख खुशाल करून घेऊ दे. मात्र ती प्राथमिक विभागात किमान दुसरीपर्यंत जाऊ देत. मग अक्षरे घोटवून घ्या. आधी नको.

Tuesday, May 13, 2008

स्थानिक आणि वैश्विक परिमाणे : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 4

शैक्षणिक गुणवत्तेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची उद्दिष्टे काय असावीत ?

शैक्षणिक गुणवत्तेसाठी जाणीवपूर्वक राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची उद्दिष्टे उपक्रमांच्या स्तरानुसार आणि विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार बदलतात. पुढे दिलेली उद्दिष्टे दक्षिण आशियातील दर्जेदार शिक्षणाबाबत नवी दिल्ली येथे जागतिक बॅंकेच्या पुढाकाराने भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेची आहेत :

शैक्षणिक गुणवत्तेचे मापन आणि वर्धन

गुणवत्ता सुधारणाऱ्या घटकांचा शोध आणि ते प्रभावी ठरण्यासाठी प्रयत्न - उदाहरणार्थ :

  • शिक्षकांमधील व्यावसायिकतेचा विकास
  • शिक्षकांसाठी प्रोत्साहक लाभ (ह्या विषयावरील एक उत्तम भाषण येथे आहे)
  • शिक्षकांचे उत्तरदायित्व
  • अधिकारांचे विकेंद्रीकरण
  • गुणवत्तेची हमी
  • शालेय स्तरावरील व्यवस्थापन
  • अध्यापन-अध्ययन प्रक्रिया आणि अध्यापनशास्त्र

दर्जेदार शिक्षण उपलब्ध होण्यासाठी अभिनव उपायांचा शोध

  • दर्जेदार शिक्षणासाठी समान संधी होण्याबाबत प्रादेशिक स्तरावरील अभ्यास
  • दर्जेदार शिक्षणासाठी संधी उपलब्ध होण्यासाठी खाजगी व सार्वजनिक क्षेत्रांमधील सहयोगाचा प्रादेशिक स्तरावर अभ्यास

उद्दिष्टांचा हा एक व्यापक स्तर झाला. एखाद्या बालोद्यानात दर्जेदार शिक्षणासाठी राबविण्यात येणारी उद्दिष्टे हे दुसरे टोक होईल. बालोद्यानासाठी गुणवत्तावर्धक उपक्रमांची उद्दिष्टे ठरवतानाही सहजासहजी न सोडवता येणारे धोरणात्मक प्रश्न उपस्थित होतात (विकीपीडियावरील हा लेख अवश्य नजरेखालून घालावा) -

  • बालोद्यानात उपस्थिती सक्तीची असावी की नसावी ? (विकसनशील देशांमधील पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या फायद्यांविषयी एक चांगला संशोधन लेख येथे मिळेल)
  • बालोद्यानातील प्रवेशासाठी विद्यार्थ्याचे वय हा निकष ठेवण्याचे फायदे-तोटे कोणते ?
  • अभ्यासक्रमाचे विविध पर्याय एकत्रितपणे विचारात घ्यावे की एकच ठराविक अभ्यासक्रम असावा?
  • बालोद्यानाचा दैनंदिन कालावधी वाढवल्याने होणारे लाभ अल्पकालीन असतात असे संशोधनातून सिद्ध होत असतानाही शिक्षकांचा / पालकांचा हट्ट पुरवावा का?
  • बालोद्यानाचा अधिकाधिक लिखापढीच्या दिशेने होत असलेला प्रवास योग्य आहे का?

वरील दोन स्तरांचा विचार करताना असे ध्यानात येईल की वैश्विक विचाराध्येही स्थानिक परिमाणे महत्त्वाची आहेत आणि अनेक स्थानिक वाटणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप वैश्विक आहे.

Popular Posts