Tuesday, May 26, 2009

छांदिष्ट - 2

या अगोदरच्या नोंदीमध्ये आपण छांदिष्टपणाचा एक नमुना पाहिला. आता खरे छांदिष्ट म्हणजे शब्दशः 'छांदिष्ट' कसे असतात याची दोन उदाहरणे पाहू. मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा उल्लेख यापूर्वीही मी केलेला आहे. या संकेतस्थळावर "धोंडोपंत' हे व्यासंगी रसिक गृहस्थ छन्दशास्त्राविषयी अतिशय चांगली माहिती देऊन चर्चा घडवून आणीत असतात. "उपक्रम' ह्या संकेतस्थळावर "धनंजय' यांनीही नव्या कवितेतील मात्रागणनाच्या अनुरोधाने चांगली चर्चा सुरू केलेली आहे.
मिसळपावावर धोंडोपंतांनी एकेका वृत्ताची माहिती देण्याच्या मिषाने उत्तमोत्तम कवितांना उजाळा देण्याचा सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. कवि ग्रेस ह्यांच्या एका अप्रतिम कवितेचे उदाहरण देऊन त्यांनी 'उद्धव' ह्या जातिवृत्ताबद्दल केलेले लेखन अवश्य वाचावे.
छंदयति (= आल्हादयति) इति छंदः अशी एक व्युत्पत्ति आहे आणि छंदांसि च्छादनात्‌ (= आच्छादनात्‌ )- अर्थात कवितेच्या आशयाचे संरक्षण करणारी रचना म्हणजे छंद अशी यास्काचार्यांची व्युत्पत्ति आहे. ही व्याख्या पूर्णपणे प्रत्ययास यावी असे उद्धव हे वृत्त आहे. आर्तता आणि कारुण्य ह्यांच्या परिपोषासाठी आणि संवर्धनासाठी विविध कवींनी ह्या वृत्ताचा वापर केलेला आहे. (मात्र अमूक मात्रासमूह म्हणजे अमूकच चाल, अमूकच रस असे बंधन असायचे कारण नाही. रागरागिण्यांचा अपारंपारिक वापर जसा प्रतिभावंतांनी विभिन्न भाववृत्तींच्या निर्मितीसाठी केलेला आहे तसेच छंदांच्या बाबतीतही खरे आहे).
"उद्धवा शांतवन कर जा
त्या गोकुळवासी जनांचे'
मध्वमुनीश्वर ह्यांच्या ह्या प्रसिद्ध कवितेमुळे ह्या वृत्ताला उद्धव हे नाव मिळाले असावे. श्रीकृष्णाला अक्रूर गोकुळातून मथुरेला घेऊन आला. त्याच्या विरहाने आकांत करणाऱ्या गोकुळवासीयांचे सांत्वन करण्याची जबाबदारी कृष्णाने उद्धवावर सोपवली त्या घटनेवरील हे काव्य आहे.
""बा नंद यशोदा माता
मजसाठी त्यजतील प्राण
सोडूनि प्रपंचा फिरतील
मनीं उदास रानोरान""
गोकुळवासीयांच्या आकांताच्या कल्पनेने कृष्णही व्यथित झालेला आहे. गोपींविषयी तर तो म्हणतो,
""तिळतुल्य नाही मनिं दुगल्या
दृढनिश्चय करुनिं तगल्या
बहुधा त्या नसतील जगल्या
भंगले मनोरथ ज्यांचे ।। उद्धवा...।।''
उद्धव जातितील अनेक काव्ये आपल्या परिचयाची आहेत. उद्धव जातिचे चरण वापरून तयार केलेली अर्धसम वृत्तेही अतिशय प्रभावी आहेत.
उदाहरणार्थ, अक्रूर ह्या जातिवृत्तात पहिला चरण (। प । प । - -) असा अठरा मात्रांचा आहे तर दुसरा चरण उद्धव जातिचा (- । प । - -) म्हणजे चौदा मात्रांचा आहे. या वृत्तातली श्री. ग. ह. पाटील ह्यांची “श्रावणबाळ’’ ("शर आला तो धावून आला काळ') ही कविता शिकताना तर सद्गदिद होऊन स्फुंदणारे शाळकरी विद्यार्थी माझ्या आणि अगोदरच्या पिढीतील बहुतेकांना आठवत असतील.
अक्रूर जातिचे हे सामर्थ्य स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या आपल्या काव्यात अजरामर केले आहे. वीर सावरकर ह्या चित्रपटात या कवितेला अक्रूर जातिवृत्ताच्या पारंपारिक चालीच्या आधारे सुधीर फडके ह्यांनी दिलेली चाल, चित्रपटात स्वातंत्र्यवीरांची तळमळ प्रकट करणारा उत्कट परिणाम साधून जाते आणि नंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.
उद्धव जातिचा उपयोग करून "नृपममता' हे सुंदर वृत्त तयार करण्यात आलेले आहे. उद्धव जातिच्या चरणापुढे एक "र' गण (गुरु-लघु-गुरु) ठेवून ( - । प । - -।- . – ) ते तयार होते. गोविंदाग्रजांची 'प्रेम आणि मरण' ही गाजलेली कविता नृपममता जातिमध्ये आहे.
"तो हसे जरा उपहासे
मग स्वयेचि वदला त्रासे । त्यांप्रति ।।
निष्प्रेम चिरंजीवन ते।
जगी दगडालाही मिळते । धिक्‌ तया ।।'
किंवा
"ही त्याची स्थिती पाहुनिया
ती दीड वितीची दुनिया । बडबडे ।।
कुणी हसे करी कुणी कीव
तडफडे कुणाचा जीव । त्यास्तव ।।
अशा अनेक अविस्मरणीय ओळी गोविंदाग्रजांनी ह्या कवितेत लिहिलेल्या आहेत. कडव्याचा शेवट करताना तर त्यांनी बहार केली आहे. भवानी जातिचा खंडित चरण शेवटी वापरला आहे.
"निंदती कुणी त्याप्रति, नजर चुकविती, भितीही कोणी
जड जगास अवजड गोणी । होइ ती ।।'
किंवा
"तो योग खरा हठयोग प्रीतिचा रोग लागला ज्याला
लागते जगावे त्याला । हे असे ।।'
असो. छांदिष्टपणाला अंत नाही. मात्र श्री. धनंजय ह्यांनी त्यांच्या उपक्रमाने आणि श्री. धोंडोपंत ह्यांनी त्यांच्या छंदोवृत्तीने दिलेला आनंद शब्दातीत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन लेखन आवरते घेतो.

8 comments:

  1. > उद्धव जातिच्या चरणापुढे एक "र' गण (गुरु-लघु-गुरु) ठेवून ( - । प । - -।- . – ) ते तयार होते.
    >-------

    'प' गण याचा अर्थ काय होतो ?

    'बडबडे' हा शब्द अर्थातच 'र' गणात बसत नाही. त्या छंदातल्या शेवटच्या भागात उच्चरणाला महत्त्व आहे. पहिल्या दोन मात्रा एकत्र उच्चारून तिथे यति असल्याप्रमाणे न्यास घ्यावा लागतो. आणि शेवटचे अक्षर लघु असो वा गुरू, त्याचा उच्चार थोडक्यात करावा लागतो. तो शेवटच्या शब्दाचा उच्चार लांबवता येत नाही. 'हे असे' मधल्या 'से' चे हलन्त स्वरूप भाषेत नसतेच. पण उच्चार मात्र अन्त्याक्षर हलन्त असल्यासारखा करावा लागतो, यात त्या नादाची गोडी आहे.

    ReplyDelete
  2. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
    < 'प' गण याचा अर्थ काय होतो ? >
    प हे चिह्न पद्मावर्तन म्हणजे आठ मात्रांचा एक समूह दर्शविते. परंतु आपल्याला 'र गण म्हणजे काय' असे अभिप्रेत असावे.
    ह्या वृत्तातील र गणात एकूण पाच मात्रा आणि फक्त मध्य लघु म्हणजे तिसऱ्या मात्रेवर लघु, इतकीच अट अपेक्षित असावी. हलन्ताचा विचार करण्यासाठी, "बडबडत' असा शब्द शेवटी असल्याची कल्पना करू. उच्चार "बड बडत्‌' होईल असे आपले म्हणणे असल्याचे मला वाटते आणि पटतेही. अर्थातच "बड बडत' अशा चालीने म्हणणेही शक्य आहे, विशेषतः शेवटचे अक्षर गुरु आणि मृदु व्यंजनाने तयार झालेले असल्यास. ('कुणि घ्या हो ताजी ताजी । ही फुले ।।')

    ReplyDelete
  3. 'प' = ८ मात्रांचा समूह, या माहितीबद्दल धन्यवाद. मी बराच काळ या माहितीच्या शोधात होतो.


    आता नृपममता जातितल्या शेवटच्या भागाविषयी परत थोडे वेगळे शब्द वापरून बघतो.
    मी तर म्हणेन की तिथे 'बडबडत/त्‌' हा उदाहरणादाखल घेतलेला शब्द फारच कृत्रिम वाटेल. त्या शेवटच्या चरणात फारच नादमयता आहे ती या कारणासाठी की तो अतिशय छोटा (३.५-४.० मात्रांचा) आहे, आणि तरीही त्यात एक लांबलेला उच्चार आणि यति आहे; आणि या सगळ्या यतिआधीच्या भागातल्या दीर्घपणाची किंमत पुढला भाग झटकन उच्चारून द्यावी लागते. 'ही फुले', वा 'त्यां प्रति', वा 'बडबडे' म्हणताना 'ही' हा दीर्घ अक्षरी शब्द तर येतोच, पण त्या अक्षरावर एक विरामही आहे. आणि तो घेताना पुढल्या अक्षरांवर पटकन 'हल्ला' करण्याची तयारी करावी लागते. आणि 'फुले' मधला 'ले' असा आवरावा लागतो की त्याची लिखाणाच्या नेहमीच्या नियमानुसार दोन मात्रांची मागणी आहे, पण उच्चारात त्या अक्षराची अर्ध्या किंवा एका मात्रेत बोळवण केल्याचा भास व्हावा.

    शेवटचं अक्षर घाईघाईत उरकायचा हा प्रकार काव्यातल्या एरवीच्या नियमाच्या पार विरुद्‌ध आहे. कारण शेवटचं अक्षर लघु असेल तेव्हाही ते, त्यावरच्या न्यासामुळे, गुरू समजण्यात येतं. नृपममता जातित मात्र शेवटच्या अक्षराला, ते लघु असो वा गुरु, लघुसदृश कळा येते. 'हलन्तासारखे शेवटचे अक्षर' या शब्दांतून मी माझा विचार बरोबर व्यक्त करू शकलो नाही, असं दिसतंय. तेव्हा आता तो विचार मांडायला मी 'लघु-प्रमाणे' हा शब्द वापरून बघतो आहे.

    ReplyDelete
  4. आपले म्हणणे लक्षात आले आहे असे वाटते. म्हणूनच मी ‘बडबडत’ असा शेवटी लघु अक्षर असलेला शब्द घेतल्यास ते अधिक स्पष्ट होते असे म्हटले. शेवटच्या र गणात दोन मात्रांनंतर यति आहे हेही योग्य आहे. मात्र ज्या काळात ही काव्यरचना झालेली आहे त्या काळात कविता वाचण्यापेक्षाही गाण्याकडे कल जास्त होता हे ध्यानात घ्यायला हवे. नृपममता रामावरती हे गाणे त्या काळी प्रसिद्ध होते. वाचनात जरी अंत्य गुरु येत नसला तरी गाताना तो येत असावा.

    अरबी आणि फार्सी भाषांच्या प्रभावाने मराठी उच्चारणात हलन्ताची धाटणी आलेली आहे. गो. नी. दाण्डेकरांसारख्या व्यक्ती उच्चारताना असे उच्चार कटाक्षाने टाळतात. दाण्डेकर असे न म्हणता दाण्डेकर असे म्हणून र चा पूर्ण स्वरान्त उच्चार करतात. (स्वरांच्या बाबतीत ह्याला उदात्त किंवा अनुदात्त असे म्हणणे योग्य होईल का हे एखाद्या अधिकारी व्यक्तीकडून जाणून घ्यायला हवे.)

    ह्या संदर्भात श्री. बा. छो. गोविंदेकर ह्यांनी माझ्या नजरेस आणून दिलेली एक गोष्ट आठवते. ‘भिंतीवरी कालनिर्णय असावे’ - अशा भुजंगप्रयाताच्या वापरात ‘य’ च्या उच्चारात हलन्तदोष आहे. ‘कालनिर्णय भिंतीवरी असावे’ अशी दिंडीमधील रचना केल्यास हा दोष नाहीसा होतो.

    ReplyDelete
  5. श्री पेंढारकर : 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' आणि भुजंगप्रयाताचा संबंधच काय? ही ओळ आहे तशीच छान वाटते. इंद्रवज्रेतल्या आठव्या दीर्घ वर्णाऐवजी दोन लघु वर्ण घेतले आहेत. ही सवलत घेण्याचे प्रमाण सध्या कविंमधे फार वाढले आहे. आणि त्यामुळे नादमयतेत सहसा फरक पडत नाही, हे मान्य करायला हवे. ते असो.

    क्रान्ति सडेकर यांनी 'अग्निसखा' या मालिकेत ०१ डिसेंबर २००९ ला एक कविता लिहिली आहे. ओळींचे २-८-८-४ असे मात्राभाग पडतात. म्हणजे (+,अक्रूर) असा छंद ढोबळमानानी म्हणता येईल, कारण तिथे अक्रूरापेक्षा दोन मात्रा जास्त आहेत. आणि २-८-४ असे उद्‌धवात 'कविते, तुज़ शोधित आले' असे धृवपद आहे. ही २-८-८-४ ही कुसुमाग्रजांची आवडती रचना दिसते आहे. या मात्रावृत्ताला नाव असणारच; ते नाव तुम्हाला माहीत आहे काय?

    - डी एन

    ReplyDelete
  6. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
    कालनिर्णयच्या जिंगलची चाल चांगली आहे हे खरेच आहे. मी उदाहरण दिले ते केवळ हलन्तदोष उच्चारशैलीमुळे कसा तयार होतो ह्याचे. जाहिरातीच्या जिंगलचे गण पाडणाऱ्यांना लोक नक्कीच छांदिष्ट म्हणतील पण आता खोलात शिरतोच आहोत तर तेही करूया.

    'भिंतीवरी कालनिर्णय असावे' ही ओळ इंद्रवज्रा वृत्तातली नाही. एका गुरुबद्दल दोन लघु घेण्याबद्दलही आक्षेप नाही. परंतु इंद्रवज्रेसाठी "ज" गण आवश्यक असताना येथे 'त' गण आलेला आहे. सातवे अक्षर निर् हे संवृत म्हणून गुरु आहे आणि आठवे अक्षर 'ण' हे लघु आहे. म्हणून ही ओळ त-त-ज-ग-ग अशी न होता त-त-त-ग-ग अशी झालेली आहे.
    किंबहुना ह्या ओळीचे गण ग-ग-य-य-य असेही पडतात म्हणूनच ओळीला भुजंगप्रयाताची चाल लागलेली आहे. (ह्याच जिंगलमधील पहिल्या दोन ओळी इंद्रवज्रा वृत्तात, तिसरी ओळ एक मात्रा जास्त असल्याने थोडी शेवटच्या ओळीसारखी आणि थोडी इंद्रवज्रेसारखी आहे)

    इंद्रवज्रेला आरोही चाल आहे आणि "श्लोकाची' चालही आहे (कैलासराणा शिवचंद्रमौळी). जिंगलचा प्रयत्नही श्लोकाची चाल देण्याचा आहे. वरीलप्रमाणे एखादे त-त-त-ग-ग हे वृत्त किंवा र-र-र-र सारखे राधिका वृत्त ( ते ग-य-य-य-ल-ग असेही लिहिता येते) ऑफ्-बीट म्हणजेच भुजंगप्रयातात म्हणता येते. (किंवा याच्या नेमके उलट म्हणजे भुजंगप्रयातातील रचनाही राधिकेच्या दुडक्या चालीवर म्हणण्याची लकब कीर्तनकारांमध्ये आढळते) असो. छांदिष्टपणाला अंत नाही.

    आपण सांगितलेल्या दोन पद्मावर्तनी वृत्तांमधील ओळी द्याव्यात ही विनंती.

    ReplyDelete
  7. > 'भिंतीवरी कालनिर्णय असावे' ही ओळ इंद्रवज्रा वृत्तातली नाही.
    >----

    ती ओळ अर्थातच इन्द्रवज्रेत नाही. फक्त आठव्या गुरु वर्णाऐवजी दोन लघु वर्ण घेतले आहेत. 'निर्णय' मधली तिन्ही अक्षरे मला लघु वाटतात. कविच्या सोयीसाठी गरज़ पडल्यास 'नि' गुरु मानायला माझी हरकत नाही. 'सम्प' शब्दातला 'स' गुरुच धरावा लागतो, तसा 'निर्णय' बद्‌दल नियम असल्यास मला माहीत नाही. पण 'दुपट्टा' मधला 'प' ज़सा नि:संदिग्धपणे गुरु आहे, तसे 'निर्णय' बद्‌दल वाटत नाही, आणि 'सम्प' बद्दलही वाटत नाही. त्या जाहिरातीची सुरुवात इंद्रवज्रेत असेल तर मग ही ओळही त्याच धाटणीची आहे, असे मी ज़ास्तच विश्वासाने म्हणेन.

    > र-र-र-र सारखे राधिका वृत्त
    >
    हे प्रसिद्‌ध वृत्त आहे. 'अच्युतं केशवं रामनारायणं'. 'साधते स्रग्विणी रा-च चारी गणें' अशी ओळ मी माझ्या सोयीसाठी बनवली आहे. 'स्रग्विणी'ला 'राधिका' हे मान्यताप्राप्त नाव आहे, की तुम्ही ते सोयीसाठी वापरता? भुजंगप्रयातातला शेवटचा गुरु पहिले अक्षर म्हणून वापरला की झाली स्रग्विणी. त्यामुळे सारख्या चालींत (किंचित फेरफार करून) दोन्ही वृत्ते बसलीत, तर आश्चर्य काही नाही. तेव्हा कीर्तनकारांची दुडकी चाल (ती वापरलेल्या ओळीचे उदाहरण देऊ शकाल?) मी स्रग्विणीची न मानता भुजंगप्रयाताचीच एक चाल म्हणेन. पण हे चाल ऐकल्यावरच सांगता येईल.

    > आपण सांगितलेल्या दोन पद्मावर्तनी वृत्तांमधील ओळी द्याव्यात ही विनंती.
    >---

    कुठल्या वृत्तांतली उदाहरणे तुम्हाला हवी आहेत? २-८-८-४ मात्रांच्या ज़ातीला 'भूपति' नाव असल्याचा खुलासा मी सडेकर बाईंच्या स्तंभात केला असल्याचे तुम्ही वाचले असेल. त्याची उदाहरणे मी तिथेच बरीच दिली आहेत.

    - डी एन

    ReplyDelete
  8. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
    'तुम्ही' ह्या शब्दात 'म्ही' हे जोडाक्षर समजू नये असा अभिप्राय माधवरावांना छंदोरचनेत व्यक्त केलेला आहे. ब मिश्रित ह साठी भ हे अक्षर आहे त्याप्रमाणेच म मिश्रित ह साठी अक्षर नसल्याने जोडाक्षर लिहिले जाते असे त्यांनी म्हटले आहे.
    हा विचार ध्यानात घेता 'निर्णय' मधील तिन्ही अक्षरे लघु आहेत हे आपले म्हणणे मला पटते.

    मी शाळेत राधिका ह्याच नावाने हे वृत्त शिकलेलो असल्याने त्याचे नाव स्रग्विणी आहे हे नव्याने समजले.

    क्रान्ति सडेकर यांचा 'अग्निसखा' ब्लॉग गुगलवरून शोधला आणि त्यातील आपले प्रतिसादही वाचले.

    मन:पूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete

Popular Posts