Disclaimer: The reader should understand that the information provided in this blog does not constitute legal, medical or professional advice of any kind. All warranties, liabilities, express or implied, are hereby disclaimed
Tuesday, December 21, 2010
ये दुख सहा ना जाए ...
भाबडेपणा कमी असलेले आणि लोकप्रिय मतप्रवाहात सहजासहजी वाहून जाण्यास तयार नसलेले अनेक लोक अशा गोष्टी मान्य करीत नाहीत. तासंतास घोटल्याने गाण्यात दर्द उतरेल ही समजूतही अनेक विचारवंतांना मान्य नाही. गुरुची लहर म्हणून शिष्याने अघोरी रियाझ करण्याला अर्थ नाही, त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो असे ते मानतात.
हुकमी कारुण्य किंवा दर्द गाण्यात आणण्याचा काही फॉर्म्युला आहे का? (किंबहुना फॉर्म्युलाच आहे आणि ज्याला तो चांगला जमला तो आपल्याला दर्दी वाटतो, असे आहे का? ). स्वभावोक्ति करणारे गाण्याचे नेमके शब्द, आवाजाचा विशिष्ट लगाव, कातरता दर्शविणारा कंप, आणि एखाद्या संस्कृतीच्या परंपरेत अशा दर्दी भावनांशी जोडले गेलेले विशिष्ट स्वर किंवा तशा मानल्या गेलेल्या विशिष्ट स्वरावली यांचे रसायन जुळून आले की इच्छित परिणाम साधला जातो असे हे मत आहे. पण हे रसायन जमवून आणण्याची हातोटी साध्य करणे ह्यालाच तर तपश्चर्या म्हणत नसावेत ना?
अलिकडेच ऍटलांटिक मंथलीमध्ये '3rd minor' ची महती सांगणारा ह्याच विषयावरचा लेख वाचनात आला होता. सायंटिफिक अमेरिकनमधील एका अहवालाचाही त्यात हवाला देण्यात आलेला आहे. लोकसत्तेमध्येही (२८ सप्टेंबर २०१०) अरुण पुराणिक ह्यांनी ‘स्वरसम्राज्ञीच्या श्रेष्ठत्वाचा मागोवा’ ह्या लता मंगेशकर ह्यांच्यावरील गौरवपर लेखात कोमल गांधाराचा उल्लेख केलेला आहे. अर्थातच हे स्वर नेहमीच करुण रसाशी निगडित असतात असे नाही. प्रतिभाशाली संगीतकार त्यांचा वापर इतर इतर रसांच्या परिपोषासाठीही करतात.
काही गाणी, काही बंदिशी त्यातल्या काव्याचा परिपोष सुयोग्य संगीतामुळे झाल्यामुळे असेल, पण पछाडत राहतात. भीमसेनजींनी उस्ताद रशीदखान ह्यांना केलेल्या फर्माईशीवरून त्यांनी सादर केलेली "याद पिया की सताए', पं. राजन साजन मिश्रा ह्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या उस्ताद अल्लारखां ह्यांना अर्पण केलेली रूपक तालातली "ख्वाजा मुइनुद्दिन पीर अजमेरवाले', ह्या बंदिशी कदाचित त्यांच्या प्रासंगिक संदर्भामुळे असेल पण नेहमी आठवत राहतात. "याद पिया की सताए' तर कित्येकांनी चांगली गायलेली आहे. अलिकडे कौशिकीने गायलेली आहे, वडाली बंधूंनीही गायलेली आहे. पण...
पछाडणाऱ्या गाण्यांविषयी "माझिया मना' ह्या ब्लॉगवर सौ. अपर्णा संखे ह्यांनी एक चांगली मालिका लिहिलेली आहे ती अवश्य वाचावी. चंद्रशेखर महामुनी ह्यांनीही आर्त गाण्यांवर सुंदर लेख लिहिलेला आहे. बेगम अख्तर ह्यांच्याविषयी लिहिताना धनंजय ह्यांनी "दंश' नावाची बोरकरांची कविता उद्धृत केलेली आहे. 'Thy tooth is not so keen..' असे झोंबऱ्या वाऱ्याला शेक्सपिअर सांगतो त्याची आठवण झाली.
कदाचित काही एक वयानंतर गायकाला माणसाच्या कृतघ्नपणाचा अनुभव आला की मगच असा "दंश' तुलनेने सुसह्य होत असावा आणि गाण्यात तो दर्दीला आविष्कार होत असावा. बेगम अख्तर ह्यांनी गायलेली ही गझल माझ्या मित्राने तो मृत्यूशय्येवर असताना मला ऐकवली होती आणि ती विसरणे खरोखरच अशक्य आहे.
Wednesday, September 1, 2010
मुलांनी काढलेली चित्रे - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 16
मुलांनी हुबेहूब चित्रे काढण्यास शिकावे म्हणून हल्ली लहानपणीच त्यांना खास शिकवण्या लावल्या जातात. हे योग्य आहे का? की मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निरर्थक चित्रे काढू द्यावीत?
पालकांनी (आणि शिक्षकांनीही) हे समजून घ्यायला हवे की चित्रकला म्हणजे शारीरिक कसरत किंवा कौशल्य (कारागिरी) नव्हे. आत्मप्रकटीकरणाची ती एक पद्धत असून तिचे स्वतःचे असे तर्कशास्त्र आहे. संशोधकांनी मुलांच्या चित्रांमधून अर्थ शोधण्याचे प्रयत्न अनेक अंगांनी केलेले आहेत. पण शिक्षकांनी किंवा पालकांनी मुलांच्या चित्रातून अर्थ शोधणे किंवा त्यांना निरर्थक म्हणणे अन्यायकारक आहे कारण वयाच्या सातव्या ते आठव्या वर्षापर्यंत मुलाने वस्तुनिष्ठ वास्तवाचे चित्रण केलेले असले तरी ते कमालीचे व्यक्तिसापेक्ष असते. कारण मूल वास्तववादी बनू पहात असले तरी त्याची व्यक्तिसापेक्षता (अहंभाव) त्याच्या आड येत असतो. मुलांच्या चित्रातले जग वास्तवातले जग नसून त्यांच्या कल्पनेत त्यांनी वास्तवाची जशी कल्पना केलेली असते तसे ते असते. ही सृष्टिकर्त्याची भूमिका आहे. म्हणून मुलांच्या चित्रांना बौद्धिक पातळीवरील वास्तववादी चित्रे (दृश्य पातळीवरील नव्हे) असे म्हणतात. (उदाहरणार्थ, कप अपारदर्शक असला तरी त्यात भरलेले दूध मुले चित्रात दाखवतात.) म्हणूनच पिआजे आणि इन्हेल्डर "लहान मुले अत्यंत वास्तववादी असतात' असे प्रतिपादन करतात.
डोळ्यांसमोरचा देखावा बदलत असला तरी मुले एकाच प्रकारचा देखावा (सूर्य, डोंगर वगैरे) काढतात. याची दोन कारणे असू शकतात. पहिले म्हणजे असा आदर्श देखावा (चित्र नव्हे) असावा हा आग्रह त्यातून व्यक्त होतो. आणि दुसरे म्हणजे संभवतः मूल दबावाखाली असल्याने तपशील हरवलेले साचेबंद चित्र ते काढीत रहाते.
वरील विवेचनावरून हे स्पष्ट होईल की लहानपणी चित्रकलेची "शिकवणी' लावणे अनावश्यक तर आहेच शिवाय मुलाची मुस्कटदाबी करण्यासारखे अन्यायकारकही आहे. मुलांना आत्मप्रकटीकरणाचा एक मार्ग म्हणून हवी तशी चित्रे काढू देणे इष्ट होय.
लहान मुलांच्या रेखाटण्यांमागील प्रक्रिया कशी असते? चित्रकाराची कौशल्ये त्यांच्यामध्ये विकसित होण्यासाठी प्रयत्न करावेत का?
बौद्धिक पातळीवर चित्रकारासाठी आवश्यक असलेली कौशल्ये मुलांमध्ये असतातच. उदाहरणार्थ, डोळ्यांच्या, शरीराकृतींच्या अक्षरेषा कलत्या केल्या तरी मुलांच्या ते ध्यानात येते (वय वर्षे 3) असे गुडनाव आणि फ्राईडमन (Learning to Think) ह्यांनी दाखवून दिलेले आहे. मुलांची चित्रकला कशी विकसित होते ह्याचे सोदाहरण विवेचन करणारा एक उत्तम लेख येथे आहे.
मुले दृश्याबाबत फारच संवेदनशील असतात. त्यांची अवास्तव वाटणारी चित्रे सूक्ष्मपणे पाहिल्यास त्यात लपलेली संगती दिसू शकते. काय काढायचे हे त्यांना माहीत असते पण कसे काढायचे हे त्यांना माहीत नसते. ह्या दोहोतील दरी सांधण्याच्या दृष्टीने त्यांचे चित्रकलेचे नियम तयार होतात. म्हणूनच शारीरिक क्षमता/कौशल्ये वयपरत्वे विकसित होईपर्यंत त्यांच्यावर प्रशिक्षणाचे ओझे लादू नये अन्यथा आपल्या बौद्धिक पातळीवरील क्षमतांविषयी मुले साशंक होतील.
पिआजे ह्यांनी मुलांच्या चित्रातील नियमनाचे कारकत्व "मानसिक प्रतिमा' ह्या संकल्पनेला दिलेले आहे. मानसिक प्रतिमा अनुकरणावर आधारलेली असते. अनुकरण कसे करावे हे मुले शिकतात. अनुकरण स्मृतीच्या बॅंकेत रहाते. ह्या स्मृतीचे पुन्हा अनुकरण म्हणजे मानसिक प्रतिमेचे रेखाटन. वयाच्या दुसऱ्या वर्षापर्यंत ही स्थिती असते. दुसऱ्या वर्षापर्यंत हे अनुकरण प्रतिनिधित्वाची पातळी गाठते. ह्यामुळे चित्र काढणाऱ्या मुलाकडे मनातील आंतरिक प्रतिमा तयार असते. म्हणूनच बाहेरील प्रतिकृतीचा त्यांच्या चित्रावर खूपच कमी परिणाम असतो. यामुळेच प्रतिकृतीशिवाय चित्र काढणे मुलांना अशक्य वाटत नाही.
मुलांना इतरांनी काढलेली चित्रे रंगविण्यास द्यावीत का?
मुलांना इतरांनी काढलेली चित्रे रंगविण्यास देणे चुकीचे आहे असे अनेक चित्रकारांचे आणि मनोवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. "कलरिंग बुक्स' ही अंतिमतः घातक असून इतरांनी काढलेली चित्रे मुलांना रंगवायला देणे हे प्लॅस्टिकचे बोंडले चोखायला देण्यासारखे आहे असे त्यांना वाटते. मुलांना कुठेेतरी गुंतवून ठेवायचे म्हणून चित्रे रंगविण्यास देऊ नये असा ह्या म्हणण्यामागील आशय आहे.
असे असले तरी चित्र रंगविण्यासाठी मुलांनी केलेली रंगांची निवड भावनिकदृष्ट्या लक्षणीय असते आणि अशी रंगांची निवड हा मनोवैज्ञानिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
Sunday, July 4, 2010
अमूर्त कल्पना आणि प्रश्न समजून घेण्याची क्षमता - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 15
शालेय वय होण्याआधी लहान मुलांना प्रश्न विचारणे योग्य आहे का?
अध्ययनप्रक्रियेत आत्मकेंद्री स्वभावावर मात करून सामाजिक सुसंवाद साधणे का आवश्यक आहे हे आपण पाहिले आहे. लहान मुलांच्या आत्मकेंद्री स्वभावामुळे ज्ञानग्रहणात अडथळे येतात हे पिआजे ह्यांचे म्हणणेही आपण ह्या अगोदर पाहिले आहे. ह्या म्हणण्यास वायगोत्स्की ह्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते अमूर्त संकल्पना तयार करण्याची अगर जाणून घेण्याची क्षमता लहान मुलांमध्ये असते. मोठी माणसे परकीय भाषा शिकताना होणाऱ्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती आहे. यामुळे प्रथमतः निरर्थक आणि पोकळ वाटणाऱ्या गोष्टी मुलांकडून करवून घेतल्या तरी शालेय जीवनाच्या संदर्भात त्यांना अर्थ प्राप्त होतो.
वाचन आणि अध्यापन यातून अशा प्रथमतः निरर्थक वाटणाऱ्या संकल्पनांना अर्थ प्राप्त होतो. यातूनच बालोद्यानाच्या शाळेची कल्पना अस्तित्वात आली व विकसित झाली. सारांश; लहान मुलांना संकल्पनातील अमूर्तता अडचणीची वाटत नाही. पुढे पिआजे यांनी ह्या म्हणण्याला मान्यता दिली. वायगोत्स्की यांच्या मतानुसार, शालेय वयाआधी शास्त्रीय ज्ञानाशी संबंधित अमूर्त कल्पना मुलांना समजत नसल्या तरी व्यावहारिक जीवनातील तात्कालिक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रातिभ संकल्पनांचे मुलांना वैचारिक पातळीवर आकलन होते. (किंबहुना अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी मोठ्या वयातही त्याचे संभाव्य व्यावहारिक उपयोजन हा हेतू प्रभावी असल्याखेरीज त्या समजणे कठीण होते व त्यासाठी तयार केलेली मूर्त प्रारूपेही निरुपयोगी ठरतात. डोनाल्डसन यांनीही लहान मुलांच्या बाबतीत ह्या मुद्याचे आग्रही प्रतिपादन केलेले आहे.)
लहान मुलांना प्रश्न विचारताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायला हवे?
मार्गारेट डोनाल्डसन ह्यांनी मानव हा प्राणी असल्याचे विचारात घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. व ह्या प्राण्याच्या दृष्टीने निरर्थक असलेले प्रश्न मुलांना विचारू नयेत असे मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांना आपण जे उपक्रम करण्यास देतो त्यांची निवड करताना ह्याचे भान असायला हवे. कृती करण्यापूर्वी मुलाच्या मनात असलेले विचार आणि कृती करताना असलेले विचार ह्यामध्ये नैसर्गिक एकसंधपणा असायला हवा. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या, प्रश्नाशी संबंध नसलेल्या कृतीवरही मूल लक्ष केंद्रित करते. (उदाहरणार्थ, बाईंनी हात हलवल्यास, डोके खाजवल्यास ह्या कृतींचा संबंध मूल प्रश्नाशी जोडण्याचा प्रयत्न करते). शिक्षकाच्या बोलण्यातील हेतू, भाष्य, सूर, पसंती/नापसंती इत्यादी भाव जाणून घेण्यासाठी मूल भाषाबाह्य संदर्भांचा आधार घेण्याची धडपड करते. म्हणूनच मुलांना विचारण्याचे प्रश्न काळजीपूर्वक तयार करावे लागतात आणि विचारतानाही काळजी घ्यावी लागते.
पिआजे यांनीही ह्या मुद्यावर विचार केलेला आहे. "कुतूहल हा (बाल) मनाच्या गरजांचा दृश्य परिणाम आहे' असे त्यांनी म्हटले आहे. "कोठे' हा प्रश्न मुलांना सर्वात सोपा वाटतो. "काय' हा नंतर समजतो. "का' हा प्रश्न समजण्यास कठीण जातो. "कसे' हा प्रश्न तर फारच कठीण आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. ज्या प्रश्नात एखाद्या साध्याच्या दिशेने काही हालचाल अभिप्रेत आहे असे प्रश्न निवडावेत असे ते म्हणतात. प्रश्न, "प्रेरणा आणि उद्देश' ह्यांनी परिपूर्ण हवा.
सर्व वस्तूंना जीव असून त्यांना हेतू, भावना वगैरे असतात अशी मुलांची धारणा असते. त्यामुळे जैविक दृष्टीने प्रश्नातील घटनेची सत्यता पडताळण्याचा मूल प्रयत्न करते. "योगायोग' ही संकल्पना लहान मुलांना समजू शकत नाही. (खरंतर मोठ्या माणसांपैकीसुद्धा फारच थोड्या लोकांना योगायोग म्हणजे काय हे समजते.)
वस्तूच्या नित्यत्वासारख्या सोप्या वाटणार्या कल्पना आणि युद्धासारख्या सामाजिक संदर्भ असलेल्या अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी योग्य वय होणे आवश्यक असते असे पिआजे ह्यांनी आपल्या बोधन विकासाच्या टप्प्यांचा सिद्धान्त मांडताना म्हटले आहे.
Thursday, July 1, 2010
बालमानसशास्त्र आणि अध्ययनप्रक्रिया - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 14
लहान मुले शिकतात म्हणजे काय होते? बालमानसशास्त्रातील आधारभूत संकल्पना आणि लहान मुलांच्या शिकण्याचा काय संबंध आहे?
शिकणे म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता येणे. विचारांची किंवा क्रियांची मालिका कशी असावी हे एखादे मूल (किंवा व्यक्ती) तर्कशुद्ध विचारातून ठरवू शकते. असा विचार करण्याची क्षमता सामाजिक सुसंवादातून साध्य होते. मुले एकमेकांशी किती बोलतात, एकमेकांमध्ये किती मिसळतात किंवा बाई त्यांच्याशी किती बोलतात ह्यावर पूर्वप्राथमिक वर्गात हा सुसंवाद अवलंबून असतो. ज्या मुलांना इतर मुलांशी (किंवा माणसांशी) बोलण्याची, त्यांच्यात मिसळण्याची संधी मिळत नाही त्या मुलांमध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता लवकर विकसित होत नाही.
असे का घडते?
अनुभवातील वास्तवाची सापेक्षता आणि वैयक्तिक दृष्टिकोन ह्यांची तुलना करून त्यातील अन्योन्य संबंध मूल सामाजिक सुसंवादातून ताडून पहात असते व तेच त्याचे शिक्षण असते. सापेक्षतेसाठी त्याला अन्य व्यक्तीच्या त्याच अनुभवावरील प्रतिक्रियेची गरज भासते. स्वतःची प्रतिक्रिया दुसऱ्याच्या प्रतिक्रियेशी ताडून पहाण्यासाठी हा “दुसरा कोणीतरी” हजर असावा लागतो.
शिकण्यासाठी सामाजिक सुसंवाद अनिवार्य आहे का?
कोणत्याही क्षेत्रात जाणून घेण्याची (ज्ञानग्रहणाची) प्रक्रिया ही सुसंवादाची प्रक्रिया असते. ह्या सुसंवादात, शिकणाऱ्याच्या अहंभावाचा लोप होतो. किंबहुना आपल्या अहंभावाचा लोप होऊन त्याला एखाद्या वस्तुनिष्ठ संदर्भाचे तादात्म्य लाभते तेव्हाच आपण काही शिकू शकतो. (एखादे कठीण गणित/उदाहरण आपल्याला समजल्यावर देहभान हारपण्याचा क्षण कसा येत असेे ते आठवून पहा. आपण जेव्हा काही समजून घेत असतो तेव्हा हीच प्रक्रिया कमी-अधिक उत्कटतेने घडत असते. ती अनायासे घडत असल्याने प्रत्येकवेळी ती आपणास जाणवत नाही इतकेच.)
पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा ह्या संकल्पनेशी कसा संबंध आहे?
आपल्या (किंवा मुलाच्या) मनाने तर्काच्या आधारे विविध संबंधांचे (उदाहरणार्थ, दृश्य-द्रष्टा संबंध) केलेले अनुमान हे ह्या सुसंवादाचे (साध्याचे) एक साधन असते आणि तो त्याचा परिणामही असतो. जन्मल्यापासून ह्या साधनेला सुरुवात होते. बाई वर्गात मुलांशी गप्पा मारत असतात त्यावेळी त्यांना ह्या साधकाच्या (मुलाच्या) सिद्धतेचा अंदाज आणि पडताळा घेता येतो.
वरीलप्रमाणे सुसंवादाची अधिकाधिक संधी देणाऱ्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता अर्थातच जास्त असते. ह्या सुसंवादाला पोषक असे पर्यावरण निसर्ग, व्यक्ती आणि वस्तू ह्यांच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यावर पूर्वप्राथमिक शिक्षणाचा भर असायला हवा.
वैयक्तिक बाबी आणि सामाजिक बाबी ह्यांच्यामधील फरक न कळल्याने सुसंवाद साधण्यात अडथळे येतात (मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे खरे आहे). हे अडथळे फार वाढले की सामाजिक स्तरावरील ह्याचे प्रकटीकरण भांडणांमधून दिसते तर वैयक्तिक स्तरावर अडथळ्यांचे अस्तित्व उघड जाणवले नाही तरी ज्ञानग्रहणातील असमर्थतेतून ते व्यक्त होतात.
Wednesday, June 30, 2010
बालमानसशास्त्रातील काही आधारभूत संकल्पना - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 13
पूर्वप्राथमिक व प्राथमिक विभागातील शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढेल?
हा खूप व्यापक प्रश्न आहे. केवळ कायदे करून हे घडणार नाही. कायद्याच्या निमित्ताने प्रश्नाकडे लक्ष वेधले जाते हे खरे आहे पण तितके पुरेसे नाही. प्रत्यक्ष काम शैक्षणिक संस्थांनाच करावे लागणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेसाठी बालक, पालक आणि शिक्षक अशा तिन्ही घटकांचा विचार अभिप्रेत आहे. यापैकी बालक केंद्रस्थानी असून इतर दोन घटकांमध्ये बालकाचा विकास घडविण्यासाठी समन्वय असणे आवश्यक आहे. यासाठी विशेषतः प्राथमिक व पूर्वप्राथमिक वयोगटांच्या विकासात बालमानसशास्त्र महत्त्वाचे ठरते.
पूर्वप्राथमिक शिक्षकाकडे बालमानसशास्त्राचे ज्ञान असणे अनिवार्य आहे का?
होय. सामान्यतः पूर्वप्राथमिक वर्ग संचालित करणाऱ्या शिक्षिकेला असे ज्ञान असतेच. फक्त ते औपचारिक स्वरूपात असेलच असे नाही. आई ही आपली पहिली गुरु आहे. तिला आपल्या बाळाचे मन अंतःप्रेरणेने समजते. म्हणूनच अंगणवाडी किंवा बालवाडीमध्ये बहुतेक शिक्षिकाच आहेत, पुरुष शिक्षक अभावानेच आढळेल. स्त्रीला निसर्गतःच बालमनाची अधिक जाणीव असलेली दिसते. असे असले तरी सैद्धान्तिक स्वरूपाचे औपचारिक ज्ञान बालोद्यान किंवा पूर्वप्राथमिक आणि प्राथमिक शिक्षिकांना असले तर त्याचा फायदाच होईल. विशेषतः मुले नेमके काय करण्यास सक्षम असतात किंवा नसतात ह्याच्या सर्वसामान्य मर्यादा त्यांना माहीत असल्यास फायदा होतो.
अनेक बालमानसशास्त्रज्ञांनी मुलांच्या विकासाचे वेगवेगळे टप्पे सांगितले आहेत. ह्या साऱ्यामागे बालमानसशास्त्राची काही आधारभूत तत्त्वे आहेत. मुलांचा स्वभाव आत्मकेंद्री असतो हे असेच एक तत्त्व आहे.
बालमनाच्या आत्मकेंद्री स्वभावाची संकल्पना काय आहे ?
बालमानसशास्त्राची पायाभरणी करणाऱ्या ज्यां पिआजे ह्या स्विस शास्त्रज्ञाने असे दाखवून दिलेले आहे की लहान मुलांना सांकल्पनिक विकेंद्रीकरण करता येत नाही. उदाहरणार्थ, दृश्य आणि ते पाहणारा द्रष्टा ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत हे त्यांना समजू शकत नाही. आधुनिक मानसशास्त्राला पिआजे ह्यांचे मत संपूर्णपणे अमान्य नसले तरी मुलांची क्षमता इतकी कमी नसते असे त्यांना वाटते. मुलांची समज चांगली असते पण आपल्या ज्ञानाचा वापर करण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले नसते. आपल्याला एखादी गोष्ट समजलेली आहे असे लहान मूल दाखवून देऊ शकत नाही. परंतु पिआजे ह्यांच्या मतानुसार लहान मुलाला त्याच्या दृष्टिकोनाव्यतिरिक्त दुसरा एखादा दृष्टिकोन (उदाहरणार्थ, मोठ्या माणसाचा) असू शकतो याची कल्पनाच करता येत नाही. लहान मुलाच्या ह्या असमर्थतेबाबत दुमत नाही.
पिआजे ह्यांची संशोधन पद्धती काय होती?
पिआजे ह्यांची संशोधन पद्धती काहीशा अलिप्तपणे घेतलेल्या मुलाखतीची होती. एखादा शाब्दिक अगर व्यावहारिक विषय ह्या निर्हेतुक आविर्भावात घेतलेल्या मुलाखतीच्या केंद्रस्थानी असे. पिआजे ह्यांच्या सिद्धान्तानुसार "दृश्य-द्रष्टा ह्यांच्यामध्ये समतोल साधणे' हे बालमनाचे ध्येय असते. बालमनाची जडणघडण निरंतर मनोव्यापारातून होत असते. भौतिक आणि सामाजिक पर्यावरणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये आपले स्वत्व जपण्याची धडपड असे ह्या मनोव्यापारांचे स्वरूप असते. पर्यावरणाची मनावर होणारी क्रिया आणि मनाची प्रतिक्रिया यातील समतोलत्वाचा हा सिद्धांत आहे.
Wednesday, June 23, 2010
शिस्त लावण्याचे उपाय - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 12
विद्यार्थ्यांना "शिस्त लावता येण्याचे' काही तंत्र आहे का?
विद्यार्थ्यांच्या "बेशिस्तीची' विविध कारणे आपण ह्या आधीच्या नोंदीमध्ये थोडक्यात पाहिलेली आहेत. 'Discipline' ह्या इंग्लिश शब्दाचा अर्थ शिकणे असा होतो. (Disciple = शिष्य). त्यामुळे शिस्त ही ‘लावण्याची' गोष्ट आहे हे अर्वाचीन आणि प्राचीन विद्वानांना पटते आहे असे दिसत नाही. शिक्षकाची भूमिका 'अधीक्षका'ची झाली त्यामुळे लष्करी शिस्तीची संकल्पना शिक्षणक्षेत्रात आली. "अथ आत्मानुशासनम्' अशा आदर्शवादापासून समाज दूर झाला की शिक्षकाचा नैतिक अधिकार स्वयंसिद्ध रहात नाही त्याला उसन्या पेडस्टलची किंवा दंडाधिकाराची गरज भासते.
मानसशास्त्रातील विविध मतप्रवाहांचे विविध काळी प्राबल्य होते असे आढळते. मानवी वर्तणुकीवर ताबा मिळवण्याच्या तंत्रांचे त्या मतांनुसार प्रतिपादन होत राहिले. सध्या अशा तंत्रांमध्ये न्युरोलिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग किंवा "एनएलपी' चा बराच बोलबाला आहे.
रिचर्ड बॅंडलर आणि जॉन ग्राइंडर हे ह्या संकल्पनेचे जनक होत. Frogs into Princes ह्या त्यांच्या लोकप्रिय पुस्तकातून ह्या संकल्पनेचा प्रसार झाला. मज्जासंस्था आणि भाषा ह्यांच्यातील सहयोगातून वागणुकीवर प्रभाव पडतो किंवा पाडता येतो अशा स्वरूपाचे हे गृहीतक आहे आणि त्याच्या आधारे तयार केलेली उपचारपद्धती अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांवर उपाय असल्याचा दावा करण्यात येतो.
हे तंत्र अपेक्षेनुसार वादविवादांच्या भोवऱ्यात आहेच. आदर्शवादी विद्वान आणि परंपरावादी विचारांचे समर्थन करणारे असे दोन टोकांचे लोक आपल्या अनुशासनपद्धतीसाठी ह्या तंत्राची कास धरावी असे म्हणतात हे विशेष. एनएलपी विषयी सोप्या शब्दात माहिती देणारे हे संकेतस्थळ अवश्य पहावे.
साचेबंद वागणूक नाकारणारे (= बेशिस्त) विद्यार्थी तसे का वागतात ह्याची अनेक प्रकारची कारणे असल्याने सर्वांना "रुळावर आणण्यासाठी' एकाच प्रकारचे (उदाहरणार्थ भाषिक क्लृप्तीचे) तंत्र वापरता येईल हे शक्य वाटत नाही. अनेक अनाक्रमक तंत्रांपैकी ते एक असू शकते. विद्यार्थ्यांने झापडबंद विचाराचे न होता त्याची विवेकबुद्धि शाबूत रहावी आणि त्याच्या आधारे त्याला स्वैराचारावर मात करता यावी असा आदर्शवादी विचार आहे.
विद्यार्थ्याला, मग तो बेशिस्त असो वा नसो, विचार करायची सवय लागायची असेल तर मुळात शिक्षकाला विचार करण्याचे वावडे असता कामा नये. झापडबंद किंवा टोपल्या टाकणाऱ्या शिक्षकांना विचार करण्याचा आळस असतो किंवा सवय नसते. ती सवय जर त्याने अंगी बाणवली तर त्याच्या विद्यार्थ्यांपुढे त्याचे एक उदाहरण राहील आणि त्यातून विचारांची सवय त्यांना लागू शकेल व यथावकाश त्यांचा प्रवास आत्मानुशासनाकडे होऊ शकेल.
अशी ही चिकाटीने साध्य करायची दीर्घ प्रक्रिया आहे. एका वर्षापेक्षा अधिक काळ एकाच वर्गाला शिकवणारे शिक्षक त्या वर्गाचे चांगले नियंत्रण का करू शकतात ह्यामागच्या कारणांपैकी हे महत्त्वाचे कारण आहे. कारण विद्यार्थ्यांना शिक्षकाची पुरेशी ओळख पटण्यास आणि चांगुलपणाची प्रेरणा घेण्यास आवश्यक वेळ मिळतो. बडगा उगारून किंवा एखाद्या उसन्या "तंत्राने' अल्पकालीन यश मिळेलही व त्या दृष्टीने तंत्रांचा डोळस वापर अवश्य करावा पण शाश्वत परिणामासाठी "उप-देशा'ला (शब्दशः, गुरुच्या सान्निध्यात अधिकाधिक काळ राहण्याला) पर्याय नाही.
Tuesday, June 15, 2010
विश्रब्ध शारदा
पंडित नेहरूंची पत्रे, आइन्स्टाईनची पत्रे इतकंच काय पण समर्थ रामदास स्वामींच्या पत्रांपासून साहित्यविश्वाचे अविभाज्य अंग असलेली असंख्य प्रकारची पत्रे आहेत आणि अशी पत्रे पोहोचवणारा - आणणारा तो दूत, त्याची आतुरतेने वाट पाहणारे विरही जन ह्यांच्या भावकल्लोळाचा आविष्कार करणारे पत्रवाङ्मय अतिशय समृद्ध आहे. डाकिये ने द्वार खटखटाया । अनबांटा पत्र लौट आया ।। ह्या माया गोविंद ह्यांच्या पद्यपंक्तिंसारखे पत्रांचे अनेक भावपूर्ण उल्लेख ललित आणि इतर साहित्यात जागोजागी आहेत.
अलिकडे संपर्काच्या क्रांतीमुळे पत्र लिहिणे हा प्रकार कमी झालेला आहे आणि एक साहित्यप्रकार अस्तंगत होतोय की काय अशी भीतीही अनेकांना वाटते आहे. (जॅन्युअरीमॅगेझिन ह्या साईटवरील हा लेख नजरेखालून घाला). बेन ग्रीनमन ह्या अति प्रयोगशील आधुनिक लेखकाच्या या मुलाखतीतही ही खंत दिसते आहे.
रोजनिशी म्हणजे एकप्रकारे स्वतःलाच लिहिलेली पत्रे आहेत. (प्रस्तुत ब्लॉग्जसारख्या लिहिण्याच्या हौसेखातर सुरू असलेल्या अनेक ब्लॉग्जच्या बाबतीत तर हे प्रकर्षानं खरं आहे). पत्रवाङ्मयाचा आढावा घेणारी विश्वकोशातील ही नोंद पहावी.
Popular Posts
-
जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू । भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।। भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने । दुकूलद...
-
चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ...
-
विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीची कारणे कोणती ? ह्या प्रश्नाचा आवाका फार मोठा आहे. त्याचे लहान लहान भाग करून त्याचा विचार करू. बेशिस्त नेमके ...