शालेय वय होण्याआधी लहान मुलांना प्रश्न विचारणे योग्य आहे का?
अध्ययनप्रक्रियेत आत्मकेंद्री स्वभावावर मात करून सामाजिक सुसंवाद साधणे का आवश्यक आहे हे आपण पाहिले आहे. लहान मुलांच्या आत्मकेंद्री स्वभावामुळे ज्ञानग्रहणात अडथळे येतात हे पिआजे ह्यांचे म्हणणेही आपण ह्या अगोदर पाहिले आहे. ह्या म्हणण्यास वायगोत्स्की ह्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते अमूर्त संकल्पना तयार करण्याची अगर जाणून घेण्याची क्षमता लहान मुलांमध्ये असते. मोठी माणसे परकीय भाषा शिकताना होणाऱ्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती आहे. यामुळे प्रथमतः निरर्थक आणि पोकळ वाटणाऱ्या गोष्टी मुलांकडून करवून घेतल्या तरी शालेय जीवनाच्या संदर्भात त्यांना अर्थ प्राप्त होतो.
वाचन आणि अध्यापन यातून अशा प्रथमतः निरर्थक वाटणाऱ्या संकल्पनांना अर्थ प्राप्त होतो. यातूनच बालोद्यानाच्या शाळेची कल्पना अस्तित्वात आली व विकसित झाली. सारांश; लहान मुलांना संकल्पनातील अमूर्तता अडचणीची वाटत नाही. पुढे पिआजे यांनी ह्या म्हणण्याला मान्यता दिली. वायगोत्स्की यांच्या मतानुसार, शालेय वयाआधी शास्त्रीय ज्ञानाशी संबंधित अमूर्त कल्पना मुलांना समजत नसल्या तरी व्यावहारिक जीवनातील तात्कालिक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रातिभ संकल्पनांचे मुलांना वैचारिक पातळीवर आकलन होते. (किंबहुना अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी मोठ्या वयातही त्याचे संभाव्य व्यावहारिक उपयोजन हा हेतू प्रभावी असल्याखेरीज त्या समजणे कठीण होते व त्यासाठी तयार केलेली मूर्त प्रारूपेही निरुपयोगी ठरतात. डोनाल्डसन यांनीही लहान मुलांच्या बाबतीत ह्या मुद्याचे आग्रही प्रतिपादन केलेले आहे.)
लहान मुलांना प्रश्न विचारताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायला हवे?
मार्गारेट डोनाल्डसन ह्यांनी मानव हा प्राणी असल्याचे विचारात घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. व ह्या प्राण्याच्या दृष्टीने निरर्थक असलेले प्रश्न मुलांना विचारू नयेत असे मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांना आपण जे उपक्रम करण्यास देतो त्यांची निवड करताना ह्याचे भान असायला हवे. कृती करण्यापूर्वी मुलाच्या मनात असलेले विचार आणि कृती करताना असलेले विचार ह्यामध्ये नैसर्गिक एकसंधपणा असायला हवा. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या, प्रश्नाशी संबंध नसलेल्या कृतीवरही मूल लक्ष केंद्रित करते. (उदाहरणार्थ, बाईंनी हात हलवल्यास, डोके खाजवल्यास ह्या कृतींचा संबंध मूल प्रश्नाशी जोडण्याचा प्रयत्न करते). शिक्षकाच्या बोलण्यातील हेतू, भाष्य, सूर, पसंती/नापसंती इत्यादी भाव जाणून घेण्यासाठी मूल भाषाबाह्य संदर्भांचा आधार घेण्याची धडपड करते. म्हणूनच मुलांना विचारण्याचे प्रश्न काळजीपूर्वक तयार करावे लागतात आणि विचारतानाही काळजी घ्यावी लागते.
पिआजे यांनीही ह्या मुद्यावर विचार केलेला आहे. "कुतूहल हा (बाल) मनाच्या गरजांचा दृश्य परिणाम आहे' असे त्यांनी म्हटले आहे. "कोठे' हा प्रश्न मुलांना सर्वात सोपा वाटतो. "काय' हा नंतर समजतो. "का' हा प्रश्न समजण्यास कठीण जातो. "कसे' हा प्रश्न तर फारच कठीण आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. ज्या प्रश्नात एखाद्या साध्याच्या दिशेने काही हालचाल अभिप्रेत आहे असे प्रश्न निवडावेत असे ते म्हणतात. प्रश्न, "प्रेरणा आणि उद्देश' ह्यांनी परिपूर्ण हवा.
सर्व वस्तूंना जीव असून त्यांना हेतू, भावना वगैरे असतात अशी मुलांची धारणा असते. त्यामुळे जैविक दृष्टीने प्रश्नातील घटनेची सत्यता पडताळण्याचा मूल प्रयत्न करते. "योगायोग' ही संकल्पना लहान मुलांना समजू शकत नाही. (खरंतर मोठ्या माणसांपैकीसुद्धा फारच थोड्या लोकांना योगायोग म्हणजे काय हे समजते.)
वस्तूच्या नित्यत्वासारख्या सोप्या वाटणार्या कल्पना आणि युद्धासारख्या सामाजिक संदर्भ असलेल्या अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी योग्य वय होणे आवश्यक असते असे पिआजे ह्यांनी आपल्या बोधन विकासाच्या टप्प्यांचा सिद्धान्त मांडताना म्हटले आहे.