एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मानसशास्त्र वर्तनाच्या अभ्यासाकडून मनाच्या अभ्यासाकडे सरकले आणि बोधनवाद किंवा ज्ञानात्मकतावाद (कॉग्निटिविझम) हा नवीन अध्ययनसिद्धान्त उदयाला आला. ज्ञानात्मकता वादानुसारही ज्ञान हे शिकणाऱ्याच्या बाहेर अस्तित्वात असते असे मानले आहे. परंतु त्याचा भर मानवी स्मृती ज्ञानग्रहण कसे करते आणि अध्ययनाला कशी चालना देते यावर आहे. शिवाय ह्या विश्लेषणात अध्ययनाच्या स्थिती विचारात घेतल्या जातात, व्यक्तीव्यक्तीमध्ये फरक असून अध्यापन करताना प्रत्येकाला अनुरूप अशी धोरणे अवलंबिणे आवश्यक आहे असाही विचार आहे. वर्तनवादाचा भर वर्तनबदलाच्या उद्दिष्टांवर आहे तर ज्ञानात्मकतावादाचा भर कामगिरीच्या विविध टप्प्यांचे विश्लेषण करण्यावर आहे. नवशिका ते तज्ज्ञ असा प्रवास घडताना येणारे हे टप्पे आहेत.
वातावरणाचा अध्ययनावर सर्वाधिक परिणाम होतो हे गृहीत धरले आहेच पण शिकणारा आपल्या अध्ययनासाठी नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन अशी विशिष्ट प्रकारची धोरणात्मक हत्यारे कशी वापरतो आणि पूर्वज्ञान, श्रद्धा, दृष्टिकोन व मूल्ये ह्यांचा अध्ययनावर कसा परिणाम होतो ह्यावर भर दिलेला आहे. माहितीवर प्रक्रिया कशी होते आणि कशी साठवली जाते तसेच पूर्वज्ञान स्कीमा (अनेकवचन - स्कीमाटा) नावाच्या स्मृती संरचनेत कसे साठवले जाते आणि आवश्यकतेनुसार योग्य संदर्भात आठवून कसे वापरले जाते ह्याचा विचार ज्ञानात्मकतावादात विकसित झाला आहे.
समस्या किंवा गणिते सोडविणे ह्यासारख्या उच्च पातळ्यांवरील अध्ययन पातळ्यांवर अवलंबून असलेल्या गोष्टी ज्ञानात्मकतावादाच्या आधारे स्पष्ट करणे अधिक सोपे आहे कारण गुंतागुंतीच्या समस्यांचे विघटन घटकांमध्ये करून, त्यांची पूर्वज्ञानाशी सांगड घालून नव्या अध्ययनाचे विणकाम कसे होते हे त्याद्वारे दाखवता येते. ज्ञानात्मकतावादावर आधारलेल्या अध्यापन धोरणांमध्ये अध्ययन आशयाची व्यवस्था लावण्यावर भर असतो. माहितीवर प्रक्रिया कशी करावी, माहिती कशी आठवावी, कशी वापरावी ह्याचा त्यात समावेश असतो.
डेव्हिड ऑसुबेल ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अग्रिम संघटनाची संकल्पना मांडली. शिकण्याच्या प्रक्रियेपूर्वी जी माहिती सादर होते त्याकडे त्याने लक्ष पुरविले. ह्या माहितीची पायऱ्या-पायऱ्यांची रचना केल्यास एका पायरीच्या आधारे वरची पायरी व त्याआधारे आणखी वरची पायरी गाठणे आणि पूर्वज्ञानाशी नव्या माहितीशी सांगड घालणे सुलभ होते असा विचार त्याने मांडला. म्हणजे एखादा पाठ वाचण्यापूर्वी त्यातील महत्त्वाच्या कल्पनांचा सारांश, आशयाचे स्पष्टीकरण, अमूर्ततेच्या किंवा सर्वसामान्यीकरणाच्या आणि समावेशकतेच्या आणखी वरच्या पातळीवर आधीच सादर केल्यास वाचन सोपे होते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचताना आधी ओवीवरील स्पष्टीकरण, अन्वय आणि ओवीचा अर्थ वाचून घेतल्यास ओवी जास्त समजते आणि आवडते.
रॉबर्ट गॅग्ने ह्या मानसशास्त्रज्ञाने विशिष्ट ज्ञानात्मक किंवा बोधनात्मक प्रक्रियांशी निगडित अशा अध्ययनाच्या नऊ टप्प्यांची कल्पना मांडली. ह्या नऊ टप्प्यांवर अध्ययनस्थिती कशी असते आणि कोणती बौद्धिक कौशल्ये शिकावी लागतात हे सांगितले आहे शिवाय अध्यापन कशा क्रमाने करावे हेही सांगितले आहे. अगोदर अस्तित्वात असलेल्या ज्ञानसंरचनांशी, नव्या ज्ञानाची सांगड शिकणाऱ्याला घालता यावी म्हणून धड्यांचे संघटन ह्या टप्प्यांनुसार करावे असे त्याचे मत होते. अध्ययनासाठी ह्या नऊ पायऱ्या योग्य पातळीत आधार देऊ शकतात असेही त्याला वाटत होते. ह्या नऊ पायऱ्या अशा आहेत :
शिकणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणे
त्यांना शिकण्याच्या उद्दिष्टांची/फलितांची माहिती देणे
पूर्वीचे ज्ञान आठविण्यासाठी चालना देणे
जो आशय शिकायचा आहे तो प्रेरक स्वरूपात सादर करणे
मार्गदर्शन पुरविणे
अध्यापनातून सूचना देणे आणि आवश्यक कामगिरी करवून घेणे
त्यांच्या कामासंबंधी प्रतिसाद पुरविणे
कामगिरीचे मूल्यनिर्धारण करणे
आशय रुजवण्यासाठी प्रयत्न करणे
ज्ञानात्मकतावादानुसार, अध्ययनात शिकणाऱ्यांची भूमिका अधिक सक्रिय असते आणि अध्ययन प्रक्रियांचे संघटन करीत तो शिकत जातो. ज्ञानात्मकतावादाचा भर माहिती संघटित करण्यासाठी, ती दीर्घस्मृतीत नंतर आठवता येईल अशा रीतीने साठविण्यासाठी शिकणाऱ्यांना मदत करण्यावर आहे. अध्ययनाचे उद्देश/फलित अध्यापक ठरवितो पण विचारप्रक्रिया, अंतर्गत अध्ययन, माहितीचे संघटन, स्वतःवर देखरेख करण्याचे कौशल्य विकसित करणे, सकारात्मक दृष्टिकोन वाढविणे ह्या गोष्टी शिकणाऱ्याने करणे व त्यासाठी अध्यापकाने त्याला मदत करणे अपेक्षित आहे. शिक्षण सुलभ व्हावे म्हणून अध्ययन उद्दिष्टांशी सुसंगत असे पूर्वज्ञान आठवता येईल अशा तऱ्हेचे वातावरण निर्माण करायला हवे असे ज्ञानात्मकतावादाचे गृहीतक आहे. ज्यांना फारसे पूर्वज्ञान नाही अशांना नव्या स्कीमाटा तयार करता याव्यात म्हणून त्यांच्या माहितीतील उदाहरणे देण्याचे कसब शिक्षकाकडे अपेक्षित आहे.