अध्ययन कसे घडते ह्याची मांडणी विसाव्या शतकातील 5 व्या आणि 6 व्या दशकामध्ये वर्तनवादाच्या (बिहेवियरिझम) आधारे केली गेली. "फक्त पाहता येतील (दृश्य) आणि मोजता येतील (मापनीय) अशाच घटकांच्या आधारे शास्त्रीय मांडणी करता येऊ शकते.' हा विचार आधारभूत समजून वर्तनवादाची उभारणी झालेली आहे.
वर्तनवाद समजून घेण्यासाठी मनाचे "अभिसंधान' (कंडिशनिंग) ही पारिभाषिक संज्ञा समजून घ्यायला हवी. आपल्याला आलेल्या अनुभवांचा साठा मनात होत असतो. नंतर येणारा अनुभव, आपण आधी आलेल्या ह्या अनुभवांच्या माध्यमातून घेत असतो. आधीच्या अनुभवांशी नव्या अनुभवाची तुलना करून त्याद्वारे आपण नव्या अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या परीने हा अर्थ लावलेला नवा अनुभव आणखी एक अनुभव म्हणून मनात साठवला जातो. अशा तऱ्हेने मनाच्या पूर्वीच्या संस्कारित स्थितीमध्ये (पूर्वीचे अभिसंधान) बदल होत जातो आणि त्याला नंतरची संस्कारित स्थिती (नंतरचे अभिसंधान) प्राप्त होते. थोडक्यात असे म्हणता येईल की विशिष्ट वेळी असलेल्या मनाच्या संस्कारित स्थितीला मनाचे त्यावेळचे अभिसंधान असे म्हणता येईल. अर्थातच एखाद्या वेळी असलेल्या मनाच्या मर्यादा आणि क्षमता मनाच्या त्यावेळच्या अभिसंधानानुसार असतात.
माणसाला बक्षीस देऊन (गाजर दाखवून) किंवा त्याला शिक्षा करून (छडी उगारून) त्याच्या वर्तनात बदल घडवता येतो. वर्तनात हा बदल म्हणजे "अध्ययन' किंवा "शिकणे' होय आणि "गाजर आणि छडी' ह्यांच्या साहाय्याने मनाच्या अभिसंधानात हा अपेक्षित बदल घडवला जातो. हा बदल अभिसंधित होण्यासाठी, शिकलेले दृढ होण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा सकारात्मक ("गाजर') किंवा नकारात्मक ("छडी') बळ दिले जाते. ह्याला अभिसंधानाचे प्रबलन (रीइन्फोर्समेंट) अशी संज्ञा आहे.
वर्तनवादाशी दोन प्रकारचे अभिसंधान संबंधित असल्याचे मानले जाते. 1) शास्त्रीय अभिसंधान 2) व्यापारक (कार्यप्रेरक) अभिसंधान
1) शास्त्रीय अभिसंधान किंवा क्लासिकल कंडिशनिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण इवॉन पॉवलॉव ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या रशियन शास्त्रज्ञाने केलेल्या एका प्रयोगाची माहिती घेऊ. कुत्र्याला अन्न दाखविले की त्याची लाळ गळू लागते. त्याचवेळी एक बझर वाजविणे सुरू केले. पुढेपुढे नुसता बझर वाजवला की कुत्र्याची लाळ गळू लागते. दोन नैसर्गिक प्रतिसादांची सांगड घालणारे हे अभिसंधान आहे.
2) व्यापारक (किंवा कार्यप्रेरक) अभिसंधान किंवा ऑपेरंट कंडिशनिंग आपण "स्किनर्स बॉक्स' ह्या प्रसिद्ध प्रयोगाद्वारे समजून घेऊ शकतो. बी. एफ. स्किनर ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ऑपेरंट कंडिशनिंग चेंबर ह्या नावाचे एक उपकरण तयार केले. ह्या चेंबरमध्ये उंदिर किंवा कबुतरे एक कळ दाबून आपले अन्न मिळवण्यास शिकत असत. जर एखाद्या क्रियेच्या प्रतिसादातून बक्षीस मिळत असेल तर ती क्रिया पुन्हापुन्हा केली जाते आणि जर मिळत नसेल तर ती पुन्हा केली जाण्याची शक्यता कमी असते. "सजीव प्राणी, ते करीत असलेल्या क्रियांमध्ये, त्या क्रियांमुळे त्यांना अनुभवास येणाऱ्या परिणामांमुळे, हळूहळू बदल घडवितात' ह्या सिद्धान्तावर हा प्रयोग आधारित आहे. अशा रीतीने, व्यापारक अभिसंधान हे वर्तन आणि त्याचा परिणाम ह्यांची सांगड घालणारे अभिसंधान आहे.
पहिल्या प्रकारचे अभिसंधान हे प्रतिसादात्मक आहे तर दुसऱ्या प्रकारचे अभिसंधान क्रियात्मक आहे.
प्राण्यांवर केलेल्या अशा प्रकारच्या प्रयोगांमधून वर्तनवादी शास्त्रज्ञांनी असे म्हटले की अध्ययन, नेहमी वर्तन आणि त्याचे परिणाम ह्यातील संबंधाने प्रभावित होते. शिक्षक, बक्षिस आणि शिक्षा ह्यांचा वापर करून इच्छित अध्ययन साध्य करण्यासाठी शिकणाऱ्याचे वर्तन अभिसंधित करतो. वर्तनवादी असेही मानतात की अध्ययनासाठी विविध प्रकारचे प्रबलनही आवश्यक आहे. उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी चांगले गुण मिळाल्याने प्रेरित होत असेल तर गुणांचा वापर अशा सकारात्मक प्रबलनासाठी करता येतो. कमी गुण देणे हे नकारात्मक प्रबलन असू शकते, त्याचा वापर केल्यास विद्यार्थी चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे असा हा विचार आहे.
No comments:
Post a Comment