रचनावाद (कन्स्ट्रक्टिविझम) ऐंशीच्या दशकात लोकप्रिय झाला. ह्या सिद्धान्तानुसार अध्ययन ह्या प्रक्रियेत ज्ञानाची आणि अर्थाची रचना विद्यार्थी/शिकणारा करतो. त्यासाठी तो पूर्वज्ञान, श्रद्धा आणि अनुभव ह्यांचे एकात्मीकरण करतो. ह्या सिद्धान्ताचे आधीच्या सिद्धान्तांपेक्षा मुख्य वेगळेपण असे की ह्यात ज्ञान व्यक्तीच्या बाहेर नसते असे मानले जाते. जगाच्या अनुभवातून आणि वातावरणाशी होणाऱ्या व्यवहारातून ज्ञान व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये रचते असा विचार यात मांडलेला आहे. रचनावादाचा भर वातावरणावर नियंत्रण ठेवण्यावर नाही. त्याऐवजी ज्ञान आणि कौशल्ये ह्यांचे संश्लेषण/ एकात्मीकरण व्यक्तीच्या अनुभवात होण्यावर येथे भर आहे. येथे इतर सिद्धांतांप्रमाणे स्वतंत्र घटकांवर भर नसून अखंड एकात्मतेवर भर आहे.
रचनावादाचे दोन प्रकार आहेत : बोधनात्मक रचनावाद आणि सामाजिक रचनावाद. बोधनात्मक रचनावादाचा भर शिकणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणांवर आणि शिकण्यावर त्यांचा जो परिणाम होतो त्यावर आहे. सामाजिक रचनावादाचा भर सामाजिक देवघेवीतून / आंतरक्रियांमधून अर्थ आणि समज ह्यांची निर्मिती कशी होते यावर आहे. दोन्हींचा दृष्टिकोन आत येणारी माहिती व्यक्तीच्या खास त्याच्या अशा भिंगातून कशी पाहिली जाते आणि तिचा अर्थ लावून ज्ञानसंपादन कसे होते हे पाहण्याचा आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, श्रद्धा, संस्कृती आणि अनुभव ह्यातून ह्या भिंगाची घडण होते. हा जो अर्थ लावला जातो त्यानुसार शिकणाऱ्या व्यक्ती स्कीमाटांची रचना करतात आणि त्यांच्याद्वारे त्यांना काय माहीत आहे हे व्यक्त करतात.
ज्यां पिआजे ह्यांनी बोधनात्मक रचनावादाचा सिद्धान्त मांडला. ज्ञान केवळ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रामित करता येणे शक्य नाही असे ते म्हणतात. ज्ञान अनुभवातूनच शिकावे लागते. अनुभवातून व्यक्ती मानसिक प्रारूपे किंवा स्कीमाटांची रचना करतात आणि ज्ञानाची रचना अशा एकत्र केलेल्या आणि सामावून घेतलेल्या स्कीमाटांमधील बदलांवर आधारित असते. जर आत येणारी माहिती आधीच आत असलेल्या माहितीशी संबंधित असेल तर आधीच अस्तित्वात असलेल्या स्कीमांमध्ये ती एकत्र केली जाते. जर येणारी माहिती आधीच अस्तित्वात असलेल्या माहितीच्या विरोधात असेल तर विसंवाद निर्माण होतो आणि व्यक्तीला एकाच वेळी परस्परविरोधी कल्पनांचा विचार करावा लागतो. ह्याव्यतिरिक्त आपण आणि आपल्या पर्यावरणामध्ये क्रियांची जी देवाणघेवाण होते त्यावर शिक्षण किंवा अध्ययन आधारित असते असे पिआजे ह्यांचे मत आहे. म्हणूनच वास्तव जगातील अनुभव शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
सामाजिक रचनावादामध्ये अध्ययनाच्या सामाजिक स्वरूपावर भर आहे. लेव वायगोत्स्की ह्यांच्या प्रतिपादनानुसार अध्ययन ज्या सामाजिक संदर्भामध्ये होते त्यापासून ते वेगळे काढता येत नाही. ज्ञान गोळा होण्याची प्रक्रियाही शिकणारा सामाजिक परिस्थितीशी एकात्म झाल्याखेरीज घडू शकत नाही. अध्ययन ही समन्वयात्मक प्रक्रिया आहे असे सांगून ती समजावून देण्यासाठी त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली.
ह्या सिद्धान्तानुसार विकासाच्या दोन पातळ्या आहेत. एक पातळी शिकणारा स्वतंत्रपणे गाठू शकतो तर दुसरी संभाव्य पातळी गाठण्यासाठी त्याला शिक्षकाची किंवा सहाध्यायींची मदत लागते. शिकणाऱ्याला एक पायरी वर जाता यावे म्हणून त्याला शिक्षकाचा आधार देण्याची कल्पना ह्यात आहे. ह्या आधाराने शिकणारा स्वतः पायरीपायरीने रचना करीत शिकू लागतो. त्याला शिकता येईनासे झाले की शिक्षकाने पुन्हा त्याला आधार द्यावा आणि आणखी वरच्या पायरीसाठी मार्गदर्शन करावे.
रचनावादानुसार स्मृती सातत्याने रचली जात असते. आत येणाऱ्या माहितीशी व्यक्तीची जसजशी आंतरक्रिया विशिष्ट संदर्भात होत जाते तसतसे त्या व्यक्तीला आपल्या आधीच्या ज्ञानाचा धांडोळा घ्यावा लागतो. नवी माहिती जोडली जाते किंवा सामावली जाते आणि समज आणखी सखोल आणि सार्थ होत जाते. शिकलेल्या गोष्टी वेगळ्या आणि नवनवीन संदर्भाकडे स्थलांतरित करून वापरण्याचे कौशल्य व्यक्तीला साधू लागते. वास्तव जगातील समस्या सोडविण्याची संधी ही अशा स्थलांतरणासाठी उत्तम संधी असते.
रचनावादाचे सिद्धान्त शिकण्याचे वेगवेगळे प्रकार न मानता सर्व अध्ययन किंवा शिक्षण संदर्भसापेक्ष आहे असे मानतात. रचनावादी शिक्षण सिद्धान्ताची एक दुबळी बाजू अशी की शिकणारे सगळे जण शिकण्यासाठी येताना आधीचे ज्ञान घेऊन येतात असे मानले जाते. शिकण्याचे उद्दिष्ट हे आधीचे ज्ञान क्रियान्वित करण्याचे आहे असे मानले जाते. पण एखाद्या नव्या क्षेत्राचा अभ्यास करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांकडे आधीचे ज्ञान असेलच असे नाही. मग त्याच्या आधारावर संरचना कशी उभारणार? चुकीची रचना केली जाण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पूर्वज्ञान नाही त्यांच्यासाठी ज्ञानात्मकतावादावर आधारित धोरण राबवून संकल्पनांच्या पायऱ्या तयार करून घेणे आणि पूर्वज्ञानाची उणीव भरून काढणे आवश्यक ठरते.
रचनावादाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी केवळ निष्क्रियपणे ज्ञान मिळवीत नसून ते शिकण्याच्या आणि ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी असतात. शिकणे का महत्त्वाचे आहे हे शिकणाऱ्याला उमगावे असे काम शिक्षकाने त्याच्याकडून करवून घ्यावे. म्हणून रचनावादानुसार आपले अध्यापन करणारे शिक्षक केवळ लेक्चरबाजी करीत नाहीत तर विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तो ज्या पायरीवर आहे त्याच्या वरची पायरी गाठायला तो स्वतःला मदत कशी करू शकेल हे पाहतात. त्यांची भूमिका केवळ व्याख्यात्याची न राहता ती सुविधाकारकाची होते. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययन शैलींचे भान असणे आवश्यक आहे तरच विद्यार्थी शिकत असताना शिक्षक त्याला विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल.
पहा : ज्ञानात्मकतावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -19
आणि वर्तनवाद म्हणजे काय?- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18
तसेच अध्ययनसिद्धान्तांचा सारांश - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -21
No comments:
Post a Comment