Tuesday, May 26, 2015

दगडफोड्याची गोष्ट

लहानपणी “सोनसाखळी” नावाचं साने गुरुजींच्या गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं (स्मरणशक्ति दगा देत नसावी). त्या पुस्तकात एक दगडफोड्याची गोष्ट होती.

-----

एक दगडफोड्या होता. भर उन्हात घामानं निथळत दगड फोडत होता. वरून निर्दयपणे तळपणाऱ्या सूर्याकडे त्यानं पाहिलं. आणि सुस्कारा सोडून काम करीत राहिला. मनात म्हणू लागला, “हा सूर्य माझ्यापेक्षा किती मोठा आहे. मीही असा सूर्य असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला सूर्य व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” दगडफोड्यानं डोळे मिटून उघडले.

पाहतो तो काय, तो सूर्य झाला होता!

कौतुकानं तो खाली पाहू लागला. तळपता तळपता सर्वांना भाजून काढू लागला. झाडंझुडपं सुकू लागली, नद्या नाले आटू लागले. आपल्या प्रचंड सामर्थ्याचा धाक सूर्य सर्वांना दाखवू लागला.

आभाळात एक छोटा ढग आला. पाहता पाहता काळा झाला. मोठा झाला. त्यानं सूर्याला झाकून टाकलं. खाली काय चाललंय हेही सूर्याला दिसेना आणि कळेना. सूर्य मनात म्हणून लागला, “हा ढग माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा ढग असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला ढग व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” सूर्यानं डोळे मिटून उघडले.

पाहतो तो काय, तो एक काळा कुट्ट ढग झाला होता. सूर्याला झाकून टाकून लवकरच तो बरसू लागला. धो धो पावसामुळे खाली सर्व माणसांची आणि पशुपक्ष्यांची गाळण उडाली. नद्यांना पूर आला. ढग गर्वाने खाली पहात बरसतच राहिला. आपल्या सामर्थ्यावर खूष झाला. ढग सैरावरा पळणाऱ्या सृष्टीकडे पहात असताना एक दगड त्याला निर्विकारपणे बसलेला दिसला. त्याच्यावर ढग त्वेषाने बरसला. पण दगड तसाच ढिम्म होता. ढग निराश झाला. त्याच्या मनात आलं, “हा दगड माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगड असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला दगड व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” ढगानं डोळे मिटून उघडले. तो आता पावसात मजेत भिजणारा ढग झाला होता. निर्विकारपणे ढिम्म बसून होता.

काही दिवसांनी तेथे एक दगडफोड्या आला. ह्या दगडावर घणाचे घाव घालू लागला. दगडाचे तुकडे उडू लागले, त्याला भेगा पडू लागल्या. दगड कळवळला. मनात म्हणू लागला, “हा दगडफोड्या माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगडफोड्या असतो तर किती बरं झालं असतं”

त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “अरे दगड्या, तुला का दगडफोड्या व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” दगडाने डोळे मिटून उघडले. तो पुन्हा पहिल्यासारखा दगडफोड्या झाला होता.

----

ह्या गोष्टीची अनेक तात्पर्ये सांगता येतील. अनेकप्रकारे दृष्टांत म्हणून या गोष्टीचा वापरही करता येईल. काही गोष्टी मनात घर करून राहतात त्यातलीच ही गोष्ट आहे. भावनांना हात घालणारी नाही पण तरीही अंतर्मुख करणारी.

Popular Posts