Saturday, September 12, 2015

वर्गव्यवस्थापनाचे महत्त्व. शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 22

 

अध्ययनप्रक्रियेत वर्गव्यवस्थापनाचे वेगळे असे सैद्धान्तिक महत्त्व आहे का?

शिक्षकाकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, विशेषतः माध्यमिक शाळेमध्ये मर्यादित वेळ असतो. शिक्षक पाठनियोजन करून तासिकेच्या मर्यादित वेळेत पाठ शिकवण्याचे उद्दिष्ट ठेवून वर्गात येतो. पाठनियोजनात यशस्वी वर्गव्यवस्थापन आणि वर्गाचे सहकार्य गृहीत धरलेले असते. प्रत्यक्षात वर्गाचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर वेळ फुकट जातो आणि पाठनियोजन कोलमडते. म्हणून वर्गव्यवस्थापन महत्त्वाचे असते.

परंतु वर्गव्यवस्थापनाचा संबंध केवळ असा तांत्रिक आणि शिस्तीच्या अंगाने जाणाराच आहे असे नाही. वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांसमवेत शिकणे ही एक अध्ययन पद्धत आहे. सध्याच्या डी-स्कूलिंगच्या जमान्यात विद्यार्थी घरी एकट्याने /पालकांसमवेत शिकतात. एखाद्या शिक्षकाने चार-पाच विद्यार्थ्यांना झाडाखाली त्यांच्या आवडीचा विषय शिकवणे अशी शांतिनिकेतन शैलीची अध्ययन शैलीही असू शकते. सामाजिक संदर्भ आणि सामाजिक साहचर्य ह्या अध्ययनाला पोषक गोष्टी आहेत हा विचार वर्गांमध्ये अध्ययन/ अध्यापन होण्यामागे मूलतः गृहीत धरलेला आहे. सोयीचा विचार नंतरचा आहे.

शिकणारा विद्यार्थी सामाजिक संदर्भाशी जुळवून घेत असताना त्याचे आत्मकेंद्री भान विरते आणि शिकण्याची क्रिया घडते. आत्मकेंद्रित्व शिकण्याच्या आड येत असते. वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे सामाजिक संदर्भ आणि समन्वय अनिवार्य ठरून आत्मकेंद्रित्वाचा प्रभाव कमी होतो आणि अध्ययन अनायासे घडून येण्यास मदत होते असा हा विचार आहे. प्राचीन भारतीय परंपरेतही दोघांनी करायचा तो अभ्यास आणि एकट्याने करायचे ते तप असे म्हटले आहे. वर्गाची जोपासना एक सामाजिक आकृतिबंध म्हणून करणे शिक्षकासाठी हितावह असते.

“वर्गशिक्षक”, वर्गाची म्हणून असलेली एक अस्मिता (“आमचा वर्ग”,’ “आमच्या मॅडम” ) ह्या गोष्टी वर्ग हा एक अध्ययनगट म्हणून सिद्ध होण्यासाठी मदत करतात. अर्थातच “वर्ग” ह्या संकल्पनेकडे एक समूह म्हणून न पाहता एक अध्ययनशैली म्हणून पाहिले तर अध्ययनाला पोषक असे वर्गव्यवस्थापन सोपे होईल. शिस्तीच्या किंवा तांत्रिक अंगाने वर्गाचे व्यवस्थापन करतानाही वर्ग ही मूलतः एक अध्ययनप्रणाली आहे हे भान शिक्षकाला असणे इष्ट आहे.

शिक्षकाची जबाबदारी अशी आहे की “हा आपला वर्ग...” “आपण शिकतोय’’” असे वातावरण निर्माण करावे.

“माझा वर्ग...” आणि “तुम्ही शिकताय...” असे वातावरण नको.

“सहनाववतु..” हा मंत्र आहे.

Popular Posts