Saturday, December 17, 2016

deschooling कडे कल वाढण्यामागची मूळ कारणे कोणती? - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 25

 
डीस्कूलिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी इव्हान इलिच (
Deschooling Society), पॉल गुडमन (Compulsory Miseducation) आणि एवरेट रेमर (School Is Dead) ह्यांचे साहित्य वाचल्यास मदत होईल.

जर एखाद्या प्राण्याला भूक लागलेली नसतानाही चाबूक मारून सतत खायला लावलं तर त्याची जशी अवस्था होईल तशी अवस्था आजच्या शालेय विद्यार्थ्यांची होते आहे असं अल्बर्ट आइन्स्टाइन म्हणतो.

वाचायला कसं शिकवावं हा प्रश्नच नाही असं मज्जासंस्थेचे अभ्यासक म्हणतात. शहरातली मुले तर लिखित शब्दांच्या इतकी संपर्कात असतात की सामान्य मुलांना शब्द आणि त्यांचे लेखन ही सांकेतिक संकल्पना तात्काळ समजायला हवी. पण न समजण्याचं मुख्य कारण असं की ती शाळेत जातात! तिथे त्यांना बक्षिस आणि शिक्षा मिळते ती भलत्याच कारणांसाठी आणि एखाद्या गोष्टीत सहजी रस निर्माण होऊच नये अशी शालेय शिक्षणाची शैली असते. अनेक शाळा अशा असतात की त्या शाळांमध्ये विद्यार्थी जितका जास्त काळ जातील तितका त्यांचा बुद्ध्यांक घसरतो. मागे पडणारे अनेक विद्यार्थी जर रस्त्यावर भटकत राहिले असते तर त्यांचे शिक्षण जास्त चांगले झाले असते असेही संशोधनातून दिसून येते.
 
शाळांमध्ये पैसा ओतला की शाळा सुधारतात ही एक सार्वत्रिक अंधश्रद्धा आहे. पैशाने शिक्षण विकत घेऊ पाहणा-यांसाठी अनेक शाळांमधून अध्ययनाचा स्टंट किंवा तमाशा केला जातो आणि विद्यार्थ्यांचा नैसर्गिक बौद्धिक विकास तेथे खुंटतो. काही शिकणे ही कल्पनाच अशा विद्यार्थ्यांना भयंकर जाचक वाटू लागते. अखेरीस अशा विद्यार्थ्यांना रेमटावून त्यांच्यामधून एकमेकांशी स्पर्धा करणे हा एकमेव कार्यक्रम असलेले शिपुर्डे तयार केले जातात आणि अनेक सामाजिक समस्यांना हे शिपुर्डे नंतर कारणीभूत ठरतात.
 
लोकानुयायी धोरणे, श्रम आणि पैसा ह्यांचा अतोनात अपव्यय, आणि लहान मुलांच्या वैचारिक व भावविश्वाचा निर्दय खेळखंडोबा हे आजच्या औपचारिक शिक्षणाचे अनिवार्य घटक ठरत आहेत. शासकीय स्तरावरील सदोष कायद्यांमुळे आणि भ्रष्ट व्यवस्थेत यशस्वी होणा-या ठरावीक परवानाधारक व्यक्तींना शिक्षकाच्या व्यवसायाचा ठेका मिळालेला असून हे ठेकेदार देतील ते शिक्षण अशी शिक्षणाची सरकारी व्याख्या झालेली आहे. हे कमी म्हणून की काय लोक मेंढरासारखे धंदेवाईक कोचिंग क्लासेसच्या मागे धावत आहेत आणि आपल्या मुलांना क्लासेसमध्ये कोंबून मुलांचे बारीक पीठ पाडण्यात धन्यता मानत आहेत. खरेतर शाळा आणि क्लासेसची उपयुक्तता नोकरी करणा-या आईबापांच्या वाढत्या मुलांसाठी पाळणाघरे (= कोंडवाडे) इतकीच उरलेली आहे.

शालाबाह्य जीवनात विविध प्रकारच्या स्क्रीन्सकडे निर्बुद्धपणे पहात बसणारी मुले आता शाळांमधूनही कल्पनाशून्य स्मार्टबोर्ड लेसन्सचे रतीब जिरवताना दिसतात. रडक्या मुलांच्या तोंडात बोंडले खुपसावे तसे हे `स्मार्ट'बोर्डचे बोंडले मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आजच्या शिक्षकांचे आवडते आणि सोयीस्कर साधन झाले आहे.
 
अंतिमतः ह्या व्यवस्थेतून तयार होणारे अनेक 'उच्चशिक्षित' वैफल्यग्रस्त होत आहेत कारण आपल्याला काहीही येत नाही, आपण खरे काही शिकलेलो नाही हे त्यांना अंतर्यामी माहीत असते आणि ते सत्य त्यांना छळत राहते. घोकण्याची क्षमता असली तरी मेंदूला लागलेल्या चुकीच्या सवयींमुळे त्यांची शिकण्याची क्षमता ते हरवून बसलेले असतात.
 
शालेय शिक्षणाबाबत निराश झालेले विचारी पालक नाईलाजाने डीस्कूलिंग कडे वळत आहेत. पण ती वाट योग्य ध्येयाकडे जाणारी असली तरी चांगल्या शालेय शिक्षणाच्या तुलनेने अतिशय खडतर आहे. शाळेत न जाता विद्यार्थ्याने समाजाभिमुखता जोपासणे अतिशय अवघड आहे. आणि शिक्षण ही तर एक
सामाजिक प्रक्रिया आहे असे मानसशास्त्रीय प्रतिपादन आहे!

आदर्श शालेय समाजाची निर्मिती हे आजच्या काळाचे मोठे आव्हान आहे.

Sunday, December 11, 2016

वर्गाचे पारिस्थितिकीय विश्‍लेषण म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 24

 
वर्गात कार्यरत असलेल्या प्रेरणा, ताणेबाणे कसे असतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
  • तुमचे विद्यार्थी आणि तुम्ही एकमेकांसोबत बराच वेळ घालवता.
  • ह्या काळात शिकण्यासाठी पोषक असं वातावरण निर्माण कसं करावं ह्याची तुम्हाला काळजी असते.
  • विद्यार्थी अनेक आहेत, प्रत्येकाची शिकण्याची गरज वेगवेगळी आहे शिकण्याची शैली भिन्न आहे ह्याची तुम्हाला जाणीव असते.
  • शक्य तितके व्यक्तिगत लक्ष देता यावे असा तुमचा प्रयत्न असतो.
  • शिकण्याची प्रक्रिया सहजशक्य व्हावी आणि त्यायोगे विद्यार्थ्यांनी चांगलं शिक्षण पदरात पाडून घ्यावं ह्यासाठी वर्गावर प्रभाव पाडणे ही तुमची व्यावसायिक भूमिका असते.
पण नेहमी हे शक्य होतं असं नाही. विद्यार्थीच जास्त प्रभाव पाडतात. तुम्हाला जोखण्यासाठी तुमच्या सहनशीलतेच्या सीमा पडताळून पाहतात. तुमचा "अंत" पाहतात. अखेरीस तडजोड करून, भाजीवाल्याशी घासाघीस करून भाजी खरेदी होते तसं शिकण्याचं माप विद्यार्थ्याच्या झोळीत टाकावं लागतं. ह्याची कारणं अनेक आहेत.

  • शिकण्याची ऊर्मी प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये सारखी नसते.
  • शाळेत येण्यामागे विद्यार्थ्यांचा उद्देश वेगळाच असतो. त्यांना आपापसात मिसळायचे असते आणि आपले "सोशल लाईफ" जगायचे असते.
  • शाळेत येण्यामागच्या त्यांच्या प्रेरणा आणि त्यांनी धड्यातलं काही शिकावं अशी तुमची धडपड ह्या दोन गोष्टींची स्पर्धा सुरू असते.

वॉल्टर डॉयल ह्यांनी वर्ग ही एक पारिस्थितिकी (इकॉलॉजी) असल्याची संकल्पना गृहीत धरून तिचा अभ्यास केला आहे. निसर्गात सजीवांच्या परस्पर व्यवहारांचा असा अभ्यास पारिस्थितिकी विज्ञान म्हणून शास्त्रज्ञ करीत असतात. जीवनांच्या प्रेरणांचा शोध घेऊन त्या प्रेरणांचा तोल निसर्गात कसा साधला जातो ह्याचा हा अभ्यास असतो. विद्यार्थी आणि शिक्षक हे घटक असलेली वर्गातील परिस्थिती असाच आपला तोल सांभाळत असते. हे संतुलन साधण्यासाठी अनेक औपचारिक आणि अनौपचारिक उपाययोजना केल्या जातात. विद्यार्थ्यांच्या विविध प्रकारच्या ऊर्मींचा खुबीने वापर करून शिकण्याला चालना देण्याकडे त्या वळविल्या जातात.

  • विद्यार्थ्यांचे गट पाडणे
  • काही सक्षम विद्यार्थ्यांना नेतृत्व देणे व शिक्षकाने आपले काही अधिकार त्यांना देणे
  • विद्यार्थ्यांना पायरी पायरीने यशाचा अनुभव देणे
  • शिक्षकाने आपल्या वर्तनाच्या मर्यादा आधीच आखून घेणे
  • शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या वर्तनाच्या मर्यादा आधीच आखून देणे म्हणजे वर्गासाठी नियम काय आहेत हे सर्व विद्यार्थ्यांना नीट सांगणे. (विद्यार्थ्याच्या व्यत्ययकारक वर्तनाला तोंड देताना ह्या आणि ह्या अगोदरच्या मुद्याचे विशेष महत्त्व आहे.)
  • वर्गाला व्यक्तिमत्त्व देणे.
  • निसर्गाशी सांगड घालण्यास सुलभ अशा शिक्षणप्रणालींचा स्वीकार करणे (शांतिनिकेतन)
  • वर्गामध्ये शिक्षकांनी काय करावे आणि विद्यार्थ्यांनी काय करावे ह्याच्या तपासणी याद्या (चेक लिस्ट्स) तयार करणे व त्यावर अंमल करणे.

हे सारे कसे करावे ह्यासाठी बरेच साहित्य उपलब्ध आहे. पण मुळात हे करायचे आहे अशी इच्छा असणे आणि हे करणे शक्य आहे ह्याचे भान असणे महत्त्वाचे आहे.
वर्गाच्या पारिस्थितिकीय निर्धारणासाठी काही शाळा पुढील तीन पायर्‍यांचा वापर करतात 


1. शिक्षकासाठी प्रश्‍नावली - शिक्षकाने स्वतःशी नीट संवाद साधावा, वर्गव्यवस्थापनाची आपली शैली नेमकी काय आहे ह्याचे भान यावे, आपला अनुभव नेमका कसा आहे आणि तो हाती घेतलेल्या कामासाठी कितपत उपयोगी आहे ह्याची उत्तरे मिळून नेमक्या कोणत्या कृतीची गरज आहे हे स्वतःलाच स्पष्ट व्हावे असा ह्या मागचा उद्देश आहे. तुम्ही शिक्षक का झालात? शिक्षक व्हावेसे तुम्हाला कशामुळे वाटले? शिक्षक असण्यामधील सर्वात चांगली गोष्ट कोणती? शिकवताना तुम्हाला आनंद कशामुळे मिळतो? शिक्षक असण्यातील सर्वात कठीण किंवा नकोशी गोष्ट कोणती? अशा प्रश्‍नांचा समावेशही त्यात असतो.

2. वर्ग पारिस्थितिकीय तपासणी यादी - वर्गातील सध्याच्या प्रथांचे मूल्यमापन करण्यासाठी आणि आवश्यक गोष्टी केल्या जात आहेत का हे जाणून घेण्यासाठी यादी. वर्गाची संरचना, वर्तनाबाबत अपेक्षा, अध्यापन व्यवस्थापन, वर्गातील सकारात्मक व्यवहार, योग्य वर्तनाला प्रतिसाद, अयोग्य वर्तनाला प्रतिसाद. तपासणी यादीची ही मुख्य अंगे आहेत. ह्यात अनेक उपघटक संभवतात.

3. वर्ग निरीक्षण पत्रिका - प्रतिसाद देण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते का? विद्यार्थी योग्य शैक्षणिक प्रतिसाद देतात का? वर्गात फार व्यत्यय आणतात का? तुम्ही विद्यार्थ्यांची स्तुती कितीदा करता? तुम्ही विद्यार्थ्यांची निंदा कितीदा करता?


तपासणी याद्यांचे नमुने/ याद्यांची प्रारूपे प्रत्येक शाळेने स्थानिक परिस्थितीनुसार तयार करणे आवश्यक आहे.









Popular Posts