पद्मगंधा प्रकाशनातर्फे सुमारे 25 वर्षांपूर्वी प्रकाशित करण्यात आलेले 'इतिशोध' हे इतिहास संशोधक सुरेश जोशी ह्यांचे 172 पानांचे पुस्तक नुकतेच वाचनात आले. लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखांचे हे संकलन आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत श्री. निनाद बेडेकर म्हणतात, '' इतिशोध हे आत्मचरित्र नव्हे. ऐतिहासिक साधने गोळा करण्यासाठी केलेल्या कष्टमेहनतीची ती एक गाथा आहे, किंवा व्यथा आहे.'' शिलालेख, ताम्रपट, मूर्ती, चित्रे, नाणी, खापरे, कागदपत्रे अशीच इतिहास संशोधनाची साधने असतात. ऐतिहासिक साधने संगृहीत करून ठेवण्यास मिळालेली दृष्टी हे खरे तर ह्या मेहनतीमागचे भांडवल आहे.
श्री. सुरेश जोशी 40 वर्षे अहमदनगर ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयाचे कार्यकारी विश्वस्त होते. पुण्यातील राजा केळकर वस्तुसंग्रहालयाचे क्युरेटर म्हणूनही काही काळ त्यांनी काम पाहिले आहे.
नगरच्या ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयातील दुर्मीळ, साधनांचा प्रचंड संग्रह त्यांच्या परिश्रमाची, चिकाटीची आणि जिद्दीची साक्ष आहे. हा बहुमोल संग्रह गोळा करताना अनेक व्यक्ती, समाज आणि प्रसंग ह्यांचा श्री. जोशी ह्यांच्या संवेदनशील मनाने घेतलेला शोध असे ह्या 'इतिशोधाचे' स्वरूप आहे.
महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार ह्यांचा सहवास आणि मार्गदर्शन आणि त्यांच्याशी असलेला घरोबा ह्याविषयी जोशी ह्यांनी समरसून लिहिले आहे. सेतुमाधवराव पगडी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. सांकलिया, डॉ. पु. म. जोशी, प्रा. राम शेवाळकर, न. र. फाटक, बाबासाहेब पुरंदरे, अशा अनेक दिग्गजांशी आलेला संबंध आणि किस्से जोशींनी वर्णिलेले आहेत.
संशोधन कार्यात स्वत:ला पूर्णपणे झोकून देणार्या व्यक्ती दुर्मीळ होत चाललेल्या ह्या काळात श्री. जोशी ह्यांच्यासारख्या माणसांची आगळीवेगळी मुलुखगिरी वेगळी उठून दिसते.
No comments:
Post a Comment