Sunday, September 13, 2009

वर्गातील शिस्त : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 10

शैक्षणिक गुणवत्तेसाठी वर्गात शिस्त राखणे अनिवार्य नाही का? बदलत्या सामाजिक परिस्थितीत अशी शिस्त राखणे शिक्षकांना किती शक्य होते?

हा प्रश्न सध्याच्या काळात जास्त तीव्र झालेला आहे असे वाटत असले तरी तो सार्वकालिक आहे. काळानुरूप प्रश्नवेगवेगळ्या भाषेत व्यक्त होत आलेला आहे. शिक्षकाने समंजस असण्यावर भर वाढत गेला तसतशी ही भाषा बदलतगेली आहे.

आधी वर्गातील "शिस्त' त्यानंतर वर्गावर "नियंत्रण' आणि आता वर्गाचे "व्यवस्थापन' अशा स्वरूपात हे विचार व्यक्त होत आहेत. पण ह्या प्रकटीकरणाच्या शैलीमध्ये फरक असला तरी त्यातील मूलभूत प्रश्न एकच आहे : मुलांना स्वतंत्र विचार जोपासण्याची अनुमती आहे की त्यांनी झापडबंद सैनिकी शिस्तीत राहणे श्रेयस्कर आहे ? एका टोकाला मोकाट सुटलेल्या मुलांचा वर्ग आणि दुसरीकडे शिक्षकाच्या धाकात शिकण्याचा अभिनय करणाऱ्या मुलांचा वर्ग अशी या स्थितीची दोन टोके आहेत.

1907 साली प्रकाशित झालेल्या A Theory of Motives, Ideals, and Values in Education ह्या विल्यम चान्सलर ह्यांच्या प्रसिद्ध ग्रंथापासून ह्या विषयावरील चर्चेला जास्त चालना मिळाली आणि त्यावर अजूनही विचारविनिमय सुरू आहे. हा प्रश्न अध्यापनकलेशी किंबहुना अध्यापन वृत्तीशी निगडित मूलभूत प्रश्न असल्याने त्यावर नेहमीच नवे विचार व्यक्त होत राहतील.

विषयाचे उत्तम ज्ञान आणि ते व्यक्त करण्याची हातोटी असलेल्या शिक्षकाला वर्गाच्या नियंत्रणासाठी वेगळे काही करावे लागत नाही असा एक सरधोपट विचार आहे. तर 1981 मध्ये प्रसिद्ध झालेल्या स्टीव्हन रॉस ह्यांच्या Learning and discovery या पुस्तकात वर्गातील झापडबंद शिक्षणाचा संबंध वर्गातील वाढत्या विद्यार्थीसंख्येशी जोडलेला आहे.
वर्गनियंत्रणाचे एक तांत्रिक अंग अवश्य आहे. ""मुलांनो गप्प बसा पाहू!'' असे ओरडत राहण्यापेक्षा अनुभवी शिक्षक एखाद्या विद्यार्थ्याचे नाव घेतो.

"संदीऽप!'

असे केल्याने संदीप चमकून गप्प होतो आणि शिक्षकाकडे पाहू लागतो. संदीपनं काय केलं बरं अशा कुतुहलाने इतर विद्यार्थीही आपापले उद्योग थांबवून संदीपकडे आणि मग शिक्षकाकडे पाहू लागतात. दोन क्षण शांतता निर्माण होते आणि अनुभवी शिक्षक याचा उपयोग वर्गाचे नियंत्रण हातात घेण्यासाठी करू शकतो. ही तंत्रे शिक्षक अनुभवातून शिकू शकतात. काही शिक्षक कधीच ही तंत्रे शिकू शकत नाहीत कारण त्यांना आपण ती शिकावी असे तीव्रतेने वाटत नसते किंवा ती कशी शिकावीत याचे मार्गदर्शन त्यांना मुख्य अध्यापकांकडून मिळत नसते.

अशा तंत्रांचा उपयोग होण्याला अर्थातच खूप मर्यादा आहेत कारण या मूलभूत प्रश्नाचे खरे / सैद्धान्तिक स्वरूप वेगळे आहे. त्याबाबत वेगवेगळे विचार जाणून घेणे आणि आपल्याला जे पटतील त्यांचा अंगिकार करणे हाच (खडतर) मार्ग अवलंबिण्याची मनसिक तयारी शिक्षकांनी ठेवायला हवी (कारण अध्यापन वृत्तीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे).

No comments:

Post a Comment

Popular Posts