माझ्या पिढीचं (माझ्या आधीच्या आणि नंतरच्या पिढ्यांचंही) बालपण समृद्ध करण्यात फार मोठा वाटा "चांदोबा' चा आहे. दक्षिणेकडील आणि बहुभाषिक प्रकाशन असूनही "चांदोबा'चा तोंडवळा अस्सल मराठमोळा आहे. वेताळाच्या गोष्टी असोत, परोपकारी गोपाळाच्या असोत की "भयानक दरी'सारख्या चांदोबा-स्पेशल गोष्टी असोत चित्रा आणि शंकर ह्यांच्या चित्रांनी नटलेल्या ह्या सर्व साहित्याने माझ्या भावविश्वात घर केलेलं आहे. व्हिडिओ गेम्सच्या आणि मल्टिचॅनेल करमणुकीच्या आजच्या जगातही चांदोबा मुलांना श्रेष्ठ बालसाहित्य देऊ शकेल यात मला यत्किंचितही शंका नाही. मात्र आपण पालकच त्याला विसरतो आहोत का याची शंका येते.
माझ्या अनेक मित्रांकडे चांदोबाचे जुने अंक बाईंड केलेले आहेत. इतरांकडून हेळसांड होऊ नये म्हणून हा खजिना हे मित्र कंजूषपणे जपत असतात. सहज म्हणून चांदोबाचा नेटवर सर्च घेतला आणि मराठी चांदोबाच्या 14 वर्षांच्या अंकांचा खजिना येथे सापडला. हे अंक ऑनलाइन विनामूल्य वाचता येतात. तुम्हीही जर चांदोबाचे माझ्यासाखेच फॅन असाल तर चंदामामा प्रकाशनाला प्रतिसाद पाठवा आणि मराठीचे आणखी अंक उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करा.
आणि हो. वर्षाला 240 रुपये ही चांदोबाची वर्गणीही फार वाटू नये.
No comments:
Post a Comment