Sunday, July 4, 2010

अमूर्त कल्पना आणि प्रश्न समजून घेण्याची क्षमता - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 15

शालेय वय होण्याआधी लहान मुलांना प्रश्न विचारणे योग्य आहे का?   

अध्ययनप्रक्रियेत आत्मकेंद्री स्वभावावर मात करून सामाजिक सुसंवाद साधणे का आवश्यक आहे हे आपण पाहिले आहे. लहान मुलांच्या आत्मकेंद्री स्वभावामुळे ज्ञानग्रहणात अडथळे येतात हे पिआजे ह्यांचे म्हणणेही आपण ह्या अगोदर पाहिले आहे. ह्या म्हणण्यास वायगोत्स्की ह्यांनी आक्षेप घेतला. त्यांच्या मते अमूर्त संकल्पना तयार करण्याची अगर जाणून घेण्याची क्षमता लहान मुलांमध्ये असते. मोठी माणसे परकीय भाषा शिकताना होणाऱ्या प्रक्रियेशी ही प्रक्रिया मिळतीजुळती आहे. यामुळे प्रथमतः निरर्थक आणि पोकळ वाटणाऱ्या गोष्टी मुलांकडून करवून घेतल्या तरी शालेय जीवनाच्या संदर्भात त्यांना अर्थ प्राप्त होतो.

वाचन आणि अध्यापन यातून अशा प्रथमतः निरर्थक वाटणाऱ्या संकल्पनांना अर्थ प्राप्त होतो. यातूनच बालोद्यानाच्या शाळेची कल्पना अस्तित्वात आली व विकसित झाली. सारांश; लहान मुलांना संकल्पनातील अमूर्तता अडचणीची वाटत नाही. पुढे पिआजे यांनी ह्या म्हणण्याला मान्यता दिली. वायगोत्स्की यांच्या मतानुसार, शालेय वयाआधी शास्त्रीय ज्ञानाशी संबंधित अमूर्त कल्पना मुलांना समजत नसल्या तरी व्यावहारिक जीवनातील तात्कालिक समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रातिभ संकल्पनांचे मुलांना वैचारिक पातळीवर आकलन होते. (किंबहुना अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी मोठ्या वयातही त्याचे संभाव्य व्यावहारिक उपयोजन हा हेतू प्रभावी असल्याखेरीज त्या समजणे कठीण होते व त्यासाठी तयार केलेली मूर्त प्रारूपेही निरुपयोगी ठरतात. डोनाल्डसन यांनीही लहान मुलांच्या बाबतीत ह्या मुद्याचे आग्रही प्रतिपादन केलेले आहे.)

लहान मुलांना प्रश्न विचारताना कोणत्या गोष्टींचे भान ठेवायला हवे?

मार्गारेट डोनाल्डसन ह्यांनी मानव हा प्राणी असल्याचे विचारात घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. व ह्या प्राण्याच्या दृष्टीने निरर्थक असलेले प्रश्न मुलांना विचारू नयेत असे मत मांडले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुलांना आपण जे उपक्रम करण्यास देतो त्यांची निवड करताना ह्याचे भान असायला हवे. कृती करण्यापूर्वी मुलाच्या मनात असलेले विचार आणि कृती करताना असलेले विचार ह्यामध्ये नैसर्गिक एकसंधपणा असायला हवा. प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीच्या, प्रश्नाशी संबंध नसलेल्या कृतीवरही मूल लक्ष केंद्रित करते. (उदाहरणार्थ, बाईंनी हात हलवल्यास, डोके खाजवल्यास ह्या कृतींचा संबंध मूल प्रश्नाशी जोडण्याचा प्रयत्न करते). शिक्षकाच्या बोलण्यातील हेतू, भाष्य, सूर, पसंती/नापसंती इत्यादी भाव जाणून घेण्यासाठी मूल भाषाबाह्य संदर्भांचा आधार घेण्याची धडपड करते. म्हणूनच मुलांना विचारण्याचे प्रश्न काळजीपूर्वक तयार करावे लागतात आणि विचारतानाही काळजी घ्यावी लागते.

पिआजे यांनीही ह्या मुद्यावर विचार केलेला आहे. "कुतूहल हा (बाल) मनाच्या गरजांचा दृश्य परिणाम आहे' असे त्यांनी म्हटले आहे. "कोठे' हा प्रश्न मुलांना सर्वात सोपा वाटतो. "काय' हा नंतर समजतो. "का' हा प्रश्न समजण्यास कठीण जातो. "कसे' हा प्रश्न तर फारच कठीण आहे असे त्यांचे निरीक्षण आहे. ज्या प्रश्नात एखाद्या साध्याच्या दिशेने काही हालचाल अभिप्रेत आहे असे प्रश्न निवडावेत असे ते म्हणतात. प्रश्न, "प्रेरणा आणि उद्देश' ह्यांनी परिपूर्ण हवा.

सर्व वस्तूंना जीव असून त्यांना हेतू, भावना वगैरे असतात अशी मुलांची धारणा असते. त्यामुळे जैविक दृष्टीने प्रश्नातील घटनेची सत्यता पडताळण्याचा मूल प्रयत्न करते. "योगायोग' ही संकल्पना लहान मुलांना समजू शकत नाही. (खरंतर मोठ्या माणसांपैकीसुद्धा फारच थोड्या लोकांना योगायोग म्हणजे काय हे समजते.)

वस्तूच्या नित्यत्वासारख्या सोप्या वाटणार्या कल्पना आणि युद्धासारख्या सामाजिक संदर्भ असलेल्या अमूर्त कल्पना समजून घेण्यासाठी योग्य वय होणे आवश्यक असते असे पिआजे ह्यांनी आपल्या बोधन विकासाच्या टप्प्यांचा सिद्धान्त मांडताना म्हटले आहे.

Thursday, July 1, 2010

बालमानसशास्त्र आणि अध्ययनप्रक्रिया - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 14

लहान मुले शिकतात म्हणजे काय होते? बालमानसशास्त्रातील आधारभूत संकल्पना आणि लहान मुलांच्या शिकण्याचा काय संबंध आहे?
शिकणे म्हणजे तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता येणे. विचारांची किंवा क्रियांची मालिका कशी असावी हे एखादे मूल (किंवा व्यक्ती) तर्कशुद्ध विचारातून ठरवू शकते. असा विचार करण्याची क्षमता सामाजिक सुसंवादातून साध्य होते. मुले एकमेकांशी किती बोलतात, एकमेकांमध्ये किती मिसळतात किंवा बाई त्यांच्याशी किती बोलतात ह्यावर पूर्वप्राथमिक वर्गात हा सुसंवाद अवलंबून असतो. ज्या मुलांना इतर मुलांशी (किंवा माणसांशी) बोलण्याची, त्यांच्यात मिसळण्याची संधी मिळत नाही त्या मुलांमध्ये तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता लवकर विकसित होत नाही.

असे का घडते?
अनुभवातील वास्तवाची सापेक्षता आणि वैयक्तिक दृष्टिकोन ह्यांची तुलना करून त्यातील अन्योन्य संबंध मूल सामाजिक सुसंवादातून ताडून पहात असते व तेच त्याचे शिक्षण असते. सापेक्षतेसाठी त्याला अन्य व्यक्तीच्या त्याच अनुभवावरील प्रतिक्रियेची गरज भासते. स्वतःची प्रतिक्रिया दुसऱ्याच्या प्रतिक्रियेशी ताडून पहाण्यासाठी हा “दुसरा कोणीतरी” हजर असावा लागतो.

शिकण्यासाठी सामाजिक सुसंवाद अनिवार्य आहे का?
कोणत्याही क्षेत्रात जाणून घेण्याची (ज्ञानग्रहणाची) प्रक्रिया ही सुसंवादाची प्रक्रिया असते. ह्या सुसंवादात, शिकणाऱ्याच्या अहंभावाचा लोप होतो. किंबहुना आपल्या अहंभावाचा लोप होऊन त्याला एखाद्या वस्तुनिष्ठ संदर्भाचे तादात्म्य लाभते तेव्हाच आपण काही शिकू शकतो. (एखादे कठीण गणित/उदाहरण आपल्याला समजल्यावर देहभान हारपण्याचा क्षण कसा येत असेे ते आठवून पहा. आपण जेव्हा काही समजून घेत असतो तेव्हा हीच प्रक्रिया कमी-अधिक उत्कटतेने घडत असते. ती अनायासे घडत असल्याने प्रत्येकवेळी ती आपणास जाणवत नाही इतकेच.)  

पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचा ह्या संकल्पनेशी कसा संबंध आहे?

आपल्या (किंवा मुलाच्या) मनाने तर्काच्या आधारे विविध संबंधांचे (उदाहरणार्थ, दृश्य-द्रष्टा संबंध) केलेले अनुमान हे ह्या सुसंवादाचे (साध्याचे) एक साधन असते आणि तो त्याचा परिणामही असतो. जन्मल्यापासून ह्या साधनेला सुरुवात होते. बाई वर्गात मुलांशी गप्पा मारत असतात त्यावेळी त्यांना ह्या साधकाच्या (मुलाच्या) सिद्धतेचा अंदाज आणि पडताळा घेता येतो.

वरीलप्रमाणे सुसंवादाची अधिकाधिक संधी देणाऱ्या पूर्वप्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता अर्थातच जास्त असते. ह्या सुसंवादाला पोषक असे पर्यावरण निसर्ग, व्यक्ती आणि वस्तू ह्यांच्या साहाय्याने उपलब्ध करून देण्यावर पूर्वप्राथमिक शिक्षणाचा भर असायला हवा. 

वैयक्तिक बाबी आणि सामाजिक बाबी ह्यांच्यामधील फरक न कळल्याने सुसंवाद साधण्यात अडथळे येतात (मोठ्या माणसांच्या बाबतीतही हे खरे आहे). हे अडथळे फार वाढले की सामाजिक स्तरावरील ह्याचे प्रकटीकरण भांडणांमधून दिसते तर वैयक्तिक स्तरावर अडथळ्यांचे अस्तित्व उघड जाणवले नाही तरी ज्ञानग्रहणातील असमर्थतेतून ते व्यक्त होतात.

Popular Posts