प्रश्नपत्रिका संगणकावर तयार करणाऱ्या शिक्षकांना किंवा मुद्रकांना सगळ्यात नकोसे वाटते ते बीजगणितातील राशी आणि समीकरणे टाईप करणे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस आणि ओपन ऑफिस अशा दोन्ही प्रोग्राम्समध्ये हे करणे शक्य असते. एमएस वर्डमध्ये इन्सर्ट - ऑब्जेक्ट - क्रिएट न्यू - ऑब्जेक्ट टाईप - मायक्रोसॉफ्ट इक्वेशन असा प्रवास केल्यावर इक्वेशन एडिटर उघडतो. त्यातील चिह्ने समजून घेऊन वापरणे अवघड नसले तरी वेळखाऊ आणि जिकिरीचे आहे. ओपन ऑफिसमध्ये फॉर्म्युला विभागात जास्त चांगला इक्वेशन एडिटर आहे पण तो वापरण्यासाठी बीजगणिताचे ज्ञान आवश्यक आहे. शिक्षक हाताने प्रश्नपत्रिका लिहिताना, ती वाचणाऱ्याला गणिताचे ज्ञान असल्याचे साहजिकच गृहीत धरतात त्यामुळे त्यांचे लिखाण मुद्रणशास्त्राप्रमाणे काटेकोर असत नाही. ही प्रश्नपत्रिका संगणकावर उतरवणाऱ्याला गणिताचे ज्ञान असतेच असे नाही. मग आनंदी आनंद. गणिताच्या पेपरमध्ये मुद्रणाच्या चुका नित्याच्याच आहेत.
गणिताची किंवा तांत्रिक पुस्तके छापताना ल टेक्स नावाची प्रणाली वापरतात. माध्यमिक शिक्षणापुरते बोलायचे तर इंटरनेटवर टेक्सएड, लिटरल मॅथ, मॅथकास्ट, फॉर्म्युलेटर टार्शिया, मॅथ मॅजिक असे अनेक इक्वेशन एडिटर्स विनामूल्य उपलब्ध आहेत.
त्यातील मॅथकास्ट हा एडिटर मला एखादा कॅल्क्युलेटर वापरण्याइतका सोपा वाटतो. त्यात चुका होण्याचा संभवही खूप कमी आहे. क्रमवर्तन (क्रमनिरपेक्षता) आणि सहयोग वगैरे नियमांचे तर्कशास्त्र त्यात आपोआप विचारात घेतले जाते. ह्या एडिटरसाठी लागणारे फॉण्ट्ससुद्धा विनामूल्य उपलब्ध आहेत. बैजिक राशी ह्या एडिटरमध्ये तयार करून वर्डमध्ये किंवा पेजमेकरमध्ये सहज चिकटवता येतात. गणिताच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांना हे एक वरदानच आहे.