निमित्त आहे New York Review of Books चे संपादक रॉबर्ट सिल्व्हर्स ह्यांच्या मुलाखतीचं. एलिझाबेथ हार्डविक ह्यांनी Harper's Magazine मध्ये "The Decline of Book Reviewing" असा निबंध लिहिला आणि त्यातून व्यक्त झालेली चांगल्या परीक्षणांची उणीव पूर्ण करण्यासाठी New York Review of Books ची सुरुवात कशी झाली वगैरे गोष्टी मुलाखतीत वाचल्या. (हार्पर्स मॅगेझिन पूर्वी नेटवर फुकट वाचायला मिळत असे नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या जगातील - तसेच पहिल्या जगातील सुद्धा - फुकट्या वाचकांची चैन त्यांनी बंद करायचं ठरवलेलं दिसतंय. ऍटलांटिक मंथली सुद्धा पूर्वी फुकट वाचता यायचं. नंतर तेही हार्पर्सप्रमाणे बंदिस्त झालं. आता पुन्हा फुकट झालंय! असा बदल का करावा लागला ह्यावर James Fallows नं चांगलं लिहिलंय आणि केविन केलीच्या निबंधाचा संदर्भही दिलाय. पण "फुकट असलं तरी इतक्या मोठ्या संख्येनं "ह्यांच्या"सारख्यांशिवाय वाचतो कोण!" हा साक्षात्कार त्यांना झाला असणार हे आपलं माझं मत. हार्पर्सही हळूहळू येईलच वळणावर.)
मला (माझ्या अल्प कुवतीनुसार) कशा तऱ्हेची परीक्षणं आवडतात यावर एकदा विस्तारानं लिहायचंच आहे. पण परीक्षणवजा काहीतरी पूर्वी लिहिल्याचं आठवलं. मग शोधाशोध केल्यावर मे 1995 ते मे 2003 ह्या काळात उणीपुरी (म्हणजे उणीच) 46 टिपणं (म्हणजे परिच्छेदच ते ) लिहिल्याचा शोध लागला. त्यांना परीक्षणं म्हणायचं धाडस करणं शक्यच नाही. काय वाचलं त्याची त्रोटक यादी आहे ती. मध्येच एखाद्या वाक्यात शेरेबाजी आहे इतकंच. एक उदाहरण खाली देतोय :
20.01.97
श्री. पु. भागवत गौरव ग्रंथ श्रोत्रीनं वाचायला दिला. त्यानंच दिलेलं दुर्गा भागवतांचं कदंब अजून पडलेलं आहे. श्रोत्रीची taste चांगली दिसते. त्यानं दिलेलं अहिताग्नि राजवाडे ह्यांचं आत्मचरित्र बरेच दिवस ठेवून मग वाचलं. पुस्तक ताड-फाड, सडेतोड वगैरे आहे. सावरकर, रॅंग्लर परांजपे वगैरे भल्याभल्यांची चंपी त्यात केलेली आहे. स्वतःच्या व्यासंगाची साधना कशी केली हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचं पुस्तकात लेखकानं वारंवार लिहिलेलं असलं तरी प्रत्यक्षात ही साधना कशी केली ह्याचा बोध पुस्तकातून मला झाला नाही.
सावरकरांचा प्रतिवाद, महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा समाचार वगैरे गोष्टी वाचायला आवडल्या. (सावरकरांनी त्यांचं उसनं नेलेलं पुस्तक परत केलं नाही हा त्यांच्यावरचा रागही व्यक्त केलेला आहे). मतप्रदर्शन प्रामाणिक असल्यामुळे आणि त्यामागे conviction असल्यामुळे असाही एक दृष्टिकोन म्हणून वाचनीय आहे.
श्री. पु. भागवत गौरव ग्रंथातला ग. रा. कामत ह्यांचा लेख सुंदर आहे. सुनीताबाई देशपांडे ह्यांना श्रीपुंनी लिहिलेली पत्रे हा या ग्रंथातला सर्वात चांगला भाग आहे व त्यामुळे ग्रंथ संग्राह्य झालेला आहे. ग्रंथात राम पटवर्धनांचा लेख हवा होता. डॉ. वसंत पाटणकर आणि प्रा. यास्मिन शेख यांच्या लेखांमध्ये (अपरिहार्यपणे?) पुनरावृत्ती आढळते. डॉ. पाटणकरांचं त्यांनी भेट दिलेलं त्यांचं स्वतःचं पुस्तकही सवडीनं वाचायचंच आहे. तो योग कधी येतो ते पाहू.
बऱ्याच दिवसांनी वाचलं तेव्हा हे फार वाईट आहे असं वाटलं नाही. पुन्हा असा प्रयत्न करण्याचाही मोह झाला. त्या काळात आपण एक offline ब्लॉग लिहीत होतो हे जाणवलं.