भारतातील विद्यार्थ्यांना बिनभिंतींची शाळा नवीन नाही. वीटभट्ट्यांवरील कामगारांच्या किंवा ऊसतोडणीवरील कामगारांच्या मुलांसाठी स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या अनेक शाळा बिनभिंतीच्याच आहेत.
पण विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या बिनभिंतीच्या शाळा वेगळ्याच आहेत. Learning Plazza नेहमीच्या शाळांऐवजी उभारून 'student as consumer of education' ही कल्पना राबविण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. द इंडिपेंडंट ह्या वृत्तपत्रातील 'Lessons without walls' हे वृत्त अवश्य नजरेखालून घालावे.
21 व्या शतकासाठी सुयोग्य शाळा असे ह्या प्रयोगाचे वर्णन करण्यात येत आहे. आपण ह्याची माहिती घेण्याचे कारण इतकेच की ह्याची नक्कल लवकरच ह्या ना त्या स्वरूपात आपल्याकडे चालू होईल. प्रगत तंत्रज्ञानाला विरोधासाठी विरोध नाही परंतु सृष्टीशी असलेला संवाद तोडून तो प्रतिसृष्टीशी जोडण्याचा अव्यापारेषु व्यापार लोकमान्यता मिळवीत आहे ह्याचे नक्कीच वाईट वाटते.
एकेकाळी शांतिनिकेतन हा आपला आदर्श होता ह्याचे विस्मरण आपल्याला झालेले आहे.