मध्यंतरी महाजालावरील वाचन अशी एक नोंद मी ह्या ब्लॉगवर केलेली आहे. महाजालावरील ह्या मुशाफिरीत वाचनीय असे काही आढळलेले मी तेथे नोंदविलेले आहे.
आपल्या मनाच्या सकारात्मक विचार करण्याच्या ताकदीवर विश्वास असेल तर गंमत म्हणून ही साईट पाहण्यास हरकत नाही.
"Blogging : Never before have so many people with so little to say said so much to so few ."
ही ब्लॉगिंगची व्याख्या हा त्यातलाच एक मासलेवाईक नमुना आहे.
पण सर्व नकारात्मक प्रवृत्तींवर मात करतील अशा काही कामे असतात आणि ती पाहून तुमचा अहं पार लयाला जातो.
माझे ई-स्नेही श्री. अजय भागवत ह्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या दोन साईट्स अशा प्रकारच्या आहेत. वरदा वैद्य ह्यांची विवस्वान ही खगोलशास्त्राविषयी मराठीतून माहिती देणारी अनुदिनी आणि त्यांचीच वातकुक्कुट ही हवामानशास्त्राची ओळख मराठीतून करून देणारी अनुदिनी पाहिली. मराठी भाषा मरणपंथाला लागलेली आहे का? अशी वायफळ चर्चा करीत बसण्यापेक्षा मराठीतून काम करण्यास सुरुवात करावी असा संदेश आपल्या कृतीतून देणा-या ह्या अनुदिनी आहेत. सचिन सखाराम पिळणकर ह्यांची अवकाशवेध ही अनुदिनीही अशीच आहे.
तात्पर्य - आंग्लाळलेल्या मराठी माणसांचा मराठीतून विज्ञान शिकण्यावर विश्वास राहिलेला नसला तरी त्यामुळे मराठी शास्त्रज्ञ निराश झाले आहेत असे मात्र दिसत नाही. मराठी विज्ञान परिषद पत्रिका आजही ते नेटाने चालवीत आहेत. विज्ञान विषयाची आकर्षक मांडणी मराठीतूनही करता येते ह्यावर आज विश्वास ठेवायला जे मराठी भाषक तयार नाहीत त्यांनी ही पत्रिका अवश्य नजरेखालून घालावी. वर्षाला रु.130/- इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये ही पत्रिका उपलब्ध आहे. (पण वर्गणी भरण्याचे कष्ट घ्यावे लागतात). परिषदेचा पत्ता आणि विज्ञान लोकप्रिय करण्याबद्दल परिषदेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या अनुषंगाने माहिती येथे उपलब्ध आहे.
असेच अप्रूप मला विश्वास भिडे -Retired and Happy- ह्यांच्या कामाचे वाटते.
त्यांनी सारे संतसाहित्य महाजालावर आणायचा संकल्प केला असावा अशी शंका येते. हरिदास ह्यांनी येथे अपलोड केलेली कीर्तने पाहिल्यावरही आपण नतमस्तक होतो. असे नेटाने आणि निरलसपणे काम करीत राहण्याची प्रेरणा ह्यांच्यासारख्या मंडळींना होते हे आपले परमभाग्य आहे.
कोशकार्यासारख्या कामात स्वतःला गुंतवून घेणारी प्रकाशझोतापासून दूर राहून कार्य करणारी माणसे मराठीला नवीन नाहीत हे खरे, पण नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराने भाषेचे कार्य साधले जाणार आहे हे ओळखून प्रयत्नशील असलेल्या सध्याच्या मंडळींच्या दूरदृष्टीला आणि चिकाटीला दाद द्यायलाच हवी.
उपक्रम हे संकेतस्थळही मला श्री. अजय भागवतांनी दाखविले तेव्हा त्याचे अस्तित्व समजले. पण माझ्यासारखेच मागासलेले अनेक असतील. हे संकेतस्थळ नेमके कोण चालवीत आहे हे मला शोधूनही सापडले नाही. लोकसंग्रहाची अपार शुद्ध जाणीव आणि प्रखर आत्मनिष्ठ वैराग्य हा ज्ञानेश्वरांचा आदर्श मराठी मनाला नेहमी मोहवतो असे दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले आहे त्याचा प्रत्यय अनेकदा येतो.
आपल्या कामाचे अनन्यसाधारण महत्त्व ज्यांनी ओळखले होते अशा काही विद्वानांनी हेतुतः मराठीतून मौलिक लेखन केले. पं. भातखंडे, वि. का. राजवाडे आणि शं.बा.दीक्षित अशी काही नावे ह्याबाबत घेता येतील. आपले लेखन दुर्लक्षिता येणार नाही आणि त्यातील आशय जाणण्यासाठी इतर भाषकांना मराठी शिकण्याची प्रेरणा मिळेल असा सार्थ आत्मविश्वास ह्या मंडळींकडे होता त्यामुळे इंग्रजीत लेखन करणे शक्य असूनही त्यांनी ते टाळले.