शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी संबंध मुख्यतः वर्गात येतो. त्यामुळे शिक्षकाने वर्गात प्रभावी कसे ठरावे हा उपप्रश्न महत्त्वाचा ठरतो. नव्या शिक्षकाने प्रभावी ठरण्यासाठी आपला अधिकार कसा ठसवावा आणि अनुभवी शिक्षकाने प्रभावी शिक्षक म्हणून प्रस्थापित झालेला लौकिक कसा कायम राखावा असे आणखी दोन प्रश्न त्यातून उद्भवतात. आपण धीरोदात्तपणे आणि आत्मविश्वासाने वर्गात प्रवेश करावा असे प्रत्येक शिक्षकालाच वाटते.
ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ह्याच अनुदिनीमधील 24 व्या आणि 23 व्या प्रश्नांकडे एकदा पाहून घ्यावे. त्यानंतर 26 व्या प्रश्नात सुचविलेल्या तंत्राने पुढे दिलेल्या एखाद्या पडताळा यादीसारखी यादी तयार करावी. अशा अनेक नमुना याद्या इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यांची मदत जरूर घ्यावी पण आपण स्वतः आपल्यासाठी यादी करणे आवश्यक आहे.
1. आपल्या स्वतःच्या वर्तणुकीकडे आपण सतत पाहतो का?
2. वर्गातील अनेक समस्या शिक्षकाच्या वर्तणुकीच्या थेट परिणामी उद्भवत असण्याची शक्यता अअसते.या दृष्टीने आपण घटनांकडे पाहतो का?
3. केवळ विद्यार्थ्यांच्याच वर्तणुकीचा विचार आपण करतो का?
4. शाळेच्या संघटनामध्ये किंवा प्रशासनामध्ये असलेल्या उणिवांमध्ये मुलांच्या अनिष्ट वर्तणुकीची कारणे दडलेली आहेत का?
5. विद्यार्थ्यांची वागणूक कशी असावी आणि त्यांच्याकडून अपेक्षित आदर्श दृष्टिकोन कसा आहे ह्याची चर्चा आपण त्यांच्याशी केली आहे का?
6. शाळेमध्ये आणि शाळेबाहेर विद्यार्थ्यांचे जीवन कसे आहे आणि दोन्हीकडे त्यांनी काय कामे करावीत ह्याविषयी आपण आस्था दर्शवितो का?
7. आपण आपल्या व्यवहारात सातत्यपूर्ण, न्याय्य आणि ठाम असतो का?
8. एक धोरण म्हणून स्तुतीचा सढळ वापर आपल्या अध्यापनात होतो का?
9. आपण पदोपदी अडत असल्यास योग्य लवचिकपणा दाखवतो का?
10. वर्गनियंत्रण आपण सकारात्मक विचाराने आणि सक्रियपणे करतो का?
वर्गव्यवस्थापन हा आपल्या नित्य चिंतनाचा विषय असावा! विषयावर सतत विचार करून आपण ही पडताळा यादी वाढवू शकतो. वर्गातील आपली शब्दरचना योग्य तेथे आदेशात्मक, संभाषणात्मक, प्रश्नात्मक किंवा प्रतिसादात्मक आहे का? नजरेचा यथायोग्य वापर, समर्पक हावभाव, शरीराची ठेवण, वर्गात उभे राहण्याची जागा, वर्गात फिरण्याची सवय/ क्षमता, विद्यार्थ्यांच्या जवळ जायचे की अंतर राखायचे अशा देहबोलीशी संबंधित उपाययोजना नोंदवून त्यांची स्वतःशी उजळणी करून ह्या उपायांबाबत आपण सजग राहू शकतो.
आपण जो विषय शिकवणार आहोत त्या विषयावरील प्रभुत्व आणि शिकवण्यातील आपला उत्साह ह्या दोन मुख्य गोष्टी यशस्वी वर्गव्यवस्थापनासाठी आवश्यक असतात. इतर दुय्यम गोष्टींची चर्चा आपण वर केली आहे. त्यांचे भान राहण्यासाठी प्रत्येकाने एक चेकलिस्ट म्हणजे पडताळा यादी वरीलप्रमाणे अवश्य तयार करावी.