Tuesday, April 30, 2019

वामनपंडित – यथार्थदीपिका ह्या ग्रंथाचे कर्ते

`नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी ।
रसभावना तत्कवना मानी या तेवि वाम न स्वामी’
- मोरोपंत
शाळेत वामनपंडितांच्या आणि रघुनाथपंडितांच्या1 कविता होत्या त्यामुळे ही नावे कानावरून गेलेली, ओळखीची होती.
पुढे वामनपंडितांनी (मूळ नाव – वामन नरहरी शेष) गीतार्थबोधिनी ह्या ग्रंथात गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे मराठी समश्लोकी, आर्या, हिंदी दोहा, मराठी ओवी आणि अभंग अशा पाच प्रकारच्या रचनांमध्ये केलेले रूपांतर वाचनात आले. केतकरांच्या ज्ञानकोशातील वामनपंडितांवरील नोंदीचा काही भाग असा आहे -

“यमकें लांब लांब साधण्यांत याचें कौशल्य दिसून येतें. म्हणून यास यमक्या वामन असेंहि म्हणतात. याचें कांहीं भाषांतररुप काव्य आहे व कांहीं स्वतंत्र आहे. भर्तृहरीचीं श्रृंगार, नीति वैराग्य शतकें, गंगालहरी, समश्लोकी गीता हीं भाषांतरित होय. निगमसागर नांवाचा वेदांतपर ग्रंथ त्यानें लिहिला आहे. त्यानंतर, 'यथार्थदीपिका' या नांवाची गीतेवरील टीका अनेक लोकांच्या सूचनेवरुन त्यानें लिहिली. व तींत आंधळी भक्ति ही कुचकामाची असून ज्ञानयुक्त सगुण भक्तीच श्रेष्ठ व मोक्षसाधनाचा उत्तम मार्ग म्हणून प्रतिपादिलें आहे. या ग्रंथाची ओवीसंख्या २२ हजारांवर आहे.’’
जिज्ञासूंनी मूळ नोंद2 येथे पहावी.
आधुनिक काळात अशा काव्याला कृत्रिम म्हणून हिणवण्यात आले असले तरी पाच प्रकारच्या काव्यरचनांच्या स्वभाव लक्षात घेऊन केलेली ही रूपांतरे पाहिली की आपण थक्क होतो. उदाहरणार्थ आपण पुढील श्लोक पाहू :
मूळ श्लोक
सञ्जय उवाच
तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणम्‌ ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ २-१ ॥
वामनपंडितांची गीतार्थबोधिनी
समश्लोकी
कृपाविष्ट तसा पार्थ आशीं नेत्रांत दाटली
बोले विषादयुक्तातें त्यातें हें मधुसूदन ॥
आर्या
संजय म्हणे किरीटी साश्रुसखेदहि बहूकृपावंत । होतां मधुसूदन तो बोले वचनें तयासि भगवंत ॥
दोहा
लेऊ सास असुवाभरें अर्जुन करुणाभाय । बहुबिखादसों जुगत लखी बोले श्री जदुराय ॥
ओवी
संजय म्हणे धृतराष्ट्रातें । अर्जुन वेष्टिला मोहें बहुतें । अश्रुपात आलें नेत्रांतें । देखोनि बोलिला श्रीकृष्ण ॥
अभंग
श्री गुरुव्यासाचा । शिष्य सद्विद्येचा । धृतराष्ट्रदेवाचा । –तोषदानी ॥1॥ बोले राया देव । उघड अपूर्व । तरी हें वैभव । भोक्ता होसी ॥2॥ कृपेनें व्यापीला । सांडित अश्रूला । येथें पार्थ भ्याला । विषादानें ॥3॥ मग मधुरिपू । शांतवी अमूपू । शांतवावें वपू । तुका म्हणे ॥4॥

ज्ञानेश्वरांच्या भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) ह्या टीकेप्रमाणे वामनपंडितांनी लिहिलेली गीतेवरील ओवीबद्ध टीका यथार्थदीपिका ह्या नावाने प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीइतका हा ग्रंथ पुरातन आणि समृद्ध नसला तरी त्याची शैली मर्मग्राही असून विविध प्रमेयांचा विभिन्न दृष्टिकोनांमधून केलेला अभ्यास आणि ज्ञानयुक्त सगुणभक्तिचे प्रतिपादन हे त्याचे वैशिष्ट्य आहे.
उदाहरणार्थ,

यांस मी मारूं कैसा? । इतकाच श्लोकाचा वळसा ।
हे मरती कीं शोक ऐसा । न करी अर्जुन ॥
ऐसा वाखाणितां अर्थ । हा दोष ठेविती समर्थ ।
याचा अर्थ यथार्थ । वाखाणिला ऐसा ॥
कीं यांस मारणें अधर्म । तेव्हां शोक करणें अधर्म ।
तरी श्लोकाचें मूळ भ्रम । कीं हे मरती म्हणोनि ॥   


वामनपंडितांचे आजोबा वामन अनंत शेष हे विजापूर दरबारी ग्रंथपाल होते. संस्कृत आणि फार्सी ह्या भाषा त्यांना अवगत होत्या अशी मराठी विश्वकोशातील नोंद आहे. 1666 साली वामनपंडित घरसंसार सोडून बाहेर पडले आणि त्यांनी संन्यास घेतला. 

निगमसार, कर्मतत्त्व, ब्रह्मस्तुती, अनुभूतिलेश हे त्यांचे वेदान्त तत्त्वज्ञानावर आधारित ग्रंथ आहेत. रामजन्म, अहिल्योद्धार, सीतास्वयंवर, भरतभाव, लोपामुद्रा संवाद ह्या त्यांच्या रचना रामायणावर आधारित आहेत.  

गजेंद्रमोक्ष, नामसुधा, वनसुधा, वेणुसुधा, मृत्तिकाभक्षण, हरिविलास, रासक्रीडा अशी आख्यानेही त्यांनी रचलेली आहेत. द्वारकाविजय हा त्यांचा ग्रंथ भागवताच्या दशम्‌ स्कंधावर आधारित आहे.
वामनपंडितकृत सर्व संग्रहाचे प्रकाशक  माधव चंद्रोबा असून ग्रंथाची छपाई  शिळा छापखान्यात, दगडावर अक्षरे कोरून केलेली आहे. प्रकाशन काल - शके १७९० (सन १८६८) आहे. मुंबईतील बाळाजी आणि कंपनी ह्या प्रकाशनसंस्थेने वामनी ग्रंथ हे मासिक 1889 च्या नोव्हेंबरपासून सुरू केले. वामनपंडितांच्या ग्रंथांची जुनी हस्तलिखिते मिळवून, ती शुद्ध करून छापणे हे त्याचे उद्दिष्ट होते.
वामनपंडितांविषयी अधिक माहिती जया दडकर आणि इतरांनी संपादित केलेल्या `संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशामध्ये (आरंभापासून 1920 पर्यंतचा कालखंड) मिळू शकेल.
 
वामनपंडितांच्या3 67 हून अधिक ग्रंथांची यादी4 मराठी विकिपीडियाने दिलेली आहे. त्यांचे 20 ग्रंथ येथे5 ऑनलाईन उपलब्ध आहेत. यथार्थदीपिका हा ग्रंथ राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  आपल्या भाषेतील ह्या ठेव्याकडे अडगळ म्हणून न पाहता पूर्वग्रह बाजूला ठेवून ह्या समृद्ध साहित्याचा आस्वाद घ्यायला हवा.

संदर्भ :
1. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4
2. http://ketkardnyankosh.com/index.php/2012-09-06-10-45-30/10434-2013-03-05-04-52-44
3. http://www.chanefutane.com/articles.php?articlesid=40
4. https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%A4#.E0.A4.89.E0.A4.A4.E0.A5.8D.E0.A4.A4.E0.A4.B0_.28.E0.A4.B5.E0.A4.B0.E0.A5.8D.E0.A4.A4.E0.A4.AE.E0.A4.BE.E0.A4.A8.29.E0.A4.95.E0.A4.BE.E0.A4.B2.E0.A5.80.E0.A4.A8_.E0.A4.9F.E0.A5.80.E0.A4.95.E0.A4.BE
5. http://www.transliteral.org/pages/i141129060408/view

अस्तित्वाचा अर्थ

 

आपण अस्तित्वात असतो म्हणजे काय? हे 'असणे' काय आहे? असा गहन प्रश्न आपल्याला सहसा पडत नसला तरी कधीकधी मात्र तो पडतो. त्या प्रश्नाचे शब्द नेहमी असेच असतात असे नाही पण आशय मात्र असाच असतो.

आपल्या अस्तित्वाच्या ह्या अनुभवाविषयी सतत जागरुक असणे, आपण स्वतःमध्ये 'उपस्थित' असणे ह्याला हल्ली mindful meditation असे म्हणतात आणि तणावमुक्तिसाठी वापरण्याचे एक तंत्र म्हणून ते लोकप्रियही होत आहे. 'टू बी ऑर नॉट टू बी' असा प्रश्न आत्महत्येचे विचार करणार्या हॅम्लेटच्या मनात घोळत होता आणि त्यामागील हेतू 'टू एंड द हार्ट-एक' असा होता. अस्तित्वासह कधीकधी अशा असह्य हृदयवेदना अपरिहार्यपणे येतात.

जे. कृष्णमूर्ती ह्यांनी To be is to be related अशी सुंदर व्याख्या दिलेली आहे. वस्तू, व्यक्ती, वास्तू आणि स्थळकाळाशी असलेले आपले नातेसंबंध, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या स्मृती ह्यांनीच आपलं अस्तित्व सिद्ध होत असतं. एखाद्या वस्तूचा मालक, एखाद्याचा बाप, एखाद्याचा मित्र, एखाद्या गर्दीचा घटक अशी आपली प्रतिक्षणी काहीना काही सापेक्ष ओळख असते. ही नाती जितकी विविध स्वरूपाची असतील तितके आपले अस्तित्व समृद्ध असते असे म्हणता येईल.

मानवी इतिहासातील सर्वाधिक बदल झालेला कालखंड म्हणजे 20 वे शतक असे म्हणता येईल. निसर्ग, सामाजिक व्यवहार, संस्कृती, जीवनशैली ह्या सर्वांमध्ये मुख्यतः तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे क्रांतिकारक बदल झाले. सामाजिक-सांस्कृतिक उत्क्रांतीच्या ह्या पर्वातील त्या बदलांचा वेग अभूतपूर्व होता. कदाचित 21 वे शतक अधिक वेगवान असेल. परंतु अनुभवांच्या जातकुळीमध्ये 20व्या शतकात होती तितकी विविधता असेलच असे नाही. विसाव्या शतकातील पूर्वार्धात जन्मलेल्या आणि अजून हयात असलेल्या व्यक्तीने निसर्ग आणि तंत्रज्ञान ह्यांच्यातील विविधतेचा आणि जीवनशैलीतील बदलांचा जो अनुभव सहजगत्या घेतलेला आहे तसा पुढे क्वचितच घेता येईल.

                  Jagnyatil Kahiवस्तू, व्यक्ती आणि वास्तूंशी असलेल्या भावनिक गुंतवणुकीचे हृद्य चित्रण हा डॉ. अनिल अवचट ह्यांच्या लेखनाचा एक विशेष आहे. त्यांच्या अशा काही लेखांचे संकलन "जगण्यातील काही'' ह्या त्यांच्या पुस्तकात केलेले आहे. 2005 साली प्रकाशित झालेले हे पुस्तक अजूनही ताजे वाटते. त्यातील लेख तर त्यापूर्वी प्रकाशित झालेले आहेत. विविध स्तरांवर आणि विभिन्न संदर्भांमध्ये 'उपस्थित' राहून जगण्याचा अनुभव घेण्याची कला लेखकाला साधलेली आहे. हे लेखन स्वान्तसुखाय केलेले असो किंवा संपादकांची मागणी पुरविण्यासाठी केलेले असो, वैचारिकतेचा आव न आणणारे आहे. पण तरीही चिंतनाला प्रवृत्त करणारे आहे. मुख्य म्हणजे ह्या सर्वातून 20 व्या शतकातील उत्तरार्धातील मराठी मध्यमवर्गीय जीवनशैलीचा एक दस्तऐवज जाणता- अजाणता तयार झालेला आहे.

व्यवसायाने वैद्यकीय पेशातील डॉक्टर असलेल्या लेखकांचे लेखन बहुधा सरस असते असा माझा अनुभव आहे. त्यांचे लेखन त्यांच्या व्यवसायासंबंधी नसले तरीही सूक्ष्म निरीक्षण आणि अभ्यास करण्याची सवय ह्यामुळे समृद्ध झालेले असते.

भारताचा बौद्धिक इतिहास

एका इतिहासप्रेमी व्हॉट्सअप समूहावर 'ज्ञानेश्वरीत विज्ञान आहे का', किंवा ज्ञानेश्वर वैज्ञानिक होते का अशा स्वरूपाची चर्चा सुरू आहे. खरंतर ज्ञानेश्वरी हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे का, किंवा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून त्या ग्रंथाची ग्राह्यता किती असे प्रश्नाचे स्वरूप आहे. ज्ञानेश्वर एक की दोन की अनेक, ज्ञानेश्वरीत प्रक्षिप्त भाग किती? निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई ह्या ऐतिहासिक व्यक्ती होत्या की ही 'विठ्ठल'पंतांची मुले म्हणजे एक रूपक आहे वगैरे अनेक प्रश्न वस्तुनिष्ठ म्हणून विचारता येतील. अशा प्रश्नांचा उपहास न करता प्रभावी प्रतिवाद करायचा तर राजीव मल्होत्रा ह्यांच्या म्हणण्यानुसार `इंटलेक्च्युअल क्षत्रियां'ची गरज आजच्या घडीला आहे.

ज्ञानेश्वरांच्या काळी विबुध जनमानसात कोणत्या विज्ञानविषयक कल्पना रूढ होत्या ते पहावे असा विचार करून भारतातील बुद्धिगम्य ज्ञानाचा इतिहास एखाद्या पुस्तकात सापडतो का हे पहावे असे वाटले. केवळ ज्ञानेश्वरकालीन नाही तर Intellectual History of India असे काही लेखन शक्यतो भारतीयांनी केले असल्यास ते वाचण्याची उत्सुकता मला आहे. पीटर वॅटसन ह्यांचे 'द मॉडर्न माईंड, अॅन इंटलेक्च्युअल हिस्ट्री अव ट्वेंटिएथ सेंच्युरी' हे पुस्तक जसे आहे (फार बाळबोध किंवा थिल्लर नको आणि अति बोजडही नको) तसे लेखन भारताबाबत असल्यास ते वाचावे अशी माझी इच्छा आहे.

वरील खोडसाळ प्रश्न वादासाठी मी येथे उपस्थित केलेले असले तरी पूर्वी काही जणांनी ते उपस्थित करून झाले आहेत. ज्ञानेश्वरीतील विज्ञान हे एक निमित्त झाले. हल्ली व्हॉट्सअपवर आपण राजकीय आणि सामाजिक इतिहासांची चर्चा अनेकदा करतो परंतु वैचारिक किंवा प्राज्ञिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातूनही भूतकाळाकडे पाहणे उद्बोधक ठरेल असे वाटते. प्राज्ञिक इतिहासात सम्यक परामर्श घेतला जात असल्याने जर प्राज्ञिक इतिहासाचा वेध घेण्याची पद्धत अधिक रुजली तर खोडसाळ मुद्दे उपस्थित होणे आपोआप कमी होईल असे वाटते. मुद्यांना अनेक अंगांनी भिडणे, आंतरशाखीय विचारव्यूह रचणे प्राज्ञिक इतिहासाच्या कक्षेत येते. रिचर्ड व्हॉटमोअर आणि ब्रायन यंग ह्यांनी संपादित केलेल्या `अ कंपॅनियन टू इंटलेक्च्युअल हिस्ट्री' ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये प्राज्ञिक इतिहासाची चांगली ओळख करून दिलेली आहे.

1960 पासून प्राज्ञिक इतिहास ही केवळ आंग्लभाषक जगतामध्येच नाही तर संपूर्ण यूरपमध्ये ऐतिकासिक व्यवसायातील यशोगाथा ठरली आहे. प्राज्ञिक इतिहासाच्या परिप्रेक्ष्यामधून पाहिला न जाणारा विषय आजकाल सापडणे दुरापास्त आहे. नरभक्षण ( आणि इतरही भोगोपभोग), विज्ञान आणि तंत्रज्ञान, मानवांची आणि प्राण्यांची शरीरे, भावना आणि संवेदना, आणि स्तोत्रे ह्या विषयांवरील प्राज्ञिक इतिहास आहेत. ह्या दृष्टिकोनाच्या यशाचे एक कारण म्हणजे विषयाचे आंतरशाखीय स्वरूप होय. प्राज्ञिक इतिहासकार केवळ विद्यापीठांच्या इतिहास विभागांमधूनच आहेत असे नसून राज्यशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, इंग्लिश, भाषा आणि भाषाशास्त्र, अभिजात वाङ्मय, देवत्व, अर्थशास्त्र, तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र, व्यवसाय आणि व्यवस्थापन, लोकप्रशासन, गणित आणि सर्व नैसर्गिक शास्त्रे ह्या विभागांमधूनही आहेत.

प्राज्ञिक इतिहास हा नुसताच राजांचा, राज्यांचा इतिहास नसून कल्पनांचा, विचारांचा आणि संबंधित विचारवंतांचा इतिहास असतो.

व्हॉट्सअप समूहांसारख्या व्यासपीठांवर इतिहासाशी निगडित विषयांवर अनेकांगी चर्चा झाल्यास हे परिप्रेक्ष्य सहजच साधले जाईल असे मला वाटते. तत्कालीन समाजमनांच्या धारणांचा वेध घेणे इतिहासप्रेमींसाठी नक्कीच रोचक आणि आनंददायी ठरेल.

`इंडिया - द एन्शण्ट पास्ट'

भारताच्या प्राज्ञिक इतिहासाविषयी काही वाचावं अशी इच्छा झाल्याने मी तसे काही वाचावयास मिळते का ह्या प्रयत्नात आहे. वैचारिक इतिहास, कल्पनांचा इतिहास, तत्त्वज्ञानाचा इतिहास किंवा साहित्याचा इतिहास ही सर्व प्राज्ञिक इतिहासाची उपांगे आहेत. बौद्धिक घटितांच्या अनुक्रमाने इतिहासाची मांडणी असे त्याचे स्वरूप असू शकते. मनू गोस्वामी, श्रुती कपिला, फैजल देवजी ह्यांचे लेखन त्यादृष्टीने वाचण्यासारखे आहे. पण ह्या लेखकांनी मुख्यतः अर्वाचीन कालखंड अभ्यासासाठी घेतलेला आहे. तोही महत्त्वाचा आहे परंतु प्राचीन काळाचाही समावेश अशा आढाव्यात असावा असे मला वाटत असल्याने मी तसे काही शोधत होतो.

सध्या मला बर्जोर अवारी ह्यांचे `इंडिया - द एन्शण्ट पास्ट' हे त्या जवळपास जाणारे पुस्तक मिळाले आहे. त्यांचा जन्म भारतातला पण बालपण आणि शिक्षण केनिया आणि झांझिबार येथे झालेले असून ते मॅंचेस्टर मेट्रॉपॉलिटन युनिव्हर्सिटीत मानद संशोधक म्हणून कार्यरत आहेत. नानाविध ग्रंथांमधून त्यांनी सामग्री गोळा केलेली असून त्यांची मांडणी संतुलित असल्याबद्दल अनेक तज्ज्ञांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढलेले आहेत. प्रस्तावनेत ते म्हणतात,

''This imbalance in the thinking about India can be corrected by attending to other valuable legacies from ancient India. One such heritage, which needs deeper exploration, is its intellectual patrimony. The Indians composed learned texts long before the Europeans.''

Captureमहत्त्वाच्या ग्रंथसंपदेचे भान ठेवता ठेवता केलेली इसपू 7000 ते इस 1200 ह्या इतिहासाची मांडणी असे ह्या पुस्तकाचे वैशिष्ट्य सांगता येईल. इस 1200 नंतरचा इतिहास हा या पुस्तकाचा विषय नाही पण समारोपाच्या प्रकरणात त्याकडे एक दृष्टिक्षेप आहे. भारतीय समाजाच्या प्राज्ञिक सामर्थ्यावर भाष्य करणारे हे वाक्य त्या प्रकरणात आहे.

'Hindu culture and social values retained their energy and vitality even under the most anti-Hindu Islamic kings.'

भारतातील महत्त्वाच्या बौद्धिक कृतींची वर्गीकृत यादी करणे अशासारखा एक प्रकल्प आधुनिक इतिहासप्रेमींनी घ्यायला हरकत नाही. त्याचे एक प्रारूप म्हणावे अशी पुरवणी बर्जोर अवारी ह्यांच्या पुस्तकाच्या पुरवणीमध्ये आहे.

ही यादी परिपूर्ण आहे असे नाही. संस्कृतच्या 12वी च्या पुस्तकातही अशाच त-हेची यादी वाचल्याचे मला आठवते. पण एक प्रारूप किंवा template म्हणून आपण ह्याकडे पहावे असे मला वाटते. आपण आपल्या माहितीनुसार ह्या यादीत भर घालू शकतो, किंबहुना केवळ ग्रंथांची/ कृतींचीच नाही तर विषयांचीही भर घालू शकतो. केवळ प्राचीन भाषाच नाही तर अर्वाचीन भाषांमधील कृतींचीही भर आपण घालू शकतो. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ ह्या यादीत सहज स्थान पटकावू शकेल.

मेटामॉडर्न


हेमंत प्रकाश राजोपाध्ये हे जर्मनीतील ग्योटिंगेन विद्यापीठात पीएच. डी. संशोधक असून, ऑब्झव्‍‌र्हर रीसर्च फाऊंडेशन, मुंबई येथे वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत आहेत. दैनिक लोकसत्तामध्ये जानेवारी 2018 पासून दुस-या आणि चौथ्या रविवारी धारणांचे धागे हे सदर ते लिहीत आहेत. भारतीय प्राज्ञिक इतिहासाच्या शोधात असताना मी सहाजिकच त्यांच्या लेखनाकडे वळलो. इतिहासाची त्यांनी केलेली मांडणी पोस्ट मॉडर्नच्याही नंतरच्या म्हणजे मेटामॉडर्न दृष्टिकोनातून केलेली आहे. सोप्या भाषेत असलेले हे लेखन पुन्हा पुन्हा वाचल्याशिवाय पूर्णपणे समजत नाही असा अनुभव मला आला. पण समजल्यानंतर मात्र कसदार लेखन वाचल्याचा आनंद मिळतो. त्यांचे लेखन ह्या दुव्यावर सापडू शकेल.
लेखमालेचे स्वरूप पहिल्या लेखात सांगताना ते म्हणतात,
``या मोठय़ा पटाकडे पाहताना या पूर्ण वर्षांत आपण ऋग्वेदादी वैदिक संहिता, कर्मकांडप्रधान ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे, बौद्ध-जैन परंपरांतील प्रारंभिक प्रवाह, षड्दर्शने, स्मृती-सूत्रसाहित्य, धर्मशास्त्रांतर्गत स्मृती-सूत्र साहित्य, आर्षमहाकाव्ये, पुराणे, ऐतिहासिक भूगोल (Historical geography), धार्मिक भूगोल (sacred geography), मध्ययुगीन तत्त्वज्ञान-धर्मप्रवाह, मध्यपूर्वेतून झालेला इस्लामी शासकांचा प्रवेश, भक्ती संप्रदाय, वैदिक-पुनरुज्जीवनवादी चळवळी, उत्तर-मध्ययुगातील शिवकाळ-पेशवाई-टिपू वगैरे राजसत्ता आणि वर चर्चा केली त्याप्रमाणे वसाहतवादी व वसाहतोत्तरकालीन इतिहास असा विस्तृत पट पाहायचा आहे.''
ह्या विषयाची हाताळणी कशी केली आहे त्याचा उल्लेख त्यांनी पुन्हा आपल्या 1 जून 2018 च्या लेखामध्ये केला आहे.
``मानवी इतिहास-संस्कृती आणि सामाजिकतेविषयीच्या सिद्धांतनासंबंधीच्या अद्ययतन अशा बहुविद्याशाखीय, विविध चिकित्सात्मक परंपरा आणि पद्धतींच्या आधारे आपल्याला उपखंडाचा इतिहास जोखायचा आहे, हे आपण ठरवलं होतं.''
राजोपाध्यांची मांडणी अशा त-हेची बहुविद्याशाखीय, समावेशक असल्याने प्राज्ञिक इतिहासाच्या मांडणीच्या जवळ जाणारी आहे असे वाटले. त्यांचे सदर आपल्या सर्वांप्रमाणे मीही वाचीत होतो पण आता हे सर्व लेख पुन्हा वाचल्यानंतर त्या लेखनाचे महत्त्व आणि वेगळेपण प्रकर्षाने जाणवले.
(मेटामॉडर्न दृष्टिकोनातून जागतिक पातळीवर कसा विचार सुरू आहे ह्याचा मासला हेन्झी फ़्रिनाख्त यांच्या ह्या दुव्यावरील लेखात मिळेल)

Popular Posts