Monday, November 17, 2008

Offline

निमित्त आहे New York Review of Books चे संपादक रॉबर्ट सिल्व्हर्स ह्यांच्या मुलाखतीचं. एलिझाबेथ हार्डविक ह्यांनी Harper's Magazine मध्ये "The Decline of Book Reviewing" असा निबंध लिहिला आणि त्यातून व्यक्त झालेली चांगल्या परीक्षणांची उणीव पूर्ण करण्यासाठी New York Review of Books ची सुरुवात कशी झाली वगैरे गोष्टी मुलाखतीत वाचल्या. (हार्पर्स मॅगेझिन पूर्वी नेटवर फुकट वाचायला मिळत असे नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या जगातील - तसेच पहिल्या जगातील सुद्धा - फुकट्या वाचकांची चैन त्यांनी बंद करायचं ठरवलेलं दिसतंय. ऍटलांटिक मंथली सुद्धा पूर्वी फुकट वाचता यायचं. नंतर तेही हार्पर्सप्रमाणे बंदिस्त झालं. आता पुन्हा फुकट झालंय! असा बदल का करावा लागला ह्यावर James Fallows नं चांगलं लिहिलंय आणि केविन केलीच्या निबंधाचा संदर्भही दिलाय. पण "फुकट असलं तरी इतक्या मोठ्या संख्येनं "ह्यांच्या"सारख्यांशिवाय वाचतो कोण!" हा साक्षात्कार त्यांना झाला असणार हे आपलं माझं मत. हार्पर्सही हळूहळू येईलच वळणावर.)

मला (माझ्या अल्प कुवतीनुसार) कशा तऱ्हेची परीक्षणं आवडतात यावर एकदा विस्तारानं लिहायचंच आहे. पण परीक्षणवजा काहीतरी पूर्वी लिहिल्याचं आठवलं. मग शोधाशोध केल्यावर मे 1995 ते मे 2003 ह्या काळात उणीपुरी (म्हणजे उणीच) 46 टिपणं (म्हणजे परिच्छेदच ते ) लिहिल्याचा शोध लागला. त्यांना परीक्षणं म्हणायचं धाडस करणं शक्यच नाही. काय वाचलं त्याची त्रोटक यादी आहे ती. मध्येच एखाद्या वाक्यात शेरेबाजी आहे इतकंच. एक उदाहरण खाली देतोय :

 

20.01.97

श्री. पु. भागवत गौरव ग्रंथ श्रोत्रीनं वाचायला दिला. त्यानंच दिलेलं दुर्गा भागवतांचं कदंब अजून पडलेलं आहे. श्रोत्रीची taste चांगली दिसते. त्यानं दिलेलं अहिताग्नि राजवाडे ह्यांचं आत्मचरित्र बरेच दिवस ठेवून मग वाचलं. पुस्तक ताड-फाड, सडेतोड वगैरे आहे. सावरकर, रॅंग्लर परांजपे वगैरे भल्याभल्यांची चंपी त्यात केलेली आहे. स्वतःच्या व्यासंगाची साधना कशी केली हे सांगण्यासाठी हे पुस्तक लिहिल्याचं पुस्तकात लेखकानं वारंवार लिहिलेलं असलं तरी प्रत्यक्षात ही साधना कशी केली ह्याचा बोध पुस्तकातून मला झाला नाही.

सावरकरांचा प्रतिवाद, महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञानाचा समाचार वगैरे गोष्टी वाचायला आवडल्या. (सावरकरांनी त्यांचं उसनं नेलेलं पुस्तक परत केलं नाही हा त्यांच्यावरचा रागही व्यक्त केलेला आहे). मतप्रदर्शन प्रामाणिक असल्यामुळे आणि त्यामागे conviction असल्यामुळे असाही एक दृष्टिकोन म्हणून वाचनीय आहे.

श्री. पु. भागवत गौरव ग्रंथातला ग. रा. कामत ह्यांचा लेख सुंदर आहे. सुनीताबाई देशपांडे ह्यांना श्रीपुंनी लिहिलेली पत्रे हा या ग्रंथातला सर्वात चांगला भाग आहे व त्यामुळे ग्रंथ संग्राह्य झालेला आहे. ग्रंथात राम पटवर्धनांचा लेख हवा होता. डॉ. वसंत पाटणकर आणि प्रा. यास्मिन शेख यांच्या लेखांमध्ये (अपरिहार्यपणे?) पुनरावृत्ती आढळते. डॉ. पाटणकरांचं त्यांनी भेट दिलेलं त्यांचं स्वतःचं पुस्तकही सवडीनं वाचायचंच आहे. तो योग कधी येतो ते पाहू.

बऱ्याच दिवसांनी वाचलं तेव्हा हे फार वाईट आहे असं वाटलं नाही. पुन्हा असा प्रयत्न करण्याचाही मोह झाला. त्या काळात आपण एक offline ब्लॉग लिहीत होतो हे जाणवलं.

Monday, November 10, 2008

तंत्रज्ञान आणि गुणवत्ता : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 6

शैक्षणिक तंत्रज्ञानाशिवाय शैक्षणिक गुणवत्ता साध्य होणे अशक्य आहे का?

शैक्षणिक गुणवत्ता हा आता एक सांस्कृतिक विषय झालेला आहे. ज्या संस्कृतींमध्ये शैक्षणिक तंत्रज्ञान वापरले जाते त्या अधिक प्रगत मानल्या जात आहेत. प्रगतीची ही व्याख्या मान्य केली तर शैक्षणिक तंत्रज्ञान अनिवार्य ठरते. मात्र शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे काय ह्याविषयी भिन्न मतप्रवाह आहेत. शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या व्याख्या शैक्षणिक गुणवत्तेच्या संदर्भाने या सादरीकरणात केलेल्या आढळतील.

शैक्षणिक तंत्रज्ञानाचे तत्त्वज्ञान हा मोठा विषय आहे. सारांशाने असे म्हणता येईल की शिकणाऱ्यांना कल्पनांचा शोध घेण्यास आणि शिकवणाऱ्यांना अर्थ समजावून देण्यास मदत करणारे कोणतेही तंत्रज्ञान अशा शैक्षणिक हेतूंसाठी वापरले असता ते शैक्षणिक तंत्रज्ञान ठरेल. शैक्षणिक तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळे ज्या समाजाला सुसंस्कृत ठरायचे असेल त्याने ते आत्मसात करणे आवश्यक आहे.

नवे तंत्रज्ञान शिकण्यातील उदासीनता मराठी माध्यमाच्या शिक्षकांना म्हणूनच उपयुक्त ठरणारी नाही. जर प्रतिष्ठा प्राप्त करून घ्यायची असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी शक्य तितक्या लवकर आपल्या पचनी पाडून घ्यावे हे बरे.

गुणवत्ता तंत्रज्ञानातून येत नाही. तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो त्यावर गुणवत्ता अवलंबून आहे. तंत्रज्ञानाच्या वापरातून प्रतिष्ठा मिळेल पण गुणवत्ता साध्य करण्यासाठी त्या वापरामध्ये कौशल्य, कल्पकता आणि विवेक असायला हवा.

यशस्वी तंत्रज्ञान म्हणजे गुणवत्ता साध्य करून देणारे तंत्रज्ञान असे समीकरण मांडता येईल का?

नाही. एखादे तंत्रज्ञान यशस्वी का होते आहे त्याचे कारण शोधून त्या कारणाचा कल्पक वापर हवा. भावनिक गरज म्हणून चॅटिंग लोकप्रिय/ यशस्वी झाले. म्हणूनच भविष्यातील शिक्षणासाठी भावनांच्या सामर्थ्याचा वापर करावा असे तज्ञांना वाटते.

Thursday, November 6, 2008

योग्य मनोभूमिका : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 5

शैक्षणिक गुणवत्तेसाठी पूर्वअट कोणती आहे?

योग्य मनोभूमिका तयार होणे ही एकमेव पूर्वअट आहे. त्यामागील तर्कसंगती पुढीलप्रमाणे सांगता येईल :

  • सुधारणेस वाव आहे हे सर्व संबंधितांना मान्य व्हायला हवे.
  • सुधारणेसाठी बदलणे आवश्यक असते.
  • बदलासाठी सर्व संबंधितांची मुख्यतः मानसिक तयारी हवी
  • अभ्यासातून बदलाची दिशा स्पष्ट करून घ्यावी.
  • बदलाच्या व्यवस्थापनासाठी प्रायोजक, लक्ष्य आणि कार्यकर्ते कोण हे नक्की करावे.

वरीलपैकी प्रत्येक मुद्याची विस्ताराने चर्चा करणारे बरेच संशोधनात्मक लिखाण उपलब्ध आहे.

शैक्षणिक बदलाची दिशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आहे का?

शैक्षणिक गुणवत्ता हे ध्येय आहे, तंत्रज्ञान हे ध्येय नव्हे, असे भान ठेवून काळाबरोबर राहण्यासाठी आवश्यक तितकाच तंत्रज्ञानाचा अंगीकार करावा. गुणवत्तेचे प्रश्न अमूकच तंत्रज्ञान वापरून सुटतील असे नाही. साधनसामग्रीचा वापर गुणवत्तावर्धनासाठी कसा करावा ह्याचा विचार प्रामुख्याने मुख्याध्यापकांनी आणि शिक्षकांनी करायचा आहे.

अध्ययनक्षेत्रात तंत्रज्ञानाची, विशेषतः इंटरनेटची मर्यादा स्पष्ट करणारे सादरीकरण येथे उपलब्ध आहे ते अवश्य पहावे. पूर्णतः इंटरनेटवर अवलंबून राहण्याऐवजी इंटरनेटच्या जोडीने संगणकाचा वापर सादरीकरणे तयार करण्यासाठी वापरणे हा सुवर्णमध्ये ठरू शकतो. शिक्षकाचे श्रम आणि विद्यार्थ्यांचा वेळ वाचणार असेल तर असे तंत्रज्ञान अवश्य वापरावे. इंटरनेटवर विनामूल्य वापरासाठी अध्ययनसाहित्य, चित्रे, आकृत्या, ऍनिमेशन्स, व्हिडिओज्‌ वगैरे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. (उदाहरणार्थ विकीमीडियावरील प्रतिमा) आपल्याला हवे ते शोधण्याचे कष्ट घेतले तर शिक्षकांना आकर्षक सादरीकरणे तयार करता येतील.


Wednesday, October 29, 2008

NCERT Books

महाराष्ट्रात बहुसंख्य विद्यार्थी राज्यातील एस.एस.सी. बोर्डाच्या परीक्षा देतात पण बऱ्याच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना CBSE म्हणजे केंद्रीय बोर्डासाठी वापरली जाणारी NCERT ने तयार केलेली पुस्तके संदर्भासाठी हवी असतात.

हिंदी आणि इंग्लिश अशा दोन माध्यमांमधून ही पुस्तके उपलब्ध आहेत.

विशेषतः विविध स्पर्धा परीक्षा किंवा प्रज्ञा शोध परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके लागतात परंतु ही पुस्तके सर्व बुकडेपोंमधून मिळतही नाहीत. सर्व इयत्तांसाठी ही पुस्तके इंटरनेटवर येथे मोफत उपलब्ध आहेत.

Sunday, October 26, 2008

गलद्दानगण्डं

गलद्दानगण्डं मिल्द्भृंगखण्डम्
चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डम्।।
लसद्दन्तकाण्डं
विपद्भंगचण्डम्
शिवप्रेमपिण्डम्भजे वक्रतुण्डम्।।



आद्य श्री शंकराचार्यांची स्तोत्रे प्रासमधुर आणि अर्थवाही तर आहेतच शिवाय जाणकारांच्या मते ती मंत्राक्षरयुक्तही आहेत. चार चरणांचे हे लहानसे श्रीगणेशस्तोत्रही असेच सुंदर असून स्वभावोक्ति अलंकाराचे सुंदर उदाहरणही आहे.

(ज्याचे) दानरूपी गंडस्थल गळते आहे, आणि ज्ञानार्थी भक्त भुंग्यांच्या थव्यांप्रमाणे तेथे रुंजी घालीत आहेत, (ज्याची) सुंदर सोंड रुळत आंदोलने करीत आहे, (जो) शौण्ड (सोंड असलेला) जगताचा तारणहार आहे, (ज्याचे) दन्तकाण्ड चमकते आहे, (जो) चण्ड (चण्डीपुत्र) विघ्नांचा नाश करीत आहे, (अशा) शिवप्रेमाचे घनीभूत सार असलेल्या (शिवपुत्र) वक्रतुंडाला मी भजतो.

Saturday, August 16, 2008

आधी शोधलेचि पाहिजे

सर्च इंजिन्समुळे माहितीच्या महासागराचा थांग लागणे शक्य झालेले आहे. 'गुगल' सारख्या सर्च इंजिनांनी माहितीचे अनेक पर्याय आपल्यासमोर क्षणार्धात हजर करण्याची किमया साध्य केलेली आहे.

प्रत्येक प्रश्नाचं गुगल हेच एक उत्तर झाल्यासारखं आहे.

गुगलसारखंच Cuil ("ज्ञान" ह्या अर्थाचा आयरिश शब्द) नावाचं सर्च इंजिन सध्या चर्चेमध्ये आहे (तशी सर्च इंजिन्स उदंड आहेत). पूर्वी गुगलसाठी काम करणाऱ्या तंत्रज्ञांनी ते विकसित केलेलं आहे. PIM software असा शोध मी गुगलमध्ये घेतला तेव्हा 16 लाख 70000 पानं सापडली आणि 'कूल' मध्ये 17 कोटी 75 लाख चारशे तेवीस पानं सापडली.

गुगलइतकं अजून कूल चांगलं नाही, बरंचसं असंबंद्ध आहे असं काही टीकाकारांचं म्हणणं आहे. मला मात्र ते आपल्या टूलबारवर कूल आयकॉन ठेवण्याइतकं नक्कीच चांगलं आणि महत्त्वाचं वाटलं.

Sunday, July 20, 2008

स्पर्धा

जगामध्ये अस्तित्वासाठी आणि आपल्या जनुकांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून विविध प्रजातींमध्ये सतत स्पर्धा सुरू असते असे आपण जीवशास्त्रामध्ये वाचतो. परंतु एकाच प्रजातीचे नर आणि माद्या ह्यांची एकमेकांशी स्पर्धा होण्याचा प्रकार फक्त मानवामध्येच आढळत असावा.

शतकानुशतके स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळाल्याने "पुरुषी' आणि 'बायकी' अशी गुणांची विभागणी झाली. स्त्रियांना मजुरी कमी मिळण्याचा प्रकार अद्यापही सुरू आहे. टेल्कोच्या शॉप फ्लोअरवरील कामासाठी अर्ज करण्यास स्त्री इंजिनिअर्सना मज्जाव करणाऱ्या जाहिरातीबद्दल थेट जेआरडींकडे दाद मागणारी एखादी सुधा (कुलकर्णी) मूर्ती अजूनही अपवादात्मकच आहे. संशोधनातून असेच आढळते की अजूनही बऱ्याच स्त्रियांना पुरेसा आत्मविश्वास आलेला नाही.

मात्र अलिकडे स्त्रिया पुरुषांशी वाढती स्पर्धा करू लागल्यावर "पुरुषी' किंवा "बायकी' असे काही गुण नसून फक्त "यशस्वी' ठरणारे गुण असतात असा साक्षात्कार पुरुषांना झालेला दिसतो. ह्याचाच परिणाम म्हणून आजचा शहरी पुरुष आपल्या रूपाकडे, नीटनेटकेपणाकडे आणि संवादकौशल्याकडे लक्ष पुरवू लागलेला आहे. स्त्रियांच्या ज्या गुणांमुळे त्यांना यश मिळते आहे ते गुण तो अंगी बाणवू लागलेला आहे. पुरुषांच्या ह्या नव्याने उदयाला आलेल्या वर्गाला मार्क सिम्पसन ह्यांनी "मेट्रोसेक्शुअल' (हेटरोसेक्शुअलच्या चालीवर) अशी संज्ञा बहाल केली आहे आणि ती लोकप्रिय झालेली आहे.

मेट्रोसेक्शुअल्सना एक आणखी फायदा होण्याची शक्यता आहे तो म्हणजे दीर्घायुष्य लाभण्याचा. स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त दीर्घायुषी असतात, पण आता त्यांचे गुण अंगिकारणाऱ्या पुरुषांचे सरासरी आयुष्यमान खरोखरच वाढेल का हे कळण्यास अजून काही वर्षे जावी लागतील. पण तशी शक्यता तर्कसुसंगत नक्कीच आहे.

विभिन्न समाजांमध्ये आणि संस्कृतींमध्ये तसेच विविध कालखंडांमध्ये स्त्री-पुरुषांच्या सामाजिक वर्तणुकींच्या भूमिका कशा होत्या ह्याचे वर्णन करणारी विकिपीडियामधील ही नोंद जिज्ञासूंनी अवश्य वाचावी.


Popular Posts