Saturday, January 25, 2014

ज्ञानात्मकतावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -19


एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये मानसशास्त्र वर्तनाच्या अभ्यासाकडून मनाच्या अभ्यासाकडे सरकले आणि बोधनवाद किंवा ज्ञानात्मकतावाद (कॉग्निटिविझम) हा नवीन अध्ययनसिद्धान्त उदयाला आला. ज्ञानात्मकता वादानुसारही ज्ञान हे शिकणाऱ्याच्या बाहेर अस्तित्वात असते असे मानले आहे. परंतु त्याचा भर मानवी स्मृती ज्ञानग्रहण कसे करते आणि अध्ययनाला कशी चालना देते यावर आहे. शिवाय ह्या विश्लेषणात अध्ययनाच्या स्थिती विचारात घेतल्या जातात, व्यक्तीव्यक्तीमध्ये फरक असून अध्यापन करताना प्रत्येकाला अनुरूप अशी धोरणे अवलंबिणे आवश्यक आहे असाही विचार आहे. वर्तनवादाचा भर वर्तनबदलाच्या उद्दिष्टांवर आहे तर ज्ञानात्मकतावादाचा भर कामगिरीच्या विविध टप्प्यांचे विश्लेषण करण्यावर आहे. नवशिका ते तज्ज्ञ असा प्रवास घडताना येणारे हे टप्पे आहेत.

वातावरणाचा अध्ययनावर सर्वाधिक परिणाम होतो हे गृहीत धरले आहेच पण शिकणारा आपल्या अध्ययनासाठी नियोजन, नियंत्रण आणि मूल्यांकन अशी विशिष्ट प्रकारची धोरणात्मक हत्यारे कशी वापरतो आणि पूर्वज्ञान, श्रद्धा, दृष्टिकोन व मूल्ये ह्यांचा अध्ययनावर कसा परिणाम होतो ह्यावर भर दिलेला आहे. माहितीवर प्रक्रिया कशी होते आणि कशी साठवली जाते तसेच पूर्वज्ञान स्कीमा (अनेकवचन - स्कीमाटा) नावाच्या स्मृती संरचनेत कसे साठवले जाते आणि आवश्यकतेनुसार योग्य संदर्भात आठवून कसे वापरले जाते ह्याचा विचार ज्ञानात्मकतावादात विकसित झाला आहे.

समस्या किंवा गणिते सोडविणे ह्यासारख्या उच्च पातळ्यांवरील अध्ययन पातळ्यांवर अवलंबून असलेल्या गोष्टी ज्ञानात्मकतावादाच्या आधारे स्पष्ट करणे अधिक सोपे आहे कारण गुंतागुंतीच्या समस्यांचे विघटन घटकांमध्ये करून, त्यांची पूर्वज्ञानाशी सांगड घालून नव्या अध्ययनाचे विणकाम कसे होते हे त्याद्वारे दाखवता येते. ज्ञानात्मकतावादावर आधारलेल्या अध्यापन धोरणांमध्ये अध्ययन आशयाची व्यवस्था लावण्यावर भर असतो. माहितीवर प्रक्रिया कशी करावी, माहिती कशी आठवावी, कशी वापरावी ह्याचा त्यात समावेश असतो.   

डेव्हिड ऑसुबेल ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अग्रिम संघटनाची संकल्पना मांडली. शिकण्याच्या प्रक्रियेपूर्वी जी माहिती सादर होते त्याकडे त्याने लक्ष पुरविले. ह्या माहितीची पायऱ्या-पायऱ्यांची रचना केल्यास एका पायरीच्या आधारे वरची पायरी व त्याआधारे आणखी वरची पायरी गाठणे आणि पूर्वज्ञानाशी नव्या माहितीशी सांगड घालणे सुलभ होते असा विचार त्याने मांडला. म्हणजे एखादा पाठ वाचण्यापूर्वी त्यातील महत्त्वाच्या कल्पनांचा सारांश, आशयाचे स्पष्टीकरण, अमूर्ततेच्या किंवा सर्वसामान्यीकरणाच्या आणि समावेशकतेच्या आणखी वरच्या पातळीवर आधीच सादर केल्यास वाचन सोपे होते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचताना आधी ओवीवरील स्पष्टीकरण, अन्वय आणि ओवीचा अर्थ वाचून घेतल्यास ओवी जास्त समजते आणि आवडते. 

रॉबर्ट गॅग्ने ह्या मानसशास्त्रज्ञाने विशिष्ट ज्ञानात्मक किंवा बोधनात्मक प्रक्रियांशी निगडित अशा अध्ययनाच्या नऊ टप्प्यांची कल्पना मांडली. ह्या नऊ टप्प्यांवर अध्ययनस्थिती कशी असते आणि कोणती बौद्धिक कौशल्ये शिकावी लागतात हे सांगितले आहे शिवाय अध्यापन कशा क्रमाने करावे हेही सांगितले आहे. अगोदर अस्तित्वात असलेल्या ज्ञानसंरचनांशी, नव्या ज्ञानाची सांगड शिकणाऱ्याला घालता यावी म्हणून धड्यांचे संघटन ह्या टप्प्यांनुसार करावे असे त्याचे मत होते. अध्ययनासाठी ह्या नऊ पायऱ्या योग्य पातळीत आधार देऊ शकतात असेही त्याला वाटत होते. ह्या नऊ पायऱ्या अशा आहेत :
शिकणाऱ्यांचे लक्ष वेधून घेणे
त्यांना शिकण्याच्या उद्दिष्टांची/फलितांची माहिती देणे
पूर्वीचे ज्ञान आठविण्यासाठी चालना देणे
जो आशय शिकायचा आहे तो प्रेरक स्वरूपात सादर करणे
मार्गदर्शन पुरविणे
अध्यापनातून सूचना देणे आणि आवश्यक कामगिरी करवून घेणे
त्यांच्या कामासंबंधी प्रतिसाद पुरविणे
कामगिरीचे मूल्यनिर्धारण करणे
आशय रुजवण्यासाठी प्रयत्न करणे

ज्ञानात्मकतावादानुसार, अध्ययनात शिकणाऱ्यांची भूमिका अधिक सक्रिय असते आणि अध्ययन प्रक्रियांचे संघटन करीत तो शिकत जातो. ज्ञानात्मकतावादाचा भर माहिती संघटित करण्यासाठी, ती दीर्घस्मृतीत नंतर आठवता येईल अशा रीतीने साठविण्यासाठी शिकणाऱ्यांना मदत करण्यावर आहे. अध्ययनाचे उद्देश/फलित अध्यापक ठरवितो पण विचारप्रक्रिया, अंतर्गत अध्ययन, माहितीचे संघटन, स्वतःवर देखरेख करण्याचे कौशल्य विकसित करणे, सकारात्मक दृष्टिकोन वाढविणे ह्या गोष्टी शिकणाऱ्याने करणे व त्यासाठी अध्यापकाने त्याला मदत करणे अपेक्षित आहे. शिक्षण सुलभ व्हावे म्हणून अध्ययन उद्दिष्टांशी सुसंगत असे पूर्वज्ञान आठवता येईल अशा तऱ्हेचे वातावरण निर्माण करायला हवे असे ज्ञानात्मकतावादाचे गृहीतक आहे. ज्यांना फारसे पूर्वज्ञान नाही अशांना नव्या स्कीमाटा तयार करता याव्यात म्हणून त्यांच्या माहितीतील उदाहरणे देण्याचे कसब शिक्षकाकडे अपेक्षित आहे.

वर्तनवाद म्हणजे काय?- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18


अध्ययन कसे घडते ह्याची मांडणी विसाव्या शतकातील 5 व्या आणि 6 व्या दशकामध्ये वर्तनवादाच्या (बिहेवियरिझम) आधारे केली गेली. "फक्त पाहता येतील (दृश्य) आणि मोजता येतील (मापनीय) अशाच घटकांच्या आधारे शास्त्रीय मांडणी करता येऊ शकते.' हा विचार आधारभूत समजून वर्तनवादाची उभारणी झालेली आहे.


वर्तनवाद समजून घेण्यासाठी मनाचे "अभिसंधान' (कंडिशनिंग) ही पारिभाषिक संज्ञा समजून घ्यायला हवी. आपल्याला आलेल्या अनुभवांचा साठा मनात होत असतो. नंतर येणारा अनुभव, आपण आधी आलेल्या ह्या अनुभवांच्या माध्यमातून घेत असतो. आधीच्या अनुभवांशी नव्या अनुभवाची तुलना करून त्याद्वारे आपण नव्या अनुभवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या परीने हा अर्थ लावलेला नवा अनुभव आणखी एक अनुभव म्हणून मनात साठवला जातो. अशा तऱ्हेने मनाच्या पूर्वीच्या संस्कारित स्थितीमध्ये (पूर्वीचे अभिसंधान) बदल होत जातो आणि त्याला नंतरची संस्कारित स्थिती (नंतरचे अभिसंधान) प्राप्त होते. थोडक्यात असे म्हणता येईल की विशिष्ट वेळी असलेल्या मनाच्या संस्कारित स्थितीला मनाचे त्यावेळचे अभिसंधान असे म्हणता येईल. अर्थातच एखाद्या वेळी असलेल्या मनाच्या मर्यादा आणि क्षमता मनाच्या त्यावेळच्या अभिसंधानानुसार असतात. 


माणसाला बक्षीस देऊन (गाजर दाखवून) किंवा त्याला शिक्षा करून (छडी उगारून) त्याच्या वर्तनात बदल घडवता येतो. वर्तनात हा बदल म्हणजे "अध्ययन' किंवा "शिकणे' होय आणि "गाजर आणि छडी' ह्यांच्या साहाय्याने मनाच्या अभिसंधानात हा अपेक्षित बदल घडवला जातो. हा बदल अभिसंधित होण्यासाठी, शिकलेले दृढ होण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा सकारात्मक ("गाजर') किंवा नकारात्मक ("छडी') बळ दिले जाते. ह्याला अभिसंधानाचे प्रबलन (रीइन्फोर्समेंट) अशी संज्ञा आहे. 
वर्तनवादाशी दोन प्रकारचे अभिसंधान संबंधित असल्याचे मानले जाते. 1) शास्त्रीय अभिसंधान 2) व्यापारक (कार्यप्रेरक) अभिसंधान


1) शास्त्रीय अभिसंधान किंवा क्लासिकल कंडिशनिंगची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण
इवॉन पॉवलॉव ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या रशियन शास्त्रज्ञाने केलेल्या एका प्रयोगाची माहिती घेऊ. कुत्र्याला अन्न दाखविले की त्याची लाळ गळू लागते. त्याचवेळी एक बझर वाजविणे सुरू केले. पुढेपुढे नुसता बझर वाजवला की कुत्र्याची लाळ गळू लागते. दोन नैसर्गिक प्रतिसादांची सांगड घालणारे हे अभिसंधान आहे.


2) व्यापारक (किंवा कार्यप्रेरक) अभिसंधान किंवा ऑपेरंट कंडिशनिंग आपण "स्किनर्स बॉक्स' ह्या प्रसिद्ध प्रयोगाद्वारे समजून घेऊ शकतो. 
बी. एफ. स्किनर ह्या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने ऑपेरंट कंडिशनिंग चेंबर ह्या नावाचे एक उपकरण तयार केले. ह्या चेंबरमध्ये उंदिर किंवा कबुतरे एक कळ दाबून आपले अन्न मिळवण्यास शिकत असत. जर एखाद्या क्रियेच्या प्रतिसादातून बक्षीस मिळत असेल तर ती क्रिया पुन्हापुन्हा केली जाते आणि जर मिळत नसेल तर ती पुन्हा केली जाण्याची शक्यता कमी असते. "सजीव प्राणी, ते करीत असलेल्या क्रियांमध्ये, त्या क्रियांमुळे त्यांना अनुभवास येणाऱ्या परिणामांमुळे, हळूहळू बदल घडवितात' ह्या सिद्धान्तावर हा प्रयोग आधारित आहे. अशा रीतीने, व्यापारक अभिसंधान हे वर्तन आणि त्याचा परिणाम ह्यांची सांगड घालणारे अभिसंधान आहे.


पहिल्या प्रकारचे अभिसंधान हे प्रतिसादात्मक आहे तर दुसऱ्या प्रकारचे अभिसंधान क्रियात्मक आहे.


प्राण्यांवर केलेल्या अशा प्रकारच्या प्रयोगांमधून वर्तनवादी शास्त्रज्ञांनी असे म्हटले की अध्ययन, नेहमी वर्तन आणि त्याचे परिणाम ह्यातील संबंधाने प्रभावित होते. शिक्षक, बक्षिस आणि शिक्षा ह्यांचा वापर करून इच्छित अध्ययन साध्य करण्यासाठी शिकणाऱ्याचे वर्तन अभिसंधित करतो. वर्तनवादी असेही मानतात की अध्ययनासाठी विविध प्रकारचे प्रबलनही आवश्यक आहे. उदाहरणार्थ जर एखादा विद्यार्थी चांगले गुण मिळाल्याने प्रेरित होत असेल तर गुणांचा वापर अशा सकारात्मक प्रबलनासाठी करता येतो. कमी गुण देणे हे नकारात्मक प्रबलन असू शकते, त्याचा वापर केल्यास विद्यार्थी चांगले गुण मिळवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची शक्यता आहे असा हा विचार आहे.

Friday, January 24, 2014

अध्ययन सिद्धान्त - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 17

आजच्या शिक्षकाचे अध्ययन तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान गुणवत्तेच्या ऱ्हासाला कारणीभूत आहे का?
होय. तत्त्वज्ञानाविषयीचे अज्ञान म्हणजे पारिभाषिक अज्ञान नव्हे. परिभाषा माहीत नसली तरी पारंपारिक वारशाने व अनुकरणाने शैक्षणिक तत्त्वज्ञान अंगिकारणे आणि औपचारिक शिक्षणातून परिभाषा व नवीन संकल्पना शिकून घेऊन ते अंगिकारणे असे दोन मार्ग असू शकतात. प्रत्यक्षात दोन्हींची सांगड घातली गेल्यास ते अतिशय योग्य ठरते.
प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत प्रवेश करणाऱ्या असंख्य मुलांना नीट लिहिता वाचता येत नाही असे मध्यंतरी "प्रथम" च्या ""असर' अहवालाने अधोरेखित केले. गेल्या दोन वर्षांमध्ये मुलांच्या लेखन-वाचन करण्याच्या आणि गणिते सोडविण्याच्या क्षमतांमध्ये लक्षणीय घट झाल्याचे हा अहवाल म्हणतो.
शैक्षणिक क्षेत्रात विविध स्तरांवर आणि माध्यमांमधून ह्यावर चर्चा सुरू झाली. शिक्षकांनी वर्तनवादावर आधारित अध्यापनपद्धती सोडून देऊन ज्ञानसंरचनावादी अध्यापनकौशल्यांचा अंगीकार करावा असे म्हणणे सातत्याने पुढे येऊ लागले. परंतु ह्या विविध अध्ययनपद्धती कोणत्या, वर्तनवाद (Behaviourism), ज्ञानात्मकतावाद (Cognitivism) किंवा ज्ञानसंरचनावाद (Constructivism) हे वाद किंवा "-isms' कोणते ह्याबाबत शिक्षकांना संभ्रम पडतो आहे. बीएडच्या/डीएडच्या अभ्यासाच्या वेळी केलेली घोकंपट्टी आता विस्मरणात गेल्याने गोंधळात आणखीनच भर पडलेली आहे. बालमानसशास्त्र आणि त्यावर आधारित ह्या सिद्धांतांचा पसारा खूप मोठा आहे. विविध पारिभाषिक शब्दांचे अर्थ नीट माहीत नसल्यास ह्या अध्ययनपद्धतींविषयी प्रसिद्ध होणाऱ्या साहित्याचे आपल्याला नीट आकलन होत नाही. ह्या सिद्धांतांविषयी तज्ज्ञांकडून किंवा मार्गदर्शकांकडून जाणून घेतल्यास, टिपणे काढल्यास त्याचा नक्कीच लाभ होईल.
सुरुवातीला हा अभ्यास बोजड आणि कंटाळवाणा वाटू शकेल पण तो नेटाने सुरू ठेवल्यास त्याच्या परिभाषेची सवय होईल. ह्या विषयावर ग्रंथालयांमधून आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेले साहित्य वाचण्याची सवय लावून घेतल्यास आपले अध्यापन अद्ययावत राहण्यासाठी मदत होईल.



Friday, July 22, 2011

अनंताची आरती Arati Anantachi

जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू ।
भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।।

भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने ।
दुकूलदोरक करुनि पूजिती अनंत नामानें ।।1।।

नानापरिची पुष्पें द्रव्ये तुजला अर्पीती ।
षोडशपूजा करूनि ब्राह्मण संतर्पण करिती ।।2।।

अपूप वायन दंपतिपूजन त्या दिवशी करिती ।
अनंत संतुष्टोनि देती संतति संपत्ती ।।3।।

रामा धर्मा आचरिता व्रत क्लेशांतुनि सुटला ।
कौंडिण्याने पुजिता तुजला उद्धरिले त्याला ।।4।।

मोरेश्वरसुत वासुदेव हा तिष्ठत सेवेसी ।
संकटकाळी रक्षी अनंता अपुल्या दासासी ।।5।।

Monday, May 30, 2011

शालेय नेतृत्व

"शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या ऊर्जेचा विनियोग समान शैक्षणिक उद्दिष्टांसाठी व्हावा ह्या दृष्टीने सुरू असलेली व्यवस्था म्हणजे शालेय नेतृत्व' अशी विकिपीडियाने शालेय नेतृत्वाची सुंदर व्याख्या केलेली आहे.

"योजकस्तत्र दुर्लभः' ह्या उक्तीप्रमाणे हे सारे घडवून आणणारा समर्थ मुख्याध्यापक लाभणे हे शाळेचे खरे भाग्य असते. हल्ली मुख्याध्यापकाचे पद शिक्षकांना बहुधा निवृत्तीच्या जवळ आल्यावर मिळते आणि काही करून दाखवावे अशी ऊर्मी तोपर्यंत विरून गेलेली असते. त्यातही मुख्याध्यापकाचे पद ग्रहण करणारी व्यक्ती उत्साह टिकवून धरणारी असली तरी शिक्षण खात्याचे निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकारी, शाळेचे सत्तालोलुप विश्वस्तमंडळ आणि चंगळवादाच्या अंमलाखाली असलेले शिक्षक - पालक आणि विद्यार्थी मुख्याध्यापकाची सत्त्वपरीक्षा पाहतात. परिणामी ह्या सर्वांना पुरून मुख्याध्यापकाची सर्जनशीलता शिल्लक उरलीच तर ती "मुख्य अध्यापक' म्हणून खर्च न होता "मुख्य प्रशासक' म्हणून तिचा वेच होण्याची शक्यता जास्त असते.

परंतु विक्रमादित्याच्या सिंहासनाचे जसे स्थानमाहात्म्य असावे तसे मुख्याध्यापकाच्या खुर्चीचे आहे आणि अनेक कर्तृत्ववान शिक्षक त्यांना मिळालेल्या नेतृत्वाच्या संधीचं सोनं करतात आणि आदर्श मुख्याध्यापकीचा वस्तुपाठ घालून देतात. त्यातही अनेक लोकप्रिय आणि ख्यातकीर्त मुख्याध्यापकांनी आपले विचार लिहून प्रसिद्धही केलेले असल्याने ते "पूढिलांना' स्फूर्तिप्रद ठरत आहेत. इंग़्रजी आणि मराठीतही अशी अनेक पुस्तके आहेत. विविध जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबून जाणे मुख्याध्यापकाने कसे टाळावे आणि आपले काम नेटाने कसे पुधे न्यावे ह्याच्या विविध युक्त्या पॉल ब्लूम ह्यांच्या Surviving and succeeding in senior school management: getting in and getting on ह्या पुस्तकात दिलेल्या आहेत.

श्री. ल. ग. घटे ह्यांचे "मुख्याध्यापकी : एक शास्त्र आणि कला' हे हर्ष प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तकही असेच स्फूर्तिप्रद आहे. घटेसरांच्या ह्या पुस्तकाला भारतीय शिक्षण मासिकाचे संपादक श्री. मधुकर पेठे सरांची सुंदर प्रस्तावना आहे. "मुख्याध्यापकांसमोरील जटिल प्रश्न', "शाळेला उठाव आहे हे कसे जाणावे?' "शाळेला उठाव कसा आणावा?' "शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी करावयाचे प्रयत्न' "भावनिक स्पर्श आणि ओलावा निर्मिती' "पैसा मिळवणे व वापरणे' ही ह्या पुस्तकातील काही प्रकरणांची शीर्षके पाहिली तरी पुस्तकाचा आवाका आणि उपयुक्तता ध्यानात येईल.
मुख्याध्यापकाने आपल्या शाळेसाठी नेमके काय करावे ह्याचा खात्रीचा फॉर्म्यूला देता येणे शक्य नाही. पण अशा तऱ्हेच्या पुस्तकांमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळू शकेल.

Tuesday, May 17, 2011

वर्गपाठ किंवा गृहपाठ कसा द्यावा?

सर्वसामान्य शाळांमधून संमिश्र क्षमतेच्या विद्यार्थ्यांचे वर्ग केलेले असतात. ह्या विभिन्न क्षमतेच्या मुलांना एकाच तासिकेत शिकवण्याची कसरत शिक्षकाला करावी लागते. विशेष वर्ग घेतल्याखेरीज विद्यार्थ्यांना क्षमतानिहाय गटांमध्ये शिकवणे शक्य नसते.

परंतु स्वाध्याय देताना शिक्षकांना असे स्वातंत्र्य घेता येणे शक्य आहे. Assignment Tiering च्या तंत्राचा विचार आणि उपयोग शिक्षकांनी अवश्य करावा.
विद्यार्थ्यांना शिक्षकाने जे शिकवले आहे त्याचे दृढीकरण व्हावे हा वर्गपाठ किंवा गृहपाठ देण्यामागील मुख्य उद्देश असतो. विद्यार्थ्याने हा अभ्यास स्वखुशीने आणि प्रामाणिकपणे केल्यास त्याला हा लाभ अधिक चांगल्या रीतीने मिळतो.

Assignment Tiering करणारे शिक्षक एकाच धड्यावर तीन ते चार प्रकारचे वर्गपाठ/गृहपाठ तयार करतात. प्रत्येक आवृत्तीची काठिण्यपातळी वेगवेगळी असते. विद्यार्थ्याला जी आवृत्ती आवडेल ती घेऊन त्यातील स्वाध्याय सोडविण्याची मुभा दिली जाते.

- स्वाध्याय स्वतः निवडल्याने तो प्रामाणिकपणे पूर्ण करण्याकडे विद्यार्थ्याचा कल असतो.
- विद्यार्थ्याने स्वतःला झेपेल अशी पातळी निवडल्याने जास्त यश त्याच्या पदरी पडते व अशा यशाची त्याला चटक लागते.
- हुशार विद्यार्थी जास्त कठीण पातळीचा स्वाध्याय निवडणे प्रतिष्ठेचे मानतात आणि त्यांच्या क्षमतांना आव्हान मिळाल्याने अभ्यासातील त्यांचे स्वारस्य वाढते.

अर्थातच ह्यासाठी शिक्षकाला थोडी जास्त तयारी करावी लागते.

- ह्या उपक्रमासाठी शालेय पातळीवर सर्वसंमत धोरण असणे फायदेशीर असते. शिक्षक प्रतिनिधींच्या मार्फत शाळा संचालन समितीची मान्यता घेता येते. विशेषतः मुद्रणासाठी जो थोडाफार जास्तीचा खर्च येतो त्यासाठी पूर्वसंमती घ्यावी.
- उपक्रमाच्या उद्दिष्टांबाबत पालकांना विश्वासात घेणे इष्ट असते.
- एकाच पाठावर विविध काठिण्यपातळी असलेले उपयुक्त स्वाध्याय कसे तयार करावेत ह्याचे तंत्र शिकून त्याचा सराव शिक्षकांना करावा लागतो. 
- कमीत कमी वेळात स्वाध्यायाच्या जास्तीत जास्त आवृत्त्या आणि प्रती तयार करण्याचे काम हातावेगळे कसे करावे हे सरावाने जमू लागते.
- विविध आवृत्त्यांच्या पुरेशा प्रती तयार ठेवाव्या लागतात आणि कोणता विद्यार्थी कशा प्रकारचे स्वाध्याय निवडतो आहे ह्याकडे बारकाईने लक्ष ठेवावे.
- ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागलेली आहे अशांकडे वैयक्तिक लक्ष पुरवून त्यांना अधिकाधिक आव्हानात्मक स्वाध्याय सोडविण्यास उद्युक्त करावे.

Tuesday, December 21, 2010

ये दुख सहा ना जाए ...

तरुण गायकांचं गाणं जोरकस असतं, ताजंतवानं असतं आणि जेव्हा ते सवाई गंधर्व संगीत महोत्सवासारख्या प्रतिष्ठेच्या स्वरमंचावर गातात तेव्हा अर्थातच तयारीचंही असतं. पण त्यात मध्यमवयीन गायकाच्या गाण्यात आढळणारं "दर्द' जाणवत नाही. की ही केवळ आपली एक समजूत आहे?
भाबडेपणा कमी असलेले आणि लोकप्रिय मतप्रवाहात सहजासहजी वाहून जाण्यास तयार नसलेले अनेक लोक अशा गोष्टी मान्य करीत नाहीत. तासंतास घोटल्याने गाण्यात दर्द उतरेल ही समजूतही अनेक विचारवंतांना मान्य नाही. गुरुची लहर म्हणून शिष्याने अघोरी रियाझ करण्याला अर्थ नाही, त्यामुळे फायद्यापेक्षा तोटाच अधिक होतो असे ते मानतात.
हुकमी कारुण्य किंवा दर्द गाण्यात आणण्याचा काही फॉर्म्युला आहे का? (किंबहुना फॉर्म्युलाच आहे आणि ज्याला तो चांगला जमला तो आपल्याला दर्दी वाटतो, असे आहे का? ). स्वभावोक्ति करणारे गाण्याचे नेमके शब्द, आवाजाचा विशिष्ट लगाव, कातरता दर्शविणारा कंप, आणि एखाद्या संस्कृतीच्या परंपरेत अशा दर्दी भावनांशी जोडले गेलेले विशिष्ट स्वर किंवा तशा मानल्या गेलेल्या विशिष्ट स्वरावली यांचे रसायन जुळून आले की इच्छित परिणाम साधला जातो असे हे मत आहे. पण हे रसायन जमवून आणण्याची हातोटी साध्य करणे ह्यालाच तर तपश्चर्या म्हणत नसावेत ना?  
अलिकडेच  ऍटलांटिक मंथलीमध्ये '3rd minor' ची महती सांगणारा ह्याच विषयावरचा लेख वाचनात आला होता. सायंटिफिक अमेरिकनमधील एका अहवालाचाही त्यात हवाला देण्यात आलेला आहे. लोकसत्तेमध्येही (२८ सप्टेंबर २०१०) अरुण पुराणिक ह्यांनी ‘स्वरसम्राज्ञीच्या श्रेष्ठत्वाचा मागोवा’ ह्या लता मंगेशकर ह्यांच्यावरील गौरवपर लेखात कोमल गांधाराचा उल्लेख केलेला आहे. अर्थातच हे स्वर नेहमीच करुण रसाशी निगडित असतात असे नाही. प्रतिभाशाली संगीतकार त्यांचा वापर इतर इतर रसांच्या परिपोषासाठीही करतात.
काही गाणी, काही बंदिशी त्यातल्या काव्याचा परिपोष सुयोग्य संगीतामुळे झाल्यामुळे असेल, पण पछाडत राहतात. भीमसेनजींनी उस्ताद रशीदखान ह्यांना केलेल्या फर्माईशीवरून त्यांनी सादर केलेली "याद पिया की सताए', पं. राजन साजन मिश्रा ह्यांनी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या उस्ताद अल्लारखां ह्यांना अर्पण केलेली रूपक तालातली "ख्वाजा मुइनुद्दिन पीर अजमेरवाले',  ह्या बंदिशी कदाचित त्यांच्या प्रासंगिक संदर्भामुळे असेल पण नेहमी आठवत राहतात. "याद पिया की सताए' तर कित्येकांनी चांगली गायलेली आहे. अलिकडे कौशिकीने गायलेली आहे, वडाली बंधूंनीही गायलेली आहे. पण...
पछाडणाऱ्या गाण्यांविषयी "माझिया मना' ह्या ब्लॉगवर सौ. अपर्णा संखे ह्यांनी एक चांगली मालिका लिहिलेली आहे ती अवश्य वाचावी. चंद्रशेखर महामुनी ह्यांनीही आर्त गाण्यांवर सुंदर लेख लिहिलेला आहे. बेगम अख्तर ह्यांच्याविषयी लिहिताना धनंजय ह्यांनी "दंश'  नावाची बोरकरांची कविता उद्‌धृत केलेली आहे. 'Thy tooth is not so keen..' असे झोंबऱ्या वाऱ्याला शेक्सपिअर सांगतो त्याची आठवण झाली.
कदाचित काही एक वयानंतर गायकाला माणसाच्या कृतघ्नपणाचा अनुभव आला की मगच असा "दंश' तुलनेने सुसह्य होत असावा आणि गाण्यात तो दर्दीला आविष्कार होत असावा. बेगम अख्तर ह्यांनी गायलेली ही गझल माझ्या मित्राने तो मृत्यूशय्येवर असताना मला ऐकवली होती आणि ती विसरणे खरोखरच अशक्य आहे.




Popular Posts