Disclaimer: The reader should understand that the information provided in this blog does not constitute legal, medical or professional advice of any kind. All warranties, liabilities, express or implied, are hereby disclaimed
Sunday, September 11, 2016
मराठीने नुक्ता स्वीकारावा
विनोबांनी गीताईच्या आवृत्त्यांमध्ये नुक्त्याचा वापर केला आहे त्याची आठवण झाली. गीता प्रवचनांच्या अनेक देशी भाषांमधील आवृत्त्या त्यांनी देवनागरीत मुद्रित केल्याचीही आठवण झाली. देवनागरीमध्ये असल्याने बंगाली, गढवाली (मला येथे नुक्ता टाईप करता येत नाही, क्षमस्व!) आवृत्ती मी वाचू शकलो. पूर्वी गिरगिट ह्या ट्रान्स्लिटरेशन टूलमध्ये इतर भारतीय भाषांमधील वेबपेजिस् देवनागरीमध्ये वाचता येत असत. सध्या दुसरे एखादे असे टूल आहे का हे माहीत नाही.
डमरूतील ड आणि झाडातील ड वेगळे आहेत ही गोष्ट मला नवीन आहे. उच्चारस्थाने वेगळी आहेत का? डमरूतील ड अधिक दन्त्य आहे का? की भेद फक्त स्वरामध्ये/ स्वराघातामध्ये आहे? हिन्दीतील् ड प्रमाणे नुक्ता असलेला ड फ्रिकेटिव आहे का? ही माहिती विस्ताराने मिळण्यासाठी संदर्भ शोधायला हवेत. मराठी शब्दांचे उच्चार देणारा सोवनींचा पाच खंडांचा अभिनव मराठी शब्दकोश पाहण्यात आला होता. तोही पुन्हा पाहून घेतो.
कैलाशचंद्र भाटिया ह्यांचे हिंदी की मानक वर्तनी हे पुस्तक वाचल्याचे आठवते. वरील लेखाने कुतूहल चाळवल्याने ते पुन्हा वाचावे असे वाटू लागले आहे. हिंदी वर्तनीसाठीही एखादा आदर्श संदर्भ शोधायला हवा.
Monday, January 11, 2016
अध्यापकाची आणि अध्यापनाची गुणवत्ता - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 23
- शिक्षकाची गुणवत्ता आणि शिकवण्याची गुणवत्ता ह्यात फरक आहे आणि जर विद्यार्थ्यांचे अभ्यासातले यश आपल्याला सुधारायचे असेल तर ह्या दोन्ही गुणवत्तांची गरज आहे.
- 'शिक्षकाची गुणवत्ता' म्हणजे शिक्षक वर्गामध्ये जे ज्ञान, कौशल्य आणि वातावरण आणतो त्याची गुणवत्ता.
- 'शिकवण्याची गुणवत्ता' ही अधिक समावेशक संकल्पना आहे. त्यामध्ये संपूर्ण शाळा किंवा एखाद्या राज्याच्या शिक्षणप्रणालीचा अंतर्भाव होतो. संपूर्ण दिवसभर, वर्षानुवर्षे सर्व शिक्षकांतर्फे जे शिकवले जाते त्याची सर्वसाधारण गुणवत्ता असा त्याचा अर्थ आहे. शिकवण्याची गुणवत्ता उत्तम असेल तर तो शाळेच्या संघटनात्मक यशाचा परिणाम असतो.
- उच्च गुणवत्तेचे शिक्षक अशा व्यवस्थेमध्ये उच्च गुणवत्तेचे शिक्षण देऊ शकतात. त्यांची गुणवत्ता फुकट जात नाही.
- फक्त शिक्षकाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले तर आपण एका व्यक्तीवर लक्ष केंद्रित करीत असतो, व्यवस्थेवर नाही. मी चांगली शिक्षिका असूनही मला शिकवण्याचे काम चांगले करता येऊ नये असे दोष व्यवस्थेमध्ये असू शकतात.
- थोडक्यात, शिक्षकाची गुणवत्ता म्हणजे व्यक्तीची गुणवत्ता जोपासली जाण्यासाठी दर्जेदार व्यवस्थेचे पाठबळ असणे फार महत्त्वाचे आहे.
Saturday, September 12, 2015
वर्गव्यवस्थापनाचे महत्त्व. शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 22
अध्ययनप्रक्रियेत वर्गव्यवस्थापनाचे वेगळे असे सैद्धान्तिक महत्त्व आहे का?
शिक्षकाकडे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी, विशेषतः माध्यमिक शाळेमध्ये मर्यादित वेळ असतो. शिक्षक पाठनियोजन करून तासिकेच्या मर्यादित वेळेत पाठ शिकवण्याचे उद्दिष्ट ठेवून वर्गात येतो. पाठनियोजनात यशस्वी वर्गव्यवस्थापन आणि वर्गाचे सहकार्य गृहीत धरलेले असते. प्रत्यक्षात वर्गाचे व्यवस्थापन नीट झाले नाही तर वेळ फुकट जातो आणि पाठनियोजन कोलमडते. म्हणून वर्गव्यवस्थापन महत्त्वाचे असते.
परंतु वर्गव्यवस्थापनाचा संबंध केवळ असा तांत्रिक आणि शिस्तीच्या अंगाने जाणाराच आहे असे नाही. वर्गामध्ये इतर विद्यार्थ्यांसमवेत शिकणे ही एक अध्ययन पद्धत आहे. सध्याच्या डी-स्कूलिंगच्या जमान्यात विद्यार्थी घरी एकट्याने /पालकांसमवेत शिकतात. एखाद्या शिक्षकाने चार-पाच विद्यार्थ्यांना झाडाखाली त्यांच्या आवडीचा विषय शिकवणे अशी शांतिनिकेतन शैलीची अध्ययन शैलीही असू शकते. सामाजिक संदर्भ आणि सामाजिक साहचर्य ह्या अध्ययनाला पोषक गोष्टी आहेत हा विचार वर्गांमध्ये अध्ययन/ अध्यापन होण्यामागे मूलतः गृहीत धरलेला आहे. सोयीचा विचार नंतरचा आहे.
शिकणारा विद्यार्थी सामाजिक संदर्भाशी जुळवून घेत असताना त्याचे आत्मकेंद्री भान विरते आणि शिकण्याची क्रिया घडते. आत्मकेंद्रित्व शिकण्याच्या आड येत असते. वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या सहवासामुळे सामाजिक संदर्भ आणि समन्वय अनिवार्य ठरून आत्मकेंद्रित्वाचा प्रभाव कमी होतो आणि अध्ययन अनायासे घडून येण्यास मदत होते असा हा विचार आहे. प्राचीन भारतीय परंपरेतही दोघांनी करायचा तो अभ्यास आणि एकट्याने करायचे ते तप असे म्हटले आहे. वर्गाची जोपासना एक सामाजिक आकृतिबंध म्हणून करणे शिक्षकासाठी हितावह असते.
“वर्गशिक्षक”, वर्गाची म्हणून असलेली एक अस्मिता (“आमचा वर्ग”,’ “आमच्या मॅडम” ) ह्या गोष्टी वर्ग हा एक अध्ययनगट म्हणून सिद्ध होण्यासाठी मदत करतात. अर्थातच “वर्ग” ह्या संकल्पनेकडे एक समूह म्हणून न पाहता एक अध्ययनशैली म्हणून पाहिले तर अध्ययनाला पोषक असे वर्गव्यवस्थापन सोपे होईल. शिस्तीच्या किंवा तांत्रिक अंगाने वर्गाचे व्यवस्थापन करतानाही वर्ग ही मूलतः एक अध्ययनप्रणाली आहे हे भान शिक्षकाला असणे इष्ट आहे.
शिक्षकाची जबाबदारी अशी आहे की “हा आपला वर्ग...” “आपण शिकतोय’’” असे वातावरण निर्माण करावे.
“माझा वर्ग...” आणि “तुम्ही शिकताय...” असे वातावरण नको.
“सहनाववतु..” हा मंत्र आहे.
Tuesday, May 26, 2015
दगडफोड्याची गोष्ट
लहानपणी “सोनसाखळी” नावाचं साने गुरुजींच्या गोष्टींचं एक पुस्तक माझ्याकडे होतं (स्मरणशक्ति दगा देत नसावी). त्या पुस्तकात एक दगडफोड्याची गोष्ट होती.
-----
एक दगडफोड्या होता. भर उन्हात घामानं निथळत दगड फोडत होता. वरून निर्दयपणे तळपणाऱ्या सूर्याकडे त्यानं पाहिलं. आणि सुस्कारा सोडून काम करीत राहिला. मनात म्हणू लागला, “हा सूर्य माझ्यापेक्षा किती मोठा आहे. मीही असा सूर्य असतो तर किती बरं झालं असतं”
त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला सूर्य व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” दगडफोड्यानं डोळे मिटून उघडले.
पाहतो तो काय, तो सूर्य झाला होता!
कौतुकानं तो खाली पाहू लागला. तळपता तळपता सर्वांना भाजून काढू लागला. झाडंझुडपं सुकू लागली, नद्या नाले आटू लागले. आपल्या प्रचंड सामर्थ्याचा धाक सूर्य सर्वांना दाखवू लागला.
आभाळात एक छोटा ढग आला. पाहता पाहता काळा झाला. मोठा झाला. त्यानं सूर्याला झाकून टाकलं. खाली काय चाललंय हेही सूर्याला दिसेना आणि कळेना. सूर्य मनात म्हणून लागला, “हा ढग माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा ढग असतो तर किती बरं झालं असतं”
त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला ढग व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” सूर्यानं डोळे मिटून उघडले.
पाहतो तो काय, तो एक काळा कुट्ट ढग झाला होता. सूर्याला झाकून टाकून लवकरच तो बरसू लागला. धो धो पावसामुळे खाली सर्व माणसांची आणि पशुपक्ष्यांची गाळण उडाली. नद्यांना पूर आला. ढग गर्वाने खाली पहात बरसतच राहिला. आपल्या सामर्थ्यावर खूष झाला. ढग सैरावरा पळणाऱ्या सृष्टीकडे पहात असताना एक दगड त्याला निर्विकारपणे बसलेला दिसला. त्याच्यावर ढग त्वेषाने बरसला. पण दगड तसाच ढिम्म होता. ढग निराश झाला. त्याच्या मनात आलं, “हा दगड माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगड असतो तर किती बरं झालं असतं”
त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “तुला दगड व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” ढगानं डोळे मिटून उघडले. तो आता पावसात मजेत भिजणारा ढग झाला होता. निर्विकारपणे ढिम्म बसून होता.
काही दिवसांनी तेथे एक दगडफोड्या आला. ह्या दगडावर घणाचे घाव घालू लागला. दगडाचे तुकडे उडू लागले, त्याला भेगा पडू लागल्या. दगड कळवळला. मनात म्हणू लागला, “हा दगडफोड्या माझ्यापेक्षा मोठा दिसतो. मी असा दगडफोड्या असतो तर किती बरं झालं असतं”
त्याचवेळी इष्टदेवता त्याच्यासमोर उभी राहिली आणि म्हणाली, “अरे दगड्या, तुला का दगडफोड्या व्हायचे आहे? मीट डोळे आणि उघड” दगडाने डोळे मिटून उघडले. तो पुन्हा पहिल्यासारखा दगडफोड्या झाला होता.
----
ह्या गोष्टीची अनेक तात्पर्ये सांगता येतील. अनेकप्रकारे दृष्टांत म्हणून या गोष्टीचा वापरही करता येईल. काही गोष्टी मनात घर करून राहतात त्यातलीच ही गोष्ट आहे. भावनांना हात घालणारी नाही पण तरीही अंतर्मुख करणारी.
Sunday, April 13, 2014
रंग आणि त्यांच्या छटा सांगणारे मराठी शब्द
चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ब्लू अशा रंगछटा भेटीला येत तेव्हा मराठीतून अशा प्रमाणित रंगछटा का वर्णिल्या जाऊ नयेत असे मला वाटत असे. मराठीत असे नेमकेपणाने लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती (मुळातून मराठीमध्येच लिहिण्याबोलण्याची प्रवृत्ती) कमी होत असताना हा प्रश्न अधिकच सतावू लागला आहे. आपल्या भाषेच्या ह्या सुंदर अंगाकडे आपण दुर्लक्ष करून सुखद शब्दांचा खजिना गमावतो आहोत असे वाटते. मित्रांकडे आणि ओळखीच्या चित्रकारांकडे मी नेहमी हा प्रश्न काढतो.
जाहिरातीची एक क्लृप्ती म्हणून अलिकडे गाड्यांना दिल्या जाणाऱ्या रंगांसाठी नवे अनवट शब्द "कॉइन' झालेले कानावर पडतात. स्त्रियांच्या साड्यांच्या वेडामुळे रंगछटांचे काही शब्द मात्र आवर्जून मराठीत वापरले जाताना दिसतात. सामान्यतः फुलांच्या, पदार्थांच्या, पशुपक्ष्यांच्या नावांचा वापर नेमक्या रंगछटांचे वर्णन करण्यासाठी केलेला आहे.
श्री. मारुती चितमपल्ली ह्यांनी त्यांच्या आईच्या वापरातील शब्दसंपत्तीसंबंधी आपल्या "चकवा-चांदणं' ह्या आत्मचरित्रात लिहिले आहे ते माझ्या आईने नुकतेच माझ्या निदर्शनाला आणले; ""डाळिंबी, मनुका, कथ्या, जास्वंदी, लाल, शेंदरी, गुलाली, मेंदी, गव्हाळी, जांभा, पोवळा, शरबती या तांबड्या रंगाच्या छटा; जिलेबी, लिंबू,सायी, चांदणी, सोनेरी, केशरी, केतकी ह्या पिवळ्या रंगाच्या छटा. लिंबोळी, पोपटी, शेवाळी ह्या हिरव्या रंगाच्या छटा. अस्मानी आणि आनंदी ह्या निळ्या रंगाच्या छटा. निळ्या रंगाला "आनंदी' हा किती अपरूप शब्द. अंजिरी, बैंगणी आणि मावा ह्या जांभळ्या रंगाच्या छटा. काळा करवंदी, बुक्का रंग, शिसवी, चंद्रकळा ह्या काळ्या रंगाच्या छटा. दुधिया, मोतिया आणि चांदी ह्या पांढऱ्या रंगाच्या छटा. गवळा, हरणा, कोसा, कवडी, मठ्ठ, मिसरी, मोरपंखी, राखी, अबोली ही रंगांची मिश्रणं...''
त्यानंतर आमच्या घरात काही काळ सगळ्यांना असे शब्द शोधण्याचं वेडच लागलं. माझे मुलगे माझी पत्नी आणि सून सगळेजण कामाला लागले. आम्हाला फारशी मजल गाठता आली नसली तरी जे काही शब्द जमा झाले त्यांची यादी ही अशी आहे :
राखाडी, विटकरी, तपकिरी, हळदी, मोरपिशी, लिंबू, पारवा, आकाशी, अंजिरी, कुसुंबी, वांगी, लाल, किरमिजी, तांबडा, शेंदरी, नारिंगी, अबोली, केशरी, कोनफळी, दुधी, मोतिया, सोनेरी, रुपेरी, चंदेरी, जास्वंदी, डाळिंबी, पोपटी, राणी, करडा, भुरा, कबरा, पिवळा, निळा, बदामी, गुलबाक्षी, जांभळा, हिरवा, शेवाळी, गुलाबी, मेंदी, चटणी, खाकी, भगवा, पिस्ता, अबिरी, गव्हाळी, पांढरा, पिरोजी...
आणखी एक महत्त्वाचे काम आहे ते म्हणजे ह्या रंगांच्या प्रत्यक्ष छटा आणि शब्द ह्यांच्या जोड्या जुळवण्याचे. तो खरा दस्तऐवज होईल. ह्या आणि ह्या संकेतस्थळावर इंग्लिशसाठी असे काम केलेले दिसेल. मराठीसाठी असा प्रयत्न ह्या संकेतस्थळावर केलेला आढळतो पण त्यासाठी जाणकार मराठी भाषकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे . अर्थात संगणकीय प्रणालींच्या मर्यादा विचारात घेता ह्या छटा किती नेमकेपणाने दिसतात हा प्रश्न आहेच. रंगछटांचे वर्णन करणारे शब्द कसे तयार होतात आणि त्यांचे अर्थ कसे होतात ह्याचे विवेचन जिज्ञासूंना ह्या संकेतस्थळावर पाहता येईल.
Sunday, February 2, 2014
अध्ययनसिद्धान्तांचा सारांश - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -21
अध्ययनसिद्धान्तांचा सारांश काय सांगता येईल? सध्या कोणता सिद्धान्त वापरणे इष्ट आहे?
आपण कसे शिकतो ह्याबाबत अध्ययनविषयक प्रत्येक सिद्धान्त काही महत्त्वाचे ज्ञान देतो. ह्याचाच परिणाम आपण कसे शिकवतो यावर होत असतो. वरील तिन्ही प्रकारच्या सिद्धान्तांच्या समन्वयाने आपण विद्यार्थ्यांना शिकण्याचा चांगला अनुभव कसा देऊ शकू ह्याचे धोरण आखता येईल.
वर्तनवादाला हल्ली फार चांगले समजले जात नाही कारण तो शिक्षककेंद्री आहे आणि अध्ययन त्यात सक्रियतेने होते असे मानलेले नाही. परंतु शिक्षणाची उद्दिष्टे कशी गाठावी, अभ्यासक्रमाची रचना कशी करावी आणि उच्च पातळीवर विचारक्षमता विकसित करण्याचे तंत्र कसे राबवावे हे त्याने शिकवले आहे. क्षमताधिष्ठित शिक्षणाचा पाया त्यातून घातला गेला आहे आणि अध्ययन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ब्लूम्स टॅक्सॉनॉमीसारखे क्षमतांचे वर्गीकरण सिद्ध झाले आहे. ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण आणि मूल्यांकन अशा बौद्धिक वर्तनाच्या पातळ्यांचे हे वर्गीकरण आहे. त्यातून वर्तनाची उद्दिष्टे तयार झाली आणि ह्यापैकी प्रत्येक पातळीसाठी कोणती क्रियापदे वापरून अध्ययन लक्ष्ये साध्य करावी ह्याचे आडाखे शिक्षकांना बांधता येऊ लागले.
विद्यार्थी इच्छित गोष्टी शिकले आहेत की नाही ह्यावर आजच्या स्पर्धात्मक शैक्षणिक वातावरणात भर दिला जात असल्याने आपण अध्ययन उपक्रमांची रचना कशी करावी ह्यात वर्तनवादाचे योगदान महत्त्वाची भूमिका बजावीत आहे.
मनाचे कार्य कसे चालते हे समजून घेण्यात ज्ञानात्मकतावादाचा प्रभाव आहेच. स्मृतीची संरचना समजून घेण्यास आणि माहितीवर प्रक्रिया होऊन ती कशी साठवली जाते हे आपल्याला ज्ञानात्मकतावादाच्या आधारे समजले. अभ्यासाचा आशय कसा तयार केला जातो आणि तो विद्यार्थ्यांपर्यंत अध्ययनाला मदत होण्यासाठी कसा पोहोचवला जातो ह्यावर ज्ञानात्मकतावादाचा प्रभाव आहे. पाठ्यपुस्तकांमध्ये शीर्षके, उपशीर्षके, कल्पनाविस्तार अशी तर्कसंगत भागांमध्ये आशयाची विभागणी केलेली दिसते. साध्या पातळीपासून क्लिष्ट पातळीपर्यंत क्रमाक्रमाने ज्ञानप्राप्ती होण्यासाठी अध्ययन सामग्रीची मांडणी केलेली असते.
अखेरीस रचनावादाने शिकणाऱ्याला अध्ययन प्रक्रियेतील सक्रिय सहभागी मानून एक साकल्यवादी दृष्टिकोन दिलेला आहे. वाचणे, व्याख्यान देणे आणि चाचण्या घेणे ह्याऐवजी अध्यापन आता अधिक संवादात्मक झाले आहे. आपल्याला जे माहीत आहे ते मांडणे. त्यावर सहाध्यायींची आव्हाने आणि आक्षेप स्वीकारून त्यांना उत्तरे देण्याचा प्रयत्न करणे ह्यातून विचारातला उणेपणा शिकणाऱ्याला उमगत जातो. त्याचा दृष्टिकोन बहुआयामी होतो. (शिकणाऱ्याने स्वतःच अध्ययन उद्दिष्ट ठरविणे अध्ययन कितपत शक्य आहे आणि योग्य आहे असा प्रश्न अर्थातच उरतो.)
सारांशाने हे तिन्ही सिद्धान्त पाहू :
वर्तनवाद (एकोणीसशे पन्नास आणि साठची दशके)
अभ्यास - निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनाचा.
ज्ञान - व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात असते - वर्तनात बदल करून मिळवले जाते,
अध्ययन - छडी आणि गाजर अशा सकारात्मक आणि नकारात्मक प्रबलनातून अभिसंधित होणारे वर्तनातील बदल,
संशोधन - पावलॉवचे शास्त्रीय अभिसंधान - स्किनरचे व्यापारक अभिसंधान,
अध्ययनाचे प्रकार - तथ्ये आठवणे, संकल्पनांची व्याख्या करणे, स्पष्टीकरण देणे, कार्यपद्धती,
विद्यार्थी - अक्रिय,
अध्यापनाचा भर - शिक्षककेंद्री, वर्तनात बदल करण्याची क्षमता, वर्तनाच्या उद्दिष्टांचा वापर, फलितावर आधारित.
अध्यापन धोरणे - वर्तनात्मक उद्दिष्टे, ब्लूम्स टॅक्सोनॉमी, सराव आणि घोकंपट्टी
ज्ञानात्मकतावाद (एकोणीसशे साठ आणि सत्तरची दशके)
अभ्यास - मनाचा
ज्ञान - व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात असते - माहितीवर प्रक्रिया करून मिळवले जाते,
अध्ययन - नियोजन, संनियंत्रण आणि मूल्यांकन ह्याद्वारे स्मृतीसंरचनेत बदल. श्रद्धा, दृष्टिकोन आणि मूल्ये अध्ययनावर परिणाम करतात ह्यास मान्यता.
संशोधन - डेव्हिड ऑसुबेलचे अग्रिम संघटन - गॅग्नेच्या नऊ अध्यापन पायऱ्या
अध्ययनाचे प्रकार - समस्या सोडवणे, क्लिष्ट समस्यांचे लहान घटकांमध्ये विघटन करणे
विद्यार्थी - सक्रिय,
अध्यापनाचा भर - शिक्षककेंद्री, आशयाचे संघटन, अध्ययनाच्या पायऱ्या रचणे
अध्यापन धोरणे - अग्रिम संघटने, अध्यापनाच्या नऊ पायऱ्या
रचनावाद (एकोणीसशे ऐंशीचे दशक)
ज्ञान - व्यक्तीच्या बाहेर अस्तित्वात नसते तर ती व्यक्ती पर्यावरणाशी कशा आंतरक्रिया करते आणि जगाचा अनुभव घेते ह्याच्या आधारे त्याची रचना केली जाते.
अध्ययन - शिकता शिकता पूर्वज्ञानाचे, श्रद्धांचे आणि अनुभवांचे एकात्मीकरण करताना विद्यार्थी ज्ञानाची आणि अर्थाची रचना करतात
संशोधन - पिआजे ह्यांचा बोधनात्मक रचनावाद. वायगोत्स्कींचा सामाजिक रचनावाद
अध्ययनाचे प्रकार - घटकांऐवजी साकल्यावर भर
विद्यार्थी - सक्रिय, समाजाभिमुख
अध्यापनाचा भर - शिक्षक सुविधाकाराच्या भूमिकेत, वास्तव जीवनामध्ये कौशल्य आणि ज्ञान ह्यांच्या एकात्मीकरणावर भर, अध्ययन अनुभवाच्या पायऱ्या रचणे, ज्ञानाची समाजाभिमुख रचना
अध्यापन धोरणे - सक्रिय अध्ययन धोरणे, चिकित्सक विचारासाठी धोरणे, चिंतनासाठी धोरणे
Saturday, February 1, 2014
ज्ञानसंरचनावाद किंवा रचनावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -20
रचनावाद (कन्स्ट्रक्टिविझम) ऐंशीच्या दशकात लोकप्रिय झाला. ह्या सिद्धान्तानुसार अध्ययन ह्या प्रक्रियेत ज्ञानाची आणि अर्थाची रचना विद्यार्थी/शिकणारा करतो. त्यासाठी तो पूर्वज्ञान, श्रद्धा आणि अनुभव ह्यांचे एकात्मीकरण करतो. ह्या सिद्धान्ताचे आधीच्या सिद्धान्तांपेक्षा मुख्य वेगळेपण असे की ह्यात ज्ञान व्यक्तीच्या बाहेर नसते असे मानले जाते. जगाच्या अनुभवातून आणि वातावरणाशी होणाऱ्या व्यवहारातून ज्ञान व्यक्ती आपल्या स्वतःमध्ये रचते असा विचार यात मांडलेला आहे. रचनावादाचा भर वातावरणावर नियंत्रण ठेवण्यावर नाही. त्याऐवजी ज्ञान आणि कौशल्ये ह्यांचे संश्लेषण/ एकात्मीकरण व्यक्तीच्या अनुभवात होण्यावर येथे भर आहे. येथे इतर सिद्धांतांप्रमाणे स्वतंत्र घटकांवर भर नसून अखंड एकात्मतेवर भर आहे.
रचनावादाचे दोन प्रकार आहेत : बोधनात्मक रचनावाद आणि सामाजिक रचनावाद. बोधनात्मक रचनावादाचा भर शिकणाऱ्या व्यक्तीच्या वैयक्तिक गुणांवर आणि शिकण्यावर त्यांचा जो परिणाम होतो त्यावर आहे. सामाजिक रचनावादाचा भर सामाजिक देवघेवीतून / आंतरक्रियांमधून अर्थ आणि समज ह्यांची निर्मिती कशी होते यावर आहे. दोन्हींचा दृष्टिकोन आत येणारी माहिती व्यक्तीच्या खास त्याच्या अशा भिंगातून कशी पाहिली जाते आणि तिचा अर्थ लावून ज्ञानसंपादन कसे होते हे पाहण्याचा आहे. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, श्रद्धा, संस्कृती आणि अनुभव ह्यातून ह्या भिंगाची घडण होते. हा जो अर्थ लावला जातो त्यानुसार शिकणाऱ्या व्यक्ती स्कीमाटांची रचना करतात आणि त्यांच्याद्वारे त्यांना काय माहीत आहे हे व्यक्त करतात.
ज्यां पिआजे ह्यांनी बोधनात्मक रचनावादाचा सिद्धान्त मांडला. ज्ञान केवळ एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रामित करता येणे शक्य नाही असे ते म्हणतात. ज्ञान अनुभवातूनच शिकावे लागते. अनुभवातून व्यक्ती मानसिक प्रारूपे किंवा स्कीमाटांची रचना करतात आणि ज्ञानाची रचना अशा एकत्र केलेल्या आणि सामावून घेतलेल्या स्कीमाटांमधील बदलांवर आधारित असते. जर आत येणारी माहिती आधीच आत असलेल्या माहितीशी संबंधित असेल तर आधीच अस्तित्वात असलेल्या स्कीमांमध्ये ती एकत्र केली जाते. जर येणारी माहिती आधीच अस्तित्वात असलेल्या माहितीच्या विरोधात असेल तर विसंवाद निर्माण होतो आणि व्यक्तीला एकाच वेळी परस्परविरोधी कल्पनांचा विचार करावा लागतो. ह्याव्यतिरिक्त आपण आणि आपल्या पर्यावरणामध्ये क्रियांची जी देवाणघेवाण होते त्यावर शिक्षण किंवा अध्ययन आधारित असते असे पिआजे ह्यांचे मत आहे. म्हणूनच वास्तव जगातील अनुभव शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा आहे.
सामाजिक रचनावादामध्ये अध्ययनाच्या सामाजिक स्वरूपावर भर आहे. लेव वायगोत्स्की ह्यांच्या प्रतिपादनानुसार अध्ययन ज्या सामाजिक संदर्भामध्ये होते त्यापासून ते वेगळे काढता येत नाही. ज्ञान गोळा होण्याची प्रक्रियाही शिकणारा सामाजिक परिस्थितीशी एकात्म झाल्याखेरीज घडू शकत नाही. अध्ययन ही समन्वयात्मक प्रक्रिया आहे असे सांगून ती समजावून देण्यासाठी त्यांनी झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली.
ह्या सिद्धान्तानुसार विकासाच्या दोन पातळ्या आहेत. एक पातळी शिकणारा स्वतंत्रपणे गाठू शकतो तर दुसरी संभाव्य पातळी गाठण्यासाठी त्याला शिक्षकाची किंवा सहाध्यायींची मदत लागते. शिकणाऱ्याला एक पायरी वर जाता यावे म्हणून त्याला शिक्षकाचा आधार देण्याची कल्पना ह्यात आहे. ह्या आधाराने शिकणारा स्वतः पायरीपायरीने रचना करीत शिकू लागतो. त्याला शिकता येईनासे झाले की शिक्षकाने पुन्हा त्याला आधार द्यावा आणि आणखी वरच्या पायरीसाठी मार्गदर्शन करावे.
रचनावादानुसार स्मृती सातत्याने रचली जात असते. आत येणाऱ्या माहितीशी व्यक्तीची जसजशी आंतरक्रिया विशिष्ट संदर्भात होत जाते तसतसे त्या व्यक्तीला आपल्या आधीच्या ज्ञानाचा धांडोळा घ्यावा लागतो. नवी माहिती जोडली जाते किंवा सामावली जाते आणि समज आणखी सखोल आणि सार्थ होत जाते. शिकलेल्या गोष्टी वेगळ्या आणि नवनवीन संदर्भाकडे स्थलांतरित करून वापरण्याचे कौशल्य व्यक्तीला साधू लागते. वास्तव जगातील समस्या सोडविण्याची संधी ही अशा स्थलांतरणासाठी उत्तम संधी असते.
रचनावादाचे सिद्धान्त शिकण्याचे वेगवेगळे प्रकार न मानता सर्व अध्ययन किंवा शिक्षण संदर्भसापेक्ष आहे असे मानतात. रचनावादी शिक्षण सिद्धान्ताची एक दुबळी बाजू अशी की शिकणारे सगळे जण शिकण्यासाठी येताना आधीचे ज्ञान घेऊन येतात असे मानले जाते. शिकण्याचे उद्दिष्ट हे आधीचे ज्ञान क्रियान्वित करण्याचे आहे असे मानले जाते. पण एखाद्या नव्या क्षेत्राचा अभ्यास करण्यास आलेल्या विद्यार्थ्यांकडे आधीचे ज्ञान असेलच असे नाही. मग त्याच्या आधारावर संरचना कशी उभारणार? चुकीची रचना केली जाण्याचीही शक्यता आहे. म्हणूनच ज्यांच्याकडे पूर्वज्ञान नाही त्यांच्यासाठी ज्ञानात्मकतावादावर आधारित धोरण राबवून संकल्पनांच्या पायऱ्या तयार करून घेणे आणि पूर्वज्ञानाची उणीव भरून काढणे आवश्यक ठरते.
रचनावादाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थी केवळ निष्क्रियपणे ज्ञान मिळवीत नसून ते शिकण्याच्या आणि ज्ञानाची रचना करण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सहभागी असतात. शिकणे का महत्त्वाचे आहे हे शिकणाऱ्याला उमगावे असे काम शिक्षकाने त्याच्याकडून करवून घ्यावे. म्हणून रचनावादानुसार आपले अध्यापन करणारे शिक्षक केवळ लेक्चरबाजी करीत नाहीत तर विद्यार्थ्याकडे व्यक्तिगत लक्ष देऊन तो ज्या पायरीवर आहे त्याच्या वरची पायरी गाठायला तो स्वतःला मदत कशी करू शकेल हे पाहतात. त्यांची भूमिका केवळ व्याख्यात्याची न राहता ती सुविधाकारकाची होते. शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अध्ययन शैलींचे भान असणे आवश्यक आहे तरच विद्यार्थी शिकत असताना शिक्षक त्याला विचार करण्यास प्रवृत्त करू शकेल.
पहा : ज्ञानात्मकतावाद म्हणजे काय? शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -19
आणि वर्तनवाद म्हणजे काय?- शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 18
तसेच अध्ययनसिद्धान्तांचा सारांश - शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे -21
Popular Posts
-
चित्रकलेत लुडबूड करताना किंवा चित्रांविषयी वाचताना विविध रंगांच्या छटांनी मोहित होणं स्वाभाविक आहे. बर्ण्ट सिएन्ना, कॅनरी यलो, ऍक्वा मरीन ...
-
जय श्री अनंता लक्ष्मीकांता आरती ओवाळू । भक्तां संकट पडतां धावे अनंत कनवाळू ।। धृ।। भाद्रपद मासी शुक्ल चतुर्दशी तव व्रत नेमाने । दुकूलद...
-
`नमिला साष्टांग श्रीपतिभक्तिरसज्ञ वामनस्वामी । रसभावना तत्कवना मानी या तेवि वाम न स्वामी’ - मोरोपंत शाळेत वामनपंडितांच्या आणि रघुनाथपंडित...