Tuesday, April 1, 2008

चांगल्या शिक्षकाचे निकष : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोतरे - 3


शैक्षणिक
गुणवत्तेसंबंधी निव्वळ तात्त्विक किंवा सैद्धांतिक चर्चा काय कामाची? त्याचा शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व्यवहारात काय उपयोग होणार ?

असे फक्त ह्या विषयासाठीच नव्हे तर प्रत्येक विषयाच्या बाबतीत विचारता येईल. ज्यांना शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ करण्याचे काम जाणीवपूर्वक करायाचे असेल त्यांनी तात्त्विक / सैद्धांतिक भूमिका किंवा विषयाची तर्कसंगत मांडणी समजून घ्यायलाच हवी. व्यावहारिक पातळीवर काम करताना व्यवस्थापकांना किंवा शिक्षकांना 'टिप्स' देणारे साहित्य मुबलक प्रमाणात आणि सहज उपलब्ध आहे, ते वापरता येईल.

उदाहरण द्यायचे तर चांगल्या शिक्षकाचे निकष कोणते असावेत ह्याचे व्यवस्थापकांना मार्गदर्शन करणाऱ्या अनेक साईट् आज इंटरनेटवर आहेत. पारंपारिक गुरुकुल पद्धतीचा प्रभाव नाकारण्यास राजी नसलेल्या सध्याच्या भारतीय संस्कृतीला मानवेल असा चांगला शिक्षक असा असावा :

-स्वतःहून पुढाकार घेणारा आणि इतरांशी जमवून घेऊन सक्रिय राहणारा

-ठाम, पण मैत्रीपूर्ण वागणारा

-परिपूर्णतेसाठी आग्रही पण दुराग्रही नसणारा

-आपल्या विषयाचे ज्ञान असलेला आणि विद्यार्थ्यांचा गरजाही ओळखणारा

-परीक्षाभिमुख पण जीवघेण्या स्पर्धेस उद्युक्त करणारा

-टीका सौम्यपणे करणारा

अशी अपेक्षा असल्याचे मत दीप्ती गुप्ता ह्यांनी येथे नोंदवलेले आहे. अशा साईट्ससारखे अनेक स्रोत व्यवस्थापकांसाठी आज उपलब्ध आहेत.

शिक्षकांसाठी टिप्स आणि तयार सामग्री देणाऱ्या साईट् तर असंख्य आहेत. त्यात साध्या पण उपयुक्त अशाही अनेक आहेत. उदाहरणार्थ शिक्षकांना संगणकावर प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी एक उपयुक्त साधन म्हणजे आकृतीची अथवा मजकुराची मापे घेण्यासाठी स्क्रीन रूलर म्हणजे स्क्रीनवर कोठेही उभी किंवा आडवी धरता येणारी मोजपट्टी देणारी ही साईट आहे. (शिक्षकांसाठीच नव्हे तर संगणक वापरणाऱ्या इतर कोणाहीसाठी उपयुक्त असे हे साधन विनामूल्य डाऊनलोड करता येते वापरता येते.)

आपापल्या गरजेनुसार अशा सामग्रीचा मुद्रित साहित्यामध्ये किंवा इंटरनेटसारख्या संदर्भसाधनांमध्ये शोध घ्यायला हवा अथवा ह्या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यासाठी परिसंवाद, कार्यशाळा, व्याख्याने, सल्लामसलती वगैरे गोष्टींचे आयोजन करायला हवे. ह्या गोष्टी अवघड नसतात परंतु आपली सैद्धांतिक भूमिका स्पष्ट नसल्याने आपल्याला नेमके काय हवे आहे याचे भान आपल्याला आलेले नसते. हे भान येण्यासाठी शासनाने किंवा खाजगी संस्थांनी सुरू केलेले अभ्यासक्रम पूर्ण केले पाहिजेत. शिवाय विषय तर्कसंगत विवेचनातून प्रामाणिकपणे समजून घ्यायला हवा. ह्याच ब्लॉगवरील भाग1 आणि भाग 2 ह्या नोंदी म्हणजे या दिशेने सुरू केलेला माझा एक नम्र प्रयत्न आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts