या अगोदरच्या नोंदीमध्ये आपण छांदिष्टपणाचा एक नमुना पाहिला. आता खरे छांदिष्ट म्हणजे शब्दशः 'छांदिष्ट' कसे असतात याची दोन उदाहरणे पाहू. मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा उल्लेख यापूर्वीही मी केलेला आहे. या संकेतस्थळावर "
धोंडोपंत' हे व्यासंगी रसिक गृहस्थ
छन्दशास्त्राविषयी अतिशय चांगली माहिती देऊन चर्चा घडवून आणीत असतात. "उपक्रम' ह्या संकेतस्थळावर "धनंजय' यांनीही नव्या कवितेतील मात्रागणनाच्या अनुरोधाने
चांगली चर्चा सुरू केलेली आहे.
मिसळपावावर धोंडोपंतांनी एकेका वृत्ताची माहिती देण्याच्या मिषाने उत्तमोत्तम कवितांना उजाळा देण्याचा सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. कवि ग्रेस ह्यांच्या एका अप्रतिम कवितेचे उदाहरण देऊन त्यांनी
'उद्धव' ह्या जातिवृत्ताबद्दल केलेले लेखन अवश्य वाचावे.
छंदयति (= आल्हादयति) इति छंदः अशी एक व्युत्पत्ति आहे आणि छंदांसि च्छादनात् (= आच्छादनात् )- अर्थात कवितेच्या आशयाचे संरक्षण करणारी रचना म्हणजे छंद अशी यास्काचार्यांची व्युत्पत्ति आहे. ही व्याख्या पूर्णपणे प्रत्ययास यावी असे उद्धव हे वृत्त आहे. आर्तता आणि कारुण्य ह्यांच्या परिपोषासाठी आणि संवर्धनासाठी विविध कवींनी ह्या वृत्ताचा वापर केलेला आहे. (मात्र अमूक मात्रासमूह म्हणजे अमूकच चाल, अमूकच रस असे बंधन असायचे कारण नाही. रागरागिण्यांचा अपारंपारिक वापर जसा प्रतिभावंतांनी विभिन्न भाववृत्तींच्या निर्मितीसाठी केलेला आहे तसेच छंदांच्या बाबतीतही खरे आहे).
"उद्धवा शांतवन कर जा
त्या गोकुळवासी जनांचे'
मध्वमुनीश्वर ह्यांच्या ह्या प्रसिद्ध कवितेमुळे ह्या वृत्ताला उद्धव हे नाव मिळाले असावे. श्रीकृष्णाला अक्रूर गोकुळातून मथुरेला घेऊन आला. त्याच्या विरहाने आकांत करणाऱ्या गोकुळवासीयांचे सांत्वन करण्याची जबाबदारी कृष्णाने उद्धवावर सोपवली त्या घटनेवरील हे काव्य आहे.
""बा नंद यशोदा माता
मजसाठी त्यजतील प्राण
सोडूनि प्रपंचा फिरतील
मनीं उदास रानोरान""
गोकुळवासीयांच्या आकांताच्या कल्पनेने कृष्णही व्यथित झालेला आहे. गोपींविषयी तर तो म्हणतो,
""तिळतुल्य नाही मनिं दुगल्या
दृढनिश्चय करुनिं तगल्या
बहुधा त्या नसतील जगल्या
भंगले मनोरथ ज्यांचे ।। उद्धवा...।।''
उद्धव जातितील अनेक काव्ये आपल्या परिचयाची आहेत. उद्धव जातिचे चरण वापरून तयार केलेली अर्धसम वृत्तेही अतिशय प्रभावी आहेत.
उदाहरणार्थ, अक्रूर ह्या जातिवृत्तात पहिला चरण (। प । प । - -) असा अठरा मात्रांचा आहे तर दुसरा चरण उद्धव जातिचा (- । प । - -) म्हणजे चौदा मात्रांचा आहे. या वृत्तातली श्री. ग. ह. पाटील ह्यांची “श्रावणबाळ’’ ("शर आला तो धावून आला काळ') ही कविता शिकताना तर सद्गदिद होऊन स्फुंदणारे शाळकरी विद्यार्थी माझ्या आणि अगोदरच्या पिढीतील बहुतेकांना आठवत असतील.
अक्रूर जातिचे हे सामर्थ्य स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या आपल्या काव्यात अजरामर केले आहे. वीर सावरकर ह्या चित्रपटात या कवितेला अक्रूर जातिवृत्ताच्या पारंपारिक चालीच्या आधारे
सुधीर फडके ह्यांनी दिलेली चाल, चित्रपटात स्वातंत्र्यवीरांची तळमळ प्रकट करणारा उत्कट परिणाम साधून जाते आणि नंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.
उद्धव जातिचा उपयोग करून "नृपममता' हे सुंदर वृत्त तयार करण्यात आलेले आहे. उद्धव जातिच्या चरणापुढे एक "र' गण (गुरु-लघु-गुरु) ठेवून ( - । प । - -।- . – ) ते तयार होते. गोविंदाग्रजांची
'प्रेम आणि मरण' ही गाजलेली कविता नृपममता जातिमध्ये आहे.
"तो हसे जरा उपहासे
मग स्वयेचि वदला त्रासे । त्यांप्रति ।।
निष्प्रेम चिरंजीवन ते।
जगी दगडालाही मिळते । धिक् तया ।।'
किंवा
"ही त्याची स्थिती पाहुनिया
ती दीड वितीची दुनिया । बडबडे ।।
कुणी हसे करी कुणी कीव
तडफडे कुणाचा जीव । त्यास्तव ।।
अशा अनेक अविस्मरणीय ओळी गोविंदाग्रजांनी ह्या कवितेत लिहिलेल्या आहेत. कडव्याचा शेवट करताना तर त्यांनी बहार केली आहे. भवानी जातिचा खंडित चरण शेवटी वापरला आहे.
"निंदती कुणी त्याप्रति, नजर चुकविती, भितीही कोणी
जड जगास अवजड गोणी । होइ ती ।।'
किंवा
"तो योग खरा हठयोग प्रीतिचा रोग लागला ज्याला
लागते जगावे त्याला । हे असे ।।'
असो. छांदिष्टपणाला अंत नाही. मात्र श्री. धनंजय ह्यांनी त्यांच्या उपक्रमाने आणि श्री. धोंडोपंत ह्यांनी त्यांच्या छंदोवृत्तीने दिलेला आनंद शब्दातीत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन लेखन आवरते घेतो.