Friday, August 21, 2009

अध्ययनाच्या प्रेरणा : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 9

प्रश्न : अध्यापनाचे धोरण शैक्षणिक गुणवत्तेला पोषक राहण्यासाठी काय करावे?

उत्तर : एखाद्या विषयाचे अध्यापन करणे म्हणजे केवळ त्या विषयाचे पाठ्यपुस्तक शिकवणे इतकेच नाही. तो विषय विद्यार्थ्याला आपणहून शिकता येईल अशा क्षमता विद्यार्थ्यामध्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे. स्वतःहून एखादी गोष्ट शोधून काढण्यात मुलांना मिळणारा आनंद खूप मोठा आहे. आईने हातांमध्ये लपवलेला चेहराही "शोधून" काढताना बाळाला कोण आनंद मिळतो!

विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाच्या अशा प्रेरणा विकसित करण्यासाठी आज अनेक साधने आणि माध्यमे उपलब्ध आहेत. (उदाहरणार्थ, गणिताच्या शब्दकोशाचे हे संकेतस्थळ किती साधे आणि तरीही किती परिणामकारक आहे हे पाहता येईल.) त्यांचा कल्पक वापर करण्याकडे शिक्षकाचा प्रयत्न असावा. असे लहान स्वाध्यायाच्या स्वरूपातले प्रकल्प वैयक्तिक स्तरावर किंवा गटागटांना वाटून देता येतील.

शिक्षणाचे उद्दिष्ट काय? ह्या प्रश्नाची अनेक उत्तरे संभवतात. "पुढील शिक्षण घेता येण्याची क्षमता विकसित करणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट होय.' असे एक सार्वत्रिक उद्दिष्ट सांगता येते. स्वतः शिकण्यातला, एखादे तथ्य किंवा एखादी गोष्ट स्वतः शोधून काढण्यातला आनंद जर विद्यार्थ्याला घेता आला तर शिक्षकाचे ते फार मोठे यश मानायला हवे.

Tuesday, May 26, 2009

छांदिष्ट - 2

या अगोदरच्या नोंदीमध्ये आपण छांदिष्टपणाचा एक नमुना पाहिला. आता खरे छांदिष्ट म्हणजे शब्दशः 'छांदिष्ट' कसे असतात याची दोन उदाहरणे पाहू. मिसळपाव ह्या संकेतस्थळाचा उल्लेख यापूर्वीही मी केलेला आहे. या संकेतस्थळावर "धोंडोपंत' हे व्यासंगी रसिक गृहस्थ छन्दशास्त्राविषयी अतिशय चांगली माहिती देऊन चर्चा घडवून आणीत असतात. "उपक्रम' ह्या संकेतस्थळावर "धनंजय' यांनीही नव्या कवितेतील मात्रागणनाच्या अनुरोधाने चांगली चर्चा सुरू केलेली आहे.
मिसळपावावर धोंडोपंतांनी एकेका वृत्ताची माहिती देण्याच्या मिषाने उत्तमोत्तम कवितांना उजाळा देण्याचा सुंदर उपक्रम सुरू केलेला आहे. कवि ग्रेस ह्यांच्या एका अप्रतिम कवितेचे उदाहरण देऊन त्यांनी 'उद्धव' ह्या जातिवृत्ताबद्दल केलेले लेखन अवश्य वाचावे.
छंदयति (= आल्हादयति) इति छंदः अशी एक व्युत्पत्ति आहे आणि छंदांसि च्छादनात्‌ (= आच्छादनात्‌ )- अर्थात कवितेच्या आशयाचे संरक्षण करणारी रचना म्हणजे छंद अशी यास्काचार्यांची व्युत्पत्ति आहे. ही व्याख्या पूर्णपणे प्रत्ययास यावी असे उद्धव हे वृत्त आहे. आर्तता आणि कारुण्य ह्यांच्या परिपोषासाठी आणि संवर्धनासाठी विविध कवींनी ह्या वृत्ताचा वापर केलेला आहे. (मात्र अमूक मात्रासमूह म्हणजे अमूकच चाल, अमूकच रस असे बंधन असायचे कारण नाही. रागरागिण्यांचा अपारंपारिक वापर जसा प्रतिभावंतांनी विभिन्न भाववृत्तींच्या निर्मितीसाठी केलेला आहे तसेच छंदांच्या बाबतीतही खरे आहे).
"उद्धवा शांतवन कर जा
त्या गोकुळवासी जनांचे'
मध्वमुनीश्वर ह्यांच्या ह्या प्रसिद्ध कवितेमुळे ह्या वृत्ताला उद्धव हे नाव मिळाले असावे. श्रीकृष्णाला अक्रूर गोकुळातून मथुरेला घेऊन आला. त्याच्या विरहाने आकांत करणाऱ्या गोकुळवासीयांचे सांत्वन करण्याची जबाबदारी कृष्णाने उद्धवावर सोपवली त्या घटनेवरील हे काव्य आहे.
""बा नंद यशोदा माता
मजसाठी त्यजतील प्राण
सोडूनि प्रपंचा फिरतील
मनीं उदास रानोरान""
गोकुळवासीयांच्या आकांताच्या कल्पनेने कृष्णही व्यथित झालेला आहे. गोपींविषयी तर तो म्हणतो,
""तिळतुल्य नाही मनिं दुगल्या
दृढनिश्चय करुनिं तगल्या
बहुधा त्या नसतील जगल्या
भंगले मनोरथ ज्यांचे ।। उद्धवा...।।''
उद्धव जातितील अनेक काव्ये आपल्या परिचयाची आहेत. उद्धव जातिचे चरण वापरून तयार केलेली अर्धसम वृत्तेही अतिशय प्रभावी आहेत.
उदाहरणार्थ, अक्रूर ह्या जातिवृत्तात पहिला चरण (। प । प । - -) असा अठरा मात्रांचा आहे तर दुसरा चरण उद्धव जातिचा (- । प । - -) म्हणजे चौदा मात्रांचा आहे. या वृत्तातली श्री. ग. ह. पाटील ह्यांची “श्रावणबाळ’’ ("शर आला तो धावून आला काळ') ही कविता शिकताना तर सद्गदिद होऊन स्फुंदणारे शाळकरी विद्यार्थी माझ्या आणि अगोदरच्या पिढीतील बहुतेकांना आठवत असतील.
अक्रूर जातिचे हे सामर्थ्य स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांनी "ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला' ह्या आपल्या काव्यात अजरामर केले आहे. वीर सावरकर ह्या चित्रपटात या कवितेला अक्रूर जातिवृत्ताच्या पारंपारिक चालीच्या आधारे सुधीर फडके ह्यांनी दिलेली चाल, चित्रपटात स्वातंत्र्यवीरांची तळमळ प्रकट करणारा उत्कट परिणाम साधून जाते आणि नंतरही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते.
उद्धव जातिचा उपयोग करून "नृपममता' हे सुंदर वृत्त तयार करण्यात आलेले आहे. उद्धव जातिच्या चरणापुढे एक "र' गण (गुरु-लघु-गुरु) ठेवून ( - । प । - -।- . – ) ते तयार होते. गोविंदाग्रजांची 'प्रेम आणि मरण' ही गाजलेली कविता नृपममता जातिमध्ये आहे.
"तो हसे जरा उपहासे
मग स्वयेचि वदला त्रासे । त्यांप्रति ।।
निष्प्रेम चिरंजीवन ते।
जगी दगडालाही मिळते । धिक्‌ तया ।।'
किंवा
"ही त्याची स्थिती पाहुनिया
ती दीड वितीची दुनिया । बडबडे ।।
कुणी हसे करी कुणी कीव
तडफडे कुणाचा जीव । त्यास्तव ।।
अशा अनेक अविस्मरणीय ओळी गोविंदाग्रजांनी ह्या कवितेत लिहिलेल्या आहेत. कडव्याचा शेवट करताना तर त्यांनी बहार केली आहे. भवानी जातिचा खंडित चरण शेवटी वापरला आहे.
"निंदती कुणी त्याप्रति, नजर चुकविती, भितीही कोणी
जड जगास अवजड गोणी । होइ ती ।।'
किंवा
"तो योग खरा हठयोग प्रीतिचा रोग लागला ज्याला
लागते जगावे त्याला । हे असे ।।'
असो. छांदिष्टपणाला अंत नाही. मात्र श्री. धनंजय ह्यांनी त्यांच्या उपक्रमाने आणि श्री. धोंडोपंत ह्यांनी त्यांच्या छंदोवृत्तीने दिलेला आनंद शब्दातीत आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देऊन लेखन आवरते घेतो.

Monday, March 16, 2009

संपुष्ट

छांदिष्ट माणसे अनेक आहेत आणि तसेच त्यांचे नानाविध छंदही.  काही छंद संग्रह करण्याचे असतात. काडेपेट्यांपासून पोस्टाची तिकिटे जमवण्यापर्यंत अनेक.

पुस्तकप्रेमींना पुस्तकं जमवण्याचा छंद असणं स्वाभाविकच आहे. हे वेड जसजसं पराकोटीला जायला लागेल तसतशी जुनी पुस्तकं, ठराविक लेखकाची पुस्तकं, ठराविक आवृत्ती आपल्याकडे असल्याचा अभिमान वाटायला लागतो.

संतांनी असंग्रह वृत्ती जोपासण्याची गरज आहे असं कितीही कळकळीनं सांगितलं तरी त्यातून पळवाटा असतातच. ग्रंथसंग्रह करणे हे दासबोधात सत्त्वगुणाचं लक्षण म्हणून सांगितलेलं आहे ह्याचा मीही अधूनमधून आधार घेत असतो.

image

संग्रह करूनही केला नाही असं म्हणण्याची सोय आता या महाजालामुळे झालेली आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठांचा संग्रह करणारी ही साईट पाहिली तेव्हा भरून पावलो असं मला वाटलं. मराठी पुस्तकांच्या वाटेला हे भाग्य कधी येणार याची आता वाट पाहूया. लवकरच एखादी छांदिष्ट व्यक्ती- हवंतर वल्ली म्हणा- मराठी पुस्तकांच्या मुखपृष्ठांचा खजिना महाजालावर हजर करील आणि नुसते तिळा उघड असे म्हटले j2की खजिन्याची गुहा उघडेल यात मला तिळमात्र शंका नाही.  

पद्मा सहस्त्रबुद्धे यांनी केलेलं माधव आचवलांच्या जास्वंद ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ नमुना म्हणून सोबत दिलेलं आहे. मराठीत दलालांपासून अवचटांपर्यंत आणि र. कृ. जोशींपासून अच्युत पालवांपर्यंत उत्तमोत्तम चित्रकारांनी नटवलेली मुखपृष्ठांची समृद्ध दुनिया आहे. पुस्तकाच्या आशयाचा, अंतरंगाचा वेध घेणारी त्यावर समर्थपणे स्वतंत्र भाष्य करणारी अन्वर्थक आणि समर्पक मुखपृष्ठे मराठीत खरोखरच अनंत आहेत.     

नेव्हिल श्यूट च्या पॅन बुक्सच्या एका आवृत्तीत सर्व पुस्तकांची मुखपृष्ठे सुंदर ऑइल पेंटिंग्जची होती. त्यातली बरीचशी मला मिळाली.

जेन ऑस्टिनच्या पुस्तकांच्या पेंग्विन प्रकाशनाने काढलेल्या गिफ्टबॉक्स आवृत्तीत मुखपृष्ठांवर व्हिक्टोरिimageयन स्त्रियांची व्यक्तिचित्रणे आहेत. सुदैवाने ह्या आवृत्तीतील सर्व पुस्तके मी मिळवू शकलो. त्यातले प्राईड अँड प्रेज्युडिस एका मैत्रिणीने निष्काळजीपणे हरवले तेव्हा मी खूप हळहळलो. पूर्वी कुठे नाही तर काळबादेवीच्या न्यू अँड सेकंडहॅंड बुक स्टॉलमध्ये असे काही मिळण्याची आशा होती. आता तीही उरली नाही. 

पेंग्विन (आणि पेलिकन) पुस्तकांची मुखपृष्ठे हा खरंतर स्वतंत्र संशोधनाचा विषय होण्यासही हरकत नाही. अशा निवडक मुखपृष्ठांसाठी हे संकलन अवश्य पहावे.

Sunday, February 8, 2009

सहजपणाने गळते ‘मी’पण

मध्यंतरी महाजालावरील वाचन अशी एक नोंद मी ह्या ब्लॉगवर केलेली आहे. महाजालावरील ह्या मुशाफिरीत वाचनीय असे काही आढळलेले मी तेथे नोंदविलेले आहे.

आपल्या मनाच्या सकारात्मक विचार करण्याच्या ताकदीवर विश्वास असेल तर गंमत म्हणून ही साईट पाहण्यास हरकत नाही.

"Blogging : Never before have so many people with so little to say said so much to so few ."

ही ब्लॉगिंगची व्याख्या हा त्यातलाच एक मासलेवाईक नमुना आहे.

पण सर्व नकारात्मक प्रवृत्तींवर मात करतील अशा काही कामे असतात आणि ती पाहून तुमचा अहं पार लयाला जातो.

माझे ई-स्नेही श्री. अजय भागवत ह्यांनी निदर्शनास आणून दिलेल्या दोन साईट्स अशा प्रकारच्या आहेत. वरदा वैद्य ह्यांची विवस्वान ही खगोलशास्त्राविषयी मराठीतून माहिती देणारी अनुदिनी आणि त्यांचीच वातकुक्कुट ही हवामानशास्त्राची ओळख मराठीतून करून देणारी अनुदिनी पाहिली. मराठी भाषा मरणपंथाला लागलेली आहे का? अशी वायफळ चर्चा करीत बसण्यापेक्षा मराठीतून काम करण्यास सुरुवात करावी असा संदेश आपल्या कृतीतून देणा-या ह्या अनुदिनी आहेत. सचिन सखाराम पिळणकर ह्यांची अवकाशवेध ही अनुदिनीही अशीच आहे.

तात्पर्य - आंग्लाळलेल्या मराठी माणसांचा मराठीतून विज्ञान शिकण्यावर विश्वास राहिलेला नसला तरी त्यामुळे मराठी शास्त्रज्ञ निराश झाले आहेत असे मात्र दिसत नाही. मराठी विज्ञान परिषद पत्रिका आजही ते नेटाने चालवीत आहेत. विज्ञान विषयाची आकर्षक मांडणी मराठीतूनही करता येते ह्यावर आज विश्वास ठेवायला जे मराठी भाषक तयार नाहीत त्यांनी ही पत्रिका अवश्य नजरेखालून घालावी. वर्षाला रु.130/- इतक्या अत्यल्प वर्गणीमध्ये ही पत्रिका उपलब्ध आहे. (पण वर्गणी भरण्याचे कष्ट घ्यावे लागतात). परिषदेचा पत्ता आणि विज्ञान लोकप्रिय करण्याबद्दल परिषदेला मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराच्या अनुषंगाने माहिती येथे उपलब्ध आहे.

असेच अप्रूप मला विश्वास भिडे -Retired and Happy- ह्यांच्या कामाचे वाटते.

त्यांनी सारे संतसाहित्य महाजालावर आणायचा संकल्प केला असावा अशी शंका येते. हरिदास ह्यांनी येथे अपलोड केलेली कीर्तने पाहिल्यावरही आपण नतमस्तक होतो. असे नेटाने आणि निरलसपणे काम करीत राहण्याची प्रेरणा ह्यांच्यासारख्या मंडळींना होते हे आपले परमभाग्य आहे.

कोशकार्यासारख्या कामात स्वतःला गुंतवून घेणारी प्रकाशझोतापासून दूर राहून कार्य करणारी माणसे मराठीला नवीन नाहीत हे खरे, पण नव्या तंत्रज्ञानाच्या आधाराने भाषेचे कार्य साधले जाणार आहे हे ओळखून प्रयत्नशील असलेल्या सध्याच्या मंडळींच्या दूरदृष्टीला आणि चिकाटीला दाद द्यायलाच हवी.

उपक्रम हे संकेतस्थळही मला श्री. अजय भागवतांनी दाखविले तेव्हा त्याचे अस्तित्व समजले. पण माझ्यासारखेच मागासलेले अनेक असतील. हे संकेतस्थळ नेमके कोण चालवीत आहे हे मला शोधूनही सापडले नाही. लोकसंग्रहाची अपार शुद्ध जाणीव आणि प्रखर आत्मनिष्ठ वैराग्य हा ज्ञानेश्वरांचा आदर्श मराठी मनाला नेहमी मोहवतो असे दुर्गाबाई भागवतांनी लिहिलेले आहे त्याचा प्रत्यय अनेकदा येतो.

आपल्या कामाचे अनन्यसाधारण महत्त्व ज्यांनी ओळखले होते अशा काही विद्वानांनी हेतुतः मराठीतून मौलिक लेखन केले. पं. भातखंडे, वि. का. राजवाडे आणि शं.बा.दीक्षित अशी काही नावे ह्याबाबत घेता येतील. आपले लेखन दुर्लक्षिता येणार नाही आणि त्यातील आशय जाणण्यासाठी इतर भाषकांना मराठी शिकण्याची प्रेरणा मिळेल असा सार्थ आत्मविश्वास ह्या मंडळींकडे होता त्यामुळे इंग्रजीत लेखन करणे शक्य असूनही त्यांनी ते टाळले.

Friday, February 6, 2009

गुणवत्तेचे निकष : शैक्षणिक गुणवत्ता प्रश्नोत्तरे - 8

सामान्यतः कोणत्या ढोबळ निकषांनुसार संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेचे मूल्यमापन केले जाते?

सामान्यतः सोप्या भाषेत हे निकष असे सांगता येतील :

  • अभ्यासक्रमाची खोली आणि तो राबवण्यातील कार्यक्षमता
  • शिक्षक : विद्यार्थी गुणोत्तर
  • स्वीकारार्हता किंवा मागणी : एका जागेसाठी येणा-या अर्जांची संख्या
  • किती विद्यार्थी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करतात ( टक्केवारीपेक्षाही केवळ संख्या महत्त्वाची)
  • शाळेतून/संस्थेतून बाहेर पडल्यावर विद्यार्थ्यांची भविष्यात होणारी प्रगती
  • ग्रंथालय सुविधा
  • प्रयोगशाळा सुविधा image
  • संगणक सुविधा
  • संस्थेची जनमानसातील प्रतिमा / प्रतिष्ठा
  • शिक्षकांची गुणवत्ता
  • स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थ्यांचे यश
  • संस्थेला मिळणा-या देणग्या
  • संस्थेची स्रोतसमृद्धि
  • कर्मचा-यांच्या मनातील प्रतिमा
  • आत्मशोधनासाठी उत्पादकता संशोधन
  • इतर संस्थांसाठी सल्लासेवा देण्याची क्षमता

Saturday, December 20, 2008

चौकटीबाहेरचे शिक्षणचौक

भारतातील विद्यार्थ्यांना बिनभिंतींची शाळा नवीन नाही. वीटभट्‌ट्यांवरील कामगारांच्या किंवा ऊसतोडणीवरील कामगारांच्या मुलांसाठी स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या अनेक शाळा बिनभिंतीच्याच आहेत.

पण विद्यार्थ्यांना आकृष्ट करण्यासाठी ब्रिटनमध्ये सुरू झालेल्या बिनभिंतीच्या शाळा वेगळ्याच आहेत. Learning Plazza नेहमीच्या शाळांऐवजी उभारून 'student as consumer of education' ही कल्पना राबविण्याचा प्रयत्न येथे सुरू आहे. द इंडिपेंडंट ह्या वृत्तपत्रातील 'Lessons without walls' हे वृत्त अवश्य नजरेखालून घालावे.

21 व्या शतकासाठी सुयोग्य शाळा असे ह्या प्रयोगाचे वर्णन करण्यात येत आहे. आपण ह्याची माहिती घेण्याचे कारण इतकेच की ह्याची नक्कल लवकरच ह्या ना त्या स्वरूपात आपल्याकडे चालू होईल. प्रगत तंत्रज्ञानाला विरोधासाठी विरोध नाही परंतु सृष्टीशी असलेला संवाद तोडून तो प्रतिसृष्टीशी जोडण्याचा अव्यापारेषु व्यापार लोकमान्यता मिळवीत आहे ह्याचे नक्कीच वाईट वाटते.

एकेकाळी शांतिनिकेतन हा आपला आदर्श होता ह्याचे विस्मरण आपल्याला झालेले आहे.

Tuesday, December 16, 2008

घोडा का अडला?

घोडा का अडला? 
भाकरी का करपली?

(आणि पोरगी हातून का निसटली?)

ह्या साऱ्या प्रश्नांचे उत्तर एकच आहे म्हणतात. न फिरवल्यामुळे !

ह्या फिरवाफिरवीच्या फंदात पडायचं कारण म्हणजे केविन केलीच्या टेकिनमवर वाचलेला त्याचा इशारा ! ह्या नोंदीमध्ये त्याने डेव्हिड पोगच्या निरीक्षणाचाही हवाला दिलेला आहे.

डिजिटल स्वरूपात आपला सगळा "ऍनॅलॉग' डेटा रूपांतरित करायचा आपण सगळ्यांनीच सपाटा लावलेला आहे. पण ही डिजिटल माध्यमे आपली माहिती जास्त काळ टिकवू शकतात हाच मुळात एक मोठा भ्रम आहे. त्यापेक्षा कागदावरची, टेप्सवरची किंवा फिल्म्सवरची माहिती बरीच जास्त टिकून आहे.

महत्त्वाचं म्हणजे घरातल्या कंप्यूटरवर बर्न केलेल्या डीव्हीडीज्‌ फक्त 2 वर्षे टिकतात म्हणे! आणि इथे पहावं तर जो तो डीव्हीडीवर बॅक अप घेतोय. सोन्याच्या डीव्हीडीज्‌ वापरल्या तर डेटा शंभर वर्षे टिकतो हा दावाही फोल आहे म्हणतात.

ह्यावर केलीनं सुचवलेला उपाय आहे स्टोअरेज ऐवजी मूव्हेजचा. माहिती साठवण्याऐवजी एका माध्यमातून दुसऱ्या नव्या माध्यमात फिरवण्याचा - रूपांतरित करीत राहण्याचा.

आपण विषाची परीक्षा घेऊ नये हे तर खरंच पण आपण स्वतः ह्याची चाचणी घेतल्याशिवाय डीव्हीडीज्‌ फेकूनही देऊ नयेत. जास्त माहिती हवी असेल तर ही साईट अवश्य पहावी.

Popular Posts